सोशल शिक्षिकेची ज्ञानयात्रा

काही माणसे स्वतःच्या आयुष्यातील वादळांशी लढत असतानाच इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट निर्माण करतात. शिक्षक दिनानिमित्त अशाच एका ज्ञानज्योतीला- सीमा शिंदे मॅडम यांना सलाम! संघर्ष कितीही मोठा असो, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची वाट उजळत राहिली पाहिजे, या ध्यासातून त्यांनी ज्ञानदानाची अखंड ज्योत तेवत ठेवली.
सोशल शिक्षिकेची ज्ञानयात्रा
सोशल शिक्षिकेची ज्ञानयात्रा'एआय'ने संपादित केलेली प्रतिमा
Published on

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

काही माणसे स्वतःच्या आयुष्यातील वादळांशी लढत असतानाच इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची वाट निर्माण करतात. शिक्षक दिनानिमित्त अशाच एका ज्ञानज्योतीला- सीमा शिंदे मॅडम यांना सलाम! संघर्ष कितीही मोठा असो, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची वाट उजळत राहिली पाहिजे, या ध्यासातून त्यांनी ज्ञानदानाची अखंड ज्योत तेवत ठेवली.

अज्ञानाच्या गडद अंधारातून माणसाला ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाकडे नेणारी, सुसंस्कारांचे बीजारोपण करणारी आणि केवळ पुस्तकातील धडे न शिकवता जगण्याचे उदात्त भान देणारा जिवंत दीपस्तंभ म्हणजे 'शिक्षिका'. महर्षी व्यासांपासून ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापर्यंत शिक्षकाची व्याख्या ही निरंतर परिवर्तनशील राहिलेली आहे. विख्यात विचारवंत अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी शिक्षकाचे वर्णन करताना अत्यंत सुंदर भाष्य केले होते- "शिक्षकाचे सर्वांत मोठे कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात सर्जनशील अभिव्यक्ती आणि ज्ञानाची आनंददायी अनुभूती जागृत करणे!" या तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर आजच्या डिजिटल युगात शिक्षकाची भूमिका अधिक आव्हानात्मक आणि व्यापक झाली आहे. अशा या गुंतागुंतीच्या काळात, चार भिंतींच्या वर्गाला आणि पारंपरिक खडू-फळ्याच्या मर्यादेला छेद देत, तंत्रज्ञानाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत विद्यार्थ्यांच्या हृदयाचा ठाव घेणारी 'सोशल शिक्षिका' कशी असावी, याचा एक अत्यंत ज्वलंत, रसाळ आणि समृद्ध वस्तुपाठ म्हणजे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभे येथील उपक्रमशील शिक्षिका सीमा शिंदे मॅडम!

आजच्या आधुनिक काळात शिक्षण हे बऱ्याचदा महागड्या खासगी शाळांच्या चकचकाटात, अफाट स्पॉन्सरशिपमध्ये किंवा केवळ गुणपत्रिकेतील टक्केवारीच्या शर्यतीत अडकलेले दिसते. अशा गढूळ वातावरणात सीमा शिंदे मॅडम यांचा समग्र प्रवास हा शिक्षणाच्या मूळ, निर्मळ आत्म्याची प्रकर्षाने आठवण करून देणारा ठरतो. त्यांचा हा जीवनप्रवास म्हणजे केवळ एका शिक्षिकेची यशोगाथा नसून, तो अपार जिद्द, निष्ठा, कौटुंबिक त्याग आणि संघर्षातून फुललेल्या ध्येयवादाचे एक जिवंत काव्य आहे.

सीमा मॅडम यांच्या संघर्षाचे दिवस अत्यंत खडतर आणि मानवी संयमाची परीक्षा घेणारे होते. कौटुंबिक परिस्थितीमुळे अवघ्या दहावीच्या वयात त्यांचा विवाह झाला. परंतु, मनात शिक्षणाची तीव्र भूक आणि शिक्षिका बनून समाजाला घडवण्याचे उदात्त स्वप्न कायम जिवंत होते. विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर जबाबदाऱ्यांचे डोंगर उभे ठाकले असतानाही त्यांनी मनाची जिद्द ढळू दिली नाही. नवव्या महिन्याची गरोदर (Pregnancy) असताना त्यांनी बारावीचे पेपर दिले आणि नशिबाचा चमत्कार असा की, त्या महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या! त्यानंतर डी.एड. करत असताना त्यांच्या पोटी लहान मुलाचा जन्म झाला; परंतु नियतीने तिथेही क्रूर परीक्षा घेतली. बाळाच्या दोन्ही पायांत 'क्लबफूट' नावाचा व्यंगत्व निर्माण करणारा आजार होता. चिमुकल्या मुलाच्या या उपचारांची, रुग्णालयाच्या फेऱ्यांची आणि संगोपनाची कसरत सुरू असतानाच त्यांच्या यजमानांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

परंतु, महान विचारवंत स्वामी विवेकानंद म्हणतात- "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!" या विचारांनाच आपल्या जगण्याचा श्वास बनवत सीमा मॅडम संकटांसमोर डगमगल्या नाहीत. पहाटे तीन वाजता उठून दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करणे, घरातील संपूर्ण स्वयंपाक व कामे आटपणे, आजारी मुलाचे आणि पतीचे बघणे आणि मग वेळेवर कॉलेज गाठणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला. डी.एड., बी.ए., एम.ए., बी.एड. आणि एम.एड. अशी शिक्षणाची उच्च आणि उत्तुंग शिखरे त्यांनी केवळ कागदी पदव्या मिळवण्यासाठी नव्हे, तर ज्ञानाची तहान भागवण्यासाठी आणि स्वतःला समृद्ध करण्यासाठी पादाक्रांत केली. पुढे नोकरीत स्थिरावत असतानाच यजमानांना आलेला ब्रेन स्ट्रोक, सासूबाईंचे अचानक झालेले निधन आणि सासऱ्यांचे गंभीर आजारपण अशा कौटुंबिक संकटांच्या भीषण मालिकेचा त्यांनी अतिशय धैर्याने सामना केला. स्वतःच्या डोळ्यांतील अश्रूंना त्यांनी कधीही आपल्या ज्ञानदानाच्या कर्तव्यात बाधा बनू दिले नाही.

कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या भयंकर काळात जेव्हा संपूर्ण जग ठप्प झाले होते, रस्ते ओस पडले होते आणि शाळांचे दरवाजे कुलूपबंद झाले होते, तेव्हा सीमा मॅडम यांच्यातील खरी 'आधुनिक सोशल शिक्षिका' पूर्ण तेजाने उजळून निघाली. त्यांच्या शाळेतील ५० ते ६० टक्के मुले ही हातावर पोट असणाऱ्या वीटभट्टी कामगारांची आणि गरीबांची होती. त्यांच्याकडे महागडे स्मार्टफोन्स नव्हते, ना झूम किंवा गुगल मीटसारख्या ऑनलाइन मीटिंगचा खर्च परवडणारा होता. अशा कठीण प्रसंगी, 'माझे प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे' या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी स्वतःचे शैक्षणिक व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. जेणेकरून मुले आपल्या सोयीनुसार, शेजाऱ्यांच्या किंवा पालकांच्या मोबाईलवर ते व्हिडीओ कधीही पाहू शकतील.

येथूनच एका साध्या जिल्हा परिषद शिक्षिकेचा 'सोशल शिक्षिका' होण्याचा अलौकिक प्रवास सुरू झाला. आजच्या काळात शिक्षण म्हणजे केवळ 'खडू, फळा आणि पुस्तकातील धडे' उरकणे एवढेच उरलेले नाही. फ्रेंच विचारवंत जिना जॅक रुसो यांनी म्हटले होते- "बालक हे एक असे पुस्तक आहे ज्याचे प्रत्येक पान शिक्षकाने काळजीपूर्वक वाचले पाहिजे." सीमा मॅडम यांनी या सूत्राचा अंगीकार करत तंत्रज्ञानाला ज्ञानदानाचा महामार्ग बनवले. वर्गात एक साधा ट्रायपॉड लावून, कोणतीही कृत्रिम स्क्रीप्ट न ठरवता, अत्यंत नैसर्गिक आणि जिवंत वातावरणात त्या जे शिकवतात तेच थेट व्हिडीओच्या रूपात कॅमेऱ्यात कैद होते. आज यूट्यूबवर ४ लाख ३० हजारांहून अधिक आणि इन्स्टाग्रामवर २ लाख ६० हजारांहून अधिक लोक त्यांना आदराने फॉलो करतात. एका साध्या मराठी माध्यम शाळेतील उपक्रमांची ही दखल आज संपूर्ण जगभरातून घेतली जात आहे.

मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणाचा प्रभाव किती खोल आणि कायमस्वरूपी असतो, हे सीमा मॅडमच्या अध्यापनशैलीवरून स्पष्ट दिसते. नेल्सन मंडेला यांनी म्हटले होते- "तुम्ही जर एखाद्या माणसाशी त्याला समजणाऱ्या भाषेत बोललात तर ते त्याच्या डोक्यात जाते, पण जर तुम्ही त्याच्या मातृभाषेत बोललात तर ते थेट त्याच्या हृदयाला भिडते." सीमा मॅडम या तत्त्वाला धरूनच वर्गात विविध खेळ, शब्दकोडी आणि कृतीयुक्त शिक्षणाचा (Activity-based Learning) उपयोग करतात. वर्गातील ५० मुलांचा सक्रिय सहभाग, मुलांमधील भीती पार घालवून त्यांना कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने उभे राहण्यास शिकवणे यामुळे मुलांचे स्टेज डेरिंग कमालीचे वाढले आहे.

शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, याचे एक अमूल्य उदाहरण म्हणजे सीमा मॅडमचा विचार. त्या म्हणतात, "आपल्या मुलांकडून केवळ वर्गात प्रथम येण्याची किंवा डिस्टिंक्शन मिळवण्याची अपेक्षा करू नका, तर त्यांना आयुष्याच्या प्रत्यक्ष परीक्षेत उत्तीर्ण होणारे सुजाण आणि संवेदनशील नागरिक बनवा." प्रत्येक मुलाची शिकण्याची गती आणि क्षमता वेगळी असते. जे मूल पुस्तकातून शिकत नाही, ते खेळांतून किंवा प्रत्यक्ष कृतीतून शिकते. म्हणूनच, वर्गात गटकार्य देऊन मागे पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या मुख्य प्रवाहात आणतात. आज कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी लढा देणारा अवघा १० वर्षांचा लहानगा विद्यार्थी असो, ठाण्याहून खास त्यांना भेटायला येणारी एमबीएची विद्यार्थिनी असो किंवा मुंबईतील नामांकित महाविद्यालयाच्या प्रोफेसर असोत-सीमा मॅडमच्या शिक्षणशैलीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

एक आधुनिक 'सोशल शिक्षिका' म्हणून त्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि विधायक वापर कसा करावा, याचा एक आदर्श पायंडा वस्तुपाठ म्हणून जगासमोर मांडतात. सोशल मीडियावर जेव्हा नकारात्मकता आणि निरर्थक गोष्टी वेगाने पसरतात, तर मग शिक्षणाचा हा प्रकाश जगभर का पसरू नये? हा त्यांचा विचार अत्यंत क्रांतिकारक आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीची मिळालेली भक्कम साथ, जाऊबाईंचे सहकार्य, शाळेतील मुख्याध्यापक व सहकाऱ्यांचे प्रोत्साहन आणि स्वतःची अढळ चिकाटी यांच्या जोरावर त्या आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक प्रेरणास्थान बनल्या आहेत. कोणतीही व्यावसायिक जाहिरात किंवा पैशांचे प्रलोभन न स्वीकारता, अत्यंत मोफत, प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचा हा पवित्र यज्ञ त्या अविरत चालवत आहेत.

शिक्षक दिनाच्या या पावन प्रसंगी जेव्हा आपण एका 'आदर्श, आधुनिक आणि रससिद्ध शिक्षिकेचे' चित्र मनामध्ये रेखाटतो, तेव्हा सीमा शिंदे मॅडम यांचे रूप एका क्रांतिज्योतीसारखे डोळ्यांसमोर उभे राहते. खडू आणि फळ्याची पवित्र परंपरा जपत, तंत्रज्ञानाची जोड देत, स्वतःच्या आयुष्यातील संकटांची राख करत उभी राहिलेली ही शिक्षिका खऱ्या अर्थाने 'शिक्षणाचा दीप' घराघरांत पोहोचवत आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शब्दांत सांगायचे तर- "शिक्षण हे असे एक शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकता." सीमा शिंदे मॅडम यांच्या या समृद्ध प्रवासातून हेच सिद्ध होते की, जर शिक्षकाच्या मनात प्रामाणिक ध्येय, अनवाणी जिद्द आणि मुलांबद्दल अपार वात्सल्य असेल, तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना यशाच्या आणि ज्ञानदानाच्या शिखरापासून रोखू शकत नाही. अशा या आधुनिक ज्ञानदात्रीला आणि त्यांच्या निरपेक्ष सेवाभावाला शतशः प्रणाम!

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in