एक होता अय्या

अय्या हा लाजरा, हळवा असा मुलगा; इतरांच्या चेष्टेमुळे स्वतःवरच शंका घेणारा. पण मंचावर बिबट्याचा रोल स्वीकारताच त्याच्या आयुष्याला आत्मविश्वासाची नवी धार मिळते.
एक होता अय्या
Published on

कथा

माधव गवाणकर

अय्या हा लाजरा, हळवा असा मुलगा; इतरांच्या चेष्टेमुळे स्वतःवरच शंका घेणारा. पण मंचावर बिबट्याचा रोल स्वीकारताच त्याच्या आयुष्याला आत्मविश्वासाची नवी धार मिळते.

वर्गातले इतर मुलगे ‘ए अय्या’ अशीच हाक मारायचे. मुली पण त्याला चिडवायच्या. अय्या मुलांनाही सोबत नको असायचा. अय्याला मुलीही धड खेळायला घ्यायच्या नाहीत. मग त्याने कुठे जावं? काय करावं? शार्दूल तर त्याला एकदा काय म्हणाला माहिती आहे..? गॅदरिंगला परुळेकर मॅडम प्राण्यांचे नाटक बसवणार आहेत. तू वटवाघळाचं काम कर नाटकात. म्हटलं तर पक्षी म्हटलं तर प्राणी. म्हणजे धड कुठेच नाही... शार्दूलच्या या बोलण्यावर ईशान जोरात हसला आणि त्याने शार्दूलला टाळी दिली. त्यांना असं सुचवायचं होतं की, तू धड मुलगा पण नाहीस आणि नीट मुलगी पण नाहीस.

‘अय्या’चं खरं नाव सगळेच विसरून गेले. सगळे अय्या अय्या असंच करू लागले. त्याला सगळे चिडवायचे, रडवायचे त्याचं खरं तर थोडं चुकत होतं. तो पटकन मुलीसारखं ‘अय्या’ म्हणायचा. पण तो मुद्दाम करत नव्हता. तो मुलगाच होता पण सगळ्यात धाकटा. घरी सगळ्यांना मुलगी हवी होती आणि हा चौथा भाऊ जन्माला आला. मग घरच्या लोकांनी त्याला मुलीसारखं वागवलं. शाळेत जायला लागेपर्यंत त्याला मुलीचे कपडे वापरायला दिले. त्याला घरी बेबी म्हणायचे. बेबी चारचौघांत वावरू लागल्यावर सगळे त्याला हसू लागले. त्याचं बोलणं, चालणं नखरे मुलीसारखे होते.

परुळेकर बाईंच्याही हे सगळं लक्षात आलं होतं. त्यांनी गॅदरिंगच्या नाटकात अय्याला बिबट्याचं काम दिलं. बाई त्याचं खरं नाव घेत म्हणाल्या, “हे बघ स्वप्नील तू बिबट्या वाटला पाहिजेस. ‘बिल्ली’ वाटता कामा नये. मुलगा आहेस तू. जमेल तुला, जमलंच पाहिजे. मुलं तुला चिडवतात ना? त्यांना दाखवून दे रे. तू पण मुलगा आहेस. त्या शार्दूलला आपण सशाची भूमिका दिलीय. गुरगुरत त्याच्या अंगावर ये. मग शार्दूल आणि ईशान दोन ससे थरथर कापतील. तुला शरण येतील. करशील ना वाघोबाचा रोल?”

छळाला कंटाळलेला अय्या लगेच हो म्हणाला. “नक्की करेन मॅडम.” तरी ईशान गालातल्या गालात हसत बोलला, “अय्या लावणी नृत्य करणार..”

“लावणी नृत्य रक्षिता करणार आहे. स्वप्नील मर्दासारखा मर्द आहे. तो का साडी नेसेल? तू कर की मग लावणीवर नाच..” बाई स्वप्नीलच्या बाजूने आहेत हे लक्षात आल्यावर ईशान आणि शार्दूलसारख्या वात्रट मुलांना थोडा वचक बसला.

नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. रोज शाळा सुटल्यावर मुलं त्यासाठी शाळेत थांबू लागली. बिबट्याची रुबाबदार भूमिका स्वप्नील बिनधास्तपणे करू लागला. त्याला एक वेगळाच जोर चढला. बिबट्या कधी ‘अय्या’ म्हणतो का? मग वाघाचं काम करणारा मुलगा तरी असं कसं म्हणेल? मी मुलगा आहे आणि मी मुलासारखा वागणार. मुलगा म्हणून जगणार. माझ्या वाटेला जाऊ नका.. असं एक नवीनच रूप अय्या म्हणजेच स्वप्नीलने धारण केलं. आता तो अय्या उरलाच नव्हता.

परुळेकर बाईंनी पीटीच्या करमरकर सरांना काहीतरी सांगितलं असावं. करमरकर सर मुद्दाम विरारवरून मुंबईतील शाळेत शिकवायला यायचे. ते उत्तम मल्लखांबपटू होते. सर शारीरिक शिक्षणाचा तास मैदानात घ्यायचे. परुळेकर बाईंच्या सांगण्यावरून सरांनी स्वप्नीलला चक्क व्यायामशाळेकडे नेले. शाळेने जिम सुरू केली होती. नव्या व्यायामशाळेची जबाबदारी सरांवरच होती.

सर म्हणाले, “हे बघ स्वप्नील एकदम जड वजनं उचलायची नाहीत. हलक्या व्यायामापासून सुरुवात करायची. हळूहळू व्यायाम वाढवत न्यायचा. स्वप्नील व्यायामशाळेत शर्ट काढून व्यायाम करायला लागला. मुलांनी त्याला चिडवण्याआधीच सर म्हणाले, मुलगा कधी लाजतो का? सगळे मुलगेच आहेत ना इथे. लाजत लाजत व्यायाम करायचा नसतो. तू आता बिनधास्त बनत आहेस. पुन्हा वेगळं, विचित्र काही वागायचं नाही.”

मग स्वप्नीलसुद्धा बेधडकपणे व्यायाम करू लागला. घरी स्वप्नीलच्या पप्पांना आणि इतर लोकांनाही स्वप्नीलमध्ये बदल जाणवू लागले. स्वप्नील मोठ्या भावाला हसत म्हणाला, “हर्षद दादा मला पण थोडी थोडी मिशी येतेय. मी कॉलेजला जाईपर्यंत मस्त वाढेल मिशी. मर्दाला मिशी शोभते. मी मिशी कापणार नाही. बिबट्या आहे मी..”

हर्षद भावाचं हे नव रूप बघतच राहिला. आता स्वप्नीलला कुणी घरी बेबी म्हणत नाही, तर स्वप्नीलच म्हणतात. मुलांनो, मुलगा असो वा मोठा माणूस तो बदलू शकतो खरंच ना. स्वप्नील पण आरपार बदलला. आता तर तो इतक्या गर्दीतून एकट्या बोरिवलीला मामाकडे जातो. धीटपणे प्रवास करतो. करमरकर सर त्याला आता मल्लखांबावरच्या कसरतही करायला शिकवणार आहेत. स्वप्नीलची आता काही काळजीच नको!

-ज्येष्ठ साहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in