दखल
उदय कुलकर्णी
दिल्लीतील विज्ञान भवन इथे ७१ वा नॅशनल फिल्म अवार्ड सोहळा पार पडला. त्यात शाहरुख खानला अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये यामुळे आनंदाची लाट उसळली आहे, तर राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आमच्याच काळात शाहरुखला पुरस्कार मिळाला, आधी दिला गेला नव्हता, असे सत्ताधारी गट म्हणत आहे. शाहरुख मात्र नेहमीप्रमाणे शांत आहे. हेच त्याचे वैशिष्ट्य.
शाहरुख खानला ‘जवान’साठी उत्कृष्ट अभिनेता म्हणून अभिनयासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही बातमी ऑगस्टमध्ये आली तेव्हा विश्वास बसत नव्हता. वाक्यात सुधारणा करतो, तीस वर्षांनंतर त्याला मिळालेला हा पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ आहे, यावर विश्वास बसत नव्हता. इतका लोकप्रिय, प्रथम क्रमांकावरचा, हिरो म्हणून जवळपास ६२ सिनेमांत काम केलेला अभिनेता, त्याला खरंतर हा पुरस्कार कधीच मिळायला हवा होता. तसे फिल्मफेअर पुरस्कार, क्रिटीक्स अवार्ड वगैरे धरून त्याला जवळपास १४ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात दोन पुरस्कार ‘स्वदेस’, ‘चक दे इंडिया’साठी मिळाले होते. या दोन सिनेमांसाठी तरी त्याला नक्कीच राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता. पण इतक्या काळात नाही मिळाला आणि आता मिळाला. नुकताच दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
शाहरुखच्या फॅन्समध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत महिलांची संख्या मोठी आहे. एक प्रेमिक म्हणून असलेले शाहरुखचे रूप महिलांना आवडते. तरुणींच्या ‘स्वप्नातला राजकुमार’ म्हणून एक मोठा काळ शाहरुखने व्यतीत केला आहे. आज हा राजकुमार मोठा झाला आहे. प्रौढ झाला आहे. आपल्या मुलांच्या कारकिर्दीकडे डोळे लावून बसला आहे. शाहरुख खानची सुरुवात झाली ती टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यापासून. १९८८ ते १९९२-९३पर्यंत त्याच्या ‘दिल दरिया’, ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या मालिका आल्या. समांतर सिनेमाचा नामवंत दिग्दर्शक मणि कौलच्या ‘इडियट’ या सिनेमातही त्याने तेव्हाच काम केलं होतं. मालिकांमधील कामामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती, त्याची एनर्जी दिसली होती.
१९९२मध्ये त्याला सिनेमात ब्रेक मिळाला. त्यातील ‘दिवाना’, ‘राजू बन गया जंटलमन’ हिट झाले होते. ‘दिवाना’मध्ये ऋषी कपूर, दिव्या भारती होते. यात शाहरुखने बाइकवरून गाणे म्हणत एन्ट्री केली तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे टाळ्या, शिट्ट्यांनी दणदणीत स्वागत केलं होतं, याचा मी साक्षीदार आहे. ‘सर्कस’ या टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांपैकी अझिझ मिर्झाने ‘राजू बन गया जंटलमन’ सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, त्यात शाहरुखला हिरो म्हणून संधी मिळणं साहजिकच होतं. हा सिनेमा राज कपूरच्या ‘श्री ४२०’ची आधुनिक आवृत्ती होता. त्याच वर्षी ‘दिल आशना है’ सिनेमाद्वारे हेमामालिनीने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तिनेही शाहरुख व दिव्या भारतीला घेतलं होतं. या दोन नव्या कलाकारांचं टॅलेंट ओळखून मी त्यांना संधी दिली होती, असं तिने नंतर सांगितलं होतं.
१९९३च्या ‘डर’ सिनेमात त्याची खलनायकी भूमिका होती. दिग्दर्शक होता यश चोप्रा. सिनेमा हिट झाला आणि खलनायकाच्या भूमिकेत असूनही शाहरुखलाच सगळा भाव मिळाला, त्याचे ‘क..क..किरण’ गाजले. १९९३ मध्येच अब्बास-मस्तान दिग्दर्शक जोडीचा ‘बाजीगर’ सिनेमा आला होता. बाजीगर सूडकथा होती, त्यात शाहरुख अनेक खून करणारा अँटी हिरो होता. १९९४ च्या ‘अंजाम’ सिनेमातही शाहरुखची खलनायकी भूमिका होती. करिअरच्या सुरुवातीलाच अशा भूमिका स्वीकारण्याची हिंमत त्याने दाखवली. त्याचे वेगळेपण हे असे सुरुवातीपासूनच दिसून आले. १९९५चा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा यश चोप्राचा मुलगा आदित्य चोप्राचा दिग्दर्शक म्हणून पदार्पणाचा सिनेमा. हा तुफान हिट झाला. या सिनेमात तो रोमँटिक हिरो होता आणि पुढे त्याची ‘रोमँटिक हिरो’ अशीच इमेज बनली. त्याने सिद्ध केलं की, खलनायकी भूमिका करूनही पुढे हिरो म्हणून यशस्वी होता येतं. या आधी असं उदाहरण विनोद खन्नाचं आहे. त्यानेही दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या होत्या. ‘कुछ कुछ होता है’ हा करण जोहरचा दिग्दर्शनाचा पदार्पणाचा सिनेमा. यात शाहरुख हिरो होता. हा सिनेमा लोकप्रिय झाला आणि यानंतरच्या करण जोहरने दिग्दर्शन केलेल्या ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’ व ‘माय नेम इज खान’ अशा सर्व सिनेमांमध्ये शाहरुखच होता. शाहरुख व करण जोहर यांची मैत्री जगजाहीर आहे. यश चोप्रा व करण जोहर या उदाहरणांवरून असेही म्हणता येईल की, माणसे जोडण्याची कला त्याच्याकडे आहे. काही दिग्दर्शकांनी त्यांच्या पदार्पणाच्या सिनेमात त्यालाच हिरो म्हणून घेतलं होतं.
२००४ मध्ये फराह खानने ‘मैं हुं ना’द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं, त्यात शाहरुख हिरो होता. ‘ओम शांती ओम’ हा फराह खानचाच सिनेमा. दीपिका पदुकोणचा पहिला सिनेमा. इथून शाहरुखची दीपिकाबरोबरही जोडी जमली ती अजूनही कायम आहे. अशी त्याची जोडी जुही चावला, काजोल यांच्याबरोबरही होती. त्याचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले, त्यांनी बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई केली. त्याचबरोबर त्याचे काही सिनेमा सपाटून आपटले. ‘गुड्डू’, ‘रामजाने’, ‘त्रिमूर्ती’ अशा त्याच्या सिनेमांची कोणाला आठवणही नसेल. इम्तियाज अली प्रेमकथांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक आहे. २०१७ मध्ये त्याचा ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमा आला होता, त्यात शाहरुख व अनुष्का शर्मा होते. हा सिनेमा फारसा जमला नव्हता, पण शाहरुखचा दाढीमधला लूक त्याच्या चाहत्या स्त्रीवर्गाला भावला आणि त्याच्या डोळ्यातले ते प्रियकराचे भाव. ते त्याच्या प्रौढ वयातही तितकीच जादू करत होते.
पठडीतल्या सिनेमांच्या बरोबरीने शाहरुखने काही वेगळे सिनेमेही दिले. ‘स्वदेस’ हा आशुतोष गोवारीकरने दिग्दर्शित केलेला सिनेमा वेगळा होता, सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा होता. त्यात वेगळाच शाहरुख पाहायला मिळाला. त्या सिनेमातला संयत शैलीतील अंतर्मुख करणारा त्याचा अभिनयही वेगळा होता. तसाच त्याचा वेगळा अभिनय ‘चक दे इंडिया’त पाहायला मिळाला. त्यात त्याने महिला टीमचा कोच ही भूमिका साकार केली होती. एक दुखावलेला खेळाडू त्याने अप्रतिमपणे दाखवला. त्याचवेळी जिद्दी, जोशपूर्ण असा कोचही त्याने तेवढ्याच ताकदीने साकार केला. या सिनेमात रोमान्सचा पैलूच नव्हता. तरीही सिनेमा दाद घेऊन गेला. ‘डियर जिंदगी’ हा गौरी शिंदेने दिग्दर्शित केलेला सिनेमा. यात आलिया भट्टची प्रमुख भूमिका होती व शाहरुख एका मानसोपचार तज्ज्ञाच्या सपोर्टिंग भूमिकेत होता. यातील त्याचं कामही अतिशय ग्रेसफुल होतं. प्रेमात पडता पडता त्या सीमेवर तसंच थांबणं, त्यातील व्याकुळता तो न बोलता केवळ त्याच्या डोळ्यांमधून व्यक्त करतो.
विनोद करणं व त्यातही स्वतःवरच विनोद करणं हे शाहरुखचं वैशिष्ट्य आहे. ‘ओम शांती ओम’च्या वेळी तो म्हणाला होता, हिरॉईन माझ्यापेक्षा उंच आहे, वयाने लहान आहे. स्वतःकडे कमीपणा घेणारी विधानं तो करतो, ही आत्मविश्वास असलेल्या माणसाची निशाणी आहे. कारण त्याला माहीत आहे असं बोलून त्याचं मूल्य किंवा त्याची लोकप्रियता कमी होत नाही.
सध्याच्या काळात त्याने वाद टाळण्यावर अधिक भर दिल्याचे जाणवते. पण तरीही खुशमस्करी करणं हा प्रकार त्याने केला नाही, कोणाची ‘मुलाखत’ घेतली नाही. ‘माय नेम इज खान’ या २०१०च्या सिनेमाच्या वेळेस तेव्हाच्या एकसंध शिवसेनेने पाकिस्तानी खेळाडूंना सपोर्ट केला म्हणून माफी मागण्याची मागणी त्याच्याकडे केली होती तेव्हा त्याने ठामपणे त्याला नकार दिला होता. त्याचं घराणं स्वातंत्र्यसैनिकाचं आहे हे त्याने काहीवेळा सांगितलेलं आहे व त्याचा त्याला अभिमान आहे. त्याच्या देशप्रेमाबाबत शंका घेणाऱ्यांसमोर तो झुकणार नाही, हे त्याने दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर तो आपलं मुसलमान असणं लपवत नाही.
शाहरुखचा मुलगा आर्यनला २०२१मध्ये ड्रग्ज केसमध्ये अटक झाली तेव्हाही शाहरुखचं वर्तन शांत होतं, त्या संदर्भात एक शब्दही तो बोलला नाही किंवा आकाशपाताळ एक करणं, असा प्रकार त्याने केला नाही. कायद्याच्या प्रक्रियेत राहूनच त्याने या प्रकरणाचा सामना केला व पुढे आर्यन निर्दोष सुटला.
मध्यंतरी त्याचे काही सिनेमा चालले नाहीत. परंतु २०२३मध्ये आलेले ‘जवान’ व ‘पठान’ हे दोन सिनेमा बक्कळ चालले, दोन्ही सिनेमांनी भरपूर कमाई केली. दोन्हीत तो ॲक्शन हिरो होता. त्यामुळे त्याची कारकीर्द अजूनही जोरातच राहील असं दिसतं. इतका प्रदीर्घ काळ हिरो म्हणून स्टारडम टिकवणारा कलाकार क्वचितच दिसतो. आयर्न खानच्या नव्या वेबसीरिजच्या निमित्ताने शाहरुख खान पुन्हा एकदा वडील म्हणून वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. बाप असलेला शाहरुख त्यातूनही मार्ग काढेल.
काही असलं तरी अभिनेता शाहरुख आजही अभिनयाच्या भूमीवर पाय रोवून उभा आहे.
सिनेमाचे अभ्यासक