शहा मुंतोजी ब्रह्मणी यांची तितिक्षा

तितिक्षा म्हणजे सहनशीलता, प्रतिकूल परिस्थितीतही मनाची शांतता आणि स्थिरता टिकवून ठेवण्याची क्षमता. एक पातशहा जेव्हा पंढरीची वाट चालतो, ज्ञानाची इच्छा धरतो तेव्हा त्याच्या तितिक्षेच्या बळावरच तो ज्ञानप्राप्ती करतो.
Photo - Freepik
Photo - Freepik
Published on

मनाचे अभंग

डॉ. रूपेश पाटकर

तितिक्षा म्हणजे सहनशीलता, प्रतिकूल परिस्थितीतही मनाची शांतता आणि स्थिरता टिकवून ठेवण्याची क्षमता. एक पातशहा जेव्हा पंढरीची वाट चालतो, ज्ञानाची इच्छा धरतो तेव्हा त्याच्या तितिक्षेच्या बळावरच तो ज्ञानप्राप्ती करतो.

शंकराचार्यांनी लिहिलेल्या 'अपरोक्ष अनुभूती' या ग्रंथात १२ जेव्हा मी 'तितिक्षा' हा शब्द वाचला तेव्हा मला आठवले ते आमचे दहावीचे मराठीचे पुस्तक. त्यात एक वाक्य होते, "तेजस्विता, तपस्विता आणि तितिक्षा हे तारुण्याचे तीन 'त'कार आहेत." मला आता फक्त हेच वाक्य आठवतेय. बहुधा 'एका वाक्यात उत्तरे द्या' या प्रकारच्या प्रश्नात या वाक्याशी संबंधित प्रश्न येत असावा. त्यावेळी मला या तिन्ही शब्दांचे खरेखुरे अर्थ समजले होते का, हा प्रश्नच आहे. बहुतांशी मुले न कळलेल्या गोष्टी तोंडपाठ करून परीक्षेपुरते काम चालवून नेतात, तसेच मी या शब्दांबद्दल केले असावे. 'अपरोक्ष अनुभूती' अभ्यासताना पुन्हा समोर आलेल्या या शब्दाचा अर्थ आयुष्याच्या या टप्यावर मात्र मला आकळला होता. जीवनात येणारी संकटे, अडचणी न वैतागता सहन करण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा! आपले सर्वच संत हे तितिक्षेचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण त्यातही मला अधिक भावले ते स्वामी ज्ञानसागरानंद.

ते जेव्हा त्यांच्या गुरूंकडे म्हणजे कल्याणी येथील स्वामी सहजानंद यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी स्वामींकडे आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा, अशी विनंती केली तेव्हा स्वामी म्हणाले, "सध्या मठात कोणी सरपण आणणारा नाही. तू सरपण आणण्याचे काम करत असशील तर थांब." ज्ञानसागरानंदही थांबले. किती दिवस? तर तब्बल सहा महिने! सहा महिने त्यांनी बिनबोभाट सरपण आणण्याचे काम केले. कधीतरी गुरूंना आपल्यावर अनुग्रह करावासा वाटेल या आशेवर निव्वळ लाकूडफोड्याचे काम करत त्यांनी वाट पाहिली. सहा महिन्यांनंतर गुरूंनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला.

मला त्यांच्या या धैर्याची, चिकाटीची अपूर्वाई वाटली. ती यासाठी की, ज्ञानसागरानंद हे राजघराण्यातील होते. एक राजा आध्यात्मिक ओढीने महालाचा आणि राजसी जीवनशैलीचा त्याग करतो. त्याला त्याचा गुरू कोणताही आध्यात्मिक उपदेश न करता सहा महिने लाकडं फोडण्याचे काम देतो आणि हा पूर्वाश्रमीचा राजा गुरूच्या चरणाशी रहायला मिळतेय म्हणून त्यात आनंद मानतो.

गंमत म्हणजे ज्ञानसागरानंद हे त्यांचे मूळ नाव नव्हे. ते मूळचे हिंदूदेखील नव्हेत. हा 'यवन' म्हणजे मुस्लिम माणूस. बिदरवर राज्य करणाऱ्या बहामनी घराण्यातील. शहा मुंतोजी ब्रह्मणी (बहामनी) !

राजवैभवात नांदणाऱ्या या पातशहाला वैराग्य कसे आले, त्याची गोष्ट देखील विचार करावा, अशी आहे.

एकदा तो आपल्या बेगमसोबत महालाच्या खिडकीजवळ बसून केळी-साखर खात होता. केळीचा गर काढून साली खिडकीतून खाली फेकल्या जात होत्या. तितक्यात त्या खिडकीखाली एक वेडसरसा भिकारी आला आणि त्या साली उचलून खाऊ लागला. बेगमने त्याला तसे खाताना पाहिले. महालाच्या परिसरात कोणालाही फिरण्यास बंदी असताना हा इथे आलाच कसा याचा पातशहाला राग आला. पहाऱ्यासाठी उभ्या असलेल्या शिपायांना त्याने त्या भिकाऱ्याला फटक्यांची शिक्षा देण्याचा हुकूम केला. शिपायांनी त्या भिकाऱ्याला फटके देणे सुरू केले. पण त्या माराने रडण्याभेकण्याऐवजी तो भिकारी चक्क हसू लागला. त्याला हसताना पाहून पातशहाला आश्चर्य वाटले. आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते. शिक्षा मिळालेले लोक नेहमीच घाबरून दयेची याचना करतात, हा त्याचा अनुभव होता. त्याने त्या भिकाऱ्याला त्याच्या विचित्र वागण्याचे कारण विचारले. त्यावर तो भिकारी म्हणला, "हुजूर, मी साली खाल्ल्या तर माझ्या वाट्याला हे फटके आले, मग ज्याने केळ्याचा गर खाल्ला त्याच्या वाट्याला काय शिक्षा येईल ? मी या महालाच्या परिसरात आलो तर मला मार मिळाला, मग या महालात जो रात्रंदिवस राहतो, त्याची काय गत होईल? या विचाराने मला हसू आले."

त्या भिकाऱ्याच्या शब्दांनी पातशहा अस्वस्थ झाला. त्या अस्वस्थतेतच त्याने संसाराचा त्याग केला. "कुठे जावे, कोणाकडे माझ्या अस्वस्थतेचे उत्तर असेल? कोण माझ्यावर अनुग्रह करेल?" या विचारांमध्ये गढलेल्या पातशहाला आषाढी यात्रेसाठी पंढरीला निघालेली वारी दिसली. तो वारीसोबत पंढरीला पोचला. तिथल्या सावळ्या परब्रह्माच्या चरणी त्याने अन्नपाणी सोडून धरणे आरंभले. तीन दिवसांच्या उपवासानंतर विठ्ठल त्याच्या स्वप्नात आला. त्याने पातशहाला 'विवेकसिंधू' हा ग्रंथ दिला आणि कल्याणीच्या स्वामी सहजानंदांकडे जायला सांगितले.

स्वामी सहजानंदांना भेटल्यानंतर त्यांनी त्याची घेतलेली परीक्षा आपण वर पाहिली. गुरूंनी घेतलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर गुरूंनी त्यांना नवीन नाव दिले, मृत्युंजय! पुढे त्यांनी साधना करून तुरीय अवस्था प्राप्त केली. त्यांचा आध्यात्मिक अधिकार जाणून गुरूंनी त्यांना 'ज्ञानसागर' म्हटले. त्यांच्या मठाच्या परंपरेप्रमाणे शहा मुंतोजी ब्रह्मणी यांना 'ज्ञानसागरानंद' म्हटले जाऊ लागले. स्वामी ज्ञानसागरानंदांनी आपले आध्यात्मिक साधनेतील अनुभव सामान्य लोकांसाठी शब्दबद्ध केले आहेत.

ते म्हणतात,

"या देहाभ्यंतरी। जो साक्षीभूत असे निरंतरी।

तोचि आत्मा तो निर्धारी। देहावेगळा ।।

शब्द स्पर्श रूप रस गंध। या विषयांचा मानिसी आनंद।

तेथे साक्षी तू परमानंद। स्वयंज्योती।।

तू नव्हेसी नरनारी। साक्षी तू देहाचा अंतरी।

तुज जन्ममरणाची भरोवरी। नाहीच जाण।।

या इतुकीया दृश्यावेगळा । द्रष्टा आत्मा तू निराळा ।

विश्वव्यापक केवळा। सर्वाघटी तू।।"

या ओळी किती सहज शब्दांत आदीशंकराचार्याच्या अद्वैत वेदांताचे सार मांडतात!

मला शहा मुंतोजींचा जीवनप्रवास म्हणजे चमत्कार वाटतो. एक मुस्लिम पातशहा, त्याला कोणी भिकारी भेटतो काय, तो त्याच्या मनात प्रश्न निर्माण करतो काय, त्या शोधत तो पंढरपुरात पोचतो काय, तो विठ्ठलाकडे धरणे धरतो काय, विठ्ठलाचा स्वप्नसाक्षात्कार त्याला होतो काय, केवलाद्वैत वेदांतावरील 'विवेकसिंधु' हा ग्रंथ मिळतो काय, गुरू विचित्र परीक्षा घेतो काय, तो अद्वैत वेदांतावरील अधिकारी बनतो काय आणि त्याच्या लेखणीतून रसाळ ग्रंथरचना होते काय... सगळेच अद्भुत!

मनोविकारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्याविषयी लेखन.

logo
marathi.freepressjournal.in