शंभालातला निवांत निसर्गानुभव

‘शंभाला’ म्हणजे शांतता! नावाप्रमाणेच शांत, हिरवागार आणि निसर्गाने समृद्ध असलेल्या ‘शंभाला बाय द लेक’ येथे पोहोचताच मन प्रसन्न झालं. जवळच्या टेकडीवरची पायपीट, गुलाबांच्या शेतीची सफर आणि डोंगराआड मावळणाऱ्या सूर्याचं देखणं रूप अशा अनुभवांनी ही भटकंती खास बनली.
शंभालातला निवांत निसर्गानुभव
शंभालातला निवांत निसर्गानुभव
Published on: 

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

‘शंभाला’ म्हणजे शांतता! नावाप्रमाणेच शांत, हिरवागार आणि निसर्गाने समृद्ध असलेल्या ‘शंभाला बाय द लेक’ येथे पोहोचताच मन प्रसन्न झालं. जवळच्या टेकडीवरची पायपीट, गुलाबांच्या शेतीची सफर आणि डोंगराआड मावळणाऱ्या सूर्याचं देखणं रूप अशा अनुभवांनी ही भटकंती खास बनली.

कधी कधी रोजच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण निवांत घालवावेसे वाटतात. हिरव्यागार डोंगरवाटा, पावसाने चिंब भिजलेलं गवत, धुक्याने वेढलेला परिसर आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी निसर्गाची दृश्यं... यांचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा एखाद्या शांत ठिकाणी जायलाच हवं. म्हणून मी ‘शंभाला बाय द लेक’ या निसर्गरम्य ठिकाणी गेले. ‘शंभाला’ या नावाचा अर्थच शांतता. इथे पोहोचल्यावर या नावाची प्रचिती क्षणाक्षणाला येत होती.

सकाळी समोर दिसणारा निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहून दिवसाची सुरुवातच प्रसन्न झाली. इथला परिसर पाहण्याआधी जवळच्या टेकडीवर नेचर ट्रेल करण्याचं ठरवलं. ‘शंभाला बाय द लेक’चे मालक संजय पेंडुरकर यांच्यासोबत आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. पावसाळ्यात डोंगर चढण्याची मजा काही औरच असते. हिरवंगार झालेलं गवत, त्यावर साचलेले पावसाचे थेंब, पायांना जाणवणारा थंडगार स्पर्श आणि वाटेत दिसणारी रानफुलं... प्रत्येक गोष्ट मनाला भुरळ घालत होती.

टेकडी चढताना दम लागत होता, पण मध्येच थांबून दिसणारा नजारा पुन्हा पुढे जाण्याचं बळ देत होता. अचानक काळे ढग जमले आणि पाऊस सुरू झाला. रेनकोट घालून आम्ही पुढे निघालो. टेकडीच्या माथ्यावरून जाणारी चिंचोळी वाट, दोन्ही बाजूंना उतार आणि सोबत बरसणारा पाऊस यामुळे भटकंती अधिकच रोमांचक झाली. वाटेत एका नेढ्याजवळ मात्र माझा आत्मविश्वास डळमळला. पुढे जाण्यासाठी रोहितने हात दिला आणि त्याच्या मदतीने ते नेढं पार केलं. परतीच्या वेळी तेच अंतर सहज पार करता आलं, तेव्हा स्वतःचंच हसू आलं! पुढे एका बाजूला सोमवडी तलाव आणि दुसऱ्या बाजूला शिरोटा तलाव दिसत होते. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आम्ही खाली परतलो.

होमस्टेमध्ये परतल्यावर गरमागरम पोहे, समोर पडणारा पाऊस आणि संजयदादांच्या बासरीच्या सरावातून उमटणारे सूर, असं प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळालं. माझी खोलीही छान होती. डबल बेड, सुंदर कमानी असलेल्या खिडक्या आणि बाहेर दिसणारा निसर्गरम्य परिसर मनाला भावला. इथे पाच बेडरूम आणि चार डॉर्मिटरी रूम्स आहेत. झाडांनी वेढलेली जागा, बाहेर बसण्यासाठी भरपूर जागा आणि बॅकवॉटरचं दृश्य पाहण्यासाठी खास डेकही आहे. त्यामुळे वीकेंडला निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरलं आहे.

इथून जवळच असलेल्या गुलाबाच्या शेतीला दिलेली भेट हा माझ्यासाठी अनपेक्षित आनंद होता. पिवळे, गुलाबी आणि पांढरे गुलाब पाहताना त्यांचा मंद सुगंध मन प्रसन्न करत होता. गुलाबांची उंचीनुसार मोजणी, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेली फुलं, काटे काढण्याची प्रक्रिया आणि फुलांचं पॅकिंग हे सगळं जवळून पाहता आलं. प्रवासात अचानक काहीतरी नवीन शिकायला मिळण्याचा आनंदच वेगळा असतो. दुपारच्या जेवणात अळूवडी, स्टफ्ड कॅप्सिकम, आलू-मटारची भाजी, चपाती, भात आणि खास आमटी असा घरगुती बेत होता. संजयदादांच्या आई स्वतः स्वयंपाकघरातील पदार्थांवर लक्ष ठेवतात. काळ्या वाटाण्याची आमटी, चण्याची आमटी, कोकणी भाज्या असे विविध पदार्थ त्या आवडीने बनवतात. त्यांच्या गप्पांमधून इथल्या घरगुती खाद्यसंस्कृतीची ओळख झाली.

दुपारची विश्रांती घेतल्यानंतर आम्ही कोंडेश्वर देवालयाकडे निघालो. जुन्या मंदिराचं नूतनीकरण झालं आहे. मंदिराशेजारी असलेला धबधबा आणि त्यातून तयार झालेली खोल कोंडं पाहण्यासारखी आहेत. संजयदादा हाडाचे ट्रेकर असल्याने त्यांनी परिसरातील पठारं, धनगरवाड्या आणि आसपासच्या गावांची माहिती दिली. पुढे कारवीच्या दाट झाडीतून वाट काढत आम्ही एका छोट्या, पण खोल कोंड असलेल्या धबधब्यापाशी पोहोचलो. कातळाच्या भिंतींवर उमललेली गुलाबी फुलं आणि पाण्याचा नितळ साठा यामुळे हे ठिकाण अधिकच सुंदर दिसत होतं. दिवसाचा शेवट झाला तो डोंगराच्या काठावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताने. खाली पसरलेला कर्जत तालुका, चमचमणारी उल्हास नदी आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात उजळलेली गावं... हे दृश्य मनात कायमचं कोरलं गेलं. ‘शंभाला बाय द लेक’मधली ही भटकंती म्हणजे निसर्ग, खाद्यसंस्कृती आणि शांततेचा सुंदर अनुभव होता. तुम्हालाही रोजच्या धावपळीतून थोडा विरंगुळा हवा असेल, तर या निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in