

विचारपान
संदीप प्रधान
शिवसेनेत गद्दारी करणाऱ्याचा खोपकर केला जाईल, असे संदेश ठाण्यातील हत्येने दिला गेला होता. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. एकेकाळी बंडखोरांना सळो की पळो करून सोडणारी शिवसेना इतकी विकलांग का व कशी झाली?
तारीख होती २१ एप्रिल १९८९ ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली गेली. सुमारे महिनाभरापूर्वी महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची दोन मते फुटली होती. त्यापैकी एक मत खोपकरचे होते, असा संशय असल्याने ही हत्या घडवून आणली गेली. त्या दिवसापासून शिवसेनेत गद्दारी करणाऱ्याचा खोपकर केला जाईल, असा संदेश तमाम शिवसैनिक व नेत्यांना दिला गेला. १८ जून २०२६ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. सहा खासदार फुटल्याची चर्चा गेले तीन दिवस सुरु होती आणि ते सहा खासदार बैठकीकडे फिरकले नाहीत. शिवसेना साठीच्या घरात आली असताना आजूबाजूची परिस्थिती आणि शिवसेना दोन्ही कमालीच्या बदलल्या आहेत. खोपकर हे शिवसेनेतील पहिले बंड होते. ते शिवसेनेनी त्यांच्या रक्तरंजीत शैलीत हाताळले. १९६६ साली जन्माला आलेल्या शिवसेनेच्या जन्माची कहाणी हीच संघर्षाची. मग तो संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मोरारजी देसाई यांच्या अडेलतट्टूपणा विरुद्ध, मराठी माणसांच्या नोकऱ्यांकरिता. मुंबईतील गिरणी कामगार हा या शहरातील अर्थव्यवस्थेचा कणा होता. हा कामगार लढवय्या होता. आपल्या हक्कांकरिता रक्त सांडवायला मागेपुढे पाहत नव्हता. हाच कामगार हळूहळू शिवसेनेशी जोडला गेला. सोडावॉटरची बाटली अचूक भिरकावण्यापासून एखाद्याच्या पार्श्वभागावर वस्तरा फिरवण्यात हा कामगार तयार होता. केस अंगावर घ्यायला घाबरत नव्हता. शिवसेनेची दहशत बसवण्यात याच कामगार वर्गाचा मोठा हातभार लागला. मुंबईतील गँग आणि त्यामधील भाई लोकांवर शिवसेनेची जरब होती. ज्यांचा पोलिस एन्काउंटर झाला असता अशा अनेकांना शिवसेनेनी राजकारणात आणून प्रतिष्ठा व ओळख दिली. जळत्या विस्तवासारख्या असलेल्या शिवसेनेत मोठे बंड झाले ते छगन भुजबळ यांचे. भुजबळ हे त्यावेळी महापौर व आमदार होते. महापौर म्हणून केलेल्या आकर्षक घोषणा आणि शरद पवार यांच्या विरोधात भूखंडाचे श्रीखंड खाणारा मुख्यमंत्री म्हणून बँनर फडकवून भुजबळ यांनी दररोज वृत्तपत्राच्या हेडलाईन मिळवण्याचा सपाटा लावला होता. भुजबळ यांची लोकप्रियता वाढत होती. त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपद मनोहर जोशी यांना देण्याचा निर्णय घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांचे पंख कापले. भुजबळ यांच्या बंडाची ठिणगी पडली. मंडल आयोगाला ठाकरे यांनी विरोध केला होता तर भुजबळ यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची संधी दिसत होती. भुजबळ यांनी मंडल आयोगाला शिवसेनेनी केलेल्या विरोधामुळे पक्ष सोडला. तेव्हा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिक भुजबळ यांच्या मागावर होते. भुजबळ जर तेव्हा शिवसैनिकांच्या हातात सापडले असते तर विपरीत घडले असते. माझगावमध्ये भुजबळ यांचा पराभव करूनच शिवसेना शांत झाली.
नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांचे आर्थिक साम्राज्य पाहून शिवसेनेत अस्वस्थता पसरली. शिवसेनेचे काही नेते जेव्हा दोन-पाच लाखांची देणगी पक्षाला देताना का-कू करत होते तेव्हा नाईक यांनी एक कोटींची देणगी दिली आणि शंभर रुग्णवाहिका. यामुळे अनेकांचे डोळे विस्फारले. शिवसेनेच्या जोरावर हा माणूस इतका बलवान कसा झाला? हा जर पक्षाला एक कोटीची देणगी देतो तर हा किती कोटींचा धनी आहे? अशा प्रश्नांचे मोहोळ मनात उठल्याने नाईक यांचे पंख छाटले गेले. मग त्यांनीही शिवसेनेला रामराम केला. भुजबळांची वाढती लोकप्रियता असो की नाईक यांची आर्थिक सुबत्ता या दोन्ही गोष्टी शिवसेनेत नेतृत्वाला रुचल्या आणि पचल्या नाहीत. नाईक यांना देशातील एका बड्या उद्योगसमूहाचा पाठिंबा होता. त्यामुळे भुजबळ यांचा पिच्छा पुरवला गेला तसा तो नाईक यांचा पुरवला गेला नाही. शरद पवार यांच्यासोबत गेलेल्या नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ कोटींची सर्वाधिक देणगी दिली होती. भुजबळ किंवा नाईक यांच्या राजकीय व आर्थिक प्रगतीमुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व ना असुरक्षित झाले ना अस्वस्थ. उलटपक्षी या दोघांच्या राजकीय व आर्थिक ताकदीचा पक्षाकरिता पुरेपूर वापर करुन घेण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला यश आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विलक्षण करिष्मा होता. मात्र तरीही त्यांच्या कारकिर्दीत भुजबळ व नाईक यांनी पक्ष सोडला. उद्धव ठाकरे हे दीर्घकाळ राजकारणापासून दूर होते. आपल्या फोटोग्राफीत व्यस्त राहिले. २००० च्या दशकात उद्धव हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनाच तो ठराव मांडायला लावला. १९९९ मध्ये नारायण राणे जेमतेम सहा महिन्यांकरिता मुख्यमंत्री असताना भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला सहा महिने अगोदर विधानसभा निवडणुका घ्यायला लावल्या. राणे यांच्या आक्रमक नेतृत्वाची भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांना धास्ती वाटत होती. १९९९ मध्ये निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीची सत्ता सहज आली असती. परंतु भाजपने आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र द्यायला हेतूतः विलंब केला. नारायण राणे यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले. पुढे काँग्रेसचे आमदार फोडून मातोश्री क्लबवर नेऊन ठेवून सत्ता उलथवण्याचा प्रयोग राणेंनी केला. मात्र राणेंच्या या मनसुब्यांना जसा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे परममित्र गोपीनाथ मुंडे यांचा विरोध होता तसाच किंवा त्याहून अधिक विरोध उद्धव ठाकरे यांचा होता. या बंडाशी शिवसेनेचा संबंध नाही हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून वदवून घेण्यात उद्धव यशस्वी झाले. तेथेच राणे यांच्या बंडाची बिजे रुजली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी मातोश्रीवरुन उमेदवारांना फोन करून मुख्यमंत्रीपदाकरिता राणे यांचे नव्हे तर उद्धव ठाकरे यांचे नाव घेण्याचे संदेश गेले. राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय खरेतर तेव्हाच घेतला होता. राणे यांची पार्श्वभूमी वादग्रस्त होती. चेंबूरमध्ये त्यांची दहशत वाटेल इतका दबदबा होता. त्यामुळे राणे यांनी बंड केले तेव्हा प्रथमच बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर मार खातोय, असे चित्र दिसले. नेमस्त स्वभावाच्या उद्धव यांनी शिवसेनेतील अनेक भाईंना कोपऱ्यात टाकून सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे, अनिल देसाई वगैरे नेमस्त व व्हाईट कॉलर नेत्यांना पदे दिली होती. राणेंच्या राडेबाजीपुढे शिवसेनेनी अक्षरशः नांगी टाकली. जागतिकीकरणानंतर मराठी तरुण विविध क्षेत्रात नोकऱ्या करु लागले. राडेबाजी करुन केस अंगावर घेण्याची त्यांची मानसिकता झपाट्याने कमी झाली. गँगवॉरही थंडावले. त्यामुळेही शिवसेनेतील राडेबाजी रोडावली.
उद्धव व राज ठाकरे यांनी खरेतर गुण्यागोविंदाने शिवसेना सांभाळली असती तर कदाचित या दोघांची आज जी दारुण राजकीय परिस्थिती झालेय ती झाली नसती. बाळासाहेबांनी राज यांच्याकडे नाशिक व पुण्याची जबाबदारी सोपवली होती. परंतु या दोन्ही शहरातील राज यांच्या निकटवर्तीयांना परस्पर पदावरुन दूर करणे व आपली माणसे नेमणे असा सपाटा उद्धव यांनी लावला. त्यामुळे राज यांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेतील उरलेसुरले किंवा सायडिंगला फेकलेले आक्रमक, खळ्ळखट्याक करणारे नेते राज यांच्यासोबत निघून गेले. 'मी मुंबईकर' सारखे अभियान राबवून परप्रांतीयांना शिवसेनेच्या प्रवाहात आणण्याचे व्यापक राजकारण उद्धव यांनी सुरु केले. उद्धव यांच्या कार्यकाळात भाजपसोबतचे शिवसेनेचे संबंध बिघडत गेले. राजकारणात काँग्रेसचा हात धरण्याची व वेळप्रसंगी भाजप या मित्रपक्षाला टांग देण्याची मानसिकता याच काळात उद्धव यांची झाली होती.
भाजपचे नेते नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले आणि देशभरातील अनेक नेत्यांच्या करिष्म्यावर संक्रांत आली. मोदींच्या भाजपचे मित्र होऊन ते देतील त्या राजकीय तुकड्यांवर गुजराण करा किंवा मोदींच्या भाजपच्या विरोधात संघर्ष करा हे दोनच पर्याय देशातील जवळपास सर्व राजकीय पक्षांसमोर आहेत. उद्धव यांनी संघर्षाचा पर्याय स्वीकारला. कारण मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेनी धाकटेपण स्वीकारावे ही कल्पनाच उद्धव यांना मान्य नव्हती. उद्धव यांच्यावरील राजकीय संकटाची मालिका येथे सुरु झाली. काँग्रेस व शरद पवार यांच्या मदतीने उद्धव यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन मुख्यमंत्रीपद मिळवल्याने तर भाजपचा तिळपापड झाला. अर्थात उद्धव यांची मुख्यमंत्रीपदाची मनिषा २००४ पासून होती. भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही त्याची कल्पना होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव यांनी आपल्या नेते, खासदार, आमदार यांच्याशी असलेला संपर्क वाढवायला हवा होता. आपल्या विश्वासू सहकाऱ्यांची टीम बनवायला हवी होती. मोदी व त्यांचा भाजप आपल्या बंडाचा कसा वचपा काढू शकतात, याचा अंदाज उद्धवनी बांधायला हवा होता. शिवसेनेला भरभरून रसद देणाऱ्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री होऊ न देण्याची जी किंमत मोजली होती ती लक्षात घेता तशीच चूक एकनाथ शिंदे यांच्याबाबत करायला नको होती. कारण शिंदे हेही पक्षाला रसद पुरवत होते. अयोध्येत महाआरती करायची असो की, शिवाजी पार्क सभा गाड्या भरून माणसे आणण्यापासून सर्व व्यवस्था शिंदे करत होते. मग त्या बदल्यात शिंदे यांनी चार पैसे गाठीशी बांधले तर अवस्थ होऊन त्यांच्या आर्थिक दोऱ्या छाटण्याची गरज नव्हती. मात्र भुजबळ-नाईक यांच्या काळातही शिवसेना नेतृत्व असुरक्षित दिसले व राणे-शिंदेंच्या काळातही तीच असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली.
शिंदे यांची उपेक्षा करताना त्यांनी किती आमदारांना उपकृत केलेय, याचे भान देखील उद्धव यांनी राखले नाही. अखेर शिंदे यांनी बंड केले व भाजपच्या महाशक्तीच्या आशीर्वादामुळे शिवसेना उभी फोडली. भाजपच्या पाठिंब्याखेरीज शिंदे एवढे मोठे बंड करूच शकले नसते. आता शिंदे यांच्या उमेदवारांच्या विरोधात लढून जिंकलेले सहा खासदार फोडले. कदाचित उद्या पुन्हा आमदार, नगरसेवक फोडतील. गद्दारांचा खोपकर करणारी शिवसेना अक्षरशः विकलांग झाल्याचे चित्र सध्या दिसतय.
pradhansandeep19@gmail.com