मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला...

सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन आजही लाखमोलाचा आहे. या दिनाने स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ग्वाही दिली. या सोहळ्याला देशातील वेगवेगळ्या राजसत्तांसह इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या दिनाचा वृत्तांत स्थानिकांसह या परकियांनीही लिहिला. त्यातून आपल्याला आजही या सोहळ्याचे दर्शन होते.
मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला...
Published on

पाऊलखुणा

सहा जून हा शिवराज्याभिषेक दिन आजही लाखमोलाचा आहे. या दिनाने स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ग्वाही दिली. या सोहळ्याला देशातील वेगवेगळ्या राजसत्तांसह इंग्रज, डच, पोर्तुगीज यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या दिनाचा वृत्तांत स्थानिकांसह या परकियांनीही लिहिला. त्यातून आपल्याला आजही या सोहळ्याचे दर्शन होते.

शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आणि स्वराज्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले. रायगड किल्ल्यावरून तोफांची सलामी देण्यात आली. मंगलवाद्यांच्या जल्लोषामुळे स्वराज्यातील वातावरण मंगलमय झाले. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर रायगड किल्ल्याबरोबरच संपूर्ण स्वराज्यात आनंदाचे, उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. राज्याभिषेकाचे वर्णन करताना सभासद आपल्या बखरीत म्हणतो, “सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले. कित्येक नवरत्नादिक सुवर्णकमळे व नाना सुवर्णफुले, वस्त्रे उदंड दिली. दानपद्धतीप्रमाणे षोडश इत्यादिक दाने केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी अष्टप्रधानांनी उभे रहावे. पूर्वी कृतायुगी, त्रेतायुगी, द्वापारी, कलियुगाचे ठायी पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले.”

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन सभासद बखरीप्रमाणेच राज्याभिषेकप्रसंगी उपस्थित असलेला ब्रिटिश अधिकारी हेन्री ऑग्झिंडेनच्या रोजनिशीमध्येही करण्यात आले आहे. राज्याभिषेकाचा सविस्तर वृत्तांत देणारी एकमेव परकीय व्यक्ती म्हणजे हेन्री. राज्याभिषेकप्रसंगी हेन्री ऑग्झिंडेन प्रत्यक्षात उपस्थित असल्यामुळे त्याने केलेले शिवराज्याभिषेकाचे वर्णन अत्यंत महत्त्वाचे ठरते. ब्रिटिशांचा प्रतिनिधी म्हणून हेन्री ऑग्झिंडेन हा अधिकारी उपस्थित होता. रायगडाचे वर्णन, राज्याभिषेक सोहळ्यातील विधी, दरबारी मानपान आदी सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती त्याने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिली आहे. रायगडावरील राजदरबाराचे त्याने केलेले चित्रण थेट शिवकाळात घेऊन जाणारे आहे.

 ब्रिटिश लायब्ररीत असलेल्या हेन्री ऑग्झिंडेनच्या डायरीतील 
सोहळ्याच्या वृत्तांताचे पान. छायाचित्र सौजन्य -संकेत कुलकर्णी, लंडन.
ब्रिटिश लायब्ररीत असलेल्या हेन्री ऑग्झिंडेनच्या डायरीतील सोहळ्याच्या वृत्तांताचे पान. छायाचित्र सौजन्य -संकेत कुलकर्णी, लंडन.

हेन्री ऑग्झिंडेनने लिहिलेला वृत्तांत

“सहा जून, सात किंवा आठच्या सुमारास दरबारात गेलो आणि पाहिले की राजा एका भव्य सिंहासनावर विराजमान झाला होता आणि त्याच्या दिमतीला उभ्या असलेल्या सरदारांनी उंची वस्त्रे परिधान केली होती. त्याचा पुत्र संभाजी राजा, पेशवा मोरो पंडित आणि एक लौकिक असलेला श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली पायरीवर बसले होते. इतर सर्व व लष्करी अधिकारी बाजूला आदराने उभे होते. लांबूनच मी मुजरा केला आणि नारायण शेणवीने त्याला नजर करण्यात येणारी हिऱ्याची अंगठी उंचावलेल्या हातात धरली. आता त्याने आमची दखल घेतली आणि आम्हाला सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याची आज्ञा केली. तिथे आम्हाला पोशाख देऊन जाण्याचे संकेत देण्यात आले. आम्ही निघालो. पण लगेच नाही. मला दिसले की, सिंहासनामागे दोन्ही बाजूंना सुवर्णांकित भाल्यांच्या टोकावर (मुसलमानी पद्धतीची) अनेक अधिकारदर्शक व राजसत्तानिर्देशक चिन्हे दिसत होती. उजव्या हाताला दोन मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. सिंहासनाच्या डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छे भाल्यांच्या टोकांवर लटकवलेली होती. एका मौल्यवान भाल्याच्या टोकावर सोन्याच्या तराजूची न्यायचिन्हांची पारडे समपातळीत लोंबकळत होती. आम्ही राजवाड्याच्या दरवाज्यापाशी आलो तर तेथे दोन्ही बाजूंना दोन लहान गजराज आणि सोन्याच्या साजाने शृंगारलेले उमदे सफेद घोडे उभे होते. ते बघून गडाच्या एवढ्या अरुंद आणि बिकट वाटेवरून ते गडावर कसे वर आणले असतील, याचे आम्हाला कौतुक वाटत राहिले.”

या नोंदीसह हेन्रीने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचाही उल्लेख केला आहे. तो लिहितो, “शिवाजी यांचे वय ४७ असून, ते देखणे होते. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य सहज जाणवायचे. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा अधिक गौर होता. त्यांची नजर तीव्र आणि नाक सरळ व टोकास थोडेसे वाकडे होते. दाढी निमुळती व मिशा विरळ होत्या. त्यांचे बोलणे ठाम, स्पष्ट आणि जलद होते.”

शिवाजी महाराजांच्या वजनासंदर्भातही हेन्रीने नोंद केली आहे. २९ मे १६७४ रोजी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली, त्यावेळी त्यांचे वजन १६,००० होन भरले. डच दस्तावेजांतील नोंदींनुसार या तुलेत फक्त सोनेच नव्हे, तर चांदी, तांबे, जस्त, कथिल, शिसे, लोखंड, ताग, कापूर, मीठ, खिळे, जायफळ, मसाले, लोणी, साखर, विविध प्रकारची फळे व खाद्यपदार्थ यांचाही समावेश करण्यात आला होता.

शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यात दीर्घकाळापासून तहाच्या चर्चेला चालना मिळालेली होती. कोकणातील व्यापार वाढवणे, राजापूरच्या वखारीत मराठा सैन्याने केलेल्या नुकसानीची भरपाई मिळवणे, नवीन सवलती प्राप्त करणे, आधी झालेल्या तहावर पुन्हा एकदा निश्चितता आणणे, नव्या मागण्यांना कायमस्वरूपी मान्यता मिळवणे, तसेच स्वराज्यांतर्गत इंग्रजांचे चलन वापरण्यास परवानगी मिळवणे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. या सर्व मागण्या पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने इंग्रज वखारीतून हेन्री ऑग्झिंडेन याची रायगडावर वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्याच्यासोबत संवादासाठी नारायण शेणवी हा दुभाषी म्हणून पाठवण्यात आला होता.

१३ जूनपर्यंत हेन्री रायगडावर होता. वीस कलमांचा तह पूर्णतः निश्चित झाल्यानंतरच त्याने गड सोडला. राज्याभिषेकासारखा एवढा मोठा, महत्त्वाचा मंगलसोहळा साजरा होत असतानाही एवढ्या धामधुमीत सुद्धा शिवाजी महाराजांनी इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या आणि आपल्याला हव्या त्या अटी इंग्रजांकडून मान्य करून घेतल्या. शिवाजी महाराजांचा ‘अष्टावधानी’ गुण येथे प्रकर्षाने जाणवतो.

मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषेकाकडे पाहिले जाते. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या बहुतांश भागात मुस्लिम सत्तांचे वर्चस्व असताना त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करून शिवाजी महाराजांनी शून्यातूनच नवीन स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेकामुळे मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाली. शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे जे असामान्य कार्य केले होते, त्याची परिणती राज्याभिषेक सोहळ्यामध्ये होणे अटळ होते.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी सभासद म्हणतो, “या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.”

मुघल, आदिलशहा व कुतुबशहा या राजवटीत चाकरी करून अनेक मराठा सरदार स्वतःला ‘राजे’ म्हणवून घेत असत. पण त्यांना स्वतःला विधीयुक्त राज्याभिषेक मात्र करता येत नसे. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशहा व कुतुबशहा यांना आपण स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीश झाल्याचे दाखवून दिले.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापन केल्यामुळे चारशे वर्षांपेक्षा अधिक काळ गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नमूद करावी, अशी ही घटना होती. शिवराज्याभिषेकामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली. परकीय राजवटीच्या वर्चस्वाखाली सर्वस्व हरवून बसलेल्या समाजामध्ये स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची व पराक्रमाची भावना निर्माण करण्याचे कार्य राज्याभिषेकाने केले. शिवराज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजपदाला कायद्याची मान्यता मिळाली. स्वराज्य स्थापनेचे कार्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीत लावलेले स्वराज्याचे रोपटे पाहता पाहता भारताच्या बहुतांश भागात पसरत गेले. म्हणूनच हा राज्याभिषेक दिन आजही लाखमोलाचा आहे.

rakeshvijaymore@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in