
सिनेरंग
पूजा सामंत
स्त्री, आशिकी २ यासारख्या सिनेमांमधून बॉक्स ऑफिस गाजवणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक असणारा भाऊ सिद्धांत कपूर या दोघांचं भाऊ-बहीण म्हणून एक स्वतंत्र विश्व आहे. आयुष्यातल्या वाईट काळात एकमेकांचा आधार बनलेले हे दोघे आजही एकमेकांची सपोर्ट सिस्टीम आहेत. ९ ऑगस्ट, रक्षाबंधनाचा दिवस जवळ येतोय. घरोघरी रक्षाबंधनाची तयारी सुरू झालीय. त्यानिमित्ताने श्रद्धा आपल्या लाडक्या भैयाविषयी, दोघांच्या नात्याविषयी व्यक्त होत आहे.
सिद्धांतदादा, ज्याला मी भैया म्हणते, तो माझा फक्त भाऊ नाही, तर जीवाभावाचा मित्र आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात छोट्यामोठ्या अनेक बाबी असतात ज्या आपण पालकांना सांगत बसत नाही. कधी त्यांचा ओरडा बसेल म्हणून किंवा आपलेच हसे होईल म्हणून..किंवा कधी पालकांकडे वेळ नसतो म्हणून..असो. कारणं काहीही असोत. माझं आणि सिद्धांतभैयाचं असंच मेतकूट आहे. आम्ही एकमेकांना आपापल्या आयुष्यातलं सगळं सांगतो. एखादी गोष्ट किती का छोटी असेना, पण ती एकमेकांना सांगितल्याशिवाय आम्हाला रहावत नाही. अनेक वर्षं आम्ही छोट्या फ्लॅटमध्ये राहत होतो. त्यामुळे सतत एकमेकांच्या सान्निध्यात असायचो. आम्ही रात्र-रात्र गप्पा मारत असू.
भैयाचं आणि माझं अल्टिमेट स्वप्न होतं, ते म्हणजे अभिनय क्षेत्रात जाण्याचं. दोघांनाही ॲक्टर व्हायचं होतं. भैयाने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी संधी शोधू लागला. मला आधी मॉडेलिंगमध्ये संधी मिळाली आणि मग अभिनयात. दरम्यान, भैयाचा शोध सुरू होता. कधी त्याची ऑडिशन खूप छान होत असे, घरी आल्यावर तो त्या ऑडिशनबद्दल अगदी सगळं सांगत असे. त्याला खात्री असे की तो चित्रपट त्यालाच मिळेल. पण शूटिंग सुरू झालं की त्याला समजे की त्याच्या जागेवर कुणा दुसऱ्यालाच घेतलं आहे. अन्य हिरो आला आणि सिद्धांतभैयाची उचलबांगडी झाली, असं होत असे. अशा वेळी खूप निराश व्हायचा माझा भाऊ. अर्थात हे ऑडिशनचं चक्र फिल्म/टीव्ही/नाटक/ओटीटी कलाकारांच्या वाट्याला येत असतंच. त्याला इलाज नाही. पण त्या त्या वेळी त्या नैराश्याच्या भावना शेअर करण्यासाठी कुणी तरी जीवाभावाचं हवं ना? मित्र असतात, पण त्यातले अनेक पाठीमागून खिल्ली उडवतात. आपलं दु:खं ऐकून घेतात आणि नंतर दुसरीकडे सांगतात. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांसाठी असा विश्वासाचा, भरवशाचा खांदा बनलो, मानसिक आधार झालो.
मी आणि तो एकाच व्यवसायातील असल्याचा हा फायदा आहे, हे नक्की. व्यथा, आनंद, दुःख, अपमान.. सगळ्या भावभावना सांगण्याचं एकमेव हक्काचं स्थान म्हणजे माझा सिद्धांत भैया आणि त्याच्यासाठी मी..
त्याला करियरच्या आरंभीच अनेक नकार पचवावे लागले. तेव्हा त्याने न राहून, विषादाने मला सुचवलं, “छोटी, (श्रद्धाचे घरगुती लाडाचे नाव) तू ॲक्टिंग में ट्राय करना छोड दे! बहोत स्ट्रगल हैं यहा!” मी ज्या चक्रातून गेलो त्याच चक्रातून माझ्या धाकट्या बहिणीने जावं असं मला मनापासून वाटत नाही; जर तुला सहजासहजी संधी मिळाली तरच तू ॲक्टिंगचा विचार कर; कधीही तुला बरावाईट अनुभव आल्यास मी तुझ्या पाठीशी नाही, तर तुझ्या पुढे उभा असेन; हे त्याने मला आवर्जून सांगितलंय. माझ्यामध्ये आणि सिद्धांतभैयामध्ये एक वडिलकीचं नातं आहे. तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. बहीण-भावांमध्ये जी ‘सिबलिंग रायव्हलरी’ असते म्हणतात, ती आमच्यात कधीच नव्हती. मी मुंबईबाहेर असेन किंवा कधी भैया बाहेर असेल, तरीही कधी एकदा एकमेकांना भेटतो आणि दरम्यान घडलेलं सगळं काही शेअर करतो, असं आम्हाला होतं. गप्पा मारणं शक्य नसेल तेव्हा आम्ही सतत ‘चॅट’वर असतोच.
जवळजवळ ४० वर्षांपूर्वी आमचे वडील (अभिनेता शक्ती कपूर) मुंबईत धडकले तेव्हा त्यांच्या खिशात दिल्ली ते मुंबई फ्रंटियर ट्रेनचं सेकंड क्लासचं तिकीट आणि अवघे १५० रुपये होते. मुंबईत कुणाशीच ओळखपाळख नव्हती. पण तरीही हिंदी सिनेमासृष्टीत त्यांनी व्हर्सटाइल ॲक्टरचं स्थान मिळवलं आणि ४५० चित्रपट केले. आपल्या वडिलांनी केलेल्या चुकांपेक्षा त्यांनी काय मिळवलं, हे भैयाने नेहमी लक्षात ठेवलं. त्याने पपांना विश्वासाने सांगितलं, “कोई हर्ज नहीं अगर आपने हमें लॉन्च नहीं किया! ऋषी कपूरजीने भी अपने बच्चों को, खासकर रणबीर को कहा लॉन्च किया? आप अपने दिल में कोई मलाल न रखे! दिल से गिल्ट निकाल दे!”
सिद्धांतभैयाने पापांना ज्या पद्धतीने समजून घेतलं आणि समजावून सांगितलं ते पाहून मी चकित झाले. त्या वेळेस सिद्धांतभैया अवघ्या विशीत होता, ज्या वयात मुलं ‘हिरोगिरी’ करतात त्या वयातली त्याची परिपक्वता माझे डोळे पाणावून गेली!
पापांनी सिद्धांतसाठी दिग्दर्शक प्रियदर्शनकडे शब्द टाकला, त्यांनी त्याला आपल्या सिनेमात घेतलं. पण त्याने प्रियदर्शन यांचा सहाय्यक म्हणून काम करणं पसंत केलं. हा निर्णय सिद्धांतचा होता.
त्याची बहीण म्हणून मला नेहमी एका कारणासाठी वाईट वाटतं. मला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे भैयाला कायम मुलाखतींमधून हाच प्रश्न विचारला जातो की, “आपसे कई ज्यादा सफल तो आपकी सिस्टर (श्रद्धा) है, कैसा फील करते है आप?”मला सांगा कुठल्या बहिणीला हा असा प्रश्न आपल्या भावाला विचारलेला आवडेल?
असो, भैयाला यावर्षी, रक्षाबंधनाच्या दिवशी मी नऊवारी साडी नेसून ओवाळणार आहे. मग त्याला राखी बांधणार आहे! लव्ह यू भैया!
ज्येष्ठ सिनेपत्रकार.