श्रावणातला तळकोकण

श्रावण आला की तळकोकण हिरवाईच्या कुशीत विसावतो आणि माती, पाऊस, समुद्र व संस्कृतीच्या गंधाने त्याचं अवघं भावविश्व दरवळून जातं. ऊन-पावसाच्या लपंडावात नटलेला हा श्रावण म्हणजे कोकणी माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा जागणाऱ्या गावाच्या आठवणींचा ओलावा.
श्रावणातला तळकोकण
श्रावणातला तळकोकण
Published on

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

श्रावण आला की तळकोकण हिरवाईच्या कुशीत विसावतो आणि माती, पाऊस, समुद्र व संस्कृतीच्या गंधाने त्याचं अवघं भावविश्व दरवळून जातं. ऊन-पावसाच्या लपंडावात नटलेला हा श्रावण म्हणजे कोकणी माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा जागणाऱ्या गावाच्या आठवणींचा ओलावा.

झे गुरु कविवर्य वसंत सावंत, तसंच दा. र.दळवी, दादा मडकईकर आदी मालवणी मुलखातील अनेक कवींनी आपापल्या शैलीत श्रावण महिन्यातलं तळकोकण काव्यबद्ध करून ठेवलं आहे.

सारणिच्या पाण्यात रंगली

जळस्वप्नांची गाणी

ही सृष्टीची हिरवी गौळण

भरली कटि-खांद्यांनी

दूर नभाच्या पल्याड आहे

उभा कुणी श्रीरंग

उधळित पिंजर तरल

धुक्याची.. झाडांवरती रंग..

असा मनोहारी श्रावण वसंत सावंतांच्या कवितेतला, प्रत्येक कोकणी मनाला गावाकडे नेणारा.

कवी दा.र.दळवी ' सरावण ' या मालवणी कवितेत म्हणतात-

माज्या आयेचे उपास सरावणात ते किती

संसारात सुखासाठी किती कष्ट उचली ती!

वसंत सावंत आणि दा. र. दळवी दोघेही आता या जगात हयात नाहीत. पण त्यांच्या श्रावणाच्या कविता मात्र अजूनही लोकं आठवतात.

श्रावण येतो, तेव्हा तळकोकण केवळ सजत नाही, तर तो एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. आषाढाचा धुवांधार पाऊस श्रावणात थोडा शांत होतो. त्याच्या रागाची जागा एक हळुवार, लाजाळू आणि कौतुकयुक्त स्पर्श घेतो. ऊन आणि पावसाचा चाललेला हा लपंडाव म्हणजे निसर्गाचं अनोखं प्रणयनाट्य! कधी गच्च भरून आलेले ढग मिनिटाभरात वितळून जातात आणि हळुच सोन्यासारखं पिवळंधम्मक ऊन झाडांच्या पानापानांतून निथळू लागतं. या ऊन-पावसाच्या खेळात आकाशात उमटलेलं इंद्रधनुष्य पाहून असं वाटतं, की जणु तळकोकणाच्या हिरव्यागार पाठीवर निसर्गानं सप्तरंगी शालच पांघरली आहे.

श्रावणात तळकोकणात पाऊल ठेवलं की, दिसू लागतो भाताच्या रोपांचा तो कोवळा पोपटी रंग; नारळी-सुपारीच्या बागांचा गडद हिरवा शांतपणा; डोंगरावरच्या झाडीचा निळा-हिरवा ताठा आणि कातळावर उगवलेल्या मखमली शेवाळाचा तजेलदार हिरवेपणा! हे सगळे रंग एकत्र येऊन डोळ्यांना जी शांतता देतात, ती जगातील कोणत्याही पेंटिंगमध्ये शोधून सापडणार नाही.

तळकोकणातल्या श्रावणाचा खरा प्राण आहे तिथली लाल माती आणि तिच्यातून येणारा तो खास कोकणचा सुवास.. लाल मातीचे रस्ते, त्यावर पडलेले हिरवेगार थर आणि त्यावरून वाहणारे तांबूस पाण्याचे छोटे नाले—हे दृश्य तळकोकणाचं खास वैशिष्ट्य. घरांच्या उतरत्या कौलारू छतांवरून टप-टप पडणारे थेंब आणि अंगणातल्या तुळशीवृंदावनावर साचलेले तुषार तुमच्या मनाला एका वेगळ्याच तंद्रीत घेऊन जातात.

ह्या दिवसांत तळकोकणातल्या नद्या, ओढे आणि धबधबे पूर्ण ताकदीनं आणि उत्साहानं वाहत असतात. कातळावरून उड्या मारणारे छोटे-छोटे पांढरेशुभ्र धबधबे, जणू डोंगरांच्या गळ्यातल्या मोत्यांच्या माळाच वाटतात. ओढ्याच्या कडेला बसून पाण्याचा तो खळखळाट ऐकणं आणि गार वाऱ्याची झुळूक अंगावर झेलणं म्हणजे वर्षभराच्या मन:शांतीची बेगमी!

श्रावण म्हणजे तळकोकणच्या संस्कृतीचा आणि भाविक आस्थेचा महिना. या महिन्यात तळकोकणातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक देवळात एक वेगळीच मंगलमय वातावरणनिर्मिती होते. पूर्वी गावच्या देवळात 'पांडवप्रताप', 'हरिविजय' अशा ग्रंथांचं वाचन व्हायचं. ते ऐकायला दशावतारी कलाकार आवर्जून हजर असायचे. प्रत्येक आख्यान कानात साठवायचे आणि मग दशावतारी खेळ करताना आपापले संवाद उत्स्फूर्तपणे बोलत रहायचे. त्यावेळी श्रावण महिन्यातलं हे ग्रंथश्रवण त्यांना उपयोगी पडायचं. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील ठाकर समाजाचे चित्रकथी कलाकार आजही, कोणी ऐकायला असो की नसो आपली चित्रकथीची पोथी ग्रामदेवतेच्या मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी सोडतात आणि खेळ करतात. वर्षातील हा पहिला खेळ देवाला अर्पण केल्यावर पुढचे सगळे खेळ सुरळीत पार पडतात आणि त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो अशी या चित्रकथींची श्रद्धा आहे.सोमवारी शंकराच्या मंदिरांमध्ये होणारी गर्दी, बेलपत्राचा वास आणि धूपाचा सुगंध वातावरण पवित्र करून टाकतो. श्रावणी शुक्रवारी स्त्रियांची ओट्या भरणे, जिवतीची पूजा आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी होणारी लगबग यामुळे घराघरांत चैतन्य फुलतं.

आणि मग येतो तळकोकणाचा सगळ्यात आवडता, जिवाभावाचा सण—'नागपंचमी' आणि ' पोवत्याची पौर्णिमा'. समुद्राला शांत करण्यासाठी आणि कोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी दर्याराजाला अर्पण केला जाणारा नारळ, त्या दिवशी किनाऱ्यावर असणारा तो भक्तीचा आणि उत्साहाचा मेळावा... हे सगळं पोवत्याच्या म्हणजे नारळी पौर्णिमेला अनुभवणं म्हणजे तळकोकणी साधेपणाचा साक्षात्कार होय.

एरव्ही मांसाहारी असणारा कोकण श्रावण सुरू झाला की शाकाहारी होतो. मासळीवर ताव मारणारा तळकोकणी माणूस श्रावणात मात्र दोडकी नि पडवळ शोधायला लागतो. " छॅऽ सरावणात आमच्या घरात हिंवसाण चलत नाय बाबा.." असे डायलॉग तुम्हाला या दिवसात कोकणात ऐकू येतील. पण म्हणून कोकण्यांच्या जीभेची चव काही कमी होत नाही! रानभाज्यांची रेलचेल या दिवसांत बाजारात पाहायला मिळते. आळूची पानं, तांबडी भाजी, कुर्डूची भाजी, आणि मुख्य म्हणजे वारुळांवरून शोधून आणलेली 'अळमी' (रानटी मशरूम). खापराच्या पोळ्या, हळदीच्या पानातले पातोळे आणि नारळाच्या दुधातली खीर—या सगळ्यांची चंगळ याच महिन्यात कोकणी माणूस करुन घेतो.

संध्याकाळच्या वेळी जेव्हा ऊन उतरू लागतं, तेव्हा मालवण , वेंगुर्ला , शिरोडा..कुठल्याही समुद्रकिनारी जा. अगदी गुंग होऊन जाल तुम्ही. नारळाच्या झाडांमधून दिसणारा सूर्यास्त, ढगांवर झालेली रंगांची उधळण आणि किनाऱ्यावर येणाऱ्या नि क्षणाक्षणाला रंगांची उधळण करणाऱ्या लाटांचा आवाज... मनातल्या साऱ्या चिंता धुवून टाकील.

तळकोकणातला श्रावण हा केवळ एक महिना किंवा ऋतू नाही; ती एक भावना आहे. तो मनाला आल्हाद देणारा, निसर्गाशी नातं घट्ट करणारा आणि जगण्यावर पुन्हा एकदा प्रेम करायला लावणारा काळ आहे. श्रावणातल्या त्या मंद सरी, ओल्या मातीचा वास, हिरवेगार डोंगर आणि कोकणी माणसांच्या मनातली आपुलकी—हीच कोकणची श्रीमंती आहे.

आणि याच महिन्यात गावात कुणाच्या ना कुणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाल्यावर, रात्री अंथरुणावर पडल्या- पडल्या दूरवरून येणारे भजनाचे सूर मला मुंबईतही ऐकू येऊ लागतात..

कैलासराणा शिव चंद्रमौळी

फणींद्र माथा मुकुटी झळाळी

कारुण्यसिंधु भवदुःख हारी

तुजवीण शंभो मज कोण तारी......!

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in