वारा स्तब्ध रुणझुणा

'डोह'च्या निर्मळ पाण्यातून बालपण, निसर्ग आणि मानवी मनाचे सूक्ष्म रंग टिपणारे ज्येष्ठ ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा शब्दप्रवास अखेर थांबला. त्यांच्या निधनाने मराठी ललित साहित्याने एक असामान्य शब्दचित्रकार गमावला.
वारा स्तब्ध रुणझुणा
वारा स्तब्ध रुणझुणा
Published on

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

'डोह'च्या निर्मळ पाण्यातून बालपण, निसर्ग आणि मानवी मनाचे सूक्ष्म रंग टिपणारे ज्येष्ठ ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा शब्दप्रवास अखेर थांबला. त्यांच्या निधनाने मराठी ललित साहित्याने एक असामान्य शब्दचित्रकार गमावला.

'दत्त दिगंबर दैवत माझे' हे प्रसिद्ध लोकप्रिय भक्तीगीत लिहिणाऱ्या कवी सुधांशु यांनी औदुंबर येथे कृष्णाकाठी, दरवर्षी मकर संक्रांतीला १९३९ सालापासून लोकसहभागातून 'सदानंद साहित्य संमेलन 'भरवायला सुरुवात केली. या संमेलनाचा अमृत महोत्सव १४ जानेवारी २०१८ रोजी उत्साहानं साजरा करण्यात आला. नायगावकर ,अरुण म्हात्रे आणि मी महेश केळुसकर यांना विशेष कविसंमेलनासाठी या दिवशी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्या आधल्या दिवशी आम्ही कराडला श्रीनिवास विनायक कुलकर्णी या आमच्या आवडत्या लेखक-संपादकांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. एकेकाळी श्रीविकु स्वतः कविता करत असत. मग ते ललित गद्य जोमानं लिहू लागले आणि कालांतराने कवितेचा हात सुटला. मात्र त्यांचं कविता प्रेम आणि कवितेविषयीची जाणकारी शेवटपर्यंत ताजी आणि आस्थेवाईक राहिली. श्रीविकु सरांचा पहिलाच ललित लेख संग्रह ' डोह ' १९६५ साली 'मौज ' ने प्रकाशित केला आणि त्याला विलक्षण वाचकप्रियता मिळाली. आजही ' डोह ' ला आठवणारे हजारो नवे लेखक - लेखिका सापडतील. पंचमहाभूतांशी असलेलं मानवी कनेक्शन कालातीत असतं. ' डोह ' ची ताकद नेमकी त्यातच आहे. सृष्टीशी एकरूप होऊन ज्या एका विशुद्ध जाणीवेनं हे लेखन श्रीविकुंच्या हातून झालंय ते कालातीत आहे, त्यामुळेच ' डोह ' आजच्या वाचकांच्याही अंतर्मनाला साद घालतो.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जन्म कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी १९३६ साली नोव्हेंबर महिन्यात २० तारखेला झाला. प्राथमिक शिक्षण औदुंबरमध्येच झालं, तर सातवीपर्यंतचन शिक्षण अंकल- खोपला झालं. त्यापुढील शिक्षण सांगलीच्या 'अनाथ विद्यार्थी आश्रम' या संस्थेत राहून त्यांनी पूर्ण केलं. त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. या दोघांच्या सान्निध्यात होणारे कलेचे संस्कार आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे, औदुंबरच्या परिसराचा, सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम यांमधून श्रीनिवास कुलकर्णी यांचं संस्कारशील, संवेदनक्षम मन तयार झालं. लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर, “अक्षर घटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे, सर्व समजून घेत असावे आणि स्वतःच्या मर्यादाही ओळखाव्यात हे शिक्षण घरातूनच मिळाले. प्रत्येक शंकेला उत्तर मिळे. निर्माण होणाऱ्या प्रत्येक उत्सुकतेला समाधान देणारे- त्यातून पुढचा प्रश्न- त्यावर पुढचे उत्तर - यांतून दिसणाऱ्या व न दिसता जाणवणाऱ्या गोष्टींच्या तळापर्यंत जाण्याचा छंद.” (ललित, एप्रिल, १९६६) शिक्षण संपल्यावर पहिली दोन वर्षं साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय आणि मग ओगलेवाडी येथील काचकारखान्यात हिशोब खात्यात नोकरी. त्यानंतर 'मौज'या नियतकालिकाच्या संपादन विभागात काम केलं. बालवयापासून त्यांचं कवितेवर आत्यंतिक प्रेम होतं. श्रीविकु़ची पहिली कविता मराठी चौथीत असताना, पां. ना. मिसाळ यांच्या 'बालसन्मित्र' मध्ये प्रसिद्ध झाली आणि पहिली गोष्ट का. रा. पालवणकरांच्या 'खेळगडी'च्या शेवटच्या बाललेखांकात प्रसिद्ध झाली . पुढे कवितालेखन थांबल्याबद्दल ते नेहमीच खंत व्यक्त करत. पण त्यांची कवितेवर नितांत श्रद्धा होती.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची खरी ओळख आहे, ती ललितलेखक म्हणून. त्यांचा पहिला ललित लेख 'मनातल्या उन्हात' हा १९६० मध्ये 'सत्यकथे'त प्रसिद्ध झाला. येथून पुढे त्यांचा ललितलेखनाचा प्रवास सुरू झाला. त्यांचं ललितलेखन पुढीलप्रमाणे आहे. 'डोह' (१९६५), 'सोन्याचा पिंपळ' (१९७५), 'पाण्याचे पंख' (१९८७) आणि 'कोरडी भिक्षा' (२०००). या पुस्तकांमधील सर्व लेख प्रथम 'सत्यकथा' आणि 'मौज' या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. कोवळे भावविश्व 'मनातल्या उन्हात' हा पहिला लेख सत्यकथेच्या ऑगस्ट १९६० च्या अंकात प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेला 'डोह' हा पहिला ललितलेखसंग्रह यांनी वाचकांना ललितलेखनाचा वेगळाच आविष्कार घडविला. 'डोह'मध्ये लेखकाच्या बालपणाच्या आठवणी चित्रित झाल्या आहेत. बालवयातील सोनेरी अनुभव त्यात साकार होतात. औदुंबरचा परिसर, तेथील निसर्ग झाडं, पक्षी, कृष्णा नदी, डोह, सुसरी- यांच्या पार्श्वभूमीवर हे लेखन एक वेगळाच रंग घेऊन अवतरतं. लेखांच्या शीर्षकांपासूनच हे वेगळेपण जाणवायला लागतन. उदाहरणार्थ 'आम्ही वानरांच्या फौजा', 'मृगजळाच्या यक्षघराला', 'मनातल्या उन्हात', 'शब्दांच्या संध्याकाळी' इत्यादी. ही शीर्षकं कधी बोलकी होतात, तर कधी ती गूढ होऊन वाचकांची उत्सुकता वाढवितात. या सर्व लेखांमधून लहान मुलांचं जे निखळ भाव-विचार-विश्व उभं राहतं, ते विलोभनीय आहे. प्रौढ मनानं बालवयात शिरून बालकाच्या कोवळ्या नजरेनं टिपलेलं हे विश्व कोणालाही मोह घालणारं, हवंहवंसं वाटणारं, स्वप्नवत असं आहे; पण तरीही हे स्वप्नरंजन मात्र नाही. 'सोन्याचा पिंपळ'मधील लेखांमधून साकार होणारं विश्व 'डोह' पेक्षा अगदी वेगळं आहे. प्रौढ मनाला जाणवणारे, प्रत्ययाला येणारे काही गूढ, अतींद्रिय अनुभव त्यात शब्दबद्ध होतात. 'आस्तिक - आस्तिक'मधील सापांचे विविध अनुभव, 'धनानि भूमौ' मधील गुप्त धनासंबंधीचे अनुभव, 'रूपांतर' मधील देहातीततेची जाणीव; असं एक वेगळंच अनुभवविश्व वाचकांसमोर येतन. 'सोन्याचा पिंपळ' हा लेखही वेगळ्याच पातळीवर घेऊन जाणारा आहे. 'काळोख चहूकडे' आणि 'तळ्याकाठी संध्याकाळी' हे लेख आकारानं विस्तृत आणि काहीसे कथेच्या अंगानन गूढरम्य अनुभव सांगणारे आहेत. 'घंटीवाला' या लेखात आपल्या छोट्या भावाचा मृत्यूपर्यंत होणारा प्रवास लेखकानं सांगितला आहे. तो वाचताना एकाच वेळी त्रयस्थ, तटस्थ आणि तरीही आत्मनिष्ठ अशा भावनांचा प्रत्यय येतो.

'डोह' आणि 'सोन्याचा पिंपळ' या दोन्ही संग्रहांचा एक वेगळेपणा म्हणजे यांतील लेखांमधून साकारणारे लेखकाचे वडील आणि स्वतः लेखक यांच्यामधील बाप-लेकाचं प्रगल्भ नातं. 'पाण्याचे पंख' या संग्रहात घरात आणि सभोवती असणाऱ्या, वावरणाऱ्या लहान मुलांचं भावविश्व साकारलं आहे. 'अलोक', 'पदम', 'मनू', 'मिकी' इत्यादी. लहान मुलांचं हसणं, खेळणं, बागडणं हे लेखकाच्या नजरेतून टिपताना आपल्या सभोवतालच्या लहान मुलांच्या जगाशी त्यांचं नातं जुळलेलं दिसतं.

'कोरडी भिक्षा' या संग्रहात अनेक व्यक्तिचित्रन आली आहेत, आणि त्यांच्या चित्रणातून पुन्हा वेगळे अनुभव वाचकांसमोर उलगडले जातात. या सर्व लेखनाला जोड मिळाली आहे, ती लेखकाच्या चित्रदर्शी शब्दकलेची. चित्रकलेच्या संस्कारातून येणारी दृश्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणामधून वर्णनात येणारा बारकावा आणि अनुभवाचा तळ गाठणारी पारदर्शी लेखनशैली यांमुळे लेखांमधील आशय एक वेगळीच उंची गाठतो. ललित लेखनाला एक वेगळनच परिमाण देऊन हे लेखन समृद्ध करणारे लेखक म्हणून ज्यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल ते श्रीनिवास विनायक कुलकर्णी ६ ऑगस्ट २०२६ रोजी हे जग सोडून गेले. ' डोह ' मधला तो रुणझुण वाहणारा वारा स्तब्ध झाला.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in