शूरवीर मुलांच्या करामती

कसे आहात? सध्या सुट्टी असल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर काय काय उपक्रम चाललेले आहेत? मला एक सांगा, सुट्ट्या कशासाठी असतात? मज्जा, मस्ती करायला, खेळायला आणि नवीन काही शिकण्यासाठी किंवा काही कच्ची कामं पक्की करण्यासाठी असते सुट्टी. हो ना? तर मग सांगा बरं, तुम्ही काय काय करत आहात?
शूरवीर मुलांच्या करामती
Published on

खुल जा सिम सिम

ज्योति कपिले

Hi friends!

कसे आहात? सध्या सुट्टी असल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर काय काय उपक्रम चाललेले आहेत? मला एक सांगा, सुट्ट्या कशासाठी असतात? मज्जा, मस्ती करायला, खेळायला आणि नवीन काही शिकण्यासाठी किंवा काही कच्ची कामं पक्की करण्यासाठी असते सुट्टी. हो ना? तर मग सांगा बरं, तुम्ही काय काय करत आहात? हो, गोष्टींची पुस्तकं तुम्ही वाचता म्हणून मी आज एका एकदम भारी पुस्तकाची माहिती घेऊन आलेली आहे. सांगते, पुस्तकाचं म्हणजे बालकुमार कथा संग्रहाचं नाव सांगते. ‘गवसणी आकाशाला’ आणि लेखक आहेत सदानंद पुंडपाळ. आपल्या आवडत्या शैक्षणिक क्षेत्रात काम करून ते सध्या निवृत्त झाले आहेत. पण त्यांनी लिहिणं थांबवलं नाही. एकूण २८ पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. मोठमोठ्या संस्थेत ते महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून त्यांनी अनुवादही केले आहेत.

‘गवसणी आकाशाला’ या पुस्तकातील कथा या शूरवीर मुलांच्या आहेत. पुस्तकातील गोष्टी वाचून मी एकदम चकित झाले. कारण यातील बालनायक हे तुमच्यासारखे एकदम अभ्यासात हुशार आहेतच, पण त्यांची वृत्तीही अभ्यासू आहे, साहसी आहे. डिटेक्टिव्ह आहे. Yess! तुमचा उत्साह मला समजतोय. तुमची शोधक वृत्ती, कामसू वृत्ती, प्रामाणिकपणा, आईवडिलांना समजून घेण्याची इच्छा, आईवडिलांना मदत करण्याची आणि आपल्यासाठी कोणाला त्रास न होऊ देता स्वावलंबी होण्याची इच्छा! अशा विविध प्रकारच्या सद्गुणी मुलांच्या गोष्टी यात आहे ज्या तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटतील, ठरतील. कदाचित हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला वाटेल, अरे या तर माझ्याच गोष्टी आहेत. हो हो, सांगते. पुस्तकातील मला खूप आवडलेल्या काही गोष्टींची ओळख करून देते.

त्यापैकी एक गोष्ट आहे, आपल्या गरिबीला न लाजता, आपल्या शिक्षणासाठी सुट्टीत शिक्षकांच्या सहकार्याने काम करणाऱ्या, बूट पॉलिश करणाऱ्या, सातवीत शिकणाऱ्या संग्राम या मुलाची, त्याच्या शौर्याची कथा. ‘शौर्यगान’ कथेचा शेवट अगदी अनपेक्षित आहे. तुम्ही जरूर वाचा, तर दुसरी कथा आहे धाडसाची! त्या गोष्टीचे नाव आहे ‘शाईची करामत’. आता फारसे कोणी शाईचे पेन वापरत नाही. पण आम्ही वापरायचो. कधी कळत, तर कधी नकळत वर्गात एकमेकांच्या अंगावर चुकून शाई उडायची किंवा मुद्दाम टाकली जायची. या गोष्टीत सुद्धा मुद्दाम पेनातली शाई एका माणसाच्या अंगावर उडवली जाते. म्हणजे संतोष नावाचा मुलगा ही पेनामधील शाई प्रसंगावधान राखून घरी घुसलेल्या चोराच्या पाठीवर टाकतो. अर्थात चोराला ते समजत नाही आणि तो चोरी करून, घरातील किमती सामान घेऊन पळून जातो. पण संतोष पोलिसांना चोरीची माहिती आणि त्याने चोराची ओळख पटावी म्हणून शर्टाच्या पाठी उडवलेल्या शाईची गोष्ट सांगतो. त्या खुणेमुळे पोलीस चोराला रंगेहात पकडतात. संतोषचं, त्याच्या हुशारीचं कौतुक होतं. त्याचे पेपरमध्ये फोटो येतात, त्याला रोख बक्षीस मिळतं. जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, गावकरी सगळे त्याचा सत्कार करतात. छान वाटतं ना, ही गोष्ट वाचून? तरी मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगितली. मूळ कथा लेखकाने खूप छान फुलवली आहे. शिक्षक असल्याने त्यांचा बालमनाचा अभ्यास आहे. मुलांमध्ये असलेले गुण ते जाणतात. तसेच मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी सुद्धा ते ओळखून आहेत. त्या सर्व गोष्टींचा त्यांना गोष्टी लिहिताना खूप उपयोग झाला आहे.

बरं friends, तुम्हाला ‘गवसणी आकाशाला’ याचा अर्थ माहिती आहे का? म्हणजे असाध्य गोष्ट साध्य करणे किंवा अशक्य गोष्ट करून दाखविणे आणि तुम्ही मुलं आपल्या कर्तृत्वाने, हुशारीने, जिद्दीने आकाशाला गवसणी घालू शकता. प्रणाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून तुम्ही ते नक्की मिळवून वाचा आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात आकाशाला गवसणी घाला…स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचंच आहे.

साहित्यिक व बाल साहित्याच्या आस्वादक

logo
marathi.freepressjournal.in