पाऊलखुणा
दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात १२ सप्टेंबरपासून हडप्पाकालीन लिपीवरील आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झाली आहे. सिंधू लिपीचं गूढ अजूनही न सुटल्याने अनेक संशोधक त्यावर काम करत आहेत. काहींना ती द्रविड, तर काहींना वैदिक संस्कृतीशी निगडित वाटते. राजकीय छटा, विविध सिद्धांत आणि संशोधनाच्या प्रयत्नांनंतरही या लिपीचं गूढ अजूनही आहे.
दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रामध्ये १२ सप्टेंबरपासून एका खास आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचा मुख्य विषय आहे - हडप्पाकालीन लिपी. पुरातत्त्वशास्त्रामधलं हे सर्वात मोठं आणि अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. सिंधू संस्कृतीतील लिपीचा शोध लागल्यानंतर तिचा अर्थ उलगडण्याचे, ती वाचण्याचे प्रयत्न अभ्यासकांकडून सातत्याने होत आहेत. सिंधू संस्कृतीचा शोध लागून आता एक शतक उलटलं, तरी अद्याप सिंधू लिपीचा उलगडा का झाला नाही? हा प्रश्न कायम आहे.
विसाव्या शतकाच्या आरंभी भारतात झालेल्या इतिहासविषयक संशोधनातून सिंधुनदीच्या खोऱ्यात गडप झालेली वेदपूर्वकालीन एक अत्यंत प्रगत पण अज्ञात संस्कृती जगासमोर आली. भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याने १९२२ ते १९२८ दरम्यान मोहेंजोदाडो (सिंध) आणि हडप्पा (पंजाब) या ठिकाणी उत्खनन करून या भूमिगत संस्कृतीची जगाला प्रथम ओळख करून दिली. उत्खननात सापडलेल्या अनेक वस्तूंच्या आधारे सिंधू संस्कृतीतील सामाजिक आणि आर्थिक जीवनावर प्रकाश पडला. या संस्कृतीतील काही वस्तूंवर, विशेषतः मुद्रांवर विविध चिन्हे कोरलेली सापडली. ती त्यांची लिपी असावी, असे अभ्यासक मानतात. आजवर जवळपास साडेतीन हजार वस्तूंवर विविध चिन्हांत काही लिहिलेलं आढळलं आहे. पण त्या चिन्हांचा अर्थ काय, हे उलगडण्यात अद्याप यश आलेलं नाही. थोडक्यात, ती लिपी वाचता न आल्याने त्यात काय लिहिलं आहे, हे आपल्याला माहीत नाही. यातील ३५ लेख फार छोटे आहेत. त्यात जास्तीत जास्त पाच-सहा चिन्हे आहेत. निम्मे लेख मुद्रांवर आहेत. या मुद्रा चौरस आकाराच्या असून त्यांच्यावर सिंधू देव-देवता, बैल, एकशिंगी, गेंडा इत्यादींची चित्रे कोरलेली दिसतात. त्यांचा उपयोग निर्यात मालावर शिक्के मारण्यासाठी होत असावा, असे लोथल येथील पुराव्यावरून स्पष्ट होते.
अभ्यासकांनी आयुष्यभर संशोधन करूनही या लिपीचा उलगडा अद्याप झालेला नाही. या अभ्यासकांमध्ये डॉ. इरावतन महादेवन हे लिपीतज्ज्ञ, आस्को पारपोला तसेच अनेक नवीन नावे आहेत. सिंधू लिपीच्या बाबतीत अक्षरे कमी असल्याने ती चिन्हे आहेत की अक्षरे, हे स्पष्ट होत नाही. इतर प्राचीन लिपींचा उलगडा दोन भाषांच्या तुलनात्मक अभ्यासातून झाला. पण सिंधू लिपीबाबत असे झालेले नाही. समकालीन दुसऱ्या लिपीत द्विभाषिक लेख नसल्याने ती वाचणे कठीण ठरले आहे. तरीही संशोधन सुरूच आहे. सिंधू लिपीतील प्रत्येक चिन्ह हे एक संकल्पना मानली गेल्याने तिची चिन्हसंख्या मोठी आहे. या लिपीत एकूण ४१७ चिन्हे आहेत. डॉ. महादेवन यांनी संगणक विश्लेषणाद्वारे काही निष्कर्ष काढले. त्यांना सिंधू भाषा द्रविडी वाटते. आस्को पारपोला या फिनलंडच्या विद्वानाचंही तेच मत आहे. काहींना ती इंडो-आर्यन वाटते, तर एका अमेरिकन तज्ज्ञाच्या मते ही लिपीच नाही. एखादा द्विभाषिक लेख मिळाला, तरच ही कोंडी सुटू शकते. पारपोला आणि महादेवन यांच्या कामावर आधारित सिद्धांतानुसार या लिपीचा संबंध ‘प्रोटो-द्रविडियन’ भाषांशी आहे. पाकिस्तानात आजही बोलल्या जाणाऱ्या ब्राहुईसारख्या द्रविड भाषा आणि आनुवंशिक अभ्यास हे मत बळकट करतात.
पुरातत्त्वज्ञ एच. पी. रे म्हणतात, “लिपी उकलणं सोपं नसतं. ब्राह्मी लिपी ग्रीक-ब्राह्मी अशा द्विभाषिक नाण्यांमुळे समजली. लिपी कुठे सापडते, त्याचा संदर्भ महत्त्वाचा ठरतो. सिंधू संस्कृती अफगाणिस्तानपासून गुजरातपर्यंत पसरलेली होती. इतक्या विस्तृत भूभागावर आणि दीर्घकाळ टिकलेल्या संस्कृतीत एकच भाषा होती, हा समज चुकीचा असू शकतो.”
आजवर झालेल्या विविध प्रयत्नांमध्ये दिवंगत एस. आर. राव यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मते या लिपीतील प्रत्येक चिन्ह हे कल्पना नसून देवनागरीतील अक्षरासारखं आहे. सिंधू लिपीतील ४०० हून अधिक चिन्हे ही मूळ २० चिन्हे असून उरलेली काना-मात्रांसारखी आहेत, असं त्यांचं मत. या २० चिन्हांचा पश्चिम आशियातील साऊथ सेमेटिक लिपीशी साम्य आहे. राव यांच्या मते, सेमेटिक लिपीतील उच्चार सिंधू लिपीतील दिसणाऱ्या चिन्हांना लावून लेख वाचता येऊ शकतात. अशा प्रकारे काही लेख वाचून त्यांनी सिंधू भाषा संस्कृत होती, असं प्रतिपादन केलं.
डॉ. ब्रिजबासी लाल यांचं संशोधनही महत्त्वाचं आहे. सिंधू संस्कृती संपल्यानंतर तिचे काही अवशेष पुढील काळात सापडलेच पाहिजेत, या विचाराने त्यांनी शोध घेतला. त्यांना आढळलं की, सिंधू लिपीतील काही चिन्हे महापाषाणीय संस्कृतीच्या भांड्यांवर आहेत. या संस्कृतीत फक्त दफने सापडतात. त्यात मृतासाठी अन्नपाणी ठेवले जात असे. त्या भांड्यांवरील चिन्हांचा अभ्यास करता दिसून आलं की, सिंधू लिपीतील जवळपास ७५ टक्के चिन्हे महापाषाणीय भांड्यांवर आहेत. सिंधू संस्कृती इ.स.पू. १४०० च्या सुमारास लयाला गेली, तर महापाषाणीय संस्कृती इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. ३०० दरम्यान होती. ती दक्षिण भारतात केंद्रित होती, पण इतरत्रही काही ठिकाणी आढळते. महत्त्वाचं म्हणजे तिच्या जवळपास ५० टक्के चिन्हांचा ब्राह्मी लिपीत ठसा आहे. या दुव्यांत काही अंतरं असली, तरी अशोकाच्या काळापासून ब्राह्मी शिलालेख स्पष्टपणे दिसतात.
या शोधप्रयत्नांमागे राजकीय छटा देखील आहेत. यावर्षी जानेवारीत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लिपी उलगडणाऱ्यास १० लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलं. यामागचा हेतू म्हणजे भविष्यात लिपी द्रविडी भाषेची असल्याचं सिद्ध झाल्यास द्रविड चळवळीला राजकीय फायदा होईल. दुसरीकडे, संघपरिवाराशी निगडित विद्वान ही लिपी वैदिक संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. त्यांचा दावा आहे की, घग्गर-हाक्रा नदीपात्रात सर्वाधिक हडप्पा स्थळे मिळतात आणि ऋग्वेदात सरस्वती नदीचा सर्वाधिक उल्लेख आहे. पण ही मांडणी सिद्ध करण्यासाठी लिपीचा अर्थ उलगडणं आवश्यक आहे.
एकंदरीत पुराव्यांचा विचार करता, ब्राह्मी लिपीच्या जडणघडणीत सिंधू लिपीचा मोठा वाटा आहे. पण मधले दुवे सापडल्याशिवाय तिचा उलगडा अवघड आहे. रोझेटा शिलालेख जसा बहुभाषिक होता आणि त्यावरून इजिप्तची लिपी वाचली गेली, तसाच एखादा शिलालेख किंवा पुरावा सापडला, तर हडप्पा लिपी वाचणं शक्य होईल. त्यातून काळाच्या उदरात दडलेली अनेक रहस्ये उघडकीस येतील. कदाचित या लिपीचा उलगडा एका मोठ्या शोधाने होणार नाही, तर पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, लिपी-अभ्यासक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांतून तो हळूहळू होईल.
rakeshvijaymore@gmail.com