सिनेरंग
पूजा सामंत
सौंदर्याचे राजसी रूप आणि अभिनयाचे लेणे लाभलेल्या अभिनेत्री स्मिता जयकर यांनी ज्या क्षेत्रात काम केलं तिथे आपला ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात टीव्ही क्षेत्रापासून झाली आणि मग मराठी, हिंदी मालिका आणि बॉलिवूडचे मल्टी स्टारर, बिग बजेट चित्रपट असे काम करत त्या पुढे गेल्या. आमिर खान ते सलमान खान, ऐश्वर्या राय अशा अनेक दिग्गज स्टार्ससह संजय लीला भन्साली, जॉन मॅथु मथान अशा नामांकित निर्मात्यांसोबत त्यांनी चित्रपट केले आहेत. त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखा अतिशय ठळक होत्या. पण नंतर अचानक त्या अध्यात्माकडे वळल्या. अलीकडे त्यांचा उल्लेख ‘आध्यात्मिक गुरू’ असा होतो. अतिशय जोमात सुरू असलेलं करियर सोडून अध्यात्माकडे वळण्यामागे कोणतं कारण होतं? त्यातून त्यांना काय लाभलं? काय साध्य झालं? अशा काही प्रश्नांसह स्मिता जयकर यांच्याशी केलेली ही बातचीत -
अभिनयाची कारकीर्द जोरात सुरू असताना अचानकपणे तुम्ही अध्यात्माकडे वळलात. अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. हा असा अचानक बदल कशामुळे झाला?
स्मिता - अध्यात्म ही काही जादूची कांडी नाही किंवा माझ्यावर कुणी ही जादूची कांडी फिरवली, असं देखील काही झालेलं नाही. माझे पती मोहन जयकर नामांकित सॉलिसिटर आहेत. समाजातील वेगवेगळ्या वर्गातील मंडळी त्यांच्याकडे अशील म्हणून येतात. त्यात एक अध्यात्मिक गुरू देखील आहेत, आम्ही त्यांना ‘प्रभुजी’ म्हणतो. एकदा मोहनसमवेत मीही त्यांच्याकडे गेले होते. पण या एकाच भेटीने त्यांच्या सात्विक, शुद्ध अध्यात्मिक विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव पडला. नंतर मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेही नाही. पण जीवनाकडे पाहण्याचा एक निकोप, निरोगी, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा हे ध्यानात येत गेलं. माझा माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. स्वत:मध्ये होणारा हा बदल मला जाणवू लागला.
हा बदल कोणत्या स्वरूपाचा होता? तुम्हाला नेमकं काय जाणवू लागलं?
स्मिता - हे अनुभवातून घडत गेलं. पूर्वीची मी आणि आताची मी यात एक प्रवास घडत गेला. मी अभिनय, संसार आणि प्रापंचिक रहाटगाडगं यात पूर्वी देखील व्यस्त होते, आजही आहेच. पण जीवनात प्रत्येक लहानथोराला काही ना काही अडचणी येतातच, मला सुद्धा त्या आल्या. त्या अडचणींवर मात केली तरी मनात खूप नकारात्मक विचार घोळत असत. अनेक वर्षं मी ग्लॅमर इंडस्ट्रीत काढली आहेत, अनेक भलीबुरी आयुष्यं जवळून पाहिली आहेत. नकळतपणे या अशा चढउतारांचा परिणाम होत राहतो मनावर. माझं व्यक्तिगत आयुष्य वेगळं आणि माझं कार्यक्षेत्र वेगळं. या दोन्ही जगातील परस्परविरोधी व्यक्ती आणि त्यांची परस्परविरोधी आयुष्यं यांना मी सामोरी जात होते. त्यामुळे जेव्हा मी माझ्याही नकळत अध्यात्माकडे वळले, तेव्हा मला जाणवलं की, अध्यात्म ही केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर प्रत्येकासाठी एक थेरपी आहे, इट्स अ हीलिंग प्रोसेस! या प्रवासात जेव्हा मला माझ्यात अंतर्गत बदल जाणवू लागला, तेव्हा मी अध्यात्म अधिक गंभीरपणे घेतलं आणि त्यात पुढे पुढे जात राहिले, शिकत गेले. मी पूर्णतः एक नवी स्मिता म्हणून जन्मले, असं मला वाटू लागलं.
अध्यात्माचे हे जग तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर काय प्रभाव टाकतं? तुम्ही किती वेळ देता मेडिटेशनसाठी?
स्मिता - मेडिटेशन हा मानसिक शांतता मिळवण्याचा अतिशय साधा, उपयुक्त आणि प्रभावशाली मार्ग आहे. मेडिटेशनसाठी दिवसातून १५५ मिनिटं दिली तरी चालतात, त्यासाठी तासन्तास ध्यानधारणा करण्याची गरज नाही. ध्यानधारणा अधिक केल्याने सिद्धी मिळते, पण रोज नोकरी करणारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी, घर चालवणाऱ्या गृहिणी यांना अधिक वेळ देता येत नाही. कारण आपलं दैनंदिन जीवन व्यतीत करणं देखील आवश्यक आहेच. अध्यात्म सांगते, मानव आणि मुके प्राणी यांच्यात देखील जवळीक असते. घरातील मालक जर आजारी असेल तर त्याचं आजारपण मुके प्राणी स्वतःवर घेतात. इतकंच काय, झाडंझुडपं, वनस्पती यांच्यातही जीव असतो, आत्मा असतो. तुम्ही झाडाला आलिंगन दिलंत तर झाड तुमच्याशी अव्यक्त संवाद साधतात. संपूर्ण ब्रह्मांड एकाच ऊर्जेने जोडलेलं, बांधलेलं आहे. पण आपण मानव निसर्ग, ब्रह्मांड यांच्याशी संवाद साधू शकत नाही. कारण आपली संवेदनशीलता खूप कमी झालेली आहे. प्राणी, पक्षी, निसर्ग, वनस्पती यांची भाषा, त्यांची अभिव्यक्ती समजून घेता आली पाहिजे. अध्यात्म ही सगळी मायेची, प्रेमाची शिकवणूक देतं, जी आताच्या स्वार्थाने भरलेल्या समाजातून अस्तंगत होत चालली आहे.
निसर्गाचा कोप मानवाने आपणहून ओढवून घेतला आहे. जंगलतोड, अपरिमित वृक्षतोड, डोंगर-नद्या यांचा विध्वंस आपण आपल्या प्रगतीसाठी करतोय. पण निसर्गाला झालेल्या या जखमांचा हिशेब कोण पाहणार? कुणाला जाब विचारायचा? म्हणूनच आपल्यावर निसर्गाचा कोप ओढवतोय. महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंगमुळे येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतंय, ही वस्तुस्थिती आहे. अध्यात्माच्या शक्तीमुळे माणूस आपल्याखेरीज इतर जगाचा, इतरांच्या भावनांचा विचार मानवतेच्या पातळीवर करू लागतो.
तुम्ही अध्यात्माचे क्लासेस घेता असं कळलं. त्याचं स्वरूप नेमकं काय असतं?
स्मिता - कोविड काळात लॉकडाऊनमुळे सगळी मंडळी घरात अडकलेली असताना मी ऑनलाइन स्वरूपात मेडिटेशन, शरीराचे संतुलन चक्र याविषयी मार्गदर्शन करू लागले. ज्याला आपल्या देशातच नाही, तर जगभर खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. मग हे रुटीनच बनलं. भारताखेरीज माझे विद्यार्थी अमेरिका, साऊथ अमेरिका, जपान, जर्मनी असे अनेक देशांत आहेत. व्यक्तिगत मार्गदर्शनाबरोबरच अध्यात्माशी संबंधित एक अभ्यासक्रमही मी तयार केला आहे. तो मी ऑनलाइन शिकवते. अध्यात्मामुळे माझं मन शांत झालं, एका पीसफुल जीवनाचा मी आनंद घेते. ज्या अध्यात्मामुळे मला लाभ झाला ते आपले भारतीय अध्यात्म जगभर नेल्याचं समाधान आज मला आहे.
अभिनय क्षेत्राचे काय? पुन्हा तिथे परत येण्याचा विचार आहे का?
स्मिता - अभिनयाच्या खूप ऑफर्स नाहीत सध्या, पण एखादी आल्यास काम करते. पण शूटिंगसाठी फार दूर जाणं मला योग्य वाटत नाही. माझं कुटुंब आहे, माझी नव्वदी ओलांडलेली आई माझ्या घरी असते, तिच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. अध्यात्म आणि दैनंदिन जीवन यांचा समतोल राखत मी माझं आयुष्य जगत आहे. त्यात मी समाधानी आहे.
ज्येष्ठ सिने पत्रकार