'रील स्टार' ते 'रोल स्टार'

पूर्वी राजकारणात नेतृत्व उभे राहण्यासाठी रस्त्यावरची आंदोलने, जनसंपर्क आणि वर्षानुवर्षांची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची मानली जायची. आता मात्र हातातला मोबाईल, सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि काही सेकंदांची रील राजकीय नेतृत्वाची नवी दारे उघडू लागली आहेत. राजकारणाच्या आखाड्यात आता रील स्टार्सची एण्ट्री होत असून, लोकशाहीच्या बदलत्या प्रवासाचे हे नवे पर्व ठरत आहे.
'रील स्टार' ते 'रोल स्टार'
'रील स्टार' ते 'रोल स्टार''एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

विशेष

अतुल माने

पूर्वी राजकारणात नेतृत्व उभे राहण्यासाठी रस्त्यावरची आंदोलने, जनसंपर्क आणि वर्षानुवर्षांची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची मानली जायची. आता मात्र हातातला मोबाईल, सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि काही सेकंदांची रील राजकीय नेतृत्वाची नवी दारे उघडू लागली आहेत. राजकारणाच्या आखाड्यात आता रील स्टार्सची एण्ट्री होत असून, लोकशाहीच्या बदलत्या प्रवासाचे हे नवे पर्व ठरत आहे.

राजकीय नेतृत्वासाठी अंगी कोणत्या कलागुणांची आवश्यकता असते याचे उत्तर समकालीन स्थितीत दडलेले असते. मागणी तसा पुरवठा या नात्याने प्राप्त परिस्थितीमध्ये लोकांवर मोहिनी टाकून भुरळ घालणारी व्यक्तिमत्त्वं; राजकारणी म्हणून काही काळ उदयास येतात यांची असंख्य उदाहरणे इतिहासाच्या कालकुपित बंद आहेत. डावी, उजवी, समाजवादी, हिंदुत्ववादी, जहाल, मवाळ, विनोदी, अभिनयाचे अंग असणाऱ्या अशा असंख्य व्यक्तिमत्त्वांनी राजकीय नभांगण नेहमीच व्यापले आहे. त्यात आता भर पडत आहे ती भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या सध्याच्या डिजिटलच्या मळलेल्या वाटेवर आता राजकीय नेतृत्व करण्याची आस बाळगून असलेल्या असंख्य सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स या नवजात असलेल्या रील स्टारची. आपल्या लाखो चाहते म्हणजे फॉलोअर्सच्या बळावर हे स्टार नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करत असताना या नवनेतृत्वाला अनेकजण विशेषत: जेन-झी पिढी ही मनापासून दाद देत असल्याचे चित्र जगभरात दिसत आहे. आता झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत हे रील स्टार भावी नेतृत्व म्हणून राजकीय आसमंतात उदयास आले आणि चमकत राहिले. भविष्यात या स्टारचे असंख्य पुंजके राजकीय आखाड्यात पाहावयास मिळतील.

जगाचा इतिहास पाहिला तर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि त्यांच्या फॉलोअर्सची ताकद काय कमाल करू शकते याचे सप्रमाण उदाहरण युक्रेनच्या विद्यमान नेतृत्वामधून दिसून येते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन असले तरी त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांच्या असंख्य रीलना लाखोंची मिळणारी दाद ही थेट मतात उतरली. इकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रील स्टार नसले तरी त्यांना अधूनमधून रील तयार करून आपले फॉलोअर्स वाढविण्याची हौस असते. सध्या होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत हे पाहण्यात येत आहे. नेपाळमध्ये सुद्धा हेच रील स्टार रोल स्टार बनले होते. प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या प्रस्थापित राजकीय नेत्यांविरुद्ध तरुणांनी पुकारलेल्या एल्गारामुळे नेपाळमध्ये मोठे परिवर्तन घडून आले. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी रील स्टार असलेल्या बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू झाली. नेपाळमध्ये प्रशासकीय अनागोंदी, वाढता भ्रष्टाचार आणि सत्तेत असलेल्या मोजक्या घराण्यांच्या मक्तेदारीविरोधात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली होती. या आंदोलनाचे नेतृत्व बालेन शाह यांनी केले होते. आपल्याकडे नुकत्याच झालेल्या मराठवाडा आणि नागपूर पदवीधर निवडणुकांमध्ये इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर लोकप्रिय असलेल्या रील स्टार्सनी प्रस्थापित राजकीय पक्षांना मोठा धक्का दिला. छत्रपती संभाजीनगर/मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढलेले रील स्टार रविराज साबळे-पाटील यांनी २० हजारांहून अधिक मते घेत निवडणुकीचे पूर्ण समीकरण बदलून टाकले आणि ते ‘जायंट किलर’ ठरले, तर नागपूर मतदारसंघातून सोशल मीडिया स्टार नितेश कराळे मास्तर यांनीही अपक्ष म्हणून मोठी मते मिळवत राजकीय पक्षांची गणिते बिघडवली.

हल्लीचा जमाना जेन-झीचा असल्याने तंत्रज्ञान व समाजमाध्यमांचा बोलबाला मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश राजकीय पक्षसुद्धा सध्या उमेदवारी देताना इच्छुक उमेदवारांचे किती फॉलोअर्स आहेत याचा अभ्यास करून निर्णय घेतात. ज्याचे जास्त फॉलोअर्स तेवढी त्याला नेतृत्वासाठी चांगली संधी हे सूत्र अंगिकारले जात असल्याने रील स्टार त्याचा फायदा घेणारच ही वास्तवता. पारंपरिक भाषणांपेक्षा आजची तरुण पिढी रील आणि शॉर्ट व्हिडीओ जास्त पाहते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच मोठे नेते डिजिटल इन्फ्लुएंसर्सचा वापर करत आहेत. अनेक राजकीय नेते स्वतःच्या कामाचे प्रमोशन करण्यासाठी किंवा विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी रील स्टार्सना लाखो रुपयांचे मानधन देऊन रील तयार करून घेत आहेत. रणवीर अल्लाहबादियासारख्या यूट्यूबर्सनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखती हे त्याचे उत्तम उदाहरण. रील स्टार ध्रुव राठी व त्याचे करोडो फॉलोअर्स पाहता भविष्यात ध्रुवचा राजकारणाच्या आखाड्यात पाहावयास मिळाला तर नवल वाटू नये. मधल्या काळात पडद्यावरील स्टारनी राजकारणात प्रवेश केला होता. गोविंदा, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी, कंगणा रणावत अशी अनेक नावे घेता येतील. या स्टारचे आकर्षण त्या पिढीला म्हणजे आताच्या भाषेतील बूमर पिढीला होते हे पाहण्यात येते.

सध्याच्या डिजिटल युगात राजकीय नेतृत्वाची व्याख्या आणि माध्यम दोन्ही झपाट्याने बदलत आहेत. पूर्वी जिथे नेत्यांना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जाहीर सभा, पदयात्रा आणि छापील माध्यमांवर अवलंबून राहावे लागायचे, तिथे आता सोशल मीडिया रील हा राजकीय नेतृत्वाचा एक नवा आणि अत्यंत प्रभावी आयाम बनला आहे. आजचा तरुण वर्ग तासन् तास चालणारी भाषणे ऐकण्याऐवजी रील बघणे पसंत करतो. जे नेते ट्रेंडिंग गाणी, संवाद किंवा प्रभावी पार्श्वसंगीत वापरून रील्स बनवतात, ते तरुणांमध्ये लवकर लोकप्रिय होतात. रील्सच्या माध्यमातून नेत्यांना त्यांच्या राजकीय कार्याव्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक आयुष्य, छंद, आणि पडद्यामागील कष्ट दाखवता येतात. त्यामुळे जनतेला त्यांच्याबद्दल अधिक जवळीक वाटते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रीलस्टार नेते १५ ते ६० सेकंदांच्या छोट्या व्हिडिओंच्या माध्यमातून लाखो मतदारांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत थेट पोहोचतात. क्लिष्ट राजकीय मुद्दे सोप्या भाषेत मांडणे यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे रीलस्टार’ असणे हा आता केवळ मनोरंजनाचा भाग राहिलेला नसून, आधुनिक राजकीय नेतृत्वाचे आणि निवडणूक प्रचाराचे एक अपरिहार्य व शक्तिशाली शस्त्र बनले आहे. रस्त्यावर उतरून दारोदारी फिरत आपला प्रचार करण्याऐवजी आपली व पक्षाची भूमिका किंवा विरोधकांवर करायचे पलटवार रील्सच्या माध्यमातून काही मिनिटांत व्हायरल होतात, ज्यामुळे जनमानसातील अजेंडा ठरवणे सोपे जाते. हल्ली रोटी पेक्षा डेटा ला महत्व असल्याने लाखो जनतेससमोर केवळ रील च्या माध्यमातून आपला प्रचार व प्रसार करण्याची संधी या मिळत असल्याने अनेकांचा ओढा आता राजकारणाकडे वाढला आहे.

गेल्या काही काळापासून निवडणुकीचे तंत्र आणि मंत्र बदलले आहेत. रस्त्यावरील पारंपरिक प्रचार आणि आंदोलनांपासून ते आजच्या इन्स्टाग्राम रील आणि सोशल मीडियाद्वारे थेट जनतेशी संपर्क साधण्यापर्यंतचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा अत्यंत रंजक आणि वेगाने बदलणारा आहे.पूर्वी एखाद्या समस्येवर आवाज उठवण्यासाठी किंवा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांना गल्लोगल्ली फिरावे लागायचे. लोकांना एकत्र जमवण्यासाठी सभा, पत्रके आणि लाऊडस्पीकरचा वापर करावा लागायचे, ज्याला प्रचंड वेळ आणि मनुष्यबळ लागायचे. समाजवादी चळवळीला अतिशय समृद्ध आणि जुना वारसा आहे। देशातील स्वातंत्र्यलढा, सामाजिक समता आणि कामगार-शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्यातील अनेक विचारवंत आणि नेत्यांनी समाजवादी आंदोलनाचे नेतृत्व रस्त्यावर उतरून केले. मधू दंडवते, नानासाहेब गोरे, पाणीवाली बाई" म्हणून ओळखली जाणाऱ्या मृणाल गोरे, भाई वैद्य अशी नेतृत्वाची फळी समाजमान्यतेने उभी राहिली. १९७० च्या दशकात मृणाल गोरे, प्रमिला दंडवते आणि अहिल्या रांगणेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात ‘लाटणे मोर्चा’ काढला होता, जो प्रचंड यशस्वी ठरला होता ज्याची आजही आठवण काढली जाते. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि शेतीमालाला रास्त भाव मिळवण्यासाठी समाजवादी विचारांतून अनेक आंदोलने झाली. शरद जोशी यांनी स्थापन केलेली ‘शेतकरी संघटना’ आणि त्यानंतरच्या काळात राजू शेट्टी, डॉ. अजित नवले असे नेते याच रस्त्यावरील आंदोलनातून तयार झाले. काळ बदलला तशी समाजाची अभिरुचि बदलली. पूर्वी रस्त्यावर उतरून होणारी लढाई आता डिजिटल परीक्षेत्रात आली. हातातील मोबाइल ही याचे संपर्क केंद्र बनले. जरी आज डिजिटल संपर्क वाढला असला, तरी रस्त्यावरील आंदोलनांचे महत्त्व पूर्णपणे कमी झालेले नाही. अनेकदा आदिवासी बांधव, शेतकरी किंवा विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि त्या आंदोलनाचे थेट व्हिडिओ किंवा रील सोशल मीडियावर टाकून त्याला देशव्यापी प्रसिद्धी मिळवून देतात. नवी दिल्ली मधूळ सीजपी च्या आंदोलनात याच विविध रील चा वापर अनेक रील स्टार ने केला. यातून विविध राज्यात अनेक रील स्टार भविष्यात राजकारणात पाहावयास मिळतील.

रील स्टार्स (सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स) आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील समीकरण सध्याच्या डिजिटल युगात वेगाने बदलत आहे. पूर्वी जिथे निवडणुका जिंकण्यासाठी किंवा जनमत तयार करण्यासाठी पारंपरिक सभा, पोस्टर्स आणि रॅलींवर भर दिला जायचा, तिथे आता इन्स्टाग्राम रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. आता अनेक सोशल मीडिया स्टार्स केवळ दुसऱ्यांचा प्रचार न करता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आजची तरुण पिढी बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘रील्स’ हे सर्वात प्रभावी शस्त्र बनले आहे. राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे सोशल मीडिया सेल तरुणांच्या आवडीनुसार रील डिझाइन करतात. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स चे वाढते पीक पाहता यातून अनेक नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. याला जोड याआहे ती त्यांच्या लाखों फॉलोअर्स ची. आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स कोणत्याही थराला जातात. काहीवेळा केवळ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी चुकीची माहिती किंवा अंधश्रद्धा पसरवणारा कंटेंट शेअर केला जातो, ज्याचा विपरीत परिणाम होत आहे.

रील स्टार्सना लाखो फॉलोअर्स असले, तरी सोशल मीडियावरील व्ह्यूज म्हणजे प्रत्यक्ष मते नव्हेत, हेही अनेकदा सिद्ध झाले आहे.अनेकदा सोशल मीडियावर दशलक्षांमध्ये फॉलोअर्स असणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मात्र अगदी कमी मते मिळतात असेही पाहण्यात आले असले तरी ते प्रमाण नगण्य आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी रील्सचा फायदा निश्चित होतो, परंतु प्रत्यक्षात निवडणूक जिंकण्यासाठी बूथ-लेव्हलचे मॅनेजमेंट आणि थेट ‘ग्राउंड कनेक्ट’ (लोकांशी प्रत्यक्ष संपर्क) असणे आजही तितकेच महत्त्वाचे असल्याचा युक्तिवाद प्रमाण मानले तरी मतदानासाठी मतदाराला तयार करण्याचे जोखमीचे काम रील स्टार च्या माध्यमातून होते. हे स्टार्स कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट आपल्या प्रेक्षकांशी जोडलेले असतात, ज्यामुळे त्यांच्यातील आणि चाहत्यांमधील नाते अधिक घट्ट होत असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक रील स्टार्स पर्यावरण, मानसिक आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या गंभीर विषयांवर रील बनवून समाजाला जागरूक करतात. त्यांचा मोठा प्रभाव जनमानसावर विशेषता नव पिढीवर जास्त होतो. सामान्य पार्श्वभूमीतून आलेले अनेक तरुण आपल्या नेतृत्वाच्या आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करत आहेत आणि इतरांनाही प्रेरित करत आहेत. पूर्वी असे नेतृत्व हे केवळ समाजकारण किंवा कॉर्पोरेट जगता पुरते मर्यादित होते. मात्र, आज सोशल मीडियावरील ‘रील स्टार्स’ किंवा ‘इन्फ्लुएन्सर्स’ कोट्यवधी लोकांच्या विचारांवर आणि वर्तनावर प्रभाव पडत आहेत, जे नेतृत्वाचे च एक आधुनिक रूप साकारले जात आहे.

रस्त्यावरील आंदोलनातून तसेच कोपरा सभा, व्यासपीठावरून’ सुरू झालेला हा लोकशाहीचा प्रवास आज लोकांच्या ‘मोबाईल स्क्रीन’पर्यंत येऊन पोहोचला आहे. यामुळे नेत्यांना आणि जनतेला एकमेकांशी थेट संवाद साधण्याची एक नवी आणि वेगवान माध्यम प्रणाली मिळाली आहे.थोडक्यात सांगायचे तर, रील स्टार्स हे आजच्या राजकीय नेतृत्वाला नॅरेटिव्ह (प्रचार) सेट करण्यासाठी एक महत्त्वाचे शस्त्र मिळाले असले तरी दुसरीकडे रील स्टार्स स्वतः राजकीय नेतृत्वाची नवी पिढी म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. रील स्टार असणे म्हणजे केवळ मनोरंजन करणे नव्हे, तर तो लाखो लोकांच्या विचारांना दिशा देण्याचा एक शक्तिशाली मार्ग बनला आहे. जर या लोकप्रियतेचा वापर योग्य कारणासाठी आणि जबाबदारीने केला, तर हे रील स्टार्स आजच्या काळातील सर्वात प्रभावी रोल स्टार नेते’ ठरू शकतात.

ज्येष्ठ पत्रकार