

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात आद्य संगीत नाटककार कोण, याविषयी अण्णासाहेब किर्लोस्कर आणि सोकर बापूजी त्रिलोकेकर यांच्यातील वाद आजही कायम आहे. मात्र, १८७९ मध्ये ‘नलदमयंती’ हे गद्य-पद्यात्मक संगीत नाटक सादर करून मराठी संगीत रंगभूमीची पायाभरणी करणाऱ्या सोकर बापूजी त्रिलोकेकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते.
आद्य संगीत नाटककार कोण ? अण्णासाहेब किर्लोस्कर की सोकर बापूजी त्रिलोकेकर?’ हा वाद अजून अनिर्णित राहिलेला आहे. तरी पण कालक्रमाच्या दृष्टीने तो मान त्रिलोकेकरांकडे जायला हवा, असं अनेक नाट्य अभ्यासकांचं मत आहे. सोकर बापूजी त्रिलोकेकर यांचा जन्म एका प्रतिष्ठित सधन कुळात २९ एप्रिल १८३६ रोजी झाला.
मराठी भाषेचा अभ्यास त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे झाल्यावर सोकर बापूजी हे एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये इंग्रजी शिकू लागले .त्या काळात मुंबईत युनिव्हर्सिटीची स्थापना झाली नव्हती व त्यामुळे अर्थातच स्वतंत्र कॉलेज आणि कॉलेजच्या हल्लीच्या पदव्याही नव्हत्या. मध्यम प्रतीचं म्हणजे सध्याच्या हायस्कूल स्तरावरचं शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणाला सुरुवात होई. उच्च शिक्षणाच्या परीक्षात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉर्मल स्कॉलर व बेस्ट स्कॉलर असं म्हटलं जात असे. नॉर्मल क्लासात शिक्षकांचं काम कसं करावं याविषयीचं शिक्षण देण्यात येत असे. सोकर बापूजी हे जात्याच तीव्र बुद्धीचे असल्याकारणाने त्यांनी योग्य काळात आपला अभ्यासक्रम पुरा केला आणि ते नॉर्मल स्कॉलर झाले. याप्रमाणे शिक्षण विषयात पारंगत झाल्यावर त्यावेळी उत्कर्षावस्थेत असलेल्या ‘प्रभू सेमिनरी’ या शिक्षण संस्थेमध्ये प्रथम काही दिवस त्यांनी शिक्षकाचं काम केलं आणि त्यानंतर त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षकाची जागा मिळाली. त्या जागेवर पाच- सहा वर्षे काम केल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात ट्रान्सलेटरची नोकरी धरली. मुंबई हायकोर्टात ट्रान्सलेटर म्हणून रुपये ८० पगारावर ते नोकरीला राहिले आणि आपल्या अंगच्या हुशारीमुळे ४६० रु. पगारापर्यंत चढून मोठे हुद्देदार होऊन १८९७ मध्ये निवृत्त झाले. सरकारी काम करीत असतानाच त्यांचं मन संगीताकडे आणि नाटकांकडे वळलं.
त्यांना नाटकं पाहण्याची खूप आवड होती. नाटकांच्या सुधारणेकरिता ते काही गोष्टी सुचवत असत. १८७१ मध्ये एलफिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी संस्कृत ‘शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग केला. यावरून त्रिलोकेकरांनी अशाच प्रकारची मराठी करमणूक तयार केली पाहिजे, असं मनाशी ठरवलं आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी १८७९ मध्ये आपलं गद्यपद्यात्मक नाटक ‘नल दमयंती’ प्रसिद्ध केलं. त्याचे प्रयोगही झाले आणि ते चांगले उतरले असल्याची सर्व रसिकांनी प्रशंसा केली. वास्तविक हाच मराठी संगीत नाटकाचा आरंभ होय. एकच वर्षाने १८८० साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी संस्कृत ‘शाकुंतल’ चं मराठी रूपांतर रंगभूमीवर आणलं आणि त्रिलोकेकरांच्या ‘ नल दमयंती ‘ पेक्षा अण्णासाहेबांच्या ‘ शाकुंतल ‘ चा बोलबाला अधिक झाल्याने आद्य नाटककार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्कर ओळखले जाऊ लागले.
मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या चार भाषांचं उत्तम मार्मिक ज्ञान सुपर बापूजी यांना होतं. तथापि आपल्या मातृभाषेविषयी म्हणजेच मराठी बद्दल त्यांना अत्यंत प्रेम वाटे. मराठी कवितेचे वाचन आणि लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय असल्याकारणाने आणि ते जात्याच रसिक व बुद्धिमान असल्याकारणाने अल्पकाळात शुद्ध आणि सरस कविता करण्याची हातोटी त्यांना साधली होती.
पारसी नाटक मंडळींची नाटकं पाहण्याचा नादही सोकर बापूजींना लागला होता. या नाटकांचे प्रयोग गुजरातीत होत असले तरी ते पाहण्यासाठी सोकर बापूजी वारंवार जात असत. त्या काळात मराठीमध्ये जुन्या पद्धतीची पौराणिक नाटक होत असत आणि तीही पाहायला सोकर बापूजी जात असत. प्रसंग विशेषी त्या नाटक मंडळांना ते सहाय्यही करीत.
इसवीसन १८७१ साली एलफिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी कालिदास कविकृत संस्कृत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून दाखवला. त्यावेळी नाटकातील पदं प्रत्येक पात्रानं रागरागिणीत गाऊन दाखविली, तो प्रयोग चांगला वाटला आणि त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. ते पाहून तशा प्रकारचे प्रयोग मराठीमध्ये व्हावेत असं सोकरजींना वाटलं. गुजराती नाटकं पाहून तसल्या प्रकारची बहुजन समाजाचं चित्त वेधून टाकणारी रचना मराठीमध्ये करावी अशी त्यांना स्फूर्ती झालीच होती, त्यामध्ये या नवीन कल्पनेची भर पडली.
विष्णुपंत भावे यांनी पौराणिक नाटकांच्या प्रयोगात गायनाचा समावेश केला होता. परंतु सर्व पात्रांच्या तोंडची पदं एकट्या सूत्रधारालाच म्हणावी लागत. त्यामुळे रसभंग होत असे. ती पद्धत सोडून प्रत्येक पात्रानं आपापली पदं स्वतःच म्हणावी म्हणजे गायनात विविधता येऊन रसभंगाचाही दोष टळेल असं सोकर बापूजींना वाटलं आणि त्याप्रमाणे १८७९ मध्ये त्यांनी नलदमयंती नाटकाचं गद्य-पद्य युक्त पुस्तक प्रसिद्ध केलं. या नाटकाचा रंगभूमीवरील प्रयोग लवकरच झाला. हा प्रयोग बसविण्याच्या कामी शंकर मोरू रानडे, वासुदेवराव डोंगरे, नारायण हरी भागवत अशा नाट्यकलेत निष्णात असलेल्या गृहस्थांनी सहाय्य केलं होतं, अशी माहिती मिळते. मराठी रंगभूमीवर ही नवीन सुधारणा आणल्यामुळे सोकर बापूजींचं सर्वत्र अभिनंदन झालं.
‘नल दमयंती’ शिवाय ‘हरिश्चंद्र’ व ‘सावित्री’ ही सोकर बापूजी यांची नाटकं प्रसिद्ध झालेली आहेत. या सर्व नाटकांमध्ये गद्यपद्याची भाषा सुबोध, भारदस्त, रसाळ आणि कुलीन स्त्रिया व मुलं यांच्या कानांवर जाण्यासही योग्य अशी आहे, अशी शिफारस पत्रे त्या काळातील नाट्य विषयीच्या अभ्यासकांनी दिली होती.
सोकर बापूजींच्या नाटकांची प्रशंसा तत्कालीन वृत्तपत्रात छापून आली होती. एका वृत्तपत्रात म्हटलं होतं की ‘बहीण भावंडांनी, बापलेकांनी, तरुण स्त्री-पुरुषांनी एका पंगतीत बसून पाहण्याइतकी त्यांची नाटकं शुद्ध व निर्मळ आहेत . त्रिलोकेकरांनी काही गुजराती नाटकं लिहून गुजराती विद्वानांकडून देखील शाबासकी मिळवली होती.
‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कविचा असे’ ,या केशवसुतांच्या उक्तीप्रमाणे सोकर बापूजींचा स्वभाव आमरण साधा निष्कपट व प्रेमळ राहिला . त्यांच्या भाषेप्रमाणे त्यांचं चरित्रही निर्मळ व निर्व्याज होतं. मराठी भाषा आणि विशेषतः मराठी रंगभूमी यांच्या इतिहासात सोकर बापूजींच्या नावाचा निर्देश आजही सन्मानपूर्वक होतो.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com