नावडतीचे मीठ अळणी

सत्य-अहिंसा, हिंदू-मुस्लिम ऐक्य, सौहार्द, शांतता, सहिष्णूता, सामाजिक बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण साऱ्या जगाला देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने चालणारे ख्यातनाम पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, जलतज्ज्ञ व भारतीय जवानांचे काळजीवाहक सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
नावडतीचे मीठ अळणी
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

सत्य-अहिंसा, हिंदू-मुस्लिम ऐक्य, सौहार्द, शांतता, सहिष्णूता, सामाजिक बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण साऱ्या जगाला देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने चालणारे ख्यातनाम पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, जलतज्ज्ञ व भारतीय जवानांचे काळजीवाहक सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारविरोधी भूमिका घेतल्याने वांगचूक यांच्यासारखे एकेकाळचे आवडते सामाजिक कार्यकर्ते आता सत्ताधाऱ्यांसाठी नावडते झाले आहेत. याला नावडतीचे मीठ अळणी म्हणायचे नाही तर काय?

पर्यावरणप्रेमी सोनम वांगचूक यांनी निसर्गरम्य लेह, लडाख, कारगिल यासारख्या भागात जेव्हा बर्फवृष्टी होते, तेव्हा त्या बर्फाचे स्तूप बनवले आणि बर्फ वितळते तेव्हा त्याच स्तुपाचे पाणी शेतीच्या उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला. पाण्याच्या टंचाईवर मात करणारा हा नैसर्गिक, साधा, सोपा व परवडणारा पर्याय शोधल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सोनम वांगचूक यांना ‘रोलेक्स’ पुरस्कार प्राप्त झाला.

एवढ्यावरच समाधान मानतील ते सोनम वांगचूक कसले? त्यांनी गलवान खोरे, सियाचेनसारख्या अतिदुर्गम भागात कडाक्याच्या थंडीत देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी ‘सौर तंबू प्रकल्प’ राबविला. त्यामुळे बर्फाळ प्रदेशातही सैनिकांसाठी उबदार तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था निर्माण झाली. या प्रयोगामुळे इंधन बचतीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण झाले, प्रदूषण टळले आणि देशाभिमान जागविला गेला तो निराळाच.

सोनम वांगचूक यांनी त्यापुढे जाऊन नापास विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण वर्ग सुरू केले व तरुणांच्या हाताला काम दिले. डोंगराळ भागातील समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी केवळ संशोधनच केले नाही, तर त्याचा स्थानिकांना कसा उपयोग होईल तेही पाहिले. लडाखमधील बौद्ध व कारगिलमधील मुस्लिम समुदायांना सोबत घेऊन त्यांनी सौरऊर्जा आधारित पर्यावरणस्नेही मातीची घरे तयार करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे जतन, संरक्षण व संवर्धन झाले. या अनोख्या सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय कार्याबद्दल सोनम वांगचूक यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यांच्या कार्याला जागतिक मान्यता मिळाली ती अशी.

एवढा जागतिक मानसन्मान, प्रतिष्ठा मिळूनही सोनम वांगचूक यांनी लेह, लडाख व कारगिलला आपली कर्मभूमी मानली. तेथील सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणविषयक कार्याला वाहून घेतले. स्थानिकांच्या प्रश्नावर आवाज उठवला. सामाजिक जागृती केली. चुकीच्या शासकीय धोरणांना विरोध करतानाच, बड्या उद्योगपतींशीही त्यांनी पंगा घेतला. निसर्गरम्य लडाखमध्ये बड्या धेंडांचे मोठे प्रकल्प आले तर लडाखमधील शांतता हरपेल, आदिवासींचे स्वच्छंद जीवन अडचणीत येईल याची खूणगाठ मनाशी बाळगूनच त्यांनी स्थानिक तरुणांना संघटित केले.

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर लडाखमधील झंस्कार, द्रास, शम, नुब्रा आणि चांगथांब असे नवे जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता, त्याचे सोनम वांगचूक यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत व २०२० च्या हिल कौन्सिलच्या निवडणुकीत दिले होते. तथापि ही आश्वासाने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यातच, चांगथांग येथील मेगा सौरऊर्जा प्रकल्पाने पश्मीना शेळ्यांच्या चराई क्षेत्राची हानी होईल व त्याचा आपल्या रोजीरोटीवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांना सतावत आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी सोनम वांगचूक मैदानात उतरले.

लडाखला आदिवासी राज्याचा दर्जा द्या, आदिवासींच्या हक्काचे रक्षण करण्याची हमी देणाऱ्या सहाव्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करा, लेह व कारगिलसाठी लोकसभेचे दोन मतदारसंघ तयार करा, स्थानिक भूमिपुत्रांना सरकारी नोकऱ्या द्या, या मागण्यांसाठी सोनम वांगचूक यांनी गांधींच्या शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू केले. लेह ते दिल्ली अशी पदयात्रा काढली. मागील चार वर्षे आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचूक यांनी मागील १० सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू केले होते, तेही शांततेच्या मार्गाने. या आंदोलनादरम्यानच्या काळात लडाखमध्ये हिंसाचार उफाळला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात चार जण ठार झाले. अनेक जायबंदी झाले. हा हिंसक मार्ग आपला नाही, असे सांगून सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण थांबविले.

दरम्यान, दुसरीकडे राजकीय चक्रे फिरली. सोनम वांगचूक हेच लडाखमधील हिंसाचाराला कारणीभूत असल्याचे सांगून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. त्यांची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. लडाखमध्ये इंटरनेट सेवा बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या, ६ ऑक्टोबरला एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सोनम वांगचूक यांच्यासह सर्व आंदोलकांची तत्काळ सुटका करा, अशी मागणी स्थानिक संघटनांनी केली असून या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे आता साऱ्या लडाखवासीयांचे लक्ष लागले आहे.

लडाख हिंसाचाराच्या घटनेमुळे केंद्र सरकार व लडाख प्रतिनिधी यांच्या उद्या होणाऱ्या चर्चेला बाधा आली आहे. कोणतेही प्रश्न संवादातून सुटतील. त्यामुळे लडाखच्या नेत्यांनी पुढे येऊन चर्चेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केली आहे.

सोनम वांगचूक हे पाकिस्तान किंवा बांगलादेशात गेले होते. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्यांच्या संस्थांनी आर्थिक अनियमितता केली आहे असे आरोप करीत त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून जोधपूरच्या तुरुंगात डांबण्यात आले आहे. ज्या सोनम वांगचूक यांनी भाजपच्या निर्णयाचे एकेकाळी समर्थन केले, ज्यांनी लडाखच्या प्रश्नावर आवाज उठवला, ज्यांनी देशविदेशातील मानसन्मान मिळवले, त्यांचाच आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली अंगमो यांनी केला आहे. त्यांच्या मते, सोनम वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारून त्यांच्याविरुद्ध बेलगाम आरोप केले जात आहेत. बिनबुडाचे कथानक तयार केले जात आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये ते संयुक्त राष्ट्र व डॉन मीडिया यांनी पाकिस्तानात आयोजित केलेल्या हवामान परिषदेत सहभागी झाले होते. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाइफचे कौतुक केले होते. मागील सात वर्षांत त्यांच्या संस्थेने सौरऊर्जेवर आधारित इमारती बांधल्या. त्यातून चार हजार टन कार्बनचे उत्सर्जन वाचविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

केंद्र सरकारने त्यांच्या अनेक प्रकल्पांना पुरस्कार देऊन गौरविले आहे. वांगचूक हे देशद्रोही आहेत, तर मग त्यांना सरकारने एवढे पुरस्कार का दिले, असा संतप्त सवाल गीतांजली यांनी उपस्थित केला आहे. सोनम वांगचूक यांच्या संस्थांविरोधात चौकशीचा ससेमिरा लावून त्यांची आर्थिक नाकाबंदी का केली जात आहे? त्यांच्या विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन मारझोड का केली जात आहे? माझ्यावर पाळत ठेवून माझाही पाठलाग का केला जात आहे? असे अनेक सवाल गीतांजली यांनी उपस्थित केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालय लडाख पोलिसांचा दुरुपयोग करत असल्याचे सांगून सोनम वांगचूक यांच्यावरील सर्व आरोप गीतांजली यांनी फेटाळून लावले आहेत. सोनम वांगचूक यांच्या अटकेला आठवडा उलटून गेला तरी त्यांच्याविषयी मला सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. माझ्याशी संपर्क साधण्यात आला नाही. त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागत असल्याचे गीतांजली यांनी स्पष्ट केले आहे. वांगचूक यांना ताब्यात घेण्याची कृती मनमानी, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारी आहे. राष्ट्रीयस्तरावर नावाजलेले विचारवंत, पर्यावरणवादी, संशोधक व समाजसुधारक असलेल्या वांगचूक यांनी नेहमीच गांधींनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा व शांतीच्या मूल्यांचा पुरस्कार केला आहे. तरी वांगचूक यांच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना नाहक छळ, धमक्या, चौकशी व मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

आयुष्यभर समाजासाठी खस्ता खाणाऱ्या या गांधीवादी विचारांच्या दाम्पत्याच्या वाट्याला आता केवळ मनस्ताप आला असून एकेकाळी भाजपाला प्रिय असलेले वांगचुक आता त्यांना नकोसे झाले आहेत. नावडतीचे मीठ अळणी झालेय ते असे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in