

अजब निसर्ग
मकरंद जोशी
निसर्ग फक्त दिसत नाही, तो सतत बोलत असतो. कधी किलबिलाटातून, कधी डरकाळीतून, तर कधी शांत गुणगुणीतून. या आवाजांच्या भाषेत दडलेलं संवादविश्व उलगडून दाखवणारा हा लेख.
आपल्या अवतीभवतीचा निसर्ग हा आकर्षक रंग-गंधातून जसं त्याचं अस्तित्व जाणवून देत असतो, त्याचप्रमाणे या निसर्गातले विविध घटक त्यांच्या वेगवेगळ्या आवाजांनी निसर्गाला श्रवणीयही करतात. पहाटे सुरू होणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटापासून ते रात्री दचकवणाऱ्या रातकिड्यांच्या किरकिरीपर्यंत निसर्गाचा साऊंड ट्रॅक सतत सुरूच असतो. आपण माणसं एकमेकांशी बोलून आपल्या भावना व्यक्त करतो. निसर्गातील अन्य जीवांकडे माणसासारखी भाषा नसली तरी भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण करण्यात हे जीव कमी नाहीत. त्यामुळेच तर वाघाची डरकाळी, बेडकाची डरांव डरांव, कोकिळची सुमधुर शीळ, सापाचं फुस्स-फुस्स, गाई-म्हशींचं हंबरणं, डासाची गुणगुण, माकडांचे हुंकार असे वेगवेगळे ध्वनी निसर्गात कायम उमटत असतात. राग-प्रेम-भीती अशा आपल्या भावना याच आवाजांमधून तर एकमेकांपर्यंत पोहोचवण्यात हे जीव यशस्वी ठरतात. त्यामुळे निसर्गाचं पुस्तक वाचताना ही ध्वनींची भाषाही समजणं आवश्यक असतं.
सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक असे निसर्गातले सगळेच जीव जरी आवाज काढत असले, ध्वनी निर्माण करत असले तरी या सगळ्यांची ध्वनी निर्माण करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वाघ, म्हैस, माकड, हरीण असे सस्तन प्राणी त्यांच्या गळ्यातल्या स्वरयंत्राच्या मदतीने आवाज काढतात. पक्ष्यांच्या गळ्यात देखील स्वरयंत्रच असतं, मात्र त्याची रचना सस्तन प्राण्यांच्या गळ्यातील स्वरयंत्रापेक्षा वेगळी असते. सस्तन प्राण्यांच्या (म्हणजे माणसांच्या ही!) गळ्यातील स्वरयंत्र (लिरिंक्स) म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्या श्वासनलिकेवरील झाकण असतं, ज्यावर फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा आदळते आणि तोंडाच्या पोकळीत फिरते. त्यामुळे वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात. पक्ष्यांच्या गळ्यातील स्वरयंत्र (सिरिंक्स) हे त्यांच्या श्वासनलिकेच्या तळाशी असते. याचा आकार उलट्या इंग्रजी वाय अक्षरासारखा असतो. त्यामुळे पक्षी एकाचवेळी दोन आवाज आपल्या गळ्यातून काढू शकतात. कीटक आणि सरपटणारे प्राणी मात्र सस्तन प्राणी व पक्ष्यांप्रमाणे गळ्यातून आवाज काढू शकत नाहीत. कीटक त्यांचे पाय, पंख असे अवयव एकमेकांवर घासून आवाज काढतात, तर साप आपले खवले घासून आवाज काढतात किंवा फुफ्फुसात हवा भरून ती जोरात बाहेर फेकून फुत्कार टाकतात. बेडकांच्या गळ्याजवळ हवेच्या पिशव्या असतात, या पिशव्यांमध्ये हवा भरून ती बाहेर सोडून बेडूक आवाज काढतात.
समुद्रात राहणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये दोन प्रकारे आवाज काढण्याची क्षमता पाहायला मिळते. सील्स, सी लायन असे प्राणी जमिनीवरील सस्तन प्राण्यांप्रमाणेच आपल्या स्वरयंत्राच्या मदतीने आवाज काढतात, तर व्हेल्स (विशेषतः दात असलेले) आपल्या स्वरयंत्राबरोबरच ब्लो होलजवळच्या एअर सॅक्सचा वापर करूनही आवाज काढतात. सील्स, ओटर्स, पोलर बेअर्स हे प्राणी जमिनीवर जसे आवाज काढतात तसेच पाण्यातही काढतात. जमिनीवर त्यांचे आवाज गर्जना, आरोळी, गुरगुर अशा प्रकारचे असतात, तर पाण्यात ते क्लिक क्लिक असा किंवा शीळेची लकेर घातल्यासारखा आवाज काढतात. डॉल्फिन्सची शरीर रचना थोडी वेगळी असते, त्यांच्या स्वरयंत्रात व्होकल कॉर्ड्स म्हणजे स्वरतंतू नसतात. त्यामुळे ते आपल्या नाकाच्या पोकळीत हवा खेळवून ध्वनी निर्माण करतात. शिळेसारखा आवाज काढण्यापासून ते एखाद्या दरवाजाच्या करकरण्यापर्यंत अनेक प्रकारचे ध्वनी डॉल्फिन्स काढताना पाहायला मिळतात. बॉटल नोस डॉल्फिन्समध्ये त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख असते. प्रत्येक डॉल्फिन जी शीळ घालतो ती अगदी स्वतंत्र, वेगळी असते. या शीळेवरून त्या त्या डॉल्फिनची ओळख पटू शकते. अशी शीळ घालून हे डॉल्फिन्स आपला ठावठिकाणा दुसऱ्या डॉल्फिन्सना सांगतात, आपली ओळख पटवतात आणि आपल्या भावनाही व्यक्त करतात.
किटकांमध्ये स्वरयंत्र नसते, पण निसर्गाने आवाज करण्यासाठी त्यांना एक अजब रचना दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रानातल्या-डोंगरातल्या रस्त्यांवरून जाताना, घरालगतच्या शेता-माळावरूनही एक विशिष्ट आवाज अनेकदा ऐकू येतो. ‘बझझझ... किर्रर.. बझझ’ असा काहीसा तो आवाज असतो. अचानक सुरू झालेला हा आवाज हळूहळू वाढत जातो, वेगवेगळ्या दिशांमधून जणू त्याला कोरसची साथ मिळते आणि खटका दाबावा तसा अचानक तो बंदही होतो. या आवाजाचा कलाकार आहे ‘सिकाडा’ हा कीटक. आपल्याला रातकिडा (निदान ऐकून) माहीत असतो, त्याचाच हा दिवसाचा अवतार म्हणा ना! त्यामुळे रातकिडाच्या चालीवर याला दिनकिडा म्हणायला हरकत नाही. सिकाडांमधील नरांच्या पोटावर आणि छातीच्या जवळ ‘टिम्बल’ असते. हा अवयव एखाद्या पातळ पण कडक पडद्यासारखा असतो. सिकाडाच्या बाह्य कवचाचाच तो भाग असतो. या टिम्बलच्या मदतीनेच नर सिकाडा आपला आवाज काढतो. नर सिकाडा आपल्या फुफ्फुसात हवा भरून घेतो आणि ती जोराने बाहेर फेकताना या ‘टिम्बल’च्या सहाय्याने आवाजाची पट्टी वर- खाली करतो. नर सिकाडा हे गाणे मादीला आकर्षित करण्यासाठी गात असतो, पण अनेक प्रजातींमधल्या माद्या मात्र असा (म्हणजे आवाजी) प्रतिसाद देऊ शकत नाहीत, त्या फक्त आवाजाच्या रोखाने नराला शोधत येतात. सिकाडा नरांचा हा आवाज अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरापर्यंत सहज ऐकू जातो. एका नराने आवाज करायला सुरुवात केली की, त्या परिसरातले बाकीचे नरही आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आवाज करू लागतात आणि रानभर सिकाडाचीच सिंफनी ऐकू येते.
सिकाडा हवेच्या मदतीने आवाज करतात, तर त्यांचे भाऊबंद म्हणावेत (आवाजाच्या बाबतीत) असे क्रिकेट म्हणजे रातकिडे तर हवेची मदत न घेता आपल्याच शरीरातून आवाज निर्माण करतात. क्रिकेट अर्थात रातकिडे हे टोळ, नाकतोडे यांच्या कुटुंबातले आहेत. क्रिकेटना त्यांच्या पुढच्या पंखावर आवाज निर्माण करण्यासाठी खास अवयवच दिलेला असतो. पंखाचा विस्तार असलेल्या या भागाला कंगव्यासारखे दाते असतात आणि आवाज निर्माण करताना क्रिकेट हे दाते एकमेकांवर घासतो आणि त्यातूनच त्याची ‘किर किर’ सुरू होते. सिकाडाच्या मादीप्रमाणेच क्रिकेटच्या माद्यांनाही आवाज करण्याचा हा अवयव नसतो, त्यामुळे त्या काही बोलतच नाहीत. आपल्याला रात्री सतत, जराही खंड न पडता ऐकू येणारी रातकिड्याची किरकिर एकसुरी वाटली तरी त्यातही वैविध्य असते. म्हणजे नर जेव्हा मादीला आकर्षित करण्यासाठी,आमंत्रण देण्यासाठी आवाज करतो तो वेगळा असतो, तर निसर्गाचे आवाज असे अजब गजब आहेत. रानातून-शेतातून फिरताना, निसर्गातले पक्षी-कीटक बघताना त्यांचे आवाज नीट ऐका. याच आवाजांमधून ते संवाद साधत असतात. त्यामुळे त्यांची ही आवाजाची भाषा आपणही शिकायला हवी. नाही का?
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com