चार भिंतींतून समुद्राकडे...

दक्षिण गोव्यातील शुभ्र वाळूचे किनारे, हिरवीगार भातशेती आणि माजोर्डा गावातील अस्सल गोवन आदरातिथ्याचा आस्वाद घेत, मानसिक थकवा दूर करणाऱ्या एका अविस्मरणीय प्रवासाची ही सुंदर अनुभूती आहे.
चार भिंतींतून समुद्राकडे...
चार भिंतींतून समुद्राकडे...
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

दक्षिण गोव्यातील शुभ्र वाळूचे किनारे, हिरवीगार भातशेती आणि माजोर्डा गावातील अस्सल गोवन आदरातिथ्याचा आस्वाद घेत, मानसिक थकवा दूर करणाऱ्या एका अविस्मरणीय प्रवासाची ही सुंदर अनुभूती आहे.

गोव्यात गेलं की, माझा एक तर गोव्यातील जंगलात वसलेल्या गावात मुक्काम असतो किंवा दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारी. शुभ्र आणि सोनेरी वाळूचे असे किनारे. गर्दी गोंगाट यापासून बऱ्यापैकी दूर आहेत. कोविडचा काळ संपल्यावर मी दक्षिण गोव्याची एक ट्रिप केली होती. या काळात एक मळभ मनावर दाटलं होतं. हे मळभ निघून जावं आणि पुन्हा उमेदीने जगायला स्वच्छ प्रकाश दिसावा यासाठी ही ट्रिप केली होती.

सगळ्यात आधी Airbnb वरून आम्ही एक स्टे बुक केला होता. ५ दिवसांसाठी. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही भटकंती होणार असल्यामुळे स्टे अगदी स्वस्त मिळाला होता. जाण्याची तयारी सुरू झाली. कपडे, कॅमेरा हे सामान अगदी आटोपशीर पद्धतीने भरलं. निघण्याचा दिवस आला. त्यावेळी आमच्याकडे चारचाकी नव्हती तर बाईक होती. बाईकवर हे सगळं सामान घेऊन, रायडिंग जॅकेट्स घालून मी आणि माझा नवरा गोव्याकडे जायला निघालो. कोल्हापूर सोडलं, हायवे पार केला, आजऱ्याचा रस्ता त्यावेळी दुतर्फा झाडे असणारा होता. आंबोलीच्या थंडगार हवेतून आमची बाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली, सिंधुदुर्गचे कोकणीपण पाहत गोव्यात प्रवेश केला. गोव्याचे गोवन कोकणी वातावरण जाणवू लागलं. तिथला हायवे पार केला, बाईकने एक वळण घेतलं आणि आम्ही गोव्यातल्या टुमदार गावात प्रवेश केला. हे गाव आहे माजोर्डा. माजोर्ड्यात प्रवेश केल्यावरच भरपूर झाडं, मोठी घरं, त्यांचं प्रशस्त अंगण, दारातले माड हे सारं डोळ्यांना सुखद वाटू लागलं. आम्ही जिथे स्टे बुक केला होता तिथे पोहोचलो. एका अपार्टमेंटमध्ये प्रशस्त असा तो फ्लॅट होता. एक मोठा डबल बेड, छोटं किचन, बसायला छान बाल्कनी, स्वच्छ बाथरूम असा तो देखणा टापटीप फ्लॅट होता. कुठेही गचाळपणा नव्हता.

तिथे पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेतली. ५ दिवस राहणार असल्यामुळे बाजूलाच असणाऱ्या किराणा दुकानातून चहापूड, साखर, दूध, अंडी असं सामान आणायला निघाले. दोन मिनिटांचे अंतर चालल्यावर खूप ताजतवानं वाटलं! नव्या गावात फिरताना तिथलं वातावरण स्वतःमध्ये झिरपू द्यायला माझं मन आसुसलेलं असतं. सामान आणून फक्कड चहा केला. संध्याकाळी तिथल्या बाल्कनीत बसून मस्त चहा घेतला. तो दिवस अगदी आरामात घालवला.

दुसऱ्या दिवशी माजोर्डा फिरायला सुरुवात केली. इथल्या चिंचोळ्या रस्त्यांवरून आम्ही बाईकवरून फिरत होतो. दोन्ही बाजूला अस्सल गोवन पद्धतीची घरं आपली नारळाची, सागाची आणि नाजूक फुलझाडं सांभाळून होती. या घरांची बांधणी, रंग आणि आवार दोन्ही देखणं. आणि घरांचा नेटकेपणा तर नजरेत भरणारा. आवाराच्या बाहेर फुलपाखरांची आवडती लाल पिवळ्या रंगाची कितीतरी समईची फुलं माना वर करून उभी होती. अशा या टापटीप, आटोपशीर गावाच्या चिंचोळ्या रस्त्यावरून फिरणं तरोताजा करणारं होतं. माजोर्ड्याच्या वातावरणातच एक निवांतपणा आहे.

इथे पाणथळ जागाही भरपूर. अशाच एका पाणथळ जागेच्या बाजूला गाडी पार्क केली. दोन्ही बाजूलाही मोठाली नारळाची झाडं एका रेषेत उभी. बरेच पक्षी इथे असतात. आणि ही केवळ छोटीशी पाणथळ नाही तर बरीच मोठी आहे. त्यामध्येही कित्येक नानाविध झाडं वाढलेली आहेत. अशी ही विस्तीर्ण पाणथळ संपल्यावर दिसतो विशाल समुद्र. त्याची गाज इथपर्यंत ऐकू येत होती. किनाऱ्यावर मात्र मी संध्याकाळी जाणार होते.

तिथेच आम्हाला रिव्हन नावाचा मुलगा भेटला. सावळ्या वर्णाचा, १४-१५ वर्षांचा चुणचुणीत मुलगा. त्याची भातशेती दाखवायला आम्हाला तो घेऊन गेला. दूरपर्यंत, नजरेच्या टप्प्यात सामावणार नाही इतकी भातशेती दिसत होती. या भातशेतीच्या मधून एक बांध गेला होता आणि बाजूला छोटी तळी होती. त्या बांधावर तळ्याच्या काठी आम्ही तिघे निवांत बसलो. भरपूर पाऊस झेलल्यावर श्रावणाच्या कोवळ्या उन्हात भाताची रोपं तरारलेली दिसली. एका चुकार ढगाची सावली शेतीवरून जायची. या छोट्याशा तळ्याच्या काठी बसून भातशेतीचा अफाट नजारा पाहत होते. हे पाहताना चार भिंतीतला कोंडलेपणा अलवार विरत गेला आणि सगळं कसं श्रावणातल्या सोनेरी उन्हाप्रमाणे लख्ख दिसू लागलं. मनावरचं मळभ चांगलंच दूर झालं होतं. तिथे निवांत वेळ घालवल्यावर रिव्हन आम्हाला नाश्त्यासाठी एका छोट्या दुकानवजा हॉटेलमध्ये घेऊन गेला. एकदम स्वच्छ होतं दुकान. साठीचे असलेले काका छोट्या स्टोव्हवर काही कटलेट तळत होते. आम्ही ऑर्डर दिलल्यावर काकांनी ताजंताजं चिकन कटलेट दिलं. चविष्ट होतं अगदी. तिथेच वडापावही खाल्ला. रिव्हन आणि काकांसोबत कॉफी घेत गप्पा मारल्या. असा मस्त गप्पाटप्पांचा आणि चविष्ट पदार्थांचा नाश्ता झाल्यावर काकांचा आणि रिव्हनचा निरोप घेतला.

सकाळी इतकी भटकंती झाली होती की दुपारी जेवणखाण विसरून आम्ही गाढ झोपलो. खरंतर खूप दिवसांनी इतकी गाढ मी झोपले होते. उठल्यावर कित्येक दिवसांचं साठलेलं मानसिक थकलेपण निघून गेल्यासारखं वाटलं.

संध्याकाळी माजोर्ड्याच्या किनाऱ्यावर गेलो. विस्तीर्ण पांढऱ्या वाळूचा किनारा आहे. समुद्रकिनाऱ्यावर पाऊल टाकल्यावर आपण किती महिन्यांनी ही वाळू, हे खारं पाणी, शंख शिंपले पाहतोय हे जाणवलं. हे सारं पाहून मी हळवी झाले होते. कोविडच्या काळात चार भिंतीत बसून असं रसरशीत जगणं मी मिस करत होते. कोविडचा स्पर्श घराला होऊन गेल्यामुळे भीती, दुःख यांचं सावट सतत मनावर होतं. हेच मळभ दूर करण्यासाठी ही ट्रिप केली होती. किनाऱ्यावर बसून सभोवार नजर टाकली. लोकांना फुटबॉल खेळताना, सायकल चालवताना, फिरताना पाहणं आनंद देणारं होतं. विलक्षण सुंदर सूर्यास्त होत होता. मान्सूनचाच महिना असल्यामुळे मळभ सूर्याला झाकोळत होतंच; पण क्षितिजावर मात्र सर्वत्र केशरी रंग पसरला होता. आणि सूर्य झाकोळलेल्या ढगालाही सोनेरी किनार लाभलेली होती. शेवटी इंग्रजीत एक म्हण आहेच की every cloud has a silver lining. तसंच दृश्य समोर होतं. माजोर्ड्याच्या वातावरणाने माझ्या मनावरचं मळभ दूर केलं होतं.

  • जवळचे रेल्वेस्थानक - माजोर्डा, मडगाव, पणजी

  • जवळचे बसस्थानक - माजोर्डा बस स्टॉप, मडगाव बस स्टँड.

  • जवळचे एअरपोर्ट - Dabolim एअरपोर्ट, मोपा एअरपोर्ट

  • रस्त्याने प्रवास - आजरा आंबोली मार्गे गोव्यात उतरणे. किंवा चोरला घाट मार्गे गोव्यात उतरणे.

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ - सप्टेंबर शेवटपासून जानेवारी शेवट.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in