खळे साहेब

"शब्द आणि सुरांच्या अतुट नात्याची वीण गुंफणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या आठवणींचा हा एक सुवर्णपट आहे. पाडगावकर आणि गदिमांच्या शब्दांना खळे साहेबांनी आपल्या दैवी स्पर्शाने कसे अजरामर केले, याचा एक अत्यंत सुंदर आणि रसाळ प्रवास..
खळे साहेब
खळे साहेब 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुलखातले गजाली

डॉ. महेश केळुसकर

"शब्द आणि सुरांच्या अतुट नात्याची वीण गुंफणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या आठवणींचा हा एक सुवर्णपट आहे. पाडगावकर आणि गदिमांच्या शब्दांना खळे साहेबांनी आपल्या दैवी स्पर्शाने कसे अजरामर केले, याचा एक अत्यंत सुंदर आणि रसाळ प्रवास..

सृजनशील संगीताच्या क्षेत्रात एवढा सात्विक , सज्जन आणि ज्ञानी माणूस मी तरी पाहिलेला नाही. श्रीनिवास खळे साहेब एवढे मोठे होते की षण्मुखानंद सभागृहात एकदा प्रख्यात गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम असताना, कार्यक्रमाआधी त्यांनी प्रवेश केल्यावर लगेच ऑडियन्समध्ये बसलेल्या खळे साहेबांना वाकून नमस्कार करताना मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे.

माझ्यासारख्याच्या स्वप्नातही नव्हतं की माझी एखादी गीतरचना खळे साहेबांकडून संगीतबद्ध होईल‌. पण १९९२ साली आकाशवाणीच्या 'भावसरगम' या कार्यक्रमात,

चंद्र तो गगना खुळ्या फसवून गेला

काय आता अर्थ रे या पौर्णिमेला!

दूर माझ्या काळजाची धून वाजे

का तुम्ही जमला इथे या मैफलीला ....

ही माझी रचना त्यांनी कविता कृष्णमूर्ती यांच्याकडून गाऊन घेतली. या गाण्याची चाल इतकी अप्रतिम झाली की, श्रोत्यांच्या मागणीवरून या गाण्याचं अनेक वेळा पुनन:प्रसारण करावं लागलं होतं. कविता कृष्णमूर्ती त्यावेळी प्रचंड बिझी होत्या पण अण्णांच्या एका निरोपावर त्या आकाशवाणीत आल्या. दोन वेळा त्यांनी संपूर्ण गाण्याची रिहर्सल केली आणि अण्णांचं समाधान झाल्यावर मगच गाणं रेकॉर्ड झालं. गाण्याला चाल देण्यापूर्वी ते माझ्याकडून खळे साहेबांनी दोन-तीन वेळा म्हणून घेतलं होतं. त्या गाण्याच्या आशयाबद्दल माझ्याशी खूप आस्थेनं संवाद साधला होता. किती मोठ्या मनाचे होते खळे साहेब!

कवीच्या शब्दांचा त्यांना जाणवलेला अर्थ, त्या स्वरांमधून व्यक्त होतोय, ते स्वर त्या शब्दांना न्याय देत आहेत असा विश्वास खळेसाहेबांना वाटला तरच ते ती चाल पक्की करायचे. चाल बांधताना त्यांना शास्त्रीय संगीताचा उपयोग व्हायचा. कवीने लिहिलेल्या गीतातली भावना ते पहिल्यांदा समजून घ्यायचे. ही भावना योग्य रीतीने व्यक्त होईल असं एखाद्या रागाचं स्केल त्यांना जाणवायचं आणि मग त्या स्केलच्या आधाराने ते चाल बांधायचे. गीतामधली भावना समर्थपणे व्यक्त व्हावी म्हणून जिथे जिथे त्या रागाबाहेरचे जे स्वर त्यांना आवश्यक वाटायचे, ते तिथं वापरायचे. उदाहरणार्थ , 'जिव्हाळा' चित्रपटातील 'या चिमण्यांनो परत फिरा रे..' हे गाणं. या गाण्यातली गदिमांनी उभी केलेली संध्याकाळच्या वेळेची आर्तता , घरी वेळीच न परतलेल्या मुलाच्या आईच्या मनातली हुरहुर, सुरांमधून नेमकी व्यक्त व्हावी म्हणून खळे यांनी या गीताचा मुखडा पुरिया धनाश्री रागाच्या तर अंतरा मारव्याच्या अंगानं बांधला.

गदिमांची फारच कमी गाणी खळे साहेबांनी स्वरबद्ध केली, पण ती खूप लोकप्रिय झाली आणि गाजली. गोरी गोरी पान, एका तळ्यात होती, एक कोल्हा बहुभुकेला, मैना राणी चतुर शहाणी, आई व्हावी मुलगी माझी.. अशी काही बालगीतं आणि 'बोलकी बाहुली' चित्रपटातली तीन, तर 'जिव्हाळा' मधली सगळी गाणी. गदिमांची गाणी आपण संगीतबद्ध केल्याचा खळे साहेबांना सार्थ अभिमान होता .

कधीही त्यांनी काव्य हाती आल्याशिवाय चाल लावली नाही. आधी चाल आणि नंतर त्यावर गाणं लिहून घेणं त्यांना पटत नसे. शब्दच नसतील तर चाल लावायची कशाला? असं ते म्हणत. हे म्हणजे आधी झबलं शिवून नंतर त्या मापाचं मूल शोधण्यासारखं आहे, असं ते म्हणायचे. लतादीदींनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनात संत तुकारामांचे अभंग गायची इच्छा असल्याचा निरोप 'एचएमव्ही'त असताना हृदयनाथानी दिला. तुकारामाच्या गाथेतून ध्वनिमुद्रिकेसाठी दहा-बारा अभंग निवडणं म्हणजे तसं कठीण काम होतं. तरी विषयाच्या दृष्टीने खळे साहेबांना वेगळ्या वाटलेल्या, वैविध्य असलेल्या २० अभंगांना त्यांनी चाली दिल्या आणि त्या २० अभंगांमध्ये दीदींनी ध्वनिमुद्रिकेसाठी योग्य वाटतील ते निवडावेत असं सुचवलं. त्यावर दीदींनी त्यांना आवडलेले अभंग ऐकवायला सांगितलं. पहिले दहा अभंग ऐकून होताच त्यांना थांबवून दीदी म्हणाल्या, 'आपण हे १० अभंगच रेकॉर्ड करूया'. तेच अभंग 'अभंग तुकयाचे' या ध्वनिमुद्रिकेच्या रूपात प्रकाशित झाले.

खळे साहेबांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या वाटचालीत जवळजवळ ११५ कवींच्या रचनांना चाली दिल्या. त्यापैकी संत कवींच्या रचना वगळता जास्तीत जास्त रचना त्यांनी संगीतबद्ध केल्या त्या मंगेश पाडगावकरांच्या. ५३ वर्षांमध्ये सुमारे ३५ गाणी पाडगावकरांची श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली. ही सगळीच्या सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

पाडगावकरांची आणि खळे यांची ओळख 'शुक्रतारा'च्या निमित्ताने झाली. आकाशवाणीवर असताना एके दिवशी पाडगावकरांचा खळेंना फोन गेला .."भावसारगमसाठी एक गाणं लिहिलंय.. अजून शाई सुद्धा वाळलेली नाही." फोनवरून त्यांनी गाणं वाचून दाखवलं. ते होतं-

शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी

चंद्र आहे, स्वप्न वाहे..धुंद या गाण्यातुनी..

खळेंना ते शब्द अतिशय आवडले आणि हे गाणं आपणच करावं असं वाटलं. आपोआप चाल सुचत गेली आणि मराठीतलं एक अजरामर गाणं निर्माण झालं. तिथूनच खळे-पाडगावकर यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

खळे आणि पाडगावकर दोघेही आकाशवाणीवर काम करत होते. खळे चेंबूरला हार्बर लाईनची गाडी पकडायचे, तर कोळीवाडा स्टेशनला पाडगावकर त्यांच्याच डब्यात चढायचे. एकदा पाडगावकरांनी खळ्यांच्या हातात एक कागद ठेवला त्यावर दोनच ओळी दिलेल्या होत्या--

श्रावणात घननिळा बरसला

रिमझिम रेशीमधारा

उलगडला झाडातुन

अवचित हिरवा मोरपिसारा ..

खळेंनी विचारलं , "पुढे काय? पुढचं गाणं कुठे आहे ? " तर पाडगावकर म्हणाले, " लिहिलेलं नाही ." बोरीबंदर ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)स्टेशन येईपर्यंत त्या पहिल्या दोन ओळींना चाल लागली. दुसऱ्या दिवशी पहिला अंतरा खळेंच्या हातात पडला. असे एकेक करत पुढले अंतरे दर दिवशी मिळत गेले आणि त्यांना तशाच टप्प्याटप्प्याने चाली लागत गेल्या आणि हे गाणं पूर्ण झालं. एकेक करत अंतरे मिळत गेल्यामुळेच कदाचित प्रत्येक अंतऱ्याची चाल वेगळी झाली असावी, असं खळे यांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय. पण 'श्रावणात घननिळा' हे गाणं प्रत्येक पावसाळ्यात आठवत नाही , असा मराठी रसिक माणूस सापडणार नाही. त्या गाण्याची जादूच तशी आहे. एकदा मी पाडगावकर सरांना म्हटलं होतं, " या गाण्यातल्या तुमच्या दोन ओळींसाठी मी तुमच्या घरी आयुष्यभर भांडी घासायला तयार आहे.." तेव्हा ते दाढीअण्णा आपले मोठ्ठे सोडावाटर डोळे मिचकावत म्हणाले होते, " अरे आम्हाला भांडी घासून पुसून स्वच्छ लागतात बाबा. तुझ्यासाठी आमच्याकडे काही काम नाही -- बाय द वे कुठल्या रे त्या दोन ओळी?" तेव्हा मी म्हटलं -

पाचूच्या हिरव्या माहेरी

ऊन हळदीचे आले

माझ्या भाळावर थेंबाचे

फूलपाखरू झाले...

खळे साहेबांच्या आणि पाडगावकरांच्या आठवणींचं ते फुलपाखरू अजून माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर बसून आहे..

ज्येष्ठ कवी आणि लेखक

maheshkeluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in