कोंडलेल्या वाफेचा तलम पोत

गणेशोत्सव आणि मोदक यांचं जितकं अतूट नातं आहे, तितकंच वाफवलेले पदार्थ आणि आरोग्य यांचं आहे. म्हणूनच गणेशोत्सवानिमित्त मोदकांचा आनंद घेतानाच भारतातील वाफवलेल्या पदार्थांचं वैविध्य समजून घेत त्यांचा आपल्या आहारातील उपयोग लक्षात घ्यायला हवा.
कोंडलेल्या वाफेचा तलम पोत
Published on

विशेष

डॉ. ऋतुजा कुडाळकर-पाणसरे

गणेशोत्सव आणि मोदक यांचं जितकं अतूट नातं आहे, तितकंच वाफवलेले पदार्थ आणि आरोग्य यांचं आहे. म्हणूनच गणेशोत्सवानिमित्त मोदकांचा आनंद घेतानाच भारतातील वाफवलेल्या पदार्थांचं वैविध्य समजून घेत त्यांचा आपल्या आहारातील उपयोग लक्षात घ्यायला हवा.

आपल्या आवडत्या गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्साहाने वाट पाहत असताना सर्वांना आवडणाऱ्या स्वादिष्ट मोदकांचा विचार केल्याशिवाय रहावत नाही. गणपती बाप्पाला ‘मोदकप्रिय’ असेही म्हणतात.

मोदक म्हणजे तांदळाचे पीठ (कार्बोहायड्रेट), गूळ (लोह), किसलेले खोबरे (उपयुक्त स्निग्धांश आणि फायबर), तूप (आतडी निरोगी आणि सांधे लवचिक ठेवते), वेलची (पचनास मदत करते) यांचे मिश्रण. महाराष्ट्रात यांना ‘उकडीचे मोदक’ म्हणून ओळखले जाते. तांदळाच्या पिठाच्या आवरणात ओले खोबरे आणि गुळाचे मिश्रण घालून ते वाफवले जातात. या प्रक्रियेसाठी अलीकडे स्टीमर वापरला जातो. पण पूर्वीही परंपरागत भांड्यांमध्ये असे वाफवणारे पदार्थ बनवण्यासाठीचे भांडे असे. त्याला मोदकपात्र असेच म्हटले जाते. आजही काही घरांमध्ये ते पहायला मिळते.

मोदकाचा आकार इतर पदार्थांपेक्षा वेगळा आणि सुंदर असतो. खालून गोल, सभोवती पाकळ्या असतात. त्या वरच्या बाजूला अरुंद होत जोडल्या जातात. हा आकार पूर्णतेचं प्रतीक आहे. हा गोड पदार्थ बनवण्यासाठी उकडीला आकार देण्याचं विशिष्ट कौशल्य लागतं आणि भारतीय स्वयंपाकात ती एक कला मानली जाते.

‘मोद’ म्हणजे संस्कृतमध्ये आनंद आणि त्याचप्रमाणे मोदकाचा आस्वाद घेतल्याने आपले हृदय आनंदाने भरून जाते. आजच्या तरुण पिढीमध्ये ‘मोमो’ची क्रेझ दिसून येते. हे मोमो स्वादिष्ट, परवडणारे, लवकर तयार होणारे, व्यस्त दिनक्रमात सहज उपलब्ध होणारे असल्याने आजच्या तरुण पिढीमध्ये ते पॉप्युलर आहेत. विविध प्रकारच्या स्टफिंग्जमध्ये म्हणजे वेगवेगळे सारण वापरून ते केले जातात. हा प्रकार मुळातला पूर्वेकडच्या प्रदेशातला असला तरी स्थानिक चव आणि घटकांचा समावेश करत त्यात बदल केले गेले आहेत.

मोदक आणि मोमो हे दोन्ही पदार्थ तळूनही केले जातात. पण मोदक असोत किंवा मोमो, ते वाफवून खाणंच चांगलं. कारण वाफवणं हा स्वयंपाकाच्या पद्धतीचा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे.

वाफवून स्वयंपाक करण्याची पद्धत अधिक चांगली

वाफेच्या पाण्याचे रेणू हवेपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे उष्णतेचे वहन करतात. त्यामुळे अन्न लवकर आणि एकसारखे शिजवता येते. वाफेतील आर्द्र उष्णतेमुळे अन्नाचा पोत खराब न होता अधिक ओलसर, रसाळ, मऊ आणि लवचिक बनतो.

भारतातील काही वाफवलेले लोकप्रिय गोड पदार्थ

  • महाराष्ट्रातील निवगिऱ्या, शिरवळ्या, पातोळ्या, खरवस, पुरणाचे दिंड.

  • कर्नाटकातील कडुबू.

  • तमिळनाडूची कोझुकट्टाई.

  • बंगालचा भापा डोई आणि संदेश.

  • ओदिशाचा मांड पिठा.

  • हिमाचल प्रदेशचा सिद्दू.

भारतातील काही वाफवलेले तिखट पदार्थ

  • महाराष्ट्रातील अळूवडी, कोथिंबीर वडी, कोबीचे भानोले.

  • गुजरातमधील दुधी/मेथी/पालक मुठिया आणि ढोकळा.

  • केरळमधील केळीच्या पानात (मीन पोलिचाथु) वाफवलेले मासे.

  • बंगाली पाककृतीमध्ये (भापा माच) मोहरीच्या तेलात आणि मसाल्यांमध्ये वाफवलेले मासे.

  • भारताच्या दक्षिणेकडील भागातील सांभारासह वाफवलेले इडली/इडियाप्पम/उकडलेले भात/पुट्टू.

  • दार्जिलिंगसारख्या भारतातील डोंगराळ प्रदेशात मांस किंवा भाज्यांनी भरलेले मोमो, डंपलिंग.

  • काही प्रदेशांमध्ये ‘बांबू स्टीमिंग’चा वापर केला जातो, ज्यामुळे मांसाला अनोखी चव मिळते.

दैनंदिन आहारात वाफवलेल्या पदार्थांचा समावेश

  • मधल्या नाश्त्यासाठी वाफवलेले शेंगदाणे, मक्याचे दाणे खाऊ शकता.

  • सूप आणि सलाड तयार करण्यासाठी आपण वाफवलेले चिकन वापरू शकतो.

  • गाजर, बीट, भोपळा अशा भाज्या वाफवून सूप आणि सलाड करू शकतो.

  • वाफवलेले अंडे व्यायामानंतरच्या नाश्त्यासाठी खावे.

  • वाफवलेले स्प्राऊट्स, मोड आलेली कडधान्ये हा व्यायामानंतरच्या नाश्त्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठीचा एक उत्कृष्ट नाश्ता आहे.

वाफवलेले अन्न का चांगले असते?

अन्न पाण्यात शिजवताना ते पाण्यात उकळले गेल्यामुळे अन्नातील पोषक तत्त्वांचे नुकसान होऊ शकते. विशेषतः जीवनसत्त्व क आणि ब यांचे. कारण ते उकळत्या पाण्यात विरघळतात. याउलट अन्न वाफवताना ते पाण्यात बुडवले जात नसल्यामुळे, पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे बाहेर पडण्याची शक्यता कमी असते.

अन्न वाफवण्याचे इतर फायदे

वाफवणे ही तेलमुक्त व जलद स्वयंपाक प्रक्रिया आहे. ती अन्नातील कॅलरीज कमी करते, अन्न पचण्यास सोपे करते, पोषक तत्त्वे टिकवून ठेवते. यामुळे अन्नाची चव आणखी वाढते.

मोदक, भापा दोई, कडबू, पातोळ्या, मोमोज, अळूवडी, ढोकळा, मुठिया इत्यादी वाफवलेले पदार्थ आपण किती वेळा खाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर असे - वाफवून शिजवणे हा एक आरोग्यदायी पर्याय असला तरी, चांगले आरोग्य राखण्यासाठी संयम हा एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरू नये. म्हणून या सणासुदीच्या काळात मोदकांचा आस्वाद घ्या, पण संयमित आणि योग्य व्यायामासोबत.

फिजिओथेरपिस्ट आणि ॲडव्हान्स डाएट आणि न्यूट्रिशनमधील प्रमाणित तज्ज्ञ.

logo
marathi.freepressjournal.in