विशेष
डॉ. मुकुंद कुळे
स्त्रीला अबला ठरवणाऱ्या समाजपुरुषाने स्त्रीशक्तीचे विविध आविष्कार मात्र फारसे पुढे आणले नाहीत. एक तर त्यांना दुर्लक्षित ठेवलं किंवा गौरवीकरण करून त्यांचं तेज झाकलं. नवरात्रीत देवीचा जागर करताना स्त्री सामर्थ्याची ही रूपं समजून घ्यायला हवीत.
सामान्य स्त्री काय किंवा सीता, द्रौपदी, सती, सत्यभामा, अहल्या, म्हाळसा, अंबा यासारख्या पुराणांतल्या नायिका वा देवता काय... त्या कितीही कर्तृत्ववान-धीरोदात्त असल्या, तरी भारतीय समाजपुरुषाने या साऱ्या जणींची गणना एकाच शब्दात केली - अबला! प्रत्यक्षात कुठलीच स्त्री दुर्बल-असहाय्य नसते. सर्जन हा स्त्रीचा निसर्गधर्म असल्यामुळे तिचं तेच रूप जगन्मान्य झालं खरं, परंतु तिच्या ठायी असलेली संहारक शक्ती मात्र त्यामुळे काहीशी अलक्षित राहिली. किंबहुना जाणूनबुजून ठेवली गेली. जेणेकरून स्त्रीने आवाज उठवू नये, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच मानू नये यासाठी. यातूनच मग आपल्या पुराणग्रंथांतल्या नायिकादेखील सुटल्या नाहीत. समाजपुरुषाने या नायिकांभोवतीदेखील स्त्री म्हणून असलेल्या मानमर्यादांचा, त्याग-नीतिमत्तेचा सुरेख कोष विणला. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व, त्यांचा विद्रोह कधी सर्वसामान्यांसमोर आलाच नाही. मात्र पुराणग्रंथ-पुराणकथांची पानं नीट वाचली तर पानांआड दडलेलं या प्रत्येकीचं कर्तृत्व, त्यांनी केलेला विद्रोह, त्यांनी परिस्थितीविरुद्ध दिलेला लढा... असं काय काय समजून-उमजून येतं आणि साक्षात्कार होतो- स्त्रीशक्तीचा!
दक्षकन्या सती
हा असा विचार करताना अगदी प्रथम डोळ्यासमोर येणारं उदाहरण म्हणजे सतीचं. दक्षकन्या सती! दक्षाने एकदा आपल्या सगळ्या मुलींना विचारलं, “तुम्ही कोणाचं भाग खाता?” एकजात साऱ्या जणींनी उत्तर दिलं, “बाबा, आम्ही तुमचेच भाग खातो.” एकमेव सती होती, जी बाणेदारपणे उद्गारली, “मी माझंच भाग खाते.” कारण आपण परावलंबी आहोत हे सतीला मान्यच नव्हतं. बापाच्या घरी राहात असलो तरी आपल्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे, विचार आहेत, असं तिचं स्पष्ट मत होतं. महत्त्वाचं म्हणजे तिचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास होता. मात्र तिच्या या एका उत्तराने दक्ष राजाचा पुरुषी अहं दुखावला गेला आणि त्याने तिच्याशी कायमची वाकडीक घेतली.
“मी तुझ्यावरच अवलंबून आहे,” असं एखाद्या स्त्रीने सांगितलं की, कुठल्याही पुरुषाचा अहंकार सुखावतो. मग तो पुरुष नवरा असो, बाप असो, नाही तर भाऊ किंवा मुलगा. स्त्रीचं दुय्यमत्व-परावलंबित्व या प्रत्येकाने गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळेच त्यांच्या या गृहितकाच्या उलट एखाद्या स्त्रीने स्व-बळावर काही मिळवलं, कर्तृत्व गाजवलं, मला तुमची गरज नाही म्हटलं, की पुरुषमंडळी असतातच तयार तिची खबर घ्यायला किंवा धिंडवडे काढायला. अन्यथा आपल्या लेकीच्या उत्तराचं दक्षाला एवढं वाईट का वाटावं? पण त्याला तो स्वतःचा अपमान वाटला आणि मग त्याने जणू सतीशी नातंच तोडून टाकलं. तिचं लग्न, तिचं माहेरपण कशालाही त्याने गोड मानलं नाही की तिची कसली हौसमौज पुरवली नाही. सती सोडून साऱ्या मुलींची लग्नं त्याने थाटामाटात लावून दिली. सतीच्या बहिणींनीही सारे साजिरे-गोजिरे देव आणि ऋषी निवडले वर म्हणून. पण सती तिथेही साऱ्याजणींपेक्षा वेगळी उठून दिसली. तिने निवड केली, ती गावं भटकत फिरणाऱ्या महादेवाची-शंकराची... आणि याच महादेवाचा दक्षाने यज्ञप्रसंगी केलेला अपमान सहन न होऊन संतापलेल्या सतीने त्या धगधगत्या यज्ञातच घेतली होती उडी थेट. ही वार्ता कळताच शंकराने केलेला थयथयाट जगजाहीर आहे. त्याने त्या यज्ञात जळालेलं सतीचं कलेवर रुद्राकरवी उचलून आणलं... मात्र आणताना त्या कलेवराचे छोटेमोठे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी गळून पडले आणि संपूर्ण भारतात तब्बल ५२ शक्तिपीठं निर्माण झाली. हीच शक्तिपीठं आज भारतीयांची बलस्थानं आहेत, मात्र त्या बलस्थानांची निर्मिती जिच्यामुळे झाली ती सती कुणाला ठाऊक आहे? ती समाजपुरुषाने झाकून ठेवलीय, तिचा बाणेदारपणा कुठल्याही काळातील स्त्रीने आत्मसात करू नये म्हणून!
स्वाभिमानी सीतामाई
म्हणूनच तर सीतेची प्रतिमाही आजवर समाजपुरुषाने ‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक’ अशीच रूढ करून ठेवली आहे आणि ती तशीच रूढ करण्यामागे पुरुषसत्तेचं वर्चस्ववादी राजकारण होतं. कारण समाजात असे आदर्श उभे केले की मागाहून येणाऱ्या स्त्रियांना त्यांचा दाखला देणं सोपं जातं. स्त्रियांचा पतिव्रता म्हणून जो गौरव केला जातो, त्यामागेही हेच कारस्थान आहे. असा गौरव केला की कुणी नवऱ्याविरोधात आवाज उठवत नाही. पण हे गौरवीकरण म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मारच... तरीही आता स्त्रिया बोलू लागल्या आहेत, अगदी रामायण-महाभारतातल्या, पुराणातल्या स्त्रियादेखील! आपलं दुःख, आपल्या वेदना सांगायला त्या स्वतः अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या दैवतीकरणामागे दडलेल्या दु:खद कथा-कहाण्यांना आता वाचा फुटलीय. आताच्या समविचारी स्त्री-पुरुषांच्या माध्यमातून त्या आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजपुरुषाला जाब विचारत आहेत. सीता त्यापैकीच एक! म्हणून तर आता पुन्हा अयोध्येची महाराणी बनण्याची संधी चालून आलेली असताना सीतेने भूमीत जाणं, हा तिने केलेला विद्रोह मानला जातो. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वारस हवा म्हणूनच रामाने सीतेचा लवकुशासह स्वीकार केला, अशीही एक संगती अलीकडे लावली जाते. पण ते काहीही असो, सीतेने पुन्हा अयोध्येत पाऊल ठेवलं नाही, ही बाब महत्त्वाची. कारण आयुष्यभर रामाच्या वचनाने चालणारी सीता आयुष्याच्या अंताला स्वतःचा स्वाभिमान जपताना दिसते.
लढवय्यी सत्यभामा
क्षात्रतेज असलेल्या सत्यभामेचं देखील, समाजपुरुषाने ‘वेंधळी-वेडी’ असंच रूप जगासमोर रंगवलंय. परिणामी कृष्णाकडे पारिजातकाच्या फुलाचा हट्ट करणारी अन् कृष्णाला नारदाला विकायला निघालेली सत्यभामा बावळीच वाटते साऱ्यांना. पण प्रत्यक्षात भामा तशी नव्हती. म्हणून तर नरकासुराशी लढायला जाताना कृष्णाने तिलाच घेतलं सोबत. कारण त्याला तिच्या प्रेमाची ताकद ठाऊक होती. ती जेवढी सर्जनशील आहे, तेवढीच संहारक हे तो नक्की जाणून होता... आणि तसंच झालं. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे उन्मत्त झालेला नरकासुर कृष्णालाही भारी पडायला लागला, तेव्हा भामेनेच घेतली युद्धाची सारी सूत्रं आपल्या हातात. नरकासुराने त्याच्याकडची दिव्य शक्ती सोडली कृष्णावर, तेव्हा तर इतर देवही घाबरले क्षणभर. पण सत्यभामा नीडरपणे उभी राहिली त्या शक्तीपुढे आणि तिने सामावून घेतलं त्या शक्तीला आपल्याच देहात. जणू एक शक्ती दुसऱ्या शक्तीत विलीन झाली. आपली दिव्य शक्ती सत्यभामेने अशी सहजच पचवल्याचं बघितलं अन् तिथेच नुरकासुराचा शक्तिपात झाला. त्यानंतरच कृष्णाने आपलं सारं बळ एकवटून आपल्या सुदर्शन चक्राने नुरकासुराचा वध केला. म्हणजे भामा होती बरोबर म्हणूनच नरकासुराला मारणं सहजशक्य झालं कृष्णाला. म्हणजे कृष्णाची लाडावलेली राणी असं जिचं वर्णन समाजपुरुषाने करून ठेवलंय ती भामा प्रत्यक्षात शूर, पराक्रमी आणि युद्धातली जाणकार होती... परंतु तिचं हे रूप एकप्रकारे झाकूनच ठेवण्यात आलंय.
अग्निशिखा द्रौपदी
द्रौपदी तर बोलूनचालून अग्निशिखा होती. ती कायम सुडाने पेटलेली होती. हा सूड तिला फक्त कौरवांवर उगवायचा होता का, याविषयी शंका आहे. म्हणजे महाभारतात जरी प्रत्येक वेळी ती पांडवांच्या मनामध्ये कौरवांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं स्फुल्लिंग चेतवत राहिलेली दिसत असली, तरी प्रत्यक्षात तिच्या मनात बहुधा समाजपुरुषाबद्दलचा राग असावा आणि तो तिच्या विवाहप्रसंगापासूनच तिच्या मनात धगधगत असावा. म्हणजे, एरव्ही सगळ्यांचं लग्न एकाच पुरुषाशी होतं - ठरवलेल्या किंवा आवडलेल्या. परंतु द्रौपदीला, एकट्या अर्जुनाने जिंकलेली असतानाही, तिला लग्न मात्र पाच जणांबरोबर करावं लागलं. लग्नानंतर तिने पाचही जणांबरोबर योग्य तो पत्नीधर्म निभावलाही, तरीही तिच्या मनात लग्नप्रसंगी एक स्त्री म्हणून झालेल्या आपल्या मर्यादाभंगाचा सल नसेलच का? किंबहुना असेलच, कारण द्रौपदीचं सौंदर्य बघून कुंतीला आपल्या इतर पुत्रांची खात्री देववत नव्हती, म्हणून तर ती म्हणाली- आणलेला प्रसाद पाचांमध्ये वाटून घ्या! बरं अनावधानाने कुंती तसं म्हणाली असेल असं गृहीत धरलं तरी प्रत्यक्षात द्रौपदीला पाहिल्यावर ती आपली चूक दुरुस्त करूच शकली असती. पण कुंतीने तसं केलं नाही. द्रौपदीच्या स्त्रीत्वाचा अपमान खरंतर तिथेच झाला होता आणि मग आपल्या अपमानाचा हा अंगार तिने सतत धगधगत ठेवला. प्रत्यक्ष महाभारताच्या युद्धात कौरवांच्या विरोधात लढताना तो उपयोगी पडलाच, बहुधा अंतर्मनात पांडवांच्या विरोधात लढतानाही तिला तो उपयुक्त पडला असावा, कारण पांडव काय किंवा कौरव काय, त्यांनी प्रत्येक वेळी तिचं स्त्रीत्वच तर पणाला लावलं होतं... आणि म्हणून ती धगधगत राहिली अखंड नि तळपत राहिली क्षात्रतेजाने!
अन्यायाचा बदला घेणारी अंबा
‘महाभारत’ म्हणजे एक प्रकारे सुडाचाच प्रवास आहे. अगदी दुर्योधनापासून भीमापर्यंत आणि गांधारीपासून द्रौपदीपर्यंत. अन् तरीही महाभारतातल्या या सूडनाट्याची खरी नायिका शोभते, ती अंबाच! काशीराजाची ज्येष्ठ मुलगी अंबा. अंबिका आणि अंबालिकेची मोठी बहीण. कारण आपल्यावर झालेल्या अन्यायाची चूड तिने पुढच्या जन्मीही तशीच धगधगती ठेवली. आपल्यावर अन्याय करणाऱ्या भीष्मांचा प्राण जाईपर्यंत. एक क्षणही तिला भीष्माने केलेल्या अपमानाचा विसर पडला नाही. किंबहुना जगण्याचा प्रत्येक क्षण ती भीष्माने अपहरण करून केलेल्या अपमानाच्या आगीत जळत राहिली. पण या आगीतूनच तिने भीष्मांप्रति असलेला आपला राग अधिक वाढवत नेला आणि पुढल्या जन्मी शिखंडी बनून तीच कारणीभूत ठरली, त्याच्या मृत्यूला. तीच उभी राहिली त्यांच्या आणि अर्जुनाच्या मध्ये. क्षत्रियाच्या रूपात शिखंडी युद्धाला उभा राहिला मात्र... अंबेच्या क्रोधाचा तो झळाळ भीष्म सहन करू शकले नाहीत. तत्क्षणी त्यांचा शक्तिपातच झाला जणू आणि नेमक्या त्याच क्षणी अर्जुनाचा बाण त्यांच्या वर्मी बसला. भीष्म रथातच खाली कोसळले.
...आणि एका सुडाचा प्रवास संपला
स्त्रीत्व, स्त्री-तत्त्व, स्त्रीभाव... असं काय काय सामावलेलं असतं एका स्त्रीच्या ठायी. या साऱ्यांतून ती एकप्रकारे विश्वाला कवेत घेण्याचा, त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच करत असते. वेळप्रसंगी स्वतःकडे दुय्यमत्व घेऊन कधी ती पुरुषाला आंजारते-गोंजारतेही... मात्र जेव्हा कुणी तिच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा मात्र ती पेटून उठते. ती होते - सती, सीता, भामा, द्रौपदी, अंबा... अर्थात ही काही मोजकी उदाहरणं आहेत, पण पुराणांची-इतिहासाची पानं चाळली तर अशा कितीतरी जणी सापडतील, स्त्रीशक्तीचा साक्षात्कार घडवणाऱ्या!
लोकसाहित्याचे अभ्यासक