चाट व्हाया सँडविच

चाट आणि सँडविचच्या निमित्ताने रस्त्यावरच्या खवय्यांची, ठेल्यावरच्या भैय्यांची आणि आपल्या जिभेच्या आठवणींची ही चवदार सफर आहे. शहरजीवनातील रोजच्या गडबडीत मिसळलेली चव, सवय आणि आनंद यांचं जिवंत चित्रण या लेखातून उलगडत जातं.
चाट व्हाया सँडविच
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

चाट आणि सँडविचच्या निमित्ताने रस्त्यावरच्या खवय्यांची, ठेल्यावरच्या भैय्यांची आणि आपल्या जिभेच्या आठवणींची ही चवदार सफर आहे. शहरजीवनातील रोजच्या गडबडीत मिसळलेली चव, सवय आणि आनंद यांचं जिवंत चित्रण या लेखातून उलगडत जातं.

'चाट’ शब्दातील ‘चा’ अक्षराचा उच्चार चार हा शब्द उच्चारताना करतो तसा व्हायला हवा. तर आजच्या काळात सर्वांना प्रिय असणारं हे चाट म्हणजे नक्की काय?

तर, भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इत्यादी. अर्थात जीभ चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैय्याच्या हाताची कमाल खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा, बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी अहाहा!

चाटची सुरुवात उत्तर भारतात झाली आणि ते हळूहळू संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले. काही इतिहासकारांच्या मते, चाटची निर्मिती कॉलरासारख्या आजारांवर उपचार म्हणून झाली असावी, असंही मानलं जातं.

थोडक्यात, चाट हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या जिभेला एकाच वेळी अनेक चवींचा आनंद देतो आणि तो खाताना एक वेगळाच अनुभव येतो. चाट म्हटलं की, तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस विरळाच. एकदा या चाटची चटक लागली, की त्यातून सुटका केवळ अशक्य!

अनेक इमारतींच्या मुख्य गेटच्या आडोशाला चाट ठेलेवाले अगदी नियमितपणे आपल्या ठेल्यासह उभे असतात. आणि त्या ठेल्यावर चाट पदार्थ खायला येणारे अगदी नेमाने, म्हणजे एखाद दिवशीही हे आपण खाल्लं नाही तर नेम मोडेल या भावनेने अगदी नित्यनेमाने तिथे हजेरी लावतात. चाट कॉर्नर तर दुथडी भरून वाहत असतात. साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अगदी दहा अकरा वाजेपर्यंत हे चाट कॉर्नर खवय्यांनी भरभरून गेलेले असतात. आमच्या इमारतीपासून जवळच असलेल्या एका उंच टॉवरच्या मुख्य गेटकडे एक चाटवाला भैय्या नियमितपणे संध्याकाळी आपला ठेला लावतो. खायला येणाऱ्या, तरुणाई, स्त्री पुरुष प्रत्येकाशी, तो ठेल्याचा नियमित सभासद असल्यामुळे त्याची अगदी चांगलीच ओळख झालेली असते. आता ही खवैये मंडळी, ठेल्यावर आली की त्यांना आपल्या ऑर्डरचा क्रम सांगावा लागत नाही. त्या व्यक्तीला पाहताच भैय्याजी नुसतं सूतोवाच करून डिश बनवायला घेतो. मला ना खाण्यापेक्षाही त्यांचं हे डिश बनवणं पहायला आवडतं. बनवताना चालणारा त्यांचा हात, नेमक्या प्रमाणात त्यात पडणारे सगळे घटक आणि अखेरीस लयबद्ध हालचालीसह डिशमध्ये उतरणारं ते मिश्रण. पावभाजी बनवणाऱ्यालाही मी अगदी डोळे भरून पहातो. बायको अनेकदा हटकते, “काय पाहत राहिलायस त्याला..”

मी म्हणतो, “अगं, बघ ना त्याचा बनवण्याचा डौल, मस्त वाटतो बघायला.” त्यावर बायको लगेच, “डौल म्हणे, मी घरी बनवताना, कधी नाही उभा राहत तो असा मला बघत?”

मी विषय सोडून देतो. तर या चाट गिऱ्हाईकांमध्ये शाळकरी मुलांपासून कॉलेजियनपर्यंत, ऑफिसमधून परतणारे स्त्री-पुरुष, खवय्येगिरी करायलाच बाहेर पडलेली मंडळी, बाजारहाट करून परतणारे, पन्नाशी पलीकडचे स्त्री-पुरुष अशा सगळ्या वयाचा समावेश असतो. मी ना अनेकदा या खवय्यांचं निरीक्षण करत असतो. त्यांची डिश बनवून तयार होण्यापूर्वीच ही मंडळी त्यामध्ये शिरलेली असतात. तो डिश बनवत असतानाच, मनाने तो पदार्थ त्यांच्या मुखात गेलेला असतो. आपल्या डिशकडे अगदी एकटक पहात असतात, आणि शेवटी बारीक शेव आंथरून ती हातात आली की त्यांचं हृदय भरून येतं, परमावधीचा आनंद मनात उसळतो. पहिल्या घासातून ही खवय्ये मंडळी पदार्थांची चव जोखतात आणि त्यानुसार, ‘भैय्याजी तिखा चटणी डालो थोडा’ किंवा ‘भैय्याजी थोडा मिठा चटणी और डालना.’ अशा सूचना करतात. भैय्याजी तत्परतेने चवीत सुधारणा करतो, आणि मग भेळीचे घास किंवा चाटच्या सगळ्या घटकांनी भरलेल्या गब्दूल किंवा चपट्या पुऱ्या एकापाठोपाठ एक मुखात जाऊ लागतात.

एक डिश स्वाहा करून झाली की, सूऽऽऽ सूऽऽऽ करत, नाकातून वाहाणारं पाणी थांबवत पुढची ऑर्डर दिली जाते आणि ती बनेपर्यंत, मधल्या वेळात ही मंडळी शेजारीच असलेल्या सँडविचवाल्याकडे मोर्चा वळवतात. इथेही तेच, गिऱ्हाईकाला पाहून भैय्याजी लगेच त्याचं फेवरेट सँडविच बनवायला घेतो. गिऱ्हाईकाच्या सुचनेनुसार, त्याला कया हवंय, नकोय त्यानुसार सँडविच बनतं.

यामध्ये एक मसाला टोस्ट सँडविच नावाचा प्रकार मिळतो. म्हणजे पावाच्या दोन्ही कापट्याना बटर, चटणी फासल्यावर त्यावर बटाटा, मटार, टोमॅटो घालून केलेल्या सुक्या भाजीचा गोळा ठेवला जातो. त्यावरती खवैयांच्या पसंतीनुसार टमाटर, काकडी, बीट, कांदा यांच्या पातळ कापट्यांचा पत्ते वाटतात तसे पावाच्या चार बाजूंनी डोंगर रचला जातो. अखेरीस त्यावर पावाची दुसरी कापटी ठेवून हे मसाला सँडविच टोस्टरमध्ये शिरतं. हा टोस्टर बहुधा लांब दांड्या असलेला हँड टोस्टर असतो. उपलब्धतेनुसार कुणाकडे कोळशाची शेगडी असते तर कुणाकडे स्टोव्ह असतो. क्वचितच कुठे इलेक्ट्रिक टोस्टर दिसतो. कुरकुरीत भाजून हे टोस्ट सँडविच त्याच्यासमोर असलेल्या लाकडी फळीवर उतरतं. ही फळी किती स्वच्छ असते हा भाग वेगळा. असो.. लांब सुरीने या सँडविचचे चार त्रिकोणी तुकडे होतात. सफाईदार हातांनी ते एका बटर पेपरवर ठेवून पेपरडिशमध्ये विसावतं. त्यावर पुन्हा एकदा बटरचा पातळसा थर पसरवला जातो आणि हिरव्यागार चटणीसह ते गिऱ्हाईकाच्या हातात येतं. सोबत सॉस म्हणून जे दिलं जातं त्याला टोमॅटोचं सॉस म्हणावं का? हा प्रश्न पडावा, असा त्याचा रंग असतो. जसं चाट खाऊन झाल्यावर सुक्या शेवपुरीची मुखशुद्धी असते, तशीच इथे उकडलेल्या बटाट्याच्या कापटीवर मिरपूड भुरभुरून दिली जाते. सुकी शेवपुरी म्हणा किंवा ही बटाट्याची कापटी म्हणा, भैय्याजी द्यायला विसरलाच तर खाणारे अगदी हक्काने मागून घेतात. या बाबतीत भिडभाड बाळगली जात नाही. तर, सँडविच घशाखाली उतरत असतानाच चाटवाल्याला आधीच दिलेली ऑर्डर तयार झालेली असते, आणि हे अट्टल खवय्ये पुन्हा एकदा चाटकडे आपला मोर्चा वळवतात. हा सिलसिला पोट आणि रसना तृप्त होईपर्यंत सुरू असतो अगदी.

लेखक, निवेदक, कवी

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in