मनाचे अभंग
डॉ. रूपेश पाटकर
''तुमच्या चालकाला (Adult) मजबूत करा' या माझ्या म्हणण्यावर माधवीताईंचा प्रश्न होता, "म्हणजे नक्की काय करू ? मला समजावून सांगा की आधी हे कर, मग ते कर, मग अमूक कर, मग तमूक कर. म्हणजे बदल कसा करावा याच्या पायऱ्या सांगा."
माधवीताईंचा प्रश्न योग्य होता. निश्चित काय करायचे हे जर सांगितले नाही तर काही करता येत नाही. मला माझ्या प्राथमिक शाळेतील गोष्ट आठवली. आमच्या शाळेच्या भिंतीवर सुविचार लिहिलेले असत. त्यातील एक सुविचार होता, 'नेहमी खरे बोलावे'. माझा एक खोडकर मित्र होता. तो म्हणायचा, "खरे बोलायला हरकत नाही, पण भीती वाटते ना. ती भीती कशी घालवायची हे कुठे लिहिलेय ? आपण खरे बोललो आणि ते जर गुरुजींना आवडले नाही तर? त्यांनी आपल्याला मारू नये, यासाठी काय करायचे हे कुठे सांगितले आहे? किंवा मार मिळणार असला तरी न घाबरण्याइतके खंबीर मन कसे बनवावे, हे कुठे सांगितलेले आहे? त्यामुळे 'नेहमी खरे बोला' हा अर्धवट सुविचार आहे."
परिवर्तनाचे टप्पे
त्यामुळे केवळ उपदेशाचे डोस वर्तन-परिवर्तनासाठी उपयोगी पडत नाहीत. बदल घडवून आणण्यासाठी पायऱ्या दाखवाव्या लागतात, परिवर्तनाचे टप्पे दाखवावे लागतात, त्यात येणाऱ्या अडीअडचणी सांगून त्यावर मात करण्यासाठी काय करावे याचे बारकावे शिकवावे लागतात, हे मला मान्य होते. त्यामुळे माधवीताईंचा प्रश्न महत्त्वाचा होता.
"डॉक्टर, कोणतीही घटना घडली किंवा कोणी काही बोलले की माझा बालक (Child) किंवा पालक (Parent) आपोआप प्रतिसाद द्यायला पुढे येतात", माधवीताई म्हणाल्या.
"कारण बालक (Child) आणि पालक (Parent) हे आपल्यात सर्वात आधी तयार झालेले असतात. त्यांच्या परस्पर जोडण्या जरा जास्त घट्ट झालेल्या असतात. चालक (Adult) हा बराच नंतर तयार होतो. त्यामुळे पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे बालक (Child) आणि पालक (Parent) हे जागे झाल्याच्या सुगावा देणाऱ्या खुणा ओळखणे. तुम्हाला एखाद्या प्रसंगाने किंवा एखाद्याच्या बोलण्याने दुखावले गेल्यासारखे वाटत असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल, तुम्हाला राग येत असेल, तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुमचा 'कोण' जागा झालाय असे ओळखाल?" मी विचारले, फेल्ट फॅक्टर
"या सगळ्या भावना आहेत. भावना वाटायला लागल्या म्हणजे माझ्यातला बालक (Child) जागा झालेला असेल", त्या म्हणाल्या.
बालक (Child) हा स्वभावातील भावनांचा अनुभव देणारा भाग आहे, त्याला 'फेल्ट फॅक्टर' (Felt factor) म्हणतात. स्वतःतील बालक ओळखता येणे, स्वतःतील 'ठीक नसलेल्या भावनां' (Not ok feelings) बद्दल संवेदनशील असणे ही चालकाने (Adult ला) विचार करवा, यासाठीची पहिली आवश्यक गोष्ट आहे. जर आपल्या हे लक्षात आले की ते आपले 'Not ok' बालक आहे, तर आपण त्याला बाहेर इतरांच्या पुढ्यात जाण्यापासून थांबवू शकू. चालकाला हे तपासायला काही क्षणांचा वेळ तर लागेलंच ना ? तो वेळ त्याला देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआप भावना व्यक्त होण्यापासून थांबवण्यासाठी मनातल्या मनात दहा आकडे मोजणे हा एक प्रभावी उपाय आहे.
"आणि समजा, वेळ घेऊन देखील संभ्रम शिल्लक उरला तर?" माधवीताईंनी विचारले.
"जेव्हा प्रश्नाबाबत संभ्रम असेल तेव्हा प्रतिसाद देऊ नये. 'When in doubt, don't let it out' हा पावित्रा ठेवावा. त्यामुळे बालकाकडून दिल्या जाणाऱ्या जुन्यापुराण्या, तोट्याच्या प्रतिक्रिया देणे टळेल", मी म्हणालो. भावनांवर नियंत्रण ही खरी ताकद आहे, असे अॅरिस्टॉटलने का म्हटले होते, ते इथे आपल्या लक्षात येते.
टॉट फॅक्टर
अशाच प्रकारे आपल्या पालकाकडून येणारा प्रतिसाद तपासला पाहिजे. पालकाकडून येणारे प्रतिसाद सक्त ताकीद दिल्यासारखे असतात. त्याला इंग्रजीत 'टॉट फॅक्टर' (Taught factor) म्हणतात. म्हणजेच शिकवलेला घटक.
थॉट फॅक्टर
पण आपण जे शिकलेले असतो, ते वास्तवाला धरून असतेच असे नाही. म्हणूनच त्याला चालकाने (Adult) प्रश्न विचारले पाहिजेत. उदा. या परिस्थितीला बघून माझ्या मनात जे मत येतेय, ते खरे आहे का ? ते या प्रसंगाला लागू होईल का ? या प्रसंगाला ते मत अनुरूप प्रतिसाद आहे का? ही कल्पना मला कुठून मिळाली? तिच्या खरेपणाचा पुरावा काय ? चालकाकडे उपलब्ध होणारी माहिती असे प्रश्न उपस्थित करून मिळवलेली असल्यामुळे चालकाला (Adult) 'थॉट फॅक्टर' (Thought factor) म्हणतात. म्हणजेच 'विचार करणारा घटक'. माझ्या खट्याळ मित्राचा चालक 'नेहमी खरे बोलावे' या टॉट फॅक्टरला (Taught factor) प्रश्न विचारुन तपासत होता. 'हा अर्धवट सुविचार आहे' हे त्याचे म्हणणे त्याचा 'थॉट फॅक्टर' (Thought factor) दाखवत होते.
तुमच्या पालकात आणि बालकात काय आहे, हे जसजसे तुमच्या लक्षात येत जाईल तसतसे तुम्ही अधिक सहजपणे तुमच्या चालकाला तुमच्या बालकापासून आणि पालकापासून स्वतंत्र करू शकाल. तेवढा तुमचा चालक मजबूत होईल!
स्वसंवाद महत्त्वाचा
तुमच्या पालक आणि बालकापासून तुमच्या चालकाला स्वतंत्र करण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे. हा स्वतःशीच संवाद करण्याचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही निराश असाल, दुःखी असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल तेव्हा तुमच्या पालकाला विचारा की 'तो तुमच्या बालकाला का थोपटत आहे?' इथे स्वतःच स्वतःशी बोलणे आहे. त्यामुळे इतरांच्या पुढ्यात उत्तर देण्याचा इथे दबाव नाही. पालकाचे उत्तर आणि बालकाच्या भावना तपासायला इथे पुरेपूर वेळ मिळतो.
"हा मुद्दा खूपच इंटरेस्टिंग आहे, डॉक्टर. हे म्हणजे संकटाचे रूपांतर संधीत करण्यासारखे आहे. मी जेव्हा उदास असते, तेव्हा मी माझ्याच त्रुटी शोधून स्वतःलाच दोष देत असते. पुढच्या वेळी मी हे तपासेन की त्या खरंच माझ्या त्रुटी आहेत का ? आणि त्या माझ्या असल्या तरी मी त्यासाठी खरंच दोषी आहे का? मी माझ्या बालकालादेखील तपासेन की मला अशी भावना का आली? ती भावना वाटणे योग्य आहे का ? मी मूळात असा भावनिक प्रतिसाद का देतेय ? मला जे असुरक्षित वाटतेय ते वास्तवाला धरून आहे की मी लहानपणीसारखे एखाद्या छोट्याशा गोष्टीला बागुलबुवा समजून बसलेय ?" त्या म्हणाल्या.
कोण प्रतिसाद देत आहे ? "आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की ते माझ्यातले 'बालक' (Child) आहे किंवा तो माझ्यातला 'पालक' (Parent) आहे, तेव्हा ते आपल्यातील कोण म्हणत असते? तर ते सारे आपल्यातला 'चालक' (Adult) म्हणत असतो. पुढच्यावेळी जेव्हा तणावाची परिस्थिती असेल तेव्हा 'कोण प्रतिसाद देतंय?' (बालक, पालक की चालक?) याचा विचार करा. तुमच्या लक्षात येईल की हा साधा प्रश्नंच तुमचं टेन्शन लगेच कमी करू लागला आहे", मी सांगितले.
"पण समोरचा माणूस जर आपल्यावर चिडत असेल तर काय करावे?" त्यांनी विचारले.
"तर त्याचा बालक शोधा. एकदा तुम्ही तुमच्यातल्या बालकाबाबत संवेदनशील बनला की तुम्हाला दुसऱ्याचा बालक ओळखणे कठीण जाणार नाही," मी म्हणालो.
"पण बालकच का शोधायचा?"
"एक लक्षात घ्या. आपल्याला ज्याची भिती वाटते, ज्याच्याबाबत असुरक्षित वाटते, त्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही. आपल्याला दुसऱ्यातल्या पालकाची भीती वाटत असते. ज्याच्याबद्दल आपल्याला भीती वाटत नाही अशी गोष्ट म्हणजे बालक. प्रत्येक माणसात बालक असतोच. तुम्ही समोरच्यातील बालक शोधलात की तुम्हाला भिती वाटणार नाही. उलट त्याच्याविषयी प्रेम वाटण्याची शक्यता आहे. त्या बालकाशी प्रेमाने बोला. बालकाला थोपटणे आवडते, हे लक्षात घ्या. त्याला तुमच्यासोबत सुरक्षित वाटू द्या.
मूल्य चौकट ठरवा
आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर आपण विचार करण्याची आवश्यकता आहे, ते म्हणजे आपल्याला मूळात काय हवंय ? कोणत्या मुल्यांवर आपण आपलं आयुष्य बेतलंय ? एकदा ही चौकट निश्चित झाली की, आपल्या चालकाला प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगात कसा प्रतिसाद द्यावा, याचा विचार करत बसावे लागणार नाही. उदाहरणार्थ, नातेसंबंधांमध्ये प्रतिष्ठा महत्त्वाची की प्रेम महत्त्वाचे? या प्रश्नाचे उत्तर चालकाने विचारांती 'प्रेम' असे एकदा ठरवले की पुढे ज्या ज्या वेळी नातेसंबंधांबाबत वितुष्ट येईल, तेव्हा ते सोडवताना 'काय महत्त्वाचे?' याचा चालकाला विचार करत बसावे लागणार नाही. जीवनात 'काय महत्त्वाचे' याची चौकट जाणीवपूर्वक करणे खूप आवश्यक आहे. तो काहींसाठी जीवनमरणाचा प्रश्न होऊ शकतो. जेव्हा एखादा मुलगा मेडिकलला अॅडमिशन मिळाली नाही म्हणून जीवन संपवण्यापर्यत पोहोचतो तेव्हा अजाणतेपणे आपण म्हणजे समाजाने जिवंत राहण्यापेक्षा मेडिकलची अॅडमिशन महत्त्वाची आहे, हे मूल्य त्याच्यासमोर ठेवलेले असते. त्याच्या चालकाला ते बरोबर आहे का, याचा तपास करायची संधी आपण दिलेली नसते. ना त्यांच्या आईवडिलांनी त्यांची स्वतःची मूल्यचौकट विचारपूर्वक ठरवलेली असते", मी म्हणालो.
"तुम्ही आता जे सांगितले, त्याचा सारांश आमच्यासारख्या क्लायंटना दिलात, तर आम्हाला उपयोग होईल," माधवीताई म्हणाल्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन केलेला हा सारांश
तुमच्यातले बालक, त्याच्यातल्या कमकुवत गोष्टी, त्याला वाटणाऱ्या भीती, त्याच्या भावना व्यक्त करण्याच्या प्रमुख पद्धती ओळखायला शिका.
तुमच्यातला पालक, त्याची सक्त ताकीद, त्याचे हुकूम, त्याच्या एकाच ठिकाणी थिजलेल्या भूमिका आणि त्या व्यक्त करण्याचे मार्ग ओळखायला शिका.
दुसऱ्यातील बालकाविषयी संवेदनशील रहा, त्या बालकाशी बोला, त्याला कौतुकाची थाप द्या, त्याला सांभाळा. त्याच्यावरचा 'Not ok' चा दबाव आणि त्याच्या सृजनशीलतेने व्यक्त होण्याच्या गरजेला दाद द्या.
चालकाला (Adult) त्याच्याकडे येणाऱ्या माहितीवर विचार करण्यासाठी आणि वास्तविक परिस्थितीपासून पालक (Parent) आणि बालक (Child) वेगळे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून आवश्यक असल्यास दहा आकडे मोजा.
जेव्हा संभ्रम असेल, तेव्हा ती गोष्ट बाजूला ठेवा. त्यावर प्रतिसाद देऊ नका. तुम्ही जे बोलला नाहीत, त्यासाठी तुम्हाला कोणी जाब विचारू शकत नाही.
पुरेसा वेळ घेऊन जाणीवपूर्वक तुमची एक मूल्य व्यवस्था उभी करा. मूल्य व्यवस्थेच्या चौकटीशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही.
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ