प्रेरणेचे स्फुल्लिंग!

महाराष्ट्रातील वाढत्या आत्महत्यांच्या घटना, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, चिंतेचा गंभीर विषय बनला आहे. अपयश, नकार आणि ताण सहन न होण्यामागे मुलांमधील कमी झालेली सहनशीलता कारणीभूत ठरत आहे. मात्र, प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या दिव्यांग मुलांचे जीवन सामान्य मुलांना जिद्द, सकारात्मकता आणि संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा देऊ शकते.
प्रेरणेचे स्फुल्लिंग!
प्रेरणेचे स्फुल्लिंग!
Published on

विशेष

शोभा नाखरे

महाराष्ट्रातील वाढत्या आत्महत्यांच्या घटना, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, चिंतेचा गंभीर विषय बनला आहे. अपयश, नकार आणि ताण सहन न होण्यामागे मुलांमधील कमी झालेली सहनशीलता कारणीभूत ठरत आहे. मात्र, प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या दिव्यांग मुलांचे जीवन सामान्य मुलांना जिद्द, सकारात्मकता आणि संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा देऊ शकते.

महाराष्ट्रातील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण वाचून आज प्रत्येक संवेदनशील मन अस्वस्थ होत असतं. वैद्यकतज्ज्ञ, उद्योगपती अशा विविध क्षेत्रांतील समृद्ध आणि प्रगतिशील मंडळी यात समाविष्ट असली, तरी शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबतही अग्रेसरता दिसणं हा अत्यंत गंभीर आणि चिंतनाचा विषय बनला. एमपी सुसाइड प्रिव्हेंशन टास्क फोर्सचे सदस्य व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सत्यकांत त्रिवेदी यांनी यावर भाष्य करताना अगदी अचूकपणे सांगितलं- “मुलांना तणाव, नकार वा अपयशाला कसं सामोरं जायचं, हे शिकवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. मुलांना वाटतं की, आपलं शैक्षणिक यश त्यांच्या अस्तित्वापेक्षा मोठं आहे.” पण या अपयशाची कारणं तरी किती असतात? मित्रांपुढे झालेला अपमान, चिडवण्याचा अतिरेक, भेदाभेदाची वागणूक, वर्गातील टोमणे, अभ्यासाचा ताण, पालकांचा राग अथवा एकतर्फी प्रेम... या कारणांनी कोवळी मुलं आत्महत्येचं पाऊल उचलतात. आईवडिलांच्या काळजाचे हे तुकडे, पालकांचं उर्वरित आयुष्य उद्ध्वस्त करून मोकळे होतात.

या वास्तवाचा खोलवर विचार करताना प्रश्न पडतो की, या अपत्यांच्या अशा टोकाच्या निर्णयाला शेवटी जबाबदार कोण? बहुतांश घरांमध्ये आज एकच अपत्य असते. त्यामुळे घरातील आणलेल्या प्रत्येक गोष्टीवर ‘माझाच हक्क’ अशी वृत्ती निर्माण झाली, वाटून घेण्याची किंवा सोसण्याची सवय उरली नाही. “आमच्या लहानपणी आम्हाला मनासारखं मिळालं नाही, निदान आमच्या मुलांना तरी सारं मिळू दे,” या भावनेने पालकांनी मागताक्षणीच प्रत्येक मागणी पुरवली. त्यामुळे साधे नकारही पचवण्याची मानसिकताच मुलांमध्ये रुजली गेली नाही आणि हेच या दुर्दैवी घटनेचं मुख्य फलित ठरलं. हे वास्तव वाचताना गेली ३५ वर्षं अनुभवलेले अनेक प्रसंग डोळ्यांसमोर तरळले.

निसर्गदत्त कार्यरत पंचज्ञानेंद्रियांसह मुलाचा जन्म होणे ही प्रकृती मानली जाते. परंतु जन्मतःच ज्यांच्या झोळीत नियतीने नकार लिहून ठेवला आहे, अशा मुलांना घडवताना पालकांच्या आणि स्वतः मुलांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली की मन हेलावून जातं. एकीकडे परिपूर्ण मूल ज्ञान आणि गुणवत्ता मिळवण्यासाठी धडपडत राहतं, तर दुसरीकडे त्याच वयात विशेष मुले हातापायांच्या शिस्तबद्ध हालचाली, एकेक शब्द बोलणं, पाऊल टाकणं आणि शरीरधर्म पूर्ण करणं या मूलभूत गोष्टीसुद्धा महत्प्रयासाने आणि पालकांच्या सहकार्याने शिकतं. मुलगा ‘क’ म्हणाला म्हणून समाधानाने पेढे वाटणारी आई आणि मुलगा ब्रेल लिपी वाचू शकला याचा मनापासून आनंद मानणारी माऊली जेव्हा समोर आली, तेव्हा जगण्याचा खरा अर्थ स्पष्ट झाला.

डाऊनसिंड्रोमसारखी बुद्धीबाधिततेची कठीण समस्या असूनही जिवाचं रान करून मुलाला इंटरनॅशनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणून घडवणारी इचलकरंजीची आई शारदा दाते आठवली. प्रथमेश दातेच्या या आईने ‘वयोश्रेष्ठ माता’ हा राष्ट्रपती सन्मान मिळवून स्वतःला सिद्ध केलं. असंख्य नकार पचवत अपत्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी करणाऱ्या अशा पालकांच्या यशाने डोळे दिपून गेले.

‘मस्क्युलर डिस्ट्रोफी’सारख्या दुर्धर आजारातही आयुष्याला सुरांनी सजवणारा कै. प्रसाद घाडी, दृष्टीहीन उद्योजक सागर पाटील, डोळसांना शॉकशिवाय विजेचे काम शिकवणारा आणि मांडीपर्यंतच पाय असूनही अनेक खेळाडू घडवणारा सत्यप्रकाश तिवारी, कर्णबधिर ऑडिऑलॉजिस्ट अपूर्वा जोशी, कर्णबधिरत्वासोबत दृष्टीदोष असूनही जलतरण कौशल्याने ‘पद्मश्री’ सन्मानित तारानाथ शेणॉय आणि अनेकदा हिमालय चढून खेळाडू घडवणारी दृष्टीहीन नेहा पावसकर... अशी असंख्य उदाहरणं समोर आली! लहानपणापासून कष्टांचा महामेरू उभारून, नकार पचवण्याची त्यांची जीवनेच्छा खरोखरच थक्क करून गेली.

आजवर अशा विशेष मुलं-पालकांनी हताश होऊन आत्महत्या केल्याचं फारसं ऐकिवात आलं नाही. याचा अर्थ त्यांच्या प्रगतीचा मार्ग सरळ आणि सुकर होता का? अजिबात नाही. उलट त्यांची वाटचाल ही सुरुवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत होती. विशेष शाळेतून घराजवळच्या सामान्य शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी (१९९५ चा अपंग कायदा असूनही) त्यांना प्रचंड यातायात करावी लागली. बरेचदा सहाध्यायींकडून एकटं पाडलं गेल्याने मुलांमध्ये मानसिक अस्वस्थता आली, तरीही त्यांच्यामध्ये जिद्द आणि विजीगिषुवृत्तीच अधिक प्रमाणात दिसली.

नियतीच्या नकारात हरवलेलं बालपण, सततच्या डॉक्टरवाऱ्या आणि त्रासाच्या वातावरणामुळे मुला-पालकांची चिडचिड होणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. वेगळेपणाची जाणीव आणि राग यातून बरेचदा मुलं स्वतःला मारून घेत असत, डोकं आपटत असत आणि पालकांनाही त्याचा प्रसाद मिळत असे. परंतु काही काळाने त्यांच्या मनाला वस्तुस्थितीची जाणीव झाली. न्यूनत्व उमगल्याने मूल समजूतदार बनलं आणि कुटुंबीय आपल्यासाठी सोशिक बनून त्याग करत आहेत हे उमगून मूल शांत होत गेलं. या समजूतदारपणातूनच शेवटी दिव्यांगाचा स्वीकार झाला.

याउलट परिपूर्ण मुलांना वाढवताना सर्व काही मनासारखं केलं गेलं, पण स्क्रीनच्या जाळ्यात गुरफटलेल्या मुलांमध्ये मात्र नकार सोसण्याची सहनशीलता खूप कमी दिसली. बहुतेकदा पालकांच्या कार्यव्यस्ततेमुळे मुलांशी सुसंवाद कमी झाला आणि मुलं मोकळेपणाने बोलेनाशी झाली. नोकरीमुळे घरात पालकांची असणारी अनुपस्थिती आणि एकटेपणा यांनी मुलांना आत्मकेंद्री, आपमतलबी व शीघ्रकोपी बनवले. इतरांप्रति असणारी संवेदनशीलता बोथट झाली; छोट्या पडद्यावरील गेम्स आणि रील्समुळे मुलांच्या भावना बद्ध झाल्यासारख्या झाल्या. मारणं, ठोकणं, आपटणं आणि रक्तबंबाळ करणं पाहूनही मुलांना दुःख वाटेनासं झालं. परिणामी, थोडंही मनाविरुद्ध घडल्यास प्रचंड राग अनावर होऊ लागला. छंदातील आनंद, स्पष्ट उद्दिष्ट आणि ध्येय समोर नसल्यास मन कायम भरकटलेल्या अवस्थेत राहतं. वाचनात गोडी उरली नाही आणि शाळा-महाविद्यालयीन उपक्रमांत सहभाग नसल्याने रिकामपण मुलांना खात राहिलं. यातूनच वाईट सवयी लागल्या आणि आयुष्याचा फुललेला वसंत ऋतू कोरड्या शिशिरात परावर्तीत झाला. इथे पालकांची आणि समुपदेशकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. दोन्ही हात नसतानाही तोंडात वा पायात ब्रश धरून पेंटिंग करणारी दिव्यांग मुलं, दृष्टी नसतानाही कॉलेजात अध्यापन करणारी प्राध्यापिका, दोन्ही कानांत श्रवण नसूनही जिद्दीने उच्चविद्याविभूषित होणारी कर्णबधिर मुलं यांची जिद्द जेव्हा सामान्य मुलांना जवळून दाखवली गेली, तेव्हा त्यांच्यातही बदलाची भावना जागी झाली. कवी प्रशांत असनारे म्हणतात-

“मुला, तू जरा आजूबाजूला पाहा,

मग तुझ्याही लक्षात येईल

साक्षात परमेश्वरानं जितका

निसर्ग बाहेर ठेवलाय

तितकाच ठेवलाय तुझ्या आत...”

-नकारात्मकतेच्या बाळकडूमुळे घडत गेलेल्या या प्रयत्नांना आता एका वेगळ्या रूपात पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. छोट्या गोष्टी, अपयश आणि साधे नकार जर सर्वक्षम मुलांना आत्महत्येपर्यंत घेऊन जात असतील, तर दिव्यांगांचं जगणं आणि त्यांची प्रगती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. श्रवणयंत्रासाठी दर पाच वर्षांनी लाख-दीड लाख रुपये खर्च येतो हे वास्तव जेव्हा सामान्य पालकांना कळलं, तेव्हा आपल्यासमोरील आव्हाने तुलनेने किती सोपी आहेत याची जाणीव त्यांना झाली.

पक्षी पंखात बळ येईपर्यंतच आपल्या पिल्लांना सांभाळतात, त्यानंतर पिल्लाचं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उरतं. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जोपासलं आणि योग्य मार्गक्रमण केलं, तर विशेष मुलांच्या अविरत कष्टाचा आणि नकारांवर मात करणाऱ्या स्फुल्लिंगाचा धडा नक्कीच मनात नवी ऊर्जा, आशा व प्रेरणा जागवेल. शेवटी पालकांनी मुलांशी सुसंवादाचा आणि सकारात्मकतेचा साकव विणायला विसरायचं नाही, एवढं मात्र नक्की!

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका

Shobha.nakhare@yahoo.co.in

logo
marathi.freepressjournal.in