

आनंदाचे झाड
युवराज माने
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, घडवतो; पण कधी कधी हीच मुलं आपल्या शिक्षकाला आयुष्याचे मौल्यवान धडे देतात. जिद्द, सहकार्य, प्रेम, कृतज्ञता आणि नम्रतेची शिकवण देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगणारा हा अनुभव.
वर्गात उभं राहून मुलांकडे पाहताना कधी कधी मला स्वतःलाच प्रश्न पडतो- नेमकं कोण कोणाला शिकवत असतं? फळ्यावर मी धडा लिहितो, मुलं तो वहीत उतरवतात. मी प्रश्न विचारतो, ती उत्तरं शोधतात. मी त्यांना जगण्याची काही सूत्रं सांगतो आणि वाटतं-आजचा धडा मी त्यांना दिला. पण वर्षानुवर्षांच्या या शिक्षकपणाकडे आता मागे वळून पाहताना जाणवतं, माझ्या हातून फळ्यावर उमटलेले धडे कदाचित त्यांच्या वहीत गेले असतील; पण त्यांच्या छोट्या छोट्या कृतींनी माझ्या मनाच्या फळ्यावर उमटवलेले धडे मात्र माझ्याबरोबर आयुष्यभर राहिले.
एखाद्या लेकराने परिस्थितीसमोर न झुकता मला जिद्दीचा अर्थ समजावून सांगितला. एखाद्याने स्वतः पुढे जाताना दुसऱ्याचा हात धरून यशाची नवी व्याख्या शिकवली. एखाद्याने प्रेमाची छोटीशी भेट देऊन देण्यातला आनंद दाखवला, तर एखाद्याने माझ्याच मर्यादा माझ्यासमोर उभ्या करून नम्रतेचा धडा दिला. ही सगळी लेकरं माझ्या वर्गातली होती; पण नकळत माझी गुरुजीही झाली होती.
सुमनची गोष्ट आठवली की आजही मन भरून येतं. ऊसतोड कामगाराची मुलगी. अभ्यासात हुशार. पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणारी. मोठं व्हायचं, शिकायचं, घरची परिस्थिती बदलायची-अशी कितीतरी स्वप्नं तिच्या डोळ्यांत होती. पण सातवी झाल्यावर पुढे शिकण्याचा प्रश्न उभा राहिला. घरची परिस्थिती बिकट होती. वडिलांनी ऊसतोडणीला जाण्याचा निर्णय घेतला होता. एक दिवस ती माझ्यासमोर आली. “गुरुजी, मला खूप शिकायचंय; पण बाबा पुढे शिकवणार नाहीत. त्यांनी माझ्या नावावरही कोयता घेतलाय...”
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. “गुरुजी, खरंच... मला कोयता नको; लेखणी हवी.”
त्या शब्दांनी माझं मन हलून गेलं. मी तिला धीर दिला. पण परिस्थितीसमोर माझे शब्द किती छोटे आहेत, हे मला जाणवत होतं. काही दिवसांनी ती निरोप घ्यायला आली. माझ्या मनात एक हताश विचार होता- आपण एवढं शिकवलं, एवढी स्वप्नं दाखवली; पण शेवटी परिस्थिती जिंकली. पण सुमननेच माझा तो विचार चुकीचा ठरवला. “गुरुजी, काळजी नका करू. मी मोठी होऊन दाखवीन. तुम्हीच म्हणता ना, “जो हो नही सकता वही तो करना है!” मी पुस्तकं सोबत घेऊन जाईन. ऊसतोडणीच्या कामातून वेळ मिळेल तसा अभ्यास करीन. तुम्ही शिकवलेली अभ्यासाची पद्धत वापरीन.”
मी तिच्याकडे पाहत राहिलो. त्या क्षणी मला जाणवलं- परिस्थिती शिक्षणाची वाट अडवू शकते; पण मनातली शिकण्याची जिद्द अडवू शकत नाही. मी तिला जिद्द शिकवली होती; पण जिद्द जगून दाखवण्याचा धडा सुमनने मला शिकवला.
माझ्या वर्गात काही मुलं कितीही प्रयत्न केले तरी अभ्यासात मागेच राहायची. वाटायचं... “ही लेकरं अशीच मागे राहिली तर?” वेगवेगळ्या पद्धती वापरूनही अपेक्षित बदल दिसत नव्हता. एक दिवस मी त्याच विचारात गप्प बसलो होतो. तेव्हा खुशी माझ्याजवळ आली. “गुरुजी, काय झालं वो? एवढं गप गप का बसलात?”
मी मागे राहणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत म्हणालो,
“काय सांगू गं खुशी... ही लेकरं अभ्यासात मागं पडतायत. किती बी केलं तरी त्यांचा अभ्यास काही पुढं सरकत नाय.”
खुशी काही क्षण त्या मुलांकडे पाहत राहिली. मग म्हणाली, “गुरुजी, तुम्ही मला जसं शिकवलं ना, तसं मी त्यांना शिकवू का?”
मी तिच्याकडे पाहतच राहिलो. “तुला जमेल का?”
ती हसत म्हणाली, “का नाय जमणार? तुम्ही मला शिकवलं की! मी त्यांना हळूहळू समजावते. ते बी शिकतील.” त्या दिवसापासून खुशी त्या मुलांच्या जवळ बसू लागली. एखादं उदाहरण पुन्हा पुन्हा समजावून सांगू लागली. चूक झाली तर, “काय घाई करतोस रे? परत करूया. यावेळी जमेल बघ!” असं म्हणत त्यांचा हात धरून पुन्हा प्रयत्न करू लागली. हळूहळू ती मुलंही पुढे येऊ लागली.
एक दिवस मी खुशीला विचारलं, “अगं, तू स्वतःचा अभ्यास करतेस, वर यांच्याबी मागं लागतेस. कशाला एवढं करतेस?”
ती माझ्याकडे पाहून अगदी सहज म्हणाली, “गुरुजी, मी एकलीच पुढं जाऊन काय करायचं? आपली सगळी दोस्त मंडळी पुढं गेली पाहिजेत ना!”
मी नि:शब्द झालो. त्या छोट्याशा लेकराच्या तोंडून त्या दिवशी यशाची एवढी मोठी व्याख्या ऐकायला मिळेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तिला शिकण्याची पद्धत दिली होती; तिने मला ‘सोबत घेऊन पुढे जाण्याची’ पद्धत शिकवली.
एकदा छोट्या भेटवस्तू देण्याचा प्रसंग होता. वस्तू सरळ हातात देण्याऐवजी मी ती बंद ओंजळीत ठेवली.
“गुरुजी, काय आहे?”
“ओळखा पाहू!”
सगळ्यांचे डोळे माझ्या ओंजळीकडे. कुणी अंदाज लावायचं, कुणी प्रश्न विचारायचं. मी मात्र मुद्दाम उत्तर द्यायचो नाही. मला वस्तूपेक्षा त्यांच्या मनातला प्रश्न महत्त्वाचा वाटत होता. काय असेल? का असेल? कसं असेल? मुलांच्या कुतूहलाचा तो तिसरा डोळा उघडा ठेवायचा होता. पण काही दिवसांनी गंमत झाली. तीच लेकरं माझ्यासाठी छोट्या छोट्या वस्तू घेऊन येऊ लागली. मी विचारायचो, “माझ्यासाठी?”
ती फक्त हसायची. त्यांच्या छोट्याशा ओंजळीत वस्तू असायची; पण त्यापेक्षा मोठं काहीतरी त्यात दडलं होतं- प्रेम आणि कृतज्ञता.
मी त्यांच्या बंद ओंजळीत कुतूहलाची बीजं ठेवली होती; त्यांनी त्याच ओंजळीत प्रेमाचा आनंद भरून माझ्याकडे परत आणला होता. मुलांनी मला शिकवलं- दिलेला आनंद कधीच कमी होत नाही; तो दुसऱ्यापर्यंत पोहोचला की वाढत जातो.
एक दिवस माझ्याच विद्यार्थ्यांनी माझ्यासमोर माझी एक मर्यादा उघडी केली.
चित्रकलेचा तास होता. मुलांमधले गुण शोधताना त्यांचं चित्रकलेचं कौतुक करत होतो. तेवढ्यात आवाज आला, “गुरुजी, तुम्ही चित्र काढून दाखवा ना!” माझी पंचाईत झाली. मला चित्र काढता येत नव्हतं. पण मुलांच्या आग्रहापुढे फळ्यासमोर उभा राहिलो. हातात खडू घेतला आणि जमेल तसं काहीतरी रेखाटलं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या हसण्यात टिंगल नव्हती. माझ्या प्रयत्नाचा आनंद होता. नंतर मुलांनी स्वतःची सुंदर चित्रं काढली. त्यांच्याकडे पाहताना मनात एक विचार आला-
शिक्षकाला सगळंच येतं असं नसतं. कधी कधी विद्यार्थ्यांसमोर आपली मर्यादा मान्य करून त्यांच्याकडून शिकणं, हाही शिक्षकपणाचाच एक भाग आहे. त्या दिवशी मी चित्रकलेत हरलो होतो; पण माझ्या विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थी होण्यात जिंकलो होतो.
आज वर्गात उभा राहिलो की माझ्या मनात दोन प्रश्न असतात.
“आज मी मुलांना काय शिकवणार?”
आणि त्याचबरोबर-
“आज ही मुलं मला काय शिकवणार?”
सुमनने मला शिकवलं- परिस्थितीपेक्षा जिद्द
मोठी असते.
खुशीने शिकवलं- एकट्याने जिंकण्यापेक्षा दुसऱ्याला जिंकवण्यात मोठेपण असतं.
माझ्या लेकरांनी शिकवलं- ज्ञान, प्रेम आणि आनंद वाटल्याने कमी होत नाही; तो वाढतो आणि माझ्याच विद्यार्थ्यांनी शिकवलं- शिक्षक होणं म्हणजे सर्वकाही येणं नव्हे; तर आयुष्यभर शिकत राहणं होय.
तेव्हा उमगलं- शाळेत फक्त मुलं घडत नसतात; शिक्षकही घडत असतात. फळ्यावर मी त्यांच्यासाठी धडे लिहीत राहिलो; पण त्यांनी माझ्या मनाच्या फळ्यावर आयुष्याचे धडे लिहिले. आज माझ्या वर्गातली ती लेकरं कुठे कुठे पोहोचली आहेत, हे पाहताना मला माझ्या शिकवण्याचा अभिमान वाटतोच. पण त्याहून मोठा आनंद एका जाणिवेचा आहे- मी त्यांचा गुरुजी आहे; पण त्यांनीही मला घडवलं आहे. कारण कधी कधी... ज्यांच्या हातात आपण खडू देतो, तीच लेकरं आपल्या हातात आयुष्याचा नवा धडा ठेवून जातात आणि म्हणूनच माझ्या शिक्षकपणाची सर्वात मोठी कमाई कदाचित हीच-
माझ्या आयुष्यातले काही सर्वात सुंदर धडे मी शिकवलेले नाहीत; ते माझ्या विद्यार्थ्यांनी मला शिकवले आहेत.
मुलं माझे विद्यार्थी होतीच... पण काही क्षणी तीच माझे गुरुजी झाली होती.
शिक्षणातल्या विविध प्रवाहांचा अभ्यास करणारे प्रयोगशील शिक्षक.