स्टाइलिश हिवाळा, स्वेटर ते स्कार्फ

हिवाळा आला की, उबदार कपड्यांसोबतच स्टाइलिश दिसणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. बदलत्या ट्रेंडमुळे हिवाळी फॅशनमध्ये आज विविधता आणि आकर्षण पाहायला मिळतंय.
स्टाइलिश हिवाळा, स्वेटर ते स्कार्फ
Published on

हिवाळी ट्रेंड्स

ऐश्वर्या पेवाल-नेमाडे

हिवाळा आला की, उबदार कपड्यांसोबतच स्टाइलिश दिसणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. बदलत्या ट्रेंडमुळे हिवाळी फॅशनमध्ये आज विविधता आणि आकर्षण पाहायला मिळतंय.

हिवाळा सुरु झाला की, आपले जुने किंवा ठेवणीतले स्वेटर, जॅकेट्स आपण कपाटातून काढून मस्त स्वच्छ धुवून-सुकवून वापरायला काढतो. पण खरं सांगायचं तर आता प्रत्येक ऋतूप्रमाणे वापरले जाणारे कपडे आणि त्यांचा ट्रेंड बदलत चालला आहे. आधी फक्त लाल, ब्राउन, व्हाईट, ब्लॅक अशा रंगांचे स्वेटर वापरले जात होते. यामागे एवढाच उद्देश असायचा की, उबदार वाटावं. पण आता मात्र फॅशन म्हणून विंटर वेअरकडे पाहिलं जातं. हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही फॅशनेबल दिसू शकता. पण अशा फॅशनेबल कपड्यांची खरेदी करायची कुठून? साधारण किती बजेटमध्ये आपण काय विकत घेऊ शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळणार आहेत.

बदलता ट्रेंड

बाजारात आधीसारख्या सिम्पल स्वेटरबरोबरच बरेच नवीन पॅटर्न सध्या पाहायला मिळतील. स्वेटरमध्ये क्लासिक फुल स्लीव्ह स्वेटर, पुलोव्हर पॅटर्न, स्वेट शर्ट किंवा टॉप्स, हुडी किंवा जॅकेट स्टाईल स्वेटर, कार्डिगन स्वेटर, पफ स्लीव्ह स्वेटर, लेस स्वेटर्स, नेकमध्ये वी नेक, टर्टलनेक, ऑफ शोल्डर, कॉलरचे स्वेटर फार ट्रेंड मध्ये आहेत. या ऋतूमध्ये रंगीबेरंगी आणि ठळक प्रिंट्स जास्त वापरले जातात. अलीकडे लेयर्स स्टाईलला पसंती दिली जाते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, स्वेटर, कार्डिगन, जॅकेट किंवा ट्रेन्च कोट घालून तुम्ही स्टायलिश दिसू शकता. पाश्चात्त्य शैलीमध्ये लेयर्स मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि भारतात थंडीच्या ठिकाणी जसं की शिमला, मनाली, काश्मीर जिथे बर्फवृष्टी होते तिथे असे लेयर्स शोभून ही दिसतात आणि आरामदायी सुद्धा असतात. जॅकेट्समध्ये पण खूप नवीन पॅटर्न मार्केटमध्ये आले आहेत. महिलांसाठी खास कफ्तान पॅटर्न श्रग, पॉन्चो जे जीन्सवर वापरू शकता, wrap around शॉल रोजच्या वॉकसाठी वापरता येऊ शकते. शिवाय साडीवर डेनिम जॅकेट किंवा हँड एम्ब्रॉयडरी केलेलं स्वेटर घालून पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा संगम साधता येतो. पुरुष मंडळींसाठी रोज प्रवासात वापरता येतील असे कंफर्टेबल लेदर जॅकेट्स जे आतून फर आणि भाहेरून लेदरने बनलेले असतात तेही अगदी स्टायलिश पॅटर्नमध्ये मिळतात. काही जॅकेट्स तर ऑल सीझन वापरता येतील अशीच डिझाईन केलेली आहेत. हिवाळ्यात आपल्याला एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं ते म्हणजे कान. थंड हवा शरीरात गेल्याने सर्दी, घशात खवखव, खोकला, ताप असे व्हायरल आजार होण्याची शक्यता असते. म्हणून हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी फक्त कपडे नाही तर काही ऍक्सेसरीज वापरले गेले पाहिजे. जसं की कानटोपी मध्ये हेडबँड-स्टाईल इअर मफ्स, लोकरीच्या बिनी कॅप्स, इअर फ्लॅप हॅट्स, आणि वुलन हेडबँड्स जे थंडीत कान उबदार ठेवण्यासाठी वापरले जातात. मुलांसाठीचे कार्टून डिझाइनचे इअर मफ्ससुद्धा मिळतात. पायांची काळजी घेण्यासाठी पायमोजे, ऑफिसला जाताना बूट्स, घरात घालायचे फर-लाइन सँडल निवडू शकता. बऱ्याच जणांची हाताची स्किन खूप ड्राय होते, त्यांनी हातमोजे घातले पाहिजेत. या वर्षी मुंबईत थंडीचा जोर वाढलेला आहे आणि त्यातच ग्राहकांची रेलचेल वेगवेगळ्या मार्केटमध्ये दिसून येत आहे. काही जण रोजच्या वापरासाठी तर काहीजण वेकेशनसाठी तर काही जण न्यू इयर पार्टीसाठी शॉपिंग करताना दिसतात. हिवाळ्यात फिरायला जायचं असेल तर महिलांसाठी आकर्षक असे वूलन ड्रेस पण मार्केटमध्ये असंख्य रंग आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत. महिला वर्ग सध्या वूलन कॉर्ड सेट, वूलन मिडी, वूलन वन पीस फुल ड्रेस अशा कपड्यांना मोठी पसंती देताना दिसत आहेत.

एक खास टीप : जुन्या शॉल ज्या फाटत आल्या असतील किंवा हवी तितकी उब त्यातून मिळत नसेल तर तुम्ही त्या शॉल पासून जॅकेट, स्कर्ट, मोजे सुद्धा बनवून वापरू शकता किंवा लहान मुलांचे स्वेटर त्यापासून बनवू शकता.

आता खरेदी करायची कुठून?

मुंबईत दर वर्षी ३-४ महिन्यांसाठी एक स्वेटर मार्केट भरतं. ज्याचं नाव आहे टिबेटन मार्केट. मुंबईतील परळ सिग्नल आणि दादर स्टेशन पासून १० मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे मार्केट दर वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत साधारणतः सुरु असतं. हिवाळ्यातील कामी येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मार्केटला ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात भेट देऊन खरेदी करताना दिसतात. उत्तम क्वालिटी, अनेक साईझ, भरपूर रंग, असंख्य डिझाईनचे हिवाळ्यातील कपडे एकाच ठिकाणी मिळतात. विशेष म्हणजे इथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये परळ शिवाय बांद्रा, क्रॉफर्ड मार्केट, सी. एस. टी . परिसरात सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील.

हिवाळ्यातील कपडे खिश्यायला परवडतील का?

हो! का नाही. परळच्या स्वेटर मार्केटमध्ये कानटोपी ५० ते २०० रुपयांपर्यंत, तर लहान-मोठ्यांसाठी स्वेटर्स ४५० रुपयांपासून मिळतात. जॅकेट्सची किंमत ५०० रु पासून तर हातमोजे १०० ते २५० रु मिळतात. पायमोजे ५० ते २०० रुपयांत तर मफलर, शॉल २५० रु पासून सुरु होतात. एक गोष्ट मात्र खरेदी करताना लक्षात असावी कि आपल्याला नीट भाव करता आला पाहिजे, जेव्हा आपण स्ट्रीट शॉपिंग करतो. या वस्तूंची किंमत पीक सिझनमध्ये वाढलेली असते तर जस-जसं हिवाळा संपत येतो तस-तसं वस्तूंची किंमत कमी होत जाते. योग्य वस्तू योग्य दरात मिळावी यासाठी स्ट्रीट शॉपिंग मध्ये बार्गेन करणं गरजेचं ठरतं.

हिवाळ्यातील कपडे खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • जर तुमच्या भागात खूपच थंडी पडत असेल तर वुलन फॅब्रिक असणारे थर्मल वेअर घ्या. जर तुमच्या भागात थंडी कमी असेल तर कॉटन फॅब्रिकचे थर्मल वेअर घेतले तरी चालतील.

  • योग्य फॅब्रिक निवडणे. खूपदा फक्त वस्तूच्या रंगावरून आणि दिसण्यावरून खरेदी केली जाते, पण त्या फॅब्रिकचा फील घेऊन, आपल्या त्वचेला मऊ आणि आरामदायी आहे कि नाही ते पाहून मगच खरेदी करा.

  • बॉडी टाईप प्रमाणे खरेदी करा. प्रत्येक पोशाख प्रत्येकाला शोभून दिसेलच असं नाही. तुमच्या बॉडी टाईप नुसार खरेदी करा. एकदम बारीक शरीरयष्टी असलेल्या एकदम जाड जॅकेट छान दिसेलचं असं नाही. त्यामुळे कपडे निवडताना, कपड्यांच्या साईझकडे आवर्जून लक्ष द्या.

  • योग्य आणि शोभून दिसतील त्या रंगांची निवड करा.

लाइफस्टाइल जर्नालिस्ट

logo
marathi.freepressjournal.in