फूडमार्क
श्रुति गणपत्ये
सणांचे दिवस सुरू आहेत. 'साखरेचं खाणार त्याला देव देणार', असं म्हणत घरोघरी गोड साखरेचे पदार्थ बनत आहेत. पदार्थांमध्ये वैविध्य असलं तरी त्यातला मुख्य घटक साखर हाच आहे. या साखरेचं मूळ कोणतं ? तिथून ती जगभर कशी पसरली ? तिच्या प्रसारामागे भांडवलशाहीची जाहिरातबाजी कशी होती? या प्रश्नांच्या उत्तरात गोड साखरेची कड़ कहाणी आहे.
राणी एलिझाबेथ पहिली (१५५८-१६०३) हिचा काळ हा इंग्लंडच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो. कारण राजकारण, संस्कृती, कला, आंतरराष्ट्रीय संबंध अशा अनेक गोष्टींवर राणीने आपली छाप पाडली होती. मात्र ती आणखीही एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होती ते म्हणजे तिचे किडलेले दात. तिचे दात पिवळे, काळे असल्याचे तिला पाहिलेल्या प्रवाशांनी नमूद केलं आहे. काही तर तुटले होते, त्यामुळे ती काय बोलते हेसुद्धा अनेकदा समजायचं नाही. याला कारण तिला गोड खाण्याचा भयंकर शौक होता आणि तिच्यासाठी होणाऱ्या अनेक पार्ट्यांमध्ये सजावटीच्या अनेक गोष्टी या साखरेच्या बनवल्या जायच्या. साखरेमुळे वाढणारं वजन ही आजची समस्या आहे. पण आपल्या आधीच्या पिढ्यांमध्येही दात किडण्याची, पडण्याची समस्या साखरेमुळेच निर्माण झाली होती. तरीही साखरेचा वापर कमी झालेला नाही. तो सातत्याने आपल्या खाण्याच्या पदार्थांमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने डोकावतच राहतो. याला कारण साखरेचं उत्पादन हे भांडवलशाही व्यवस्थेने लोकांवर लादलं आहे. साखरेतून अधिकाधिक नफा कमावण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात साखर खाणं आवश्यक होतं. त्यामुळे गेल्या १५० वर्षांच्या इतिहासात अतिरिक्त साखर अक्षरशः आपल्या गळी उतरवण्यात आली.
ऊस मुळातला भारतीय. त्यामुळे साखरेचा मूळ उगमही भारतातलाच. पण ऊस भारतातून मध्य आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व या इस्लामचा प्रभाव असलेल्या देशांमध्ये गेला आणि इस्लामनेही आपल्या पदार्थांमध्ये साखरेला स्थान दिलं. पण युरोपला साखरेची चव चाखायला १०९५ साल उजाडावं लागलं. पहिल्या क्रूसेडच्या वेळी पॅलेस्टाइनमध्ये त्यांना पहिल्यांदा साखर चाखायला मिळाली. अर्थातच तिची चव उत्तम होती, पण ती महागही होती. साखर भारतात असेपर्यंत तिचा वापर मर्यादित होता. गोडव्यासाठी गूळ, मध, फळं, फुलं, पामच्या झाडापासून निघणारं गोड द्रव्य आदींचा वापर पदार्थांमध्ये केला जायचा. त्यामुळे साखर हा एकमेव पर्याय नव्हता. सर्वसामान्य लोक गुळच जास्त वापरायचे.
साखरेचं युरोपमधील स्थलांतर : साखर युरोपपर्यंत पोहोचली. युरोपला साखरेची चटक लागल्यावर त्यांनी तिचा अमर्याद वापर सुरू केला. सुरुवातीला हा वापर राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या घरीच होता. गुलामांचा वापर करून साखरेचं उत्पन्न काढलं तर त्यात नफा आहे हे समजल्यावर भांडवलशाहीने साखरेच्या उत्पादनावर आपलं लक्ष केंद्रित केलं. जास्त उत्पादन, जास्त मागणी, जास्त नफा यासाठी त्यांनी साखर आणि साखरयुक्त पदार्थ सर्वसामान्यांच्या अक्षरशः गळी उतरवले. भांडवलदारांनी चहा, कॉफी, केक, पेस्ट्री, बिस्किटं अशा प्रत्येक पदार्थामध्ये साखरेचा अमाप वापर सुरू करायला प्रोत्साहन दिलं. त्याआधी मधाचा वापर व्हायचा, पण तो मर्यादित होता.
गोड साखरेची कडू गुलामगिरी : साखरेचं प्रचंड उत्पादन करणं, ती घराघरात पोहोचवण्यासाठी जाहिराती करणं, गोड पदार्थांच्या रेसिपींची पुस्तकं बाजारात आणणं, असे अनेक उद्योग करण्यात आले. त्यामुळे ऊस हा प्रचंड नफा देणाऱ्या पिकांमध्ये गणला जाऊ लागला. पण भांडवलदारीमध्ये नफा हा दुसऱ्याच्या कष्टातूनच येतो. त्यामुळे साखरेचा जागतिक मार्ग हा गुलामगिरीतून गेला. ऊस लावण्यासाठी जास्तीत जास्त जमीन पादाक्रांत करणं, जंगल तोडणं, आफ्रिकन लोकांना गुलाम बनवून स्वस्तात आणि अमानवी पद्धतीने राबवून घेणं, हे युरोपने जगभर केलं. साखरेचं उत्पादन करणाऱ्या गुलामांच्या कथा फार भयंकर आहेत. तंबाखू, अफू, कापूस अशा काही निवडक उत्पादनांवर युरोपमधील भांडवलदार गब्बर झाले, त्यात साखर हेही महत्त्वाचं उत्पादन आहे. गुलामीची प्रथा संपुष्टात आल्यावर ब्रिटिशांनी भारतासारख्या देशातून गरीब कामगारांना आपल्या वसाहतींमध्ये नेऊन साखर उत्पादनासाठी राबवलं. ब्राझील, जावा, कॅरेबियन बेटं, क्यूबा, इजिप्त तसंच भारतातील उत्तर प्रदेश आणि बंगाल ही साखर उत्पादनाची प्रमुख केंद्रं होती. पोर्तुगीज, स्पॅनिश, ब्रिटिश, डच असे सगळेच या व्यवसायात उतरले. तांत्रिक प्रगतीसोबत साखरेचं उत्पादन आणखी चांगल्या पद्धतीने होऊ लागलं आणि साखर पांढरीशुभ्र बनली.
साखर खाणं प्रतिष्ठेचं : साखरेचा प्रचार भांडवलदारांनी अशा काही पद्धतीने केला की, त्याला आधी राजाश्रय मिळवून दिला. राजेरजवाड्यांच्या मैफिलींमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचं बीभत्स वाटावं असं प्रदर्शन भरवलं जाऊ लागलं. साखर खाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. साखरेची किंमतही तेव्हा महाग होती. उसाचं उत्पादन एका देशात होऊन त्यापासून साखर बनण्यासाठी अनेकदा ऊस दुसऱ्या देशात पाठवावा लागे. त्यामुळे साखरेच्या किमती लोकांना परवडतील अशा नव्हत्या. अशावेळी गरीब लोक अनेकदा साखरेएवजी काकवी (मोलॅसिस) वापरायचे. परवडत नसल्याने गरीबांच्या जेवणात बटाटे, कोबी अशा बेचव गोष्टी जास्त असायच्या. अशावेळी काकवी ब्रेडबरोबर लावून खाणं ही त्यांना मोठी पर्वणी वाटायची. त्यातून गोड चव तयार होत गेली. तसंच त्यांना अंग मेहनत करायला ऊर्जाही मिळायची. नफा डोळ्यासमोर ठेवून उत्पादन वाढल्याने साखरेची किंमत कमी झाली खरी, पण मागणीही वाढली, कारण सर्वसामान्यांना ती महिन्याच्या रेशनमध्ये लागू लागली.
कॉफी हाऊसचा उगम : खरं तर जगभरातल्या गोरगरीबांपर्यंत साखर ही गेल्या १५० वर्षांत पोहोचली आहे. पण त्यासाठी अनेक उपाय केले गेले. युरोपमध्ये उघडण्यात आलेल्या कॉफी हाऊसचा उगमही या साखरेच्या राजकारणातच आहे. कारण चहा पिणं हे खासगी मानलं जातं. पण कॉफी हे मात्र लोकांसोबत पिण्याचं पेय असल्याचं रूढ केलं गेलं आणि या चहा-कॉफीसोबत साखर गरजेची बनली.
अमेरिकेचं साखर साम्राज्य : अमेरिका साखरेच्या उत्पादनात उतरली आणि मग साखर नाही, असं कोणतंच क्षेत्र राहिलं नाही. जेली, जाम, कोल्ड्रिंक्स, हॉट चॉकलेट, चॉकलेट आणि प्रत्येक पॅक्ड अन्नामध्ये तिचा केवळ शिरकावच झाला नाही, तर हे पदार्थ अति प्रमाणात लोकांवर लादण्यात आले. अमेरिकन उद्योगपती हॅन्री हॅवमेयरने अमेरिकन शुगर रिफायनिंग कंपनी स्थापन करून ९८ टक्के उद्योग आपल्या ताब्यात घेतला. त्यातून मग आता दिसणारे चॉकलेट, गोळ्या, लॉलिपॉप हे सारे गोड चवीचे पदार्थ तयार झाले. मिल्टन हर्षे, फ्रँक सी मार्स यांनी आपल्या नावाने चॉकलेट-गोळ्यांचे व्यवसायच उभारले. या कंपन्यांची चॉकलेट जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच साखरेच्या मळीपासून रम दारू बनवून भांडवलदारांनी आपला नफा आणखी वाढवला.
पर्यावरणावरील दुष्परिणाम : उसाच्या अतिरिक्त उत्पादनाचा पर्यावरणावरही प्रचंड परिणाम झाला. जमीन नापीक होणं, भरमसाट पाणी उपसणं, जंगलतोड करून सपाटीकरण, वगैरे. अनेक ठिकाणी मूळचे लोकही नाहीसे झाले. कारण त्यांच्या जमिनी हिसकावून बाहेरून गुलाम किंवा गरीब कामगारांना तिथे आणून बसवण्यात आलं. आजही भारतामध्ये इतर राज्यांमध्ये ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांच्या कथा या शोषणाच्याच आहेत. आपल्या खाण्यात असलेल्या पदार्थांमध्ये साखर तशी आधुनिक म्हणावी लागले. पण तिचं आजचं जागतिक उत्पादन हे १८०-१९० दशलक्ष टन एवढं असून ब्राझील, भारत, युरोपमधून यातील ५० टक्के उत्पादन होतं.
साखर अतिरिक्त खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम सर्वांनाच माहीत आहेत. पण नफ्यापुढे हे लक्षात कोण घेतो?
मुक्त पत्रकार
shruti.sg@gmail.com