

विशेष
गीतेश गजानन शिंदे
उन्हाच्या तप्त झळांमध्येही आठवणींचा गारवा आणि निसर्गाचे बहरणारे रूप मनाला भुरळ घालते. शहराच्या सिमेंट संस्कृतीतून थेट गावाकडच्या लाल मातीकडे आणि उन्हाळ्याच्या वेगवेगळ्या छटांकडे नेणारा हा एक भावस्पर्शी प्रवास !
पहाटेच्या एसटीनं सकाळीच गावी निघालो. इतक्या पहाटेही गारवा नव्हताच आणि मी तर चक्क ऐन मे महिन्यात लाल परीनं कोकणातल्या खडतर वाटेवर निघालो होतो. डेपोतून बस बाहेर पडल्यावर कंडक्टरनं तिकिटं फाडेपर्यंत अंधाराचं साम्राज्य पूर्णपणे खालसा होऊन सूर्यनारायणानं सत्ता हातात घेतली. मला खिडकीलगतची जागा मिळाली, पण शहराची वेस ओलांडून पुढे जाताच ती तापदायक ठरू लागली. कारण उजेडाचा भगभगीत तुकडा खिडकीतून अंगावर सांडू लागला अन् वाऱ्याचा प्रत्येक झोत कानशिलं तापवू लागला. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत पुस्तक वाचत मी उन्हाशी गट्टी करू पाहत होतो. पण मन रमत नव्हतं. मग मी खिडकीतून दूरवर हिरवा रंग शोधायचा प्रयत्न करू लागलो.
डांबरी सडकेवरून धावणाऱ्या बसमध्ये दहा-अकरा वाजेपर्यंत असं वाटू लागलं की आपण बसमध्ये नसून एखाद्या कचोरीत सारणासारखे भरले गेलो आहोत. तितक्यात ड्रायव्हरनं करकचून ब्रेक दाबत एक जोरदार शिवी हासडली. एसटीचं टायर पंक्चर झालं होतं. आडवाटेला गाडी पंक्चर झाल्यानं चाक बदलण्याचा निर्णय घेतला. प्रवासी जवळपास सावली शोधू लागले. मी अवतीभवतीचा देखावा मनात साठवू लागलो. नजर जाईपर्यंत पसरलेलं पिवळं, सुकलेलं गवत पाहून माझ्या मनात कवितेच्या ओळी निनादू लागल्या,
'पिवळ्याधम्मक ओसाडावर
पिवळेधम्मक फूल
माळरानावर गेली ऊतू,
पिवळीधम्मक भूल...'
जणू आकाशाच्या भांड्यातून ऊन उतू जातंय. माळरानावर पिवळसर साय पसरल्यानं हिरवा रंग मातीआड गुडूप झाला आहे. वातावरणात उन्हाची दहशत अशी पसरली होती, जणू पट्टेरी वाघच दबा धरून बसलाय. मी आपसूकच ओळी लिहिल्या :
'दबक्या पावलानं गवतातून
हिरव्याचा काढे माग
उन्हाची दहशत अशी,
जणू चाले पट्टेरी वाघ...'
बेसावध असतानाच वाघ जसा अंगावर झडप घालतो, तशी उन्हाची झळ सर्वांगाला लागली. वाराही भीतीनं सैरावैरा पळत होता. काही काळानं ऊन थोडं मलूल पडलं आणि आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो. पण माझं मन मात्र भूतकाळातल्या आठवणींनी हिरवंगार झालं. खरं तर उन्हाचं नातं थेट बालपणाशी जोडलेलं असतं. वार्षिक परीक्षा संपून एप्रिल-मे महिना लागला की आमची रवानगी कोकणातल्या गावी व्हायची. अजूनही दुपार आठवली की डोळ्यांसमोर येते ती रणरणत्या उन्हातली गावाकडची लाल माती. दुपारच्या कडक उन्हातही भल्यामोठ्या वृक्षांची सावली असायची. दुपारी मोठ्या माणसांची वामकुक्षी सुरू झाली की, आम्ही मुलं दबक्या पावलांनी उन्हात सटकत असू. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्या शोधताना, चिंचा पाडताना अंगावर झिरपणारे ऊन आमचा सोबती असायचा. दुपारच्या शांततेत घुमणारा कोकिळेचा आवाज आणि उन्हाच्या झळांनी व्याकुळ झालेल्या जमिनीचा विशिष्ट गंध आजही मनात घर करून आहे.
माजघरात पडद्याच्या फटीतून उन्हाची तिरपी रेघ खाली जमिनीवर यायची. त्या उन्हाच्या पट्ट्यात नाचणारे धुळीचे सूक्ष्म कण पाहताना तासनतास कसे निघून जायचे, हे समजायचंच नाही. आईनं अंगणात वाळत घातलेल्या कुरडया आणि पापडांवर पडणारं लख्ख ऊन म्हणजे 'उन्हाळा' आल्याची पावतीच असायची. संध्याकाळी जेव्हा ऊन ओसरू लागायचं, तेव्हा सड्या-मातीवर शिंपडलेलं पाणी आणि त्यातून दरवळणारा मातीचा सुगंध उन्हाच्या दिवसांना अधिकच अविस्मरणीय बनवायचा. आज फ्लॅटमधील एसीच्या रूममध्ये बसून ऊन पाहताना कंटाळा येतो, पण आजही एखादा उन्हाचा कवडसा अंगावर पडला की मन त्या सोनेरी उन्हात हरवतं.
शहरात उन्हाळा येतो तो सिमेंटच्या रस्त्यांवरून निघणाऱ्या गरम वाफांमधून. इथला उन्हाळा निसर्गाच्या कुशीत विसावण्यापेक्षा, एसीच्या गारव्यात स्वतःला कोंडून घेण्याचा ऋतू झाला आहे. सकाळचे नऊ-साडेनऊ वाजत नाहीत तोवर सूर्याची आग बरसू लागते. लोकलच्या खिडकीतून येणारे चटके, सिग्नलवर उभ्या असलेल्या गाड्यांच्या इंजिनमधून निघणारी उष्णता आणि धूर, हे शहरातल्या उन्हाळ्याचे खरे चेहरे. ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांच्या शर्टवर उन्हाचे चट्टे आणि घामाच्या रेघा उमटू लागतात.
गावाकडे झाडांच्या सावलीचा आश्रय असतो, पण इथे उंचच उंच इमारतींच्या मध्ये अडकलेलं ऊन माणसाला अस्वस्थ करतं. आजकाल शहरात पूर्वीसारखी झाडांची सावली पडत नाही. भर दुपारी काँक्रीटचे रस्ते अक्षरशः चकाकताना दिसतात. मात्र, या रणरणत्या उन्हातही शहराची जीवनवाहिनी थांबत नाही. रस्त्याच्या कडेला लिंबू सरबत किंवा उसाचा रस विकणाऱ्यांच्या गाड्यांपाशी होणारी गर्दी, हेच काय ते थंडावा देणारे क्षण.
शहरातल्या उन्हाळ्याचा सर्वात मोठा 'कसोटीचा क्षण' म्हणजे सिग्नलवरची ती दोन-तीन मिनिटं. हेल्मेटच्या आतून वाहणारा घाम, डोळ्यांवर येणारी उन्हाची तिरीप आणि आजूबाजूच्या गाड्यांच्या सायलेन्सरमधून बाहेर पडणारी उष्ण हवा; हे सगळं मिळून शरीराची लाहीलाही होते. सिग्नल कधी हिरवा होतोय असं होतं. सिग्नलवर पाणी विकणारी छोटी मुलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ऊन पाहून जाणवतं की, उन्हाचे चटके गरीब आणि श्रीमंत बघून बदलत नाहीत. रस्त्यावरचा हा 'अग्निदिव्य' प्रवास संपवून एकदा का काचेच्या इमारतीतल्या ऑफिसमध्ये शिरलं, की एसीच्या कृत्रिम गारव्यात बाहेरच्या उन्हाचा विसर पडतो. ऑफिसमध्ये गप्पांची सुरुवात 'किती उकडतंय ना !' इथूनच होते. थंडगार ऑफिसच्या खिडकीतून बाहेर दिसणारं लख्ख ऊन जाणवत नसलं तरी संध्याकाळी पुन्हा त्याच तापलेल्या शहरातून घरी जायचं आहे, ही धास्ती मनाच्या एका कोपऱ्यात असतेच. एसीचा गारवा अंगाला थंड करतो, पण उन्हानं व्याकुळ झालेल्या मनाला खरी तृप्ती मिळते ती संध्याकाळी घराकडे निघताना वाहणाऱ्या त्या थोड्या सुसह्य झालेल्या वाऱ्यानंच.
जेव्हा रखरखत्या उन्हात धरणी तापून निघते, तेव्हा निसर्ग मात्र एक वेगळाच चमत्कार घडवत असतो. उन्हाळ्याचा कंटाळा करणाऱ्या आपल्या डोळ्यांना सुखावण्यासाठी दोन झाडं सज्ज होतात-एक रक्तासारखा लालभडक गुलमोहर आणि दुसरा सोन्यासारखा लख्ख पिवळा बहावा.
लहानपणी मी जिथे राहायचो त्या घरापाठीमागे मावळी मंडळचं मैदान होतं. वैशाखात इतर झाडं पाणी पाणी करत असताना गुलमोहर मात्र बहरून येतो. माझ्या एका कवितेत मी लिहिलंय :
'वैशाखातल्या मध्यान्ही तापलेलं अंबर
लख्ख उजळलेलं, गुलमोहराचं झुंबर
पंचमुखी फुलांचा शोभे रक्तवर्णी रंग
हळदमाखली देठं होत जातात निःसंग'
आकाशाच्या सिलिंगला कोणीतरी गुलमोहराचं झुंबर लटकवलंय असंच मला नेहमी वाटतं. हळूहळू ऊन त्यांच्या देठातून उतरत जातं आणि झाडावरून अलगदपणे ही फुलं निःसंग होतात. खाली केशर सडा पडलेला असतो. गुलमोहराच्या या प्रखर सौंदर्याला तितकीच सौम्य जोड मिळते ती बहाव्याची. बहावा म्हणजे निसर्गाचा 'गोल्डन शॉवर'. पानांची गळती झाल्यावर उरलेल्या नागव्या फांद्यांवर जेव्हा पिवळ्याधमक फुलांचे घोस लोंबू लागतात, तेव्हा तो एखाद्या सुवर्णमहोत्सवासारखा वाटतो. वाऱ्याच्या झुळुकीसोबत जेव्हा बहाव्याच्या पाकळ्या खाली पडतात, तेव्हा रस्त्यावर जणू सोन्याचा सडा पडल्याचा भास होतो. त्याविषयी मी कवितेत लिहिलेलं आठवतंय :
'पिऊनि उन्हाला किती बहरे बहावा
रस्ताच सारा सोनपाकळ्यांचा व्हावा
गुलमोहराचा, बहावाच खरा साथी
तप्त उन्हातही त्यांची गर्द बहरली माथी'
गुलमोहर आणि बहावा म्हणजे उन्हाळ्यातील दोन टोकाची व्यक्तिमत्त्वं आहेत. एक 'तप्त' आहे, तर दुसरा ऊन पिऊन 'तृप्त' झालाय. गुलमोहर उन्हाची प्रखरता वाढवतो, तर बहावा आपल्या शीतल पिवळ्या रंगानं उन्हाचा ताप सुसह्य करतो. या दोन झाडांमुळेच वैशाखातली ती रणरणती दुपारही चित्रमय होऊन जाते. आज शहराच्या सिमेंटच्या जंगलात ही झाडं कमी होत चालली आहेत, पण आजही एखाद्या वळणावर जेव्हा हे दोन मित्र सोबत फुललेले दिसतात, तेव्हा ऊनही हवंहवंसं वाटतं. शेवटी म्हणावंसं वाटतं की, मुळा-मुळांतून बोले सारी झाडांची ही कुळं गुलमोहराची चिंता, सगेसोयरे व्याकुळ झाड असो निष्पर्ण वा वरती हिरवे माती आत मुळांपाशी सारे असती हळवे'
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत
geeteshshinde@gmail.com