
- आनंदाचे झाड
- युवराज माने
उन्हाळी सुट्टी म्हणजे अनुभवांच्या पिशवीत लुसलुशीत अनुभवांची ताजी फळं जमा करणं. मुलांसाठी व शिक्षकांसाठी उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी म्हणजे समृद्ध होण्यासाठीची पर्वणीच असते. समृद्ध होण्यासाठी नेमकं काय करावं? आनंद वेचता वेचता नेमकं काय उचलावं? याची ही शिदोरी.
तीन दिवसांपूर्वीच निकालपत्र लेकरांच्या हातात देण्यात आलं. खरंतर त्यातलं लेकरांना काहीच कळत नव्हतं. मोठ्या वर्गातली लेकरं फक्त विषयांसमोरील अ, ब,क,ड लिहिलेलं तेवढं वाचत होती. थोडाच वेळ त्यांना त्याचं कुतूहल आणि नावीन्य होतं. आमच्या शाळेत पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक... असं काही नसतं. त्यामुळे लेकरांना निकालाचा काही ताण नव्हता. परीक्षा झाल्यानंतर आम्ही एक महत्त्वपूर्ण कृती लेकरांकडून करून घेतो. लेकरांना आवाहन केलं जातं की, “ज्या वर्गात तुम्ही वर्षभर शिकलात त्या वर्गात तुम्ही काय काय शिकलात? आणि काय काय शिकायचं राहून गेलं, ते एका कागदावर लिहा.” नंतर ते कागद जमा करून त्यावर चर्चा घेतो. लेकरं स्वतःच आत्मपरीक्षण करतात. आत्मसात केलेलं आणि राहून गेलेलं या दोन्ही बाबी लेकरं स्वतः स्वीकारतात. त्यामुळे त्यांना गुरुजींनी बनवलेल्या कागदी निकालांची गरजच वाटत नाही.
या आत्मपरीक्षण संवादानंतर लेकरांच्या मनाला एक रुखरुख लागून राहिली की, आता दीड महिना शाळेपासून, आपल्या मित्र-मैत्रिणींपासून, शिक्षकांपासून दूर राहावं लागणार याची. लेकरांच्या मनातलं ओळखणार नाहीत ते गुरुजी कसले! नेहमीप्रमाणेच संवाद कट्ट्यावर आम्ही सर्वजण एकत्र जमलो. आपण सुट्टीत काय काय करायला हवं? तुम्ही सुट्टीत काय काय करणार? हा विषय घेऊन त्यावर संवाद सुरू झाला. प्रत्येक लेकरू आपण सुट्टीत काय करणार याविषयी बोलू लागलं.
खुशी पुढे येऊन म्हणाली, “मी मामाच्या गावाला जाणार. भरपूर आंबे खाणार. मजा-मस्ती करणार.” लगेच प्रयास पुढे येऊन म्हणाला, “मी मावशीच्या गावी जाणार. तिथली नदी पाहणार. तिच्यात भरपूर पोहणार. मनोज बोरगावकर यांनी ‘नदिष्ट’ या कादंबरीत नदीचं जे वर्णन केलेलं आहे ते सगळं मी जवळून पाहणार.”
स्वाती म्हणाली, “मी पण मामाच्या गावाला जाणार. माझ्या मामाच्या गावात खूप मंदिरं आहेत. ती मंदिरं पाहून मी त्यांची चित्र काढणार. त्या मंदिरांविषयी माहिती जमा करणार.” स्वातीचं बोलणं संपलं नाही तोवरच कोमल उभी राहिली आणि सांगू लागली, “मी बहिणीच्या गावाला जाणार. माझ्या बहिणीच्या गावाकडे खूप सारी झाडे आहेत. मी त्या वेगवेगळ्या झाडांची माहिती जमा करणार.”
पूनम म्हणाली, “मी पण मामाच्या गावाला जाणार. गावाभोवती नदी व डोंगर आहेत. तिथे मी फिरणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे दगडगोटे जमा करणार.”
ही अशी कितीतरी आनंदाची ठिकाणं लेकरांच्या तोंडून बाहेर पडत होती. किशोरवय म्हणजे उत्साहाचा झराच! या वयातील गप्पा, त्यांचे विचार आपल्याला खूप काही शिकवून जातात. मध्येच साक्षी म्हणाली, “गुरुजी, तुम्ही सांगा ना, आम्ही आणखी काय काय करावं?” साक्षीच्या प्रश्नाचं मला कौतुक वाटलं अन् मी सांगू लागलो, “बाळांनो, सुट्टी म्हणजे शाळेपासून मुक्ती नसून तुम्हा सर्वांना मुक्तपणे संचार करण्याची मुभा आहे. भरपूर मोकळा वेळ मिळेल जो तुम्हाला हवं ते करण्यासाठी वापरता येईल. शाळेत जसं ठरावीक वेळात वेगवेगळे विषय घेतले जातात तसं आता होणार नाही. तुमच्या आवडीचा विषय कितीही वेळ तुम्हाला शिकता येईल.” हे सांगतानाच आणखी काय काय करता येईल हे मी त्यांना सांगू लागलो.
सकाळी लवकर उठायचं आणि घरापासून दूर अंतरावर मोकळ्या जागी जाऊन उगवत्या सूर्याचं निरीक्षण करायचं. सोबतच निसर्ग संगीत ऐकायचं. पक्ष्यांची सकाळ कशी असते, ते काय काय करतात ते पाहायचं...
आपली आई सकाळी अनेक गोष्टी करते. त्याचं निरीक्षण करायचं. कमी वेळात ती कोणकोणती कामं करते, कोणतं काम करताना तिला त्रास होतो, कोणतं काम ती मनापासून करते, कोणतं काम ती आकर्षकपणे करते आणि तेही न कंटाळा करते, एकाच वेळी ती अनेक कामं कशी करते, या सगळ्याची नोंद करायची. कोणतं काम करताना ती चिडचिड करते, याची वेगळी नोंद घ्यायची. कोणत्या कामात आपण तिला मदत करू शकतो, ते पाहायचं. हे असं सर्व काही बघायचं आणि तेही सहज आणि हो, आईचं काम आपण शिकायचं पण आहे. शेवटी कल्पना करायची की ‘आई संपावर गेली तर...’ आणि वहीत त्याविषयीच्या महत्त्वाच्या नोंदी करायच्या.
घरात राहणाऱ्या सर्वांचं निरीक्षण करायचं. कोण काय करतं? त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं कुटुंबातील योगदान, सर्वांचं कुटुंबातील स्थान किती महत्त्वाचं आहे, याची नोंद घ्यायची. कोण वेळेचा सदुपयोग करतोय, कोण वेळेचा अपव्यय करतोय, याचीही नोंद घ्यायची. कुटुंब कसं एकमेकांच्या सहकार्याने चालतं, याचा जवळून अनुभव घ्यायचा.
आपल्या घरातले आजी-आजोबा म्हणजे दोन स्वतंत्र विद्यापीठं असतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक विद्यापीठं असतात. त्या सर्वांशी मनमोकळं बोला. त्यांच्याजवळ त्यांच्या बालपणातील गोष्टी सांगण्याचा हट्ट करा. त्यांच्या जीवनातल्या संघर्षमय घटना ऐकून त्यावर त्यांनी कशी मात केली ते समजून घ्या. या सर्व नोंदी घ्या. तुम्हाला जमत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टी आजी-आजोबांना आवर्जून सांगा.
सकाळ-संध्याकाळच्या जेवणानंतर भांडी घासणं आणि झाडू काढणं, या कामांमध्ये आईला मदत करा. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचं निरीक्षण करा. भाजी निवडणं, चिरणं, धुणं, झाडलोट करणं अशा लहानसहान कामात सहभागी व्हा. आई-वडील, आजी-आजोबा यांचे हातपाय दाबून द्या. मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद...
आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांच्याशी आपुलकीने वागा. त्यांच्या घरातील मुलांना आपल्या घरी बोलवा. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा. वेगवेगळे देशी खेळ खेळा.
उन्हाळ्यात कुरडया, पापड, शेवया असे वेगवेगळे साठवणीचे पदार्थ सर्वांनी मिळून बनविण्याची रीत आहे. आपली आई-आजी-शेजारच्या काकू एकमेकींना मदत करत असे पदार्थ बनवतात. ही एक वेगळीच उपलब्धी असते नातेसंबंध घट्ट करण्याची. तुम्ही पण या कामात आईला, शेजारच्या काकूंना मदत करा. या एकत्रित कृतीत अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. त्या तुम्हाला खूप उपयोगी ठरतील.
आपले आई-बाबा जिथे कामाला जातात तिथे प्रत्यक्ष जाऊन ते करत असलेल्या कामाचं निरीक्षण करा. किती तास काम करतात? त्याचा मोबदला किती मिळतो? त्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागतात? त्यांना त्यातून आनंद मिळतो का? त्रास होत असेल तर कसला त्रास होतो? अशा नोंदी करा आणि त्यांच्या कामात काही मदत करता येईल का? यावर विचार करा.
आठवडी बाजारात आईवडिलांसोबत जा. खरेदी-विक्रीचा अनुभव घ्या. आपल्या कुटुंबाला किती रुपयांचा बाजार लागतो? वडील हा व्यवहार कसा हाताळतात? हे समजून घ्या.
आपल्या आईला-आजीला-आजोबांना एखादं पुस्तक रोज थोडं थोडं करून वाचून दाखवा. आपल्या आईवडिलांचे हात हातात घेऊन त्यांच्या हातावरून हात फिरवून पाहा. नेमकं काय वाटतं ते हृदयाच्या कुपीत नोंदवा. त्या हातांचा मुका घ्या आणि सांगा, आई-बाबांना की, “तुम्ही ग्रेट आहात..!”
मी हे सर्व सांगत असताना लेकरं हत्तीचा कान करून ऐकत होती. त्यांचे चमकणारे डोळे मला मनसोक्त आनंद देत होते. लेकरांना मी सुचविलेली ही आनंदाची ठिकाणं खूप खूप आवडली. या सर्व आनंदाच्या ठिकाणांची सहल करून तेथील आनंद ते माझ्यासाठी पण आणणार, असं वचन त्यांनी मला दिलं. यानंतर लेकरं आणि मी आपापल्या आनंदाच्या ठिकाणांच्या दिशेने निघालो.
प्रयोगशील शिक्षक व शैक्षणिक विषयांचे अभ्यासक