सुट्टीचा जादुई अवकाश

आजच्या स्पर्धात्मक आणि ताणतणाव असलेल्या शिक्षण व्यवस्थेत, उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणारी विश्रांती मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सुट्टीचा जादुई अवकाश
नवशक्ति अक्षररंग
Published on

- हितगुज

- डॉ. शुभांगी पारकर

आजच्या स्पर्धात्मक आणि ताणतणाव असलेल्या शिक्षण व्यवस्थेत, उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळणारी विश्रांती मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

सुट्टी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सुट्टी ही एखाद्या धार्मिक विधीसारखी आपल्या नातेसंबंधांना ऊर्जा देते. रोजच्या कामकाजापासून सुट्टी घेण्याची परंपरा इतिहास काळापासून सुरू आहे. आधुनिक काळात त्यात कार्यालयीन कामकाजासाठी रविवार आणि शाळा-महाविद्यालयांसाठी दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांची परंपरा सुरू झाली.

कुटुंब आणि आपल्या समाजात आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी, परस्पर बंध घट्ट करण्यासाठी सुट्टीचा अवकाश आवश्यक असतो. एक आपलेपणाची भावना निर्माण होते. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते या सुट्टीच्या अवकाशात व्यक्त करता येतं. वेगवेगळे ऋणानुबंध सुट्टीच्या अवकाशात जोडले जातात. शिवाय पिढ्यान् पिढ्यांचे भावबंध साजरे करण्यासाठीही सुट्टीचा हा अवकाश मदत करतो. शिवाय सुट्टी चांगल्या स्मृती निर्माण करते. मग आयुष्यभर या स्मृती लक्षात राहतात.

“मी लहान असताना आईसोबत पॉपकॉर्न खात असे.”

“माझ्या आजीने केलेले कैरीचे रायते अप्रतिम असे. त्याची चव आजही माझ्या जीभेवर आहे.” या अशा भूतकाळाच्या भावूक आठवणी आणि सुट्टी यांचा अनोखा संबंध आहे. सुट्टीतच त्या घडतात आणि दर सुट्टीला जिवंत होतात. नवीन पिढीला जुन्या आठवणी सांगितल्या जातात.

उन्हाळ्याची सुट्टी हा एक अत्यंत महत्त्वाचा आनंदमयी कालावधी आहे. कारण या काळात शाळेतील शिक्षणापासून तर विश्रांती मिळते, पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अवकाश मिळतो. शाळेतील कडक वेळापत्रकांपासून मुक्त होणं, घरच्या वातावरणात आराम करणं आणि स्वातंत्र्याचा लाभ घेत वेळ घालवणं हे बाल्यावस्थेत अत्यंत आवश्यक आहे. या लेखात आपण सुट्टीमुळे मुलांना मिळणारे विविध फायदे आणि त्याचा त्यांच्यावर होणारा सकारात्मक परिणाम तपासणार आहोत.

शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायदे

आजच्या काळात मुलं घरात बसून स्क्रीनवर गेम खेळत वेळ घालवतात. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना वेगवेगळ्या शारीरिक हालचाली करण्यासाठी वेळ मिळतो. चालणं, खेळणं, सायकल चालवणं या अशा उपक्रमांमधला मुलांचा सहभाग मुलांच्या शारीरिक आरोग्याला बळ देतो. यामुळे त्यांच्या हाडांची, स्नायूंची आणि इतर अवयवांची क्षमता वाढते. उन्हाळ्यात थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्याने मानसिक आरोग्यही सुधारतं. सूर्यप्रकाशामुळे जीवनसत्त्व ‘ड’चं प्रमाण वाढतं. यामुळे आनंदाची भावना वाढते आणि ताण कमी होतो.

अलीकडे शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे, दबावामुळे आणि करियरविषयक अपेक्षांमुळे मुलांना मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. म्हणूनच शिक्षणाच्या, शाळा-महाविद्यालयातल्या जबाबदाऱ्यांपासून काही काळ मुक्त होणं मुलांच्या भावनिक सुखासाठी खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मुलांना आरामदायक आणि आनंदी वातावरण अनुभवायला मिळतं. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक स्थैर्य निर्माण होते. अर्थातच सुट्टीमुळे अधिक सकारात्मक, तणावरहित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडायला मदत होते.

कुटुंबाशी संबंध आणि सामाजिक विकास

शाळेतील कडक वेळापत्रकामुळे मुलांना त्यांच्या कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवायला मिळत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवणं, प्रवास करणं आणि एकमेकांशी संवाद साधणं, गंमत-जम्मत करणं यामुळे मुलांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये वाढ होते. याच कारणाने मामाकडे जाणं हा एक मोठा समारंभ बनतो. “झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...” ही मुलांसाठी सुखद अशी उन्हाळी आठवण आहे. शिवाय आपल्या आईवडिलांशी काही ना काही कारणाने ताणले गेलेले नाते पुन्हा प्रेमाने विणण्याची संधी याच सुट्टीच्या काळात मुलांना मिळते. घरच्या इतर सदस्यांसोबत, नातेवाईकांसोबत संवाद साधता येतो. मित्र-मैत्रिणींसोबत विचारांचं आदान-प्रदान करता येतं, परस्परांपासून काही शिकता येतं. यातून परस्परांसोबतचे भविष्यातील संबंधही अधिक घट्ट होतात.

आपल्याला जे काही मिळते त्यातील काही भाग समाजाला परत देण्याची वृत्ती या सुट्टीच्या काळातच मुलांमध्ये रुजवण्याची संधी पालकांना मिळते. सुट्टीतला हा एक अर्थपूर्ण उपक्रम असू शकतो. पालकांनी या काळात सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या स्थानिक स्वयंसेवी संस्था किंवा स्वयंसेवक यांचा शोध घ्यावा आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये आपल्या मुलांना सहभागी करावं. ही अशी कृती म्हणजे केवळ दयाभाव नसतो, तर मुलांमध्ये कृतज्ञता आणि जबाबदारीची भावना निर्माण करायला तिची मदत होते. बरीच मुलं सुट्टीच्या काळात सामाजिक कार्यात भाग घेत असतात. यामुळे समाजाप्रति सकारात्मक दृष्टी विकसित होते.

सर्जनशीलता आणि छंद

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना विविध छंद जोपासण्याची आणि सर्जनशील गोष्टी करण्याची संधी मिळते. चित्रकला, लेखन, संगीत, नृत्य, हस्तकला आणि अशा इतर अनेक गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मदत करतात. सुट्टीतील मोकळा अवकाश हा मुलांना त्यांच्या छंदांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये विविध रुची निर्माण करण्यासाठी अतिशय आदर्श असा पोषक काळ असतो. यामुळे त्यांची बौद्धिक आणि सर्जनशील कौशल्य देखील विकसित होतात. सुट्टीत निसर्गाचा शोध घेण्यासाठी बाहेर जा. वेगवेगळ्या रंगांची पानं, विविध आकारांचे आणि प्रकारांचे दगड गोळा करा आणि नंतर त्यांचा वापर हस्तकलेसाठी करा. जवळच्या उद्यानात किंवा बागेत फिरणं म्हणजे आज मुलांची सगळ्यात मोठी समस्या असलेल्या स्क्रीन टाइममधून एक ताजातवाना ब्रेक आहे आणि तो मुलांना नैसर्गिक जगाशी जोडून घेण्यास मदत करतो. या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याने योग आणि ध्यान यासारख्या जीवनशैली सक्षम करणाऱ्या गोष्टी मुलांना शिकवणं अधिक सुलभ होतं.

संस्कृतीची ओळख आणि जीवन कौशल्य

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आपल्या संस्कृतीशी ओळख करून घेण्याची संधी मिळते. प्रवासासाठी किंवा नातलगांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडल्यावर विविध संस्कृतींचे, भाषांचे आणि परंपरांचे अनुभव त्यांना घेता येतात. या अनुभवांमुळे मुलांचा सामाजिक दृष्टिकोन व्यापक होतो. रूढी, चालीरीती, नाती या सर्व गोष्टींबद्दल त्यांना आपलेपणा वाटायला लागतो. तसंच सुट्टीत जीवनातील मूलभूत कौशल्य शिकण्याची संधीही मुलांना मिळते. घरकाम करण्यात आईवडिलांना मदत करणं, प्रवासासाठी तिकीट बुकिंग करणं, कुटुंबाच्या इतर कामांमध्ये भाग घेणं या सगळ्यातून मुलं जबाबदारी घ्यायला शिकतात आणि स्वावलंबी बनतात. म्हणूनच सुट्टीच्या काळात मुलांच्या दैनंदिन जीवनाचं छोटं जग अधिक कसं वाढेल, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं.

सुट्टीच्या काळात मुलांनी जगण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन, जगण्याचे वेगवेगळे मार्ग एक्सप्लोर करायला हवेत. यातून विविधता आणि सहिष्णुता यांना चालना मिळेल. जीवनातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे जे लोक आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करतात अशांसोबत राहणं. हे सुट्टीच्या काळातच शक्य होतं. आपल्याला परिचित असलेल्या जगापेक्षा वेगळं जग बाहेर आहे, हे मुलांना कळायला हवं. जगातला वेगळेपणा समजला तरच वेगळेपणात चुकीचे किंवा वाईट काही नाही, मुलांच्या लक्षात येईल.

स्मरणशक्तीला द्या विश्रांती

आजच्या स्पर्धात्मक वातावरणात शाळांमध्ये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये मुलं पराकोटीच्या शैक्षणिक दबावाचा सामना करत आहेत. नियमित अभ्यास, परीक्षेचा ताण आणि सततची स्पर्धेची भावना या बाबी मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी मुलांना खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड अभ्यासामुळे मुलांच्या मेंदूवर दबाव येतो. त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. या मानसिक थकव्यातून मुक्त होण्यासाठी, त्यांच्या मेंदूला चालना देण्यासाठी त्यांच्या स्मरणशक्तीला विश्रांती देणं आवश्यक आहे.

स्मरणशक्ती आणि मानसिक ताजेपणा

अत्याधिक अभ्यासाचा आणि स्पर्धेचा दबाव मानसिक ताण वाढवतो. हा मानसिक ताण शरीराच्या इतर कार्यांना प्रभावित करतो. उदा. झोप, पचनशक्ती, स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता यावर मानसिक ताणाचा परिणाम होऊ शकतो. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना मिळणारी विश्रांती आणि आराम यामुळे त्यांचा मेंदू पूर्णपणे ताजातवाना होतो. मुलं विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात, नवे छंद शिकतात आणि अधिक तरतरीत होतात. मेंदूला, स्मरणशक्तीला मिळणाऱ्या विश्रांतीमुळे मुलांमधले भावनिक व मानसिक स्थैर्य वाढते.

सुट्ट्या केवळ रोजच्या त्याच त्या कामापासून विश्रांती देत नाहीत, तर त्यापेक्षा अधिक काही करतात; मुख्य म्हणजे मेंदूच्या कार्यावर विधायक परिणाम करतात. जेव्हा आपण सुट्टीवर असतो तेव्हा आपल्याला अनेकदा नवीन अनुभव, नवी संस्कृती आणि विचार करण्याच्या नव्या पद्धतींचा सामना करावा लागतो. ही नवीनता मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन तयार करण्याची क्षमता उत्तेजित करते. यामुळे मुलांना एक नवा दृष्टिकोन मिळतो, त्यांचा मेंदू पुन्हा उर्जित होतो आणि ते अधिक प्रभावी आणि सकारात्मक पद्धतीने त्यांच्या अभ्यासातील आणि इतर कामगिरीमध्ये सुधारणा करतात. मेंदूला विश्रांती मिळाल्यानंतर मुलांचा एकाग्रतेचा स्तर सुधारतो, स्मरणशक्तीला बळकटी मिळते आणि त्यांचं मानसिक आरोग्य देखील सुधारतं. शाळा सुरू झाल्यावर तेथील कामात ते अधिक उत्साहाने आणि आत्मविश्वासाने भाग घेतात आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते आणि कामामध्ये सुधारणा होते.

थोडक्यात सुट्टी म्हणजे रोजच्या कंटाळवाण्या कामांच्या न संपणाऱ्या धावपळीपासून आत्म्याला शुद्ध करण्याचं प्रवेशद्वार आहे. पृथ्वीवरील सर्वात अंतर्मुखी व्यक्तीसाठीही सुट्टीच्या ऊर्जेपासून दूर राहणं निश्चितच अवघड असतं. आपण सगळेचजण अतिशय मनापासून एका लांब सुट्टीची, देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतच्या लांब ड्राइव्हची किंवा आपल्या प्रियजनांसोबत एकाच छताखाली सुट्टीचा हंगाम साजरा करण्याची वाट पाहत असतो. ज्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य आणि मजा नसते ती सुट्टी ही सुट्टीच नसते.

उन्हाळ्याच्या सुट्टीकडे फक्त विश्रांती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. सुट्टी ही नवा अनुभव घेण्यासाठी, स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी असते. ही संधी असते अधिक संतुलित, सर्जनशील होण्याची. आपण सर्वजण एकमेकांना मदत करण्यासाठी, एकमेकांचं ओझे हलकं करण्यासाठी आणि सर्वांचं हृदय आनंदाने भरण्यासाठी कसे एकत्र येतो, हे सगळं या सुट्टीला एक जादुई काळ बनवतं.

मनोचिकित्सक व अधिष्ठाता

logo
marathi.freepressjournal.in