
रसास्वाद
डॉ. सुनीता बोर्डे
मी कबरी खोदल्यात स्मशानात आणि झोपूनही बघितले मापाकरिता... मला जाळूनही काही होणार नाही आणि पुरल्यानंतरही उगवेन मी, मी कविता पाहिलेला जादुई माणूस आहे.. असे म्हणणारा आणि कवितेतील अगदी शब्दन् शब्द वास्तवात जगणारा खराखुरा जादुई माणूस म्हणजे कवी सुनील उबाळे! ‘उलट्या कडीचं घर’ हा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला आणि कित्येक दिवसांनंतर खूप उच्च दर्जाची, संवेदनशील, वास्तव आणि भेदक कविता वाचल्याचं समाधान मिळालं. मनात भिजत ठेवलेल्या दुःखाला मोड फुटले की थेट हृदयाला भिडून मन आणि मस्तिष्क यांना गदगदून हलवणारी कविता उगवून येते हेच खरं. आपल्या प्रिय आजीला अर्पण केलेल्या या संग्रहाची अर्पणपत्रिकाही खूप बोलकी आहे, “...आजी तू हसलीस की बुद्धासारखी दिसू लागली” हे वाचताना वाचक म्हणून क्षणभर आपल्याही डोळ्यापुढे आपली आजी चमकून जाते. कोणत्याही अंधश्रद्धेला भीक न घालता, सुताराकडून चुकून उलट्या लागलेल्या कडीला स्वीकारणारी आणि आपल्या नातवासह त्या उलट्या कडीच्या घरात राहणारी आजी पहिल्याच पानावर आपल्यालाही त्या उलट्या कडीच्या घरात घेऊन जाते. वाचक मग अधिक स्वच्छ नजरेने आणि लख्खपणे कवीला आणि कवितेला त्याच्या भवतालासह समजून घेऊ शकतो. वाचक या कवितांशी इतका समरस होतो की, संग्रहातील ८३ कविता आणि ११५ पानं वाचून कधी संपतात हे लक्षातही येत नाही. वाचकाला बांधून ठेवणारी कविता दुर्मिळ होत असल्याच्या या काळात कवी सुनील उबाळे यांची ही कविता खूप महत्त्वाची वाटते. कैलास पब्लिकेशन्सची ही सुंदर निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मुखपृष्ठामुळे अधिकच देखणी झालेली आहे. एकूणच शोषित वंचितांचा आवाज बंद करू पाहणारी व्यवस्था हे चित्र काव्यसंग्रहाचा विषय आणि आशय थेटपणे वाचकाच्या मनापर्यंत पोहोचवते. एका चित्राची ताकद काय असते हे पाहायचे असेल तर ‘उलट्या कडीचे घर’ या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नक्की पहावे.
कवीचं मनोगत हा तर प्रांजळ आणि ओघवत्या ललित लेखनाचा उत्कृष्ट नमुनाच आहे. “दिशांच्या साऱ्या चौकटी तोडून दुःख आणि दारिद्र्य हसत हसतच वावरतं घरादारात राजरोसपणे” असं जेव्हा कवी सांगतो तेव्हा दुःखालाही सहजपणे स्वीकारण्याची श्रमजीवी समुदायाची सामूहिक भावनाच जणू कवी व्यक्त करत असतो. म्हणूनच कवी सुनील उबाळे यांची कविता त्यांची एकट्याची न राहता एकूणच श्रमजीवी माणसांचं समूहगान बनते. भाकर, भूक, भविष्य या तीन भ चा अविरत चालणारा संघर्ष आणि घालमेल व्यक्त करताना कवीने उच्चारलेल्या ‘मी माझ्या स्वप्नांना गळफास लावलाय’ या वाक्याने मन सुन्न होते. ‘लोकांचं गू मूत काढणारी माणसं कधीच चिटकू देत नाहीत मी पणा अंगाला’, हे वाक्य वाचले की नकळत आपलाही अहंकार गळून जातो. ‘एक ओळ लिहिती राहिली पाहिजे माझ्यानंतरही’ हे ब्रीद घेऊन शताब्दी काव्य मंडळाच्या माध्यमातून तन-मन-धनाने गेली पंधरा वर्षे हा कवी कवितेने झपाटल्यासारखा लिहित्या हातांना बळ देतोय आणि मायेच्या धाग्याने उलट्या कडीच्या या घराशी जोडून ठेवतोय हे विस्मयकारक आहे.
“लोकं भलेही लपवून ठेऊ द्या, सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते, उद्याची उपासमार टाळण्यासाठी, ती भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता, तिला पकडता पकडता, हसणे रडणे राहून गेले, खेळणे कुदणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय, शून्यातून जग घडवणाऱ्या माणसांवरचा...” ही ‘भाकर’ कविता तर समस्त कष्टकरी लोकांची कैफियत बनते. या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुःख मांडत असली तरी दुःखाचा बाजार मांडत नाही! कवितेतील श्रमजीवी वर्गाचे भयाण वास्तव ताकदीने मांडत असताना आपली कविता कुठेही बिचारी होणार नाही याची पूर्ण काळजी कवीने घेतली आहे. शाळेत पानाफुलांवर कविता लिहून आणण्याच्या गृहपाठात पोरगी जेव्हा भूक, भाकर आणि बापाच्या तगमगीचं जगणं मांडणारी कविता लिहिते तेव्हा शिक्षिका ‘विषय चुकल्याचा’ शेरा देते. सुनील उबाळे यांची ही कविता म्हणजे हा चुकलेला शेरा पुसण्यासाठी सुरू असलेली धडपड आहे.
कवितेत ठिकठिकाणी येणाऱ्या नदी, पाणी, पारा, साप, कब्रस्तान, भूक, पिंपळ या प्रतिमा कवितेची माणसाच्या जगण्याशी असलेली नाळ किती घट्ट आहे हे दाखवून देते. ‘मला तुझ्या पायातलं जोडवं होऊ दे कविते’ असे जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्याची कवितेशी असलेली बांधिलकीच तो अधोरेखित करत असतो.
अजिंठा हे बुद्धाच्या सम्यक समतेचे प्रतीक म्हणून कवितेत ठिकठिकाणी ठळकपणे समोर येते. देहाच्या अजिंठ्यात, ध्यानस्थ झाल्यात माझ्यासह साऱ्या कविता.. किंवा आपण अक्षरलेणंच कोरलं, काळजाचाही अजिंठा करत, जीवतोड मेहनतीच्या साक्षीने..असे कवी म्हणतो. मावळणारा सूर्य श्रमिक लोकांच्या जीवनात उद्या प्रकाश घेऊन येईल याची काहीच खात्री देता येत नाही हे वास्तव अधोरेखित करताना कवी म्हणतो,
“व्यसनाने बरबटलेली असतात
ही मेहनतीने लदबदलेली माणसं
दिवसभर बैलासारखे राबल्यावर
माणूस होणं शक्य नसतं प्रत्येकाला...”
ढोर मेहनतीनंतर दारूचा अड्डा जवळ करणाऱ्या श्रमजीवी लोकांच्या जगण्याची दुसरी बाजू कवी मांडतो. कवीची कविता जेव्हा बहिणाबाईंच्या जात्यातून निसटलेली एक ओळ होऊ पाहते तेव्हा त्यातून कवीचा आणि कवितेचा अहंविरहित साधेपणा सिद्ध होतो.
फुले-शाहू-आंबेडकरी प्रेरणेतून आकारास आलेली ही कविता व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारते. त्यामुळेच कवी अगदी निडरपणे म्हणतो की, “इथल्या व्यवस्थेचे पाय धरून, मला लिहिताच आली नाही, एखादी सुगंधी कविता, मी इथल्या व्यवस्थेच्या, तोंडावर थुंकून सांगून देईल, माझ्या आतली घुसमट..”
या कठीण काळाला चपखल लागू होणारे कवीचे शब्द वाचकाच्या मनाला आशेचा एक नवीन किरण दाखवतात.
“हे सूर्य कुळातल्या माणसांनो, जपून ठेवा तुम्ही
जिवंत असल्याचे दाखले...आता सारे शत्रू समचेहरी
आणि आपण डोळ्यावर पट्टी बांधून,
लढू लागलो कुणाशी?..”
असा खूप कळीचा प्रश्न कवी उपस्थित करतो. त्याचवेळी कवी हा आशावादी संदेश द्यायला विसरत नाही की, “हे माणसा, एकमेकांच्या काळजावर फुंकर मारत पेटती ठेव ही आग!” मानवी नातेसंबंधांची विण घट्ट असली की परिस्थितीला कसे धैर्याने तोंड देता येते हेही इथे दिसते. “चार भिंतीच्या खुराड्याला आजीनं धुण्याभांड्याच्या कामाचा पगार गहाण ठेवून घर केलं”, या एकाच वाक्यात कवी समस्त कष्टकरी स्त्रीचे फक्त कष्टच नव्हे, तर तिची खंबीरता आणि करारीपणा देखील अधोरेखित करतो. “ती रोजच वाटत असते पाट्यावर हिरव्या मिरच्यांसोबत तिचं नशीब..”असं म्हणत कवी स्त्रीच्या कष्टाची वास्तवता दाखवून देतो.
ही खरं तर कविता नाहीए, तर एक अख्खी कादंबरी तिच्या पोटात सामावलेली आहे. कादंबरीचा विषय एका कवितेत मांडणारी ही कवीची प्रतिभा म्हणावी की, मनातल्या कोलाहलाचा कडेलोट म्हणावा? मराठवाडी बोलीभाषेतील अनेकानेक शब्द कवितेचे सौंदर्य अधिकच खुलवतात. ‘उलट्या कडीचं घर’ हा कविता संग्रह, कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने वाचायलाच हवा इतका आशयसंपन्न आणि सुंदर आहे.
मराठी भाषेच्या अध्यापक व आस्वादक.