चित्रकार सूर्योबा

संधी मिळाली की मार्गारेट मावशी, रॉबिन्सन मामासोबत सूर्यास्ताच्या समयी बाहेर पडून, गावातील टेकडीकडे फेरफटका मारण्यासाठी निघायची. टेकडीच्या पाठीमागे सूर्य जाऊ लागताच, आभाळाचा निळा रंग बदलून आकाशात वेगवेगळे रंग दिसायला लागत.
चित्रकार सूर्योबा
नवशक्ति अक्षररंग
Published on

- बालमैफल

- सुरेश वांदिले

संधी मिळाली की मार्गारेट मावशी, रॉबिन्सन मामासोबत सूर्यास्ताच्या समयी बाहेर पडून, गावातील टेकडीकडे फेरफटका मारण्यासाठी निघायची. टेकडीच्या पाठीमागे सूर्य जाऊ लागताच, आभाळाचा निळा रंग बदलून आकाशात वेगवेगळे रंग दिसायला लागत. विशेषत: लाल, शेंदरी आणि पिवळ्या रंगाच्या नयनरम्य छटांनी आकाश भरून जायचं. एखाद्या चित्रकाराने काढलेल्या सुंदर चित्रासारखं आकाश दिसायचं.

मालकीणबाईंच्या घरी असं एक चित्र फ्रेम करून टांगलेलं होतं. ते दोघांनाही फार आवडायचं. मालकीणबाई घरी नसल्या की रॉबिन्सन आणि मार्गारेट ते चित्र मोठ्या उत्सुकतेनं न्याहाळत. टेकडीवरचा सूर्यास्त बघताना घरातलं चित्र, प्रत्यक्ष बघायला मिळाल्याचा आनंद दोघांना व्हायचा. दोन्हीकडच्या या चित्रांचं रॉबिन्सनला फार आश्चर्य वाटायचं.

आज टेकडीवर आल्यावर आकाशातील रंगांकडे बघत त्याने मावशीला विचारलं,

“मावशे, तुला शंका येत नाही का?”

“रॉब्या, मला शंका नाही, तर शिंका जास्त येतात. तुझी मिशी माझ्या नाकात जाते, तेव्हा तर शिंकोबाच होतो. हा हा हा!” रॉबिन्सनची मिशी ओढत मावशी हसली.

“मावशे, बी सीरियस.”

“रॉब्या, मी नेहमीच सीरियस, तू कायम क्युरिअस. काय म्हणतो तुझ्या मनातला शंकासूर? करून टाकते त्याचा चकनाचूर, टिंगी टिंगी टिंगूर, टिंगी टिंगी टिंगूर!” मावशी स्वत:भोवती फेर मारत म्हणाली. मावशीचा मूड झक्कास असल्याचं मामाच्या लक्षात आलं. त्याने आपली शंका बोलून दाखवली, “मावशे, आपण इथे टेकडीवर येतो तेव्हा, घरातलं चित्र इथे येतं नि घरी परत जातो तेव्हा इथलं आभाळ घरी येतं, असं नाही का वाटत तुला?” मामाच्या शंकेने मावशी काही क्षण विचारात पडली. लगेच हसली. मामाचा कान ओढत म्हणाली, “मामू, मालकीणबाईंच्‍या घरी जे चित्र आपण बघतो, ते आता जसं आभाळ दिसतंय ना, त्याचं.”

“आताचं आभाळ त्या चित्रासारखं दिसतं, मग हे खरं की ते खरं?”

“या इथल्या आभाळातल्या खऱ्याखऱ्या चित्राचं ते खरंखरं चित्र!”

“मावशे, हे आत्ताचं आभाळातलं खरंखुरं चित्र कोण रंगवतं ग?”

“तो आहे ना, टेकडीच्या पाठीमागे जाणारा सूर्योबा. तोच याचा चित्रकार!”

“कित्ती छान, पण त्याला दररोज दररोज हे कसं शक्य होत असेल ग?”

“राबू, अरे त्याचं एक रहस्य या वातावरणात दडलंय.”

“कोणतं रहस्य?”

“अरे, आपल्या पृथ्वीचं वातावरण वेगवेगळे वायू, दवबिंदू आणि छोट्या-छोट्या कणांनी बनलेलं आहे. जेव्हा सूर्यकिरण या वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा या कणांशी त्यांचा संपर्क येऊन ते इकडेतिकडे विखुरतात. यास ‘रेले स्कॅटरिंग’ म्हणतात. प्रकाशकिरण या रेणूंवर पडले की त्यांच्यातील थोडीशी ऊर्जा या रेणूंकडून शोषली जाते. त्यामुळे रेणू उत्तेजित होतात. काही काळानंतर हे रेणू त्यांच्यातील ही अतिरिक्त ऊर्जा बाहेर फेकतात.”

“त्यामुळे काय घडतं?”

“त्यामुळे, हे रेणू मूळ पदावर येतात. हे घडत असताना त्यांच्याकडून प्रकाशकिरणं पुन्हा बाहेर टाकली जातात. यावेळी, या किरणांची ऊर्जा मूळ ऊर्जेपेक्षा कमी असते.”

“का बरं?”

“कारण मूळ ऊर्जेतल्या काही रेणूंचं उष्णतेत रूपांतर झालेलं असतं. असं घडत असताना हे प्रकाशकिरण मूळ दिशेपेक्षा वेगळ्या दिशेला विखुरले जातात.”

“मावशे, ही तर भानगड, सॉरी सॉरी, विज्ञान-बिज्ञान आहे. पण यात चित्रकला कुठे दडलीय?”

“मामू, सगळं सांगते. असं घायकुतीला येऊ नकोस. अरे, या सूर्योबात सात रंगांचा प्रकाश दडलेला असतो.”

“अच्छा, त्यातून हे संध्याकाळचं चित्र तो रंगवतो म्हणायचं. पण त्याला हे कसं काय शक्य होतं?”

“राबू, सूर्यात दडलेल्या जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. त्यामुळे हे जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरतात. दिवसा जेव्हा सूर्य उंचावर असतो, तेव्हा कमी तरंगलांबी असलेले निळा आणि जांभळा रंग सर्वत्र विखुरतात. त्यामुळे आकाशाचा रंग प्रामुख्याने निळा दिसतो.

“मग इतर रंगांचं काय होतं?”

“इतर रंगांचे किरणही विखुरतात,पण त्यांचं प्रमाण कमी असतं.”

“मावशे मावशे, हे गणित सोपं करून सांग की.”

“रॉब्या, सूर्योबा आपल्या डोक्यावर असताना, त्याच्या किरणांना वातावरणातून पृथ्वीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगाचे किरण जास्त विखुरलेले दिसतात.”

“मावशे हे झालं दुपारचं, पण आता संध्याकाळचं काय? आता हा निळा रंग कुठे बरं गायब झाला?”

“गायब नाही झालाय.”

“मग?”

“अरे मामू, आता हा आपला सूर्योबा अस्ताच्या समयी क्षितिजाजवळ जात असल्याने, वातावरणाच्या जाड थरातून त्याच्या प्रकाशकिरणांस प्रवास करावा लागतो. त्यामुळे कमी तरंगलाबींच्या प्रकाशासाठी अडथळा निर्माण होतो.

लांब तरंगलांबी असलेले लाल, नारंगी आणि पिवळा हे रंग आकाशात अधिक पसरतात. आपल्या टेकडीवरचं आकाश प्रदूषणमुक्त म्हणजेच स्वच्छ असल्याने हे रंग तेजस्वी आणि ऊर्जेने भारलेले दिसतात.”

“आत्ता माझ्या भेज्यात शिरलं.”

“काय ते?”

“अगं, सूर्योबा अस्तास जाताना, त्याच्या किरणांना वातावरणातून अधिक अंतर पार करावं लागल्याने निळ्या किंवा हिरव्या रंगाचे किरण इकडेतिकडे विखुरले जातात, त्यामुळे सूर्योबाच्या लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाचं विखुरणं जास्त दिसतं. त्यामुळे आकाशात या रंगांच्याच मनमोहक छटा म्हणजे चित्र तयार होतं.”

“क्या बात है राबू, सूर्योबाचं चित्र तुझ्या डोक्यात फिट्ट बसलं म्हणायचं.” मावशी लाडाने मामाचा गालगुच्चा घेत म्हणाली. या लाडाने मामा सुखावला.

“पण मावशे, माझी एक शंका आहेच.”

“गधड्या, आता काय?”

“हा सूर्योबा, मालकीणबाईंच्या घरी येऊन कधी चित्र रंगवताना दिसला कसा नाही ग?” मामाने डोळे मिचकावत मावशीला हळूच चिमटा काढला. मामाच्या या आगळीकीने चिडून मावशीने त्याच्यावर उडी घेतली. तिची उडी चुकवत मामा मालकीणबाईंच्या घराकडे धूम धावत सुटला.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in