शब्दांनी ओथंबलेले आभाळ

१४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन आणि या बालदिनी साहित्यातील साहित्य अकादमी संस्थेचा बालसाहित्य पुरस्कार, राष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी दिल्ली येथे दिला जातो आणि ह्यावर्षीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला आणि पुरस्कारप्राप्त लेखक आहेत नांदेड येथील बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत.
शब्दांनी ओथंबलेले आभाळ
Published on

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

Hi friends!

कसे आहात? काय चाललं आहे? नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात शालेय, आंतरशालेय स्पर्धा सुरू झाल्या असतील. वाचणारी मुलं नक्कीच भरपूर पुरस्कार मिळवणार, ही खात्री आहे. पण फ्रेंड्स, स्पर्धेत सहभागी होणं महत्त्वाचं, जो जास्त मेहनत करतो त्याच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडते. बरोब्बर ना? तुम्ही ज्या गोष्टी, गाणी, कवितांची पुस्तकं वाचता त्यासाठीही म्हणजे साहित्य लिहिणाऱ्या लेखकांसाठीही बरेच पुरस्कार असतात. १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिन आणि या बालदिनी साहित्यातील साहित्य अकादमी संस्थेचा बालसाहित्य पुरस्कार, राष्ट्रीय सर्वोच्च पुरस्कार दरवर्षी दिल्ली येथे दिला जातो आणि ह्यावर्षीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला आणि पुरस्कारप्राप्त लेखक आहेत नांदेड येथील बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत.

बालसाहित्य आणि बालशिक्षण हे दोन्ही डॉ. सुरेश सावंत यांचे अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत.

डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ कवितासंग्रहात एकूण पस्तीस कविता असून ह्या सर्व कविता निसर्गातील वेगवेगळ्या घटकांना घेऊन गुंफलेल्या आहेत. डॉ. सावंत सर हे निवृत्त मुख्याध्यापक असून मुळातच ते एक शिक्षक असल्याने त्यांना विद्यार्थ्यांच्या चौफेर प्रगतीची प्रचंड आस आहे. साहित्याची कास धरली, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक उत्तम आकार मिळेल याची जाणीव या लेखकाला लिहितं ठेवू लागली. आपल्या शाळेतील मुलांसाठी त्यांनी बालसाहित्यातील उत्तमोत्तम लेखकांची पुस्तकं मागवली आणि मुलांना ती पुस्तकं वाचायला देऊन त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर लिहायला उद्युक्त केलं. विद्यार्थ्यांना नुसतं लिहायला लावून ते थांबले नाहीत तर त्यांनी लिहित्या हातांना पुस्तकरूपी बक्षीस दिलं. मुलांच्या लेखांचे पुस्तक काढले. किती छान ना? असे शिक्षक, मुख्याध्यापक जर प्रत्येक शाळेला मिळाले तर? तर भावी पिढी शंभर टक्के सुसंस्कृत असेल. तर मी आज तुम्हाला बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या पुस्तकातील काही कवितांची ओळख करून देत आहे. पुस्तकातील कविता नातेसंबंध, निसर्ग, सृष्टीसौंदर्य, प्राणी, पक्षी यांच्यावर लिहिलेल्या असून संग्रहातील पहिलीच कविता ‘आभाळमाया’ शीर्षकाची असून त्यात ते लिहितात की,

“धरती आणि आकाशाचे

माया ममतेचे मधुर नाते

एक दुसऱ्याच्या साथीनेच

सृष्टीचे सृजन सफल होते...”

बालमित्रांनो, तुम्हाला पपई नक्कीच आवडत असेल. पण बहुधा पपईचे फायदे, गुणधर्म आपल्याला माहिती नसतात. एक अत्यंत औषधी, लाल पिवळ्या रंगाची आणि शरीरासाठी पोषक घटक असणारी गुणकारी पपई शरीरासाठी किती उपयोगी आहे, हेच कवीने अत्यंत खूप सरळ आणि सोप्या शब्दांत सांगितले आहे. कवितेच्या शेवटच्या ओळी वाचल्या की त्याची प्रचिती मिळते.

“औषधी आणि पोषक

गोड कौतुकात न्हाली

अशी बहुगुणी पपई

सर्वांना प्रिय झाली..”

निसर्गाने मानवाला दिलेल्या अनेक अनमोल भेटींपैकी एक आहे विविधरंगी फुलं! त्यातले काहीसे आगळेवेगळे फूल म्हणजे सूर्यफूल! सूर्यफुलात कवीला सूर्याचे तेज आणि सोन्याची झळाळी दिसते. कवी ‘सूर्यफुलांच्या शेतात’ या कवितेत म्हणतो,

“सूर्यफुलांच्या शेतात

तेज सूर्याचे सांडले

प्रेरणेचे लक्ष दिवे

ओळीओळीत मांडले..”

शिवाय ‘झेंडू’ या कवितेत काळ्या मातीवर हिरव्यागार शेतात पिवळ्या धमक झेंडूचा गालिचा आपल्याला खिळवून ठेवतो आणि

“हळदुल्या शेवंतीचे

असे भावंड थोरले

काळ्या आईच्या कुशीत

इंद्रधनुष्य कोरले..”

इतक्या सुंदर शब्दात ते फुलांच्या कविता रचून बालवाचकांना निसर्गाचे महत्त्व समजून देण्याचे काम लीलया करतात.

पुढच्या ओळी वाचून तर तुम्हाला हमखास तुमच्या मित्राची आठवण येईल.

“जेव्हा मला रडायला येतं

तेव्हा झाड अश्रू ढाळतं

जेव्हा मला आनंद होतो

तेव्हा झाड फुलं माळतं..”

आली ना मित्राची आठवण? मग निसर्गही आपला मित्र आहे, असतो, हे तुम्हाला नक्कीच पटलं असेल.

आणि एकंदरीतच निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव आपल्याला होते.

“निसर्गसंपदा पुस्तक वाचू

मोरांसोबत खुशाल नाचू

दरीडोंगरी फिरता फिरता

निसर्गशिक्षण सुरू

जंगलवाचन करू,

गड्यांनो जंगलवाचन करू..”

अशा मनाचा ठाव घेणाऱ्या सर्वच कवितांच्या ओळी छोट्यांनाच नाही तर मोठ्यांनाही भुरळ पाडणाऱ्या आहेत. ‘आभाळमाया’ यातील काही कविता बालवाचकांना ताडोबा, रेहकुरी, दाजीपूर, कर्नाळा, कांझिरंगा, भिगवण अशा एकापेक्षा एक सुंदर अभयारण्यांची माहिती देतात.

“निसर्गाच्या सहवासात

चित्तवृत्ती फुलून येतात

निर्झरांची गाणी ऐकता

विवंचना विसरून जातात..”

बरं, तुम्ही ‘काजवा’ बघितला आहे का? ज्याच्या शेपटीला दिवा असतो… आठवलं का? आठवलं तर छानच. पण काजवा बघितला नसेल तर पुस्तकातील ‘काजवा’ ही कविता, त्याची चित्रं बघा. या सुंदर चित्रांनी, कवितांनी सजलेल्या पुस्तकाचे चित्रकार आहेत संतोष घोंगडे. हे पुस्तक तुम्हीही वाचा आणि आपल्या फ्रेंड्सलाही वाचायला द्या… शेअरिंग is always केअरिंग!

बालसाहित्यिक व साहित्याच्या आस्वादक

logo
marathi.freepressjournal.in