​स्वामी विवेकानंद : आधुनिक भारताचा कर्मयज्ञ

१२ जानेवारी युवा दिन. हा दिवस केवळ एका महान संन्याशाचा जन्मदिन नसून, भारतीय तरुणाईला आत्मविश्वास, कर्तव्य आणि कृतीचा मंत्र देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा क्षण आहे.
​स्वामी विवेकानंद : आधुनिक भारताचा कर्मयज्ञ
Published on

विशेष

अक्षय वाटवे

१२ जानेवारी युवा दिन. हा दिवस केवळ एका महान संन्याशाचा जन्मदिन नसून, भारतीय तरुणाईला आत्मविश्वास, कर्तव्य आणि कृतीचा मंत्र देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा क्षण आहे.

शिकागोचे ते अथांग सभागृह... सात हजार लोकांची गर्दी आणि जगातील सर्व धर्मांचे दिग्गज प्रतिनिधी. त्या गर्दीत एक तिशीचा भारतीय तरुण उभा राहतो. अंगावर भगवे वस्त्र, कपाळावर तेज आणि डोळ्यांत संपूर्ण मानवतेबद्दलची करुणा. "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो..." हे पहिले पाच शब्द उच्चारताच दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट थांबत नाही. हे वर्णन आपण अनेकदा वाचले आहे, पण त्या टाळ्यांच्या पलीकडे स्वामी विवेकानंदांना नेमके काय सांगायचे होते? तो केवळ एका धर्माचा विजय नव्हता, तर तो त्या 'हिंदुत्वाचा' विजय होता ज्याने जगाला 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हे शिकवले. आजच्या माजलेल्या कोलाहलात विवेकानंद हे प्रखर व्यक्तिमत्व केवळ आध्यात्मिक गुरु म्हणून नाही, तर एक जागतिक स्तरावरील महान विचारवंत आणि समाजक्रांतिकारक म्हणून समजून घेणे काळाची गरज आहे.

​विवेकानंदांचे हिंदुत्व हे बंदिस्त किंवा संकुचित नव्हते. त्यांच्या आयुष्यातील एक सर्वश्रुत प्रसंग आजही आपल्याला आरसा दाखवतो. एका राजाच्या दरबारात एका नर्तकीने गायलेले भजन ऐकून स्वामीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्या नर्तकीने गायले होते- "प्रभू मेरे अवगुण चित न धरो, समदरसी है नाम तिहारो" (हे प्रभू, माझे अवगुण लक्षात घेऊ नका, तुम्ही तर समदृष्टी आहात). त्या क्षणी स्वामीजींना जाणीव झाली की, खरा संन्यासी तोच जो समोरच्या व्यक्तीचा देह किंवा व्यवसाय न पाहता त्यातील 'ईश्वरी अंश' पाहतो. आजच्या काळात जेव्हा धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तेव्हा विवेकानंदांचे हे 'उदार हिंदुत्व' आपल्याला साद घालते. त्यांच्या मते, हिंदुत्व म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक अशी जीवनपद्धती आहे जी शत्रूमध्येही ईश्वराचे रूप पाहण्याची ताकद देते.

"उपाशी पोटी राहणाऱ्याला धर्माचा उपदेश करणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय." हाच विचार घेऊन त्यांनी संपूर्ण भारत पायी पालथा घातला. कन्याकुमारीच्या त्या शेवटच्या शिळेवर ध्यानस्थ बसले असताना त्यांना हिमालयातील शांततेपेक्षा भारतातील गरिबांच्या झोपड्यांमधील आर्त हाक अधिक स्पष्ट ऐकू आली. तिथूनच एका संन्याशाचा 'राष्ट्रसंन्यासी' म्हणून पुनर्जन्म झाला.

​विवेकानंदांनी तरुणांना दिलेला संदेश आजही तितकाच धगधगता आहे. ते म्हणत, "मला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण हवे आहेत. " पण ही शक्ती कशासाठी? कोणावर अन्याय करण्यासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध आणि अज्ञानाविरुद्ध उभे राहण्यासाठी. आजच्या डिजिटल युगात, जिथे तरुण नैराश्याला आणि मानसिक ताणाला बळी पडत आहेत, तिथे स्वामीजींचे विचार 'सकारात्मकतेचा' महास्त्रोत आहेत. त्यांनी धर्माला विज्ञानाशी जोडले. त्यांनी कधीही अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही, उलट, त्यांनी प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याचे आवाहन केले. "तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तर तुमचा देवावरही विश्वास बसणार नाही," हा त्यांचा सिद्धांत आजही तितकाच प्रभावी आहे.

​आज काल आपण 'हिंदुत्व' आणि 'राष्ट्रवाद' यावर खूप चर्चा करतो, पण विवेकानंदांनी या दोन्ही संकल्पनांना 'मानवतावादा'शी जोडले होते. ते म्हणत, "पुढची पन्नास वर्षे केवळ भारतमाता हीच तुमची आराध्य देवता असू द्या." त्यांच्या मते, जोपर्यंत देशातील शेवटचा माणूस सुखी होत नाही, तोपर्यंत तुमची देवपूजा व्यर्थ आहे. त्यांनी मांडलेला विचार आजच्या धावपळीच्या जगालाही तितकाच लागू होतो. देव मंदिरात शोधण्यापेक्षा तो 'दरिद्री नारायणात' शोधावा, हा क्रांतिकारी विचार त्यांनी दिला. त्यांच्यासाठी धर्म हा केवळ परलोकाची प्राप्ती करून देण्याचे साधन नव्हते, तर तो याच जगातील दुःख दूर करण्याचे शस्त्र होते.

​शिकागोच्या जागतिक यशानंतर जेव्हा ते अमेरिकेत प्रसिद्धीच्या शिखरावर होते, तेव्हाच्या एका रात्रीचा प्रसंग अत्यंत अंतर्मुख करणारा आहे. एका आलिशान खोलीत मखमली बिछान्यावर झोपलेले असताना त्यांना झोप येईना. ते उठले, खिडकीपाशी गेले आणि रडू लागले. ते स्वतःला विचारत होते, "माझा देश दारिद्र्यात होरपळत असताना मी या सुखात कसा राहू?"

​आजच्या राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्ष्यात विवेकानंदांचे विचार सर्वसमावेशक आहेत. त्यांनी सर्व धर्मांच्या मूळ सत्याचा स्वीकार केला होता, पण त्याच वेळी आपल्या संस्कृतीवर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध ते प्रखरपणे उभे राहिले. ते एक असे 'योद्धा' होते ज्यांच्या हातात शस्त्र नव्हते, पण ज्यांच्या शब्दांत जगाला हादरवण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी देशाला 'ज्ञान' आणि 'विज्ञान' या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्यास शिकवले. त्यांच्या मते, शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर 'माणूस घडवणे' (Man-making education) होय.

​त्यांच्या विचारांचा मुख्य गाभा म्हणजे 'कृती' किंवा 'कर्तव्य'. ते म्हणत, "आम्ही जे काही आहोत, त्यासाठी आम्ही स्वतःच जबाबदार आहोत." आपल्या परिस्थितीचे खापर नशिबावर किंवा दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा, स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याची ताकद प्रत्येकात असते, हा त्यांचा विश्वास होता. "आपण जगाचे उपकार करत नाही, तर जग आपल्याला सेवा करण्याची संधी देऊन आपल्यावर उपकार करत असते," हा त्यांचा विचार अहंकाराचा नाश करणारा आहे. आज जेव्हा सेवाकार्यातही स्वार्थ दिसतो, तेव्हा विवेकानंदांचा हा 'निःस्वार्थ भाव' मार्गदर्शक ठरतो.

विवेकानंद हे केवळ भूतकाळातील एक महान पुरुष नाहीत, तर ते आपल्या भविष्याचा मार्गदर्शक आहेत. त्यांनी पाहिलेला भारत हा 'जगद्गुरु' भारत होता, पण तो सत्तेच्या बळावर नाही, तर ज्ञानाच्या, बलिदानाच्या आणि सपन्न चारित्र्याच्या बळावर. "आपले डोळे पुढे आहेत, मागे नाहीत," हा त्यांचा संदेश प्रगतीची नवी व्याख्या मांडतो. आज आपण जेव्हा या महान संन्याशाला आठवतो, तेव्हा त्यांच्यातील ती तगमग, तो आत्मविश्वास आणि ती वैश्विक करुणा आपल्या आचरणात आणण्याचे भान आपल्याला आले पाहिजे, आजचा भारतीय युवक कसा असायला हवा याची विवेकानंदानी केलेली मांडणी आजच्या युवकापर्यंत पोहोचायला हवी. त्यांचे विचार हेच उद्याच्या प्रगत भारताचे खरे आधारस्तंभ असतील. "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका," ही त्यांची गर्जना आजही प्रत्येक तरुणाच्या मनात घुमली पाहिजे. त्यांच्या विचारांचे हिंदुत्व हे द्वेषावर नाही, तर प्रेमावर, बलिदानावर आणि अखंड कर्मावर आधारलेले आहे. हा योद्धा संन्यासी आपल्याला सांगून गेला आहे की, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत तुम्ही जगाला जिंकू शकत नाही.

लेखक, अभिवाचक

akshay.watve@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in