

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
गोड खाणं केवळ स्वादासाठी नाही, तर मनाला आणि नात्यांनाही गोडवा देण्यासाठी असतं. आजच्या धावपळीच्या जगात गोड पदार्थ आणि गोड संवाद दोन्हींची आपल्याला तितकीच गरज आहे.
साखरेचे खाणार त्याला देव देणार, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित होती. आज या म्हणीत थोडी सुधारणा झालीय. साखरेचे खाणार त्याला देव लवकर नेणार असं म्हटलं जातं. खरं सांगू का? उगीचच गोड पदार्थांना नावं ठेवली जातात, शुगर वाढते, हृदयविकाराच्या दृष्टीने गोड खाणं वाईट वगैरे..
आम्ही गोड खात नाही म्हणणारे, शीतपेय, चॉकलेट्स, फास्ट फूड, भात व्यवस्थित हादडत असतात आणि का कोण जाणे फक्त गोडाच्या नावाने बोटं मोडत असतात.
मी गोड पदार्थ अगदी प्रसादासारखा खातो, गोड पदार्थ मी फार खाऊच शकत नाही, गोडाकडे मी फारसा वळतच नाही. असली गोड द्वेष्ट्यांना भूषणावह वाटणारी वाक्य कानावर पडली की, माझ्यासारख्या गोडप्रेमी व्यक्तीला फार त्रास होतो हो. नाही म्हणजे अति गोड खाण्याचे दुष्परिणाम आहेत, पण बर्फी किंवा पेढ्याचा बारीकसा तुकडा मोडून तोंडात टाकणारे पाहिले ना, की मला अस्वस्थ व्हायला होतं. पुढच्या काळात या गोड पदार्थांचं कसं होणार किंवा गोडाचं भवितव्य काय असेल या विचारांनी मन निराश होऊ लागतं आणि त्या निराशेने चिक्कीचे दोन चौकोन किंवा एखादा बेसन लाडू स्वाहा होतो तेव्हा कुठे जरा बरं वाटू लागतं.
आता श्रीखंड हा काय पानाला चुना लावतात तसा जिभेला लावण्याचा पदार्थ आहे का? घरगुती म्हणजे, घरगुती पदार्थाचं माहेरघर अशा पाटीखाली विकतचे पदार्थ मिळतात ते नव्हे, तर चक्क आपल्या घरात चक्का बनवून त्याचं बनवलेलं मलईदार श्रीखंड, वाटीभर किंवा वाडगाभरही चालेल. उजव्या हाताची तर्जनी त्यात गोल फिरवून पिवळ्याधम्मक श्रीखंडाचा पहिला घास जिभेवर ठेवायचा, अष्टसात्विक भाव जागे करायचे आणि मनापासून आनंद घेत सगळी वाटी चाटून पुसून लख्ख करायची.
अति साखर वाईट याबद्दल माझं दुमत नाही, पर्याय म्हणून गुळाने बनणारे, गोडी वाढवणारे अनेक पदार्थ आपण खाऊ शकतो. आपणच आपल्या जीवनात साखरेला प्राधान्य देऊन गुळाला मागे ढकललंय, त्याला कोण काय करणार? पूर्वी साखर रेशनवर मिळत असताना तर चहा सुद्धा गुळाचा बनत होता, साखरेचा रुबाब कुठे अस्तित्वातच नव्हता. म्हणजे बघा, खोबरं- गूळ सारणाच्या करंज्या किंवा याच सारणाच्या खमंग वड्या आणि अगदी आजही आपलं अस्तित्व अबाधित ठेवलेले उकडीचे मोदक. खरवस नावाचा पदार्थ साखरेपेक्षा गुळाचाच चविष्ट व्हायचा. मऊसर वड्यांसोबतचा रस जिभेवर आला की, ‘वाह’ अशी दाद जीभ, ओठ आणि पोट तिघेही न राहवून द्यायचे. चण्याची डाळ, गूळ, काजू, नारळाचा रस यासह केलेलं मणगंणं, पुरणपोळी, गुळपोळी, गूळपापडी, गुळांबा, मोरंबा, पायसम् इथपासून ते अगदी शेंगदाण्याची खडखडीत चविष्ट चिक्की अशा अजून अनेक गोड पदार्थांत कुठे होती साखर?
मुळात मी गोड खातो किंवा मला गोड आवडतं हा विचारच हल्ली कमीपणाचा वाटू लागलाय की काय कोण जाणे. मला ना तिखट, झणझणीत खाणं आवडतं. साखरविरहित कडवट कॉफीसुद्धा मला आवडते. ते मिळमिळीत गोड पदार्थ नाही आवडत मला हे सर्रास ऐकायला मिळतं
गोडाला मिळमिळीत म्हणणाऱ्याला तर... जाऊदे, तिखट शब्दांनी आपलं तोंड कशाला कडू करा..
गोड मी शक्यतो टाळतोच असं म्हणण्याची फॅशन आलीय. बटर, चीजचा नको इतका थर पदार्थावर पसरून आणि त्या मूळ पदार्थाची चव मारून तो समोर आणला जातो आणि आहा! मस्तच! यम्मी! असं म्हणत ते खाल्ले जातात. आज हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर शेवटी डेझर्ट म्हणून काय घेतलं जातं, तर आईस्क्रीम किंवा स्टेटस वाढवणारी ब्लॅक कॉफी.
पूर्वी कसं, जेवणासोबत गोडाचा समाचार घेतला जायचा. बासुंदीची वाटीच तोंडाला लावायची, जिलब्या उठवायच्या, श्रीखंड, आमरस ओरपायचा, मोदक हाणायचे, पुरणपोळ्या तुपा-दुधासोबत तब्येतीत खायच्या, पण आज हे शब्द इतिहासजमा झालेयत याचं वाईट वाटतं.
मध्यंतरी काही कारणाने आम्ही इमारतीमधली काही मंडळी एकत्र जमलो असताना, कुणीतरी काजू कतलीचा बॉक्स उघडला. अनेकांसमोरून फिरत आल्यावरही, तो बराचसा भरलेला होता. पहिल्या व्यक्तीने तोडलेल्या पहिल्या वडीचेच बारीक तुकडे तोडत पुढची व्यक्ती तोंडात टाकत होती. केवढा अपमान आहे हा त्या काजू कतलीचा. मी दोन वड्या उचलल्या आणि मान राखण्याचा प्रयत्न केला.
अरे, तिखट, झणझणीत चालतं, मग गोडानेच काय घोडं मारलंय? तिखट, चमचमीत खाऊ नये किंवा ते कुणाला आवडूच नये, असं मला अजिबात म्हणायचं नाही. त्या पदार्थांचीही एक लज्जत आहे, पण म्हणून गोडाला का नावं ठेवायची? गोड पदार्थ गूळ घालून करा. अगदी वाटलं तर ऑरगॅनिक गूळ घाला.
आजची पिढी आमच्या पिढीलाही गोडापासून सारखी मागे ओढत असते. अरे काय आहे? काय करणार, ऐकावं लागतं. कारण आपण आजारी पडलो की त्यांच्या व्यस्त कामातून त्यांना वेळ काढत लक्ष द्यावं लागतं.
बाहेर मिळणाऱ्या गोड पदार्थांत साखर असते. अगदी ओल्या नारळाच्या करंज्यांच्या सारणातही साखरच असते. मी ना एक गोष्ट मनापासून ठरवलीय, आयुष्याच्या शेवटपर्यंत गोड खाता आलं पाहिजे, मग काय बंधन पाळायचं? तर गोड खाण्याचं प्रमाण कमी करायचं, उदा. दोन पुरणपोळ्यांऐवजी एक खायची किंवा दिवसाला एकच लाडू आणि गोड खाण्यातलं अंतर वाढवायचं.
आज खरंच आपल्याला गोड खाण्यासोबत गोड बोलीची, गोड वागण्याची, गोड संवादाची खूप गरज आहे, कारण अगदी लहानशा गोष्टीवरूनही आपण वादावादी, हमरीतुमरीवर येतो. नमतं न घेता, समोरच्या व्यक्तीचं काही ऐकून न घेता, फक्त आपण बोलत राहतो. नात्यांतला जिव्हाळा, गोडवा विसरला जातो. जीवनाच्या शर्यतीत धावताना वैताग, निराशा येते अन् अनेकदा कडवटपणा बोलण्यातून बाहेर पडतो. सोबत चटपटीत, तिखट, झणझणीत घामाघुम करणारं खाद्य असतंच तामसीपणा वाढवायला. मग, माणसाने माणसाशी माणसासमं वागणे ही साधी सोपी सरळ गोष्टही आपण विसरून जातो.
रामदासस्वामी म्हणतात,
वरी चांगला अंतरी गोड नाही।
तया मानवाचे जिणे वेर्थ पाही।
वरी चांगला अंतरी गोड आहे।
तयालागी कोणीतरी शोधिताहे|
लेखक, निवेदक, कवी