सिडनी सेतू आरोहण

सिडनी बंदराच्या ढगाळ वातावरणातून थेट ४४० फूट उंचावर झेपावत, वाऱ्याच्या घोंगावत्या प्रवासात अनुभवलेली सिडनी सेतू आरोहणाची थरारक आणि ऐतिहासिक सफर!
सिडनी सेतू आरोहण
सिडनी सेतू आरोहण(फोटो सौजन्य - नवरोज धोंडी)
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

सिडनी बंदराच्या ढगाळ वातावरणातून थेट ४४० फूट उंचावर झेपावत, वाऱ्याच्या घोंगावत्या प्रवासात अनुभवलेली सिडनी सेतू आरोहणाची थरारक आणि ऐतिहासिक सफर!

नवीन वर्षाचा सोनेरी दिवस उजाडण्याआधीची संध्याकाळ! फटाक्यांची आतषबाजी आणि रंगीबेरंगी लुकलुकत्या दिव्यांची रोषणाई! विविध देशांत, विविध शहरांत, या रोषणाईचा आपला स्वतंत्र असा ठसा असतो. ऑस्ट्रेलियातील सिडनी ब्रिज आणि ऑपेरा हाऊस केंद्रस्थानी ठेवून केलेली रोषणाई अशीच नेत्रदीपक असते. दोन हजार साली आपण शतक ओलांडलं त्यावेळेस या सिडनी सेतूवरील ‘इटरनिटी’ या शब्दांवर केलेली दिव्यांची रोषणाई टीव्हीच्या पडद्यावर पाहिली होती तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की कधीकाळी आपण या ब्रिजची कमान चढून त्याच्या सर्वोच्च बिंदूवर उभे ठाकू.

सिडनीतला तो पहिला दिवस लख्ख आठवत असला तरी त्यादिवशी वातावरण मात्र ढगाळ आणि धूसर होतं. सिडनी बंदर, पूल आणि ऑपेरा हाऊस ही त्रिवेणी पाहायला सकाळीच तिथे पोहोचलो होतो. राखाडी आकाशाच्या पार्श्वभूमीवर, उमलत्या कमळाच्या पाकळ्यांसारखी दिसणारी ऑपेरा हाऊसची ती शुभ्र वास्तू उदास वाटत होती. त्याचा गाईडेड टूर आज काही कारणाने रद्द झाला होता. चहा कॉफीचा घुटका घ्यावा तर आत तरुणाई फुललेली. प्रचंड गलका, हसणं-खिदळणं, आणि सिगारेटच्या धुराची वलयं. आतील घुसमटीपेक्षा बाहेरील रिमझिम परवडली म्हणून सिडनी सेतू नजरेच्या टप्प्यात असेल अशा एका कट्ट्यावर विसावलो. पुलाच्या कमानीवर एका रेषेत कावळे बसले होते. थोड्यावेळाने त्यांची हालचाल बघून लक्षात आलं की ते कावळे नव्हेत; ती तर माणसं आहेत.

ऑस्ट्रेलियाला निघालेय म्हणताना उंचीची भीती असणाऱ्या एका मैत्रिणीनं शहारत, खांदे घुसळत, ‘ब्रिज क्लाइम्बिंग’चा केलेला उल्लेख आठवला. पण पुलावर म्हणजे पुलाच्या कमानीवर चढायचं … बाप्रे !

सकाळी हॉटेलमधून न बघताच उचललेली पत्रकं चाळली तेव्हा त्यात या टूरची माहिती मिळाली. ‘Climb of your life’ या ठळक वाक्यानं आमच्यातल्या थोड्या धाडशी पर्यटकाला हलवलं आणि हवेतली आणि मनातली मरगळ झटकून आम्ही सिडनी सेतू आरोहणाच्या ऑफिसच्या दिशेने चालू लागलो. ऑफिसमधील सारी व्यवस्था चोख! नेमून दिलेली कामं हसतमुखाने करणारे कर्मचारी, ब्रिजवर चढताना घालण्याच्या कपड्यांचा व्यवस्थित रचून ठेवलेला ढीग, क्लिपपॅडला लावलेले ना हरकत फॉर्म्स, त्यालाच लटकावलेलं पेन… आमच्या गटात आम्ही केवळ पाच जण होतो. आम्ही दोघं नवरा बायको, अवघे पाऊणशे वयोमान असलेली जपानी बाई, तिची पन्नाशीची मुलगी, आणि एकटा जीव सदाशिव असणारा इंग्रज गडी. ‘ऑस्ट्रेलियाला कसं काय येणं झालं?’ अशा प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण झाल्यानंतर आम्हाला ‘ब्रिजसूट’ देण्यात आले आणि त्यासोबत अनेक उपकरणं. रेडिओसेट, हँडसेट, एक रेनकोटची व दुसरी स्वेटरची पिशवी, टोपी आणि एक बक्कल आणि बेल्ट. नळकांड्यात फुंकर मारायला लावून आमच्या ‘सोवळे’पणाची चाचणी घेतली गेली. आता या उपकरणांची उपयुक्तता आणि त्यांची निश्चित जागा सांगण्यात आली. रेडिओ सेट पॅन्टच्या मागच्या बाजूस डावीकडच्या बेल्टमध्ये खोवायचा, रेनकोट अन स्वेटरची पिशवी उजवीकडे, टोपी उडून जाऊ नये म्हणून दिलेल्या स्प्रिंगसारख्या प्लॅस्टिकच्या केबलने शर्टाच्या कॉलरला अडकवायची. हेडफोन डोक्याला लावायचे पण त्याची टोकं कानावर नव्हे; तर कानशिलावर टेकवायची. एका रांगेत ब्रिज चढताना सगळ्यात शेवटी असलेल्या गाईडची कॉमेंट्री त्यातून स्पष्ट ऐकू येते. मला कुतूहल होतं त्या जाड बेल्ट आणि बक्कलचं. चढायला सुरुवात केल्यापासून उतरून येईपर्यंत तुमच्या बेल्टला असलेलं हे बक्कल ब्रिज रेलिंगच्या सरकत्या कडीत अडकवून टाकलेलं असतं. त्यामुळे तुम्ही कितीही उंचावर असलात, वाऱ्याचा झोक, पावसाचा मारा काहीही असो तुम्ही शंभर टक्के सुरक्षित असता.

‘शरीराला घट्ट पकडून ठेवणारा हा सुरक्षा पट्टा म्हणजे तुमची लाईफलाईन!’ असं म्हणत आमच्या गाईडनं आम्हा ‘गणवेशधारी’ प्रवाशांचा ताबा घेतला. या तरण्याबांड, हजरजबाबी आणि हसतमुख गाईडची स्मरणशक्ती तल्लख होती. ब्रिजबद्दलची इत्यंभूत माहिती त्याला होती. सिडनी हार्बर ब्रिजच्या कमानी जिथे किनाऱ्याला टेकतात तिथे चारी बाजूस चार मनोरे आहेत. यातील एका मनोऱ्यावर चढूनही आजूबाजूचा देखावा बघता येतो; पण कमानीवर स्वार होऊन सर्वोच्च बिंदूवर पोहोचण्याचा कैफ काही औरच! या कमानीला ब्रिजवरून जाणाऱ्या आठ पदरी रस्त्याइतकी (पन्नास मीटर) रुंदी आहे. ऑपेरा हाऊसकडून दिसणारी ब्रिजची पूर्व बाजू अन पलीकडची पश्चिम बाजू. सिडनी सेतू आरोहणाचा मार्ग संपूर्ण कमान ओलांडून (दक्षिणोत्तर) दुसरीकडे जाणं असा नसून, पूर्व कमानीवर चढून, सर्वोच्च बिंदूपाशी रस्त्याची रुंदी पार करून, पश्चिम किनाऱ्यावरून परतणं असा आहे. पुलावरच्या सुरुवातीच्या पायऱ्या सरळसोट! थोडीशी धाप लागली. एकावेळेस एकच माणूस चढायची खबरदारी घेत कमानीच्या तळाशी येऊन पोहोचलो. माझ्या पुढे चढत असलेल्या जपानी आजीच्या धापेला बहुदा सायलेंसर बसवला असावा. तुरुतुरु वर चढून गेली आणि ३६० अंश कोनातून देखावा बघण्यात रमून गेली. पुढचा चढ त्यामानाने खूपच सोपा वाटला. क्रमाक्रमानं उंची गाठणारा! त्यातही दर दहा मिनिटांनी थांबायचं, सृष्टीसौंदर्य न्याहाळायचं, गाईडनं दिलेली माहिती ऐकून अचंबित व्हायचं, भलत्याच चौकस अशा इंग्रज सहप्रवाशाची आणि गाईडची प्रश्नोत्तरं ऐकायची असं करत धीम्या गतीने ‘ब्रिज’क्रमण चालू होतं. दर थांब्याला समोरचं ऑपेरा हाऊस छोटं छोटं होत एखाद्या शिंपल्यासारखं दिसू लागलं. अजून थोड्या उंचीवरून तर सिडनी बंदराचा पूर्ण देखावा बघता आला. मजल-दरमजल करत कधी सर्वोच्च बिंदूवर म्हणजे ४४० फुटांवर येऊन पोहोचलो कळलंच नाही.

ब्रिजवर कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. कॅमेराच काय कुठलीही सुटी वस्तू तुम्ही वर नेऊ शकत नाही. हातातून निसटून ती एकतर पाण्यात पडू शकते किंवा खाली ये जा करणाऱ्या वाहनांवर. वाहनांवर पडली तर चालकाचं लक्ष विचलित होऊन मोठा अपघात घडेू शकतो. आम्ही वर पोहोचलो तेव्हा नाकाला जाणवली ती शुद्ध मोकळी हवा. जणू नुकताच प्राणवायूचा पुरवठा केलाय! वारा सोसाट्याचा नसला तरी घोंगावता होता. ऑपेरा हाऊसच्या कट्ट्यावर बसलेल्या लोकांना ओरडून सांगितलं की आम्ही कावळे नाही आहोत, माणसं आहोत माणसं!

आता आम्हाला पश्चिमेकडील कमानीवरून परतायचं होतं. आणि त्याआधी पुलाची रुंदी पार करायची होती. खाली सुसाट वेगानं पळणाऱ्या गाड्या दिसत होत्या. त्यावरील नजर काढून चेहरा ऊर्ध्वगामी करत पन्नास मीटरचं अंतर पार केलं आणि उतरणीला लागलो. गाईडच्या मनमोकळ्या स्वभावाचा फायदा घेत त्याला सांगितलं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच हा सेतू आरोहणाचा सुयोग घडत आहे. मला वाटलं, तो आनंदित होऊन आमच्याकडे बघेल, दोन्ही हात हातात घेऊन हस्तांदोलन करत आम्हाला शुभेच्छा देईल; पण अशी काही प्रतिक्रिया न देता तो म्हणाला, “असे खास दिवस साजरे करण्यासाठी इथे हजारो जोडपी येतात.” मी कसनुसं हसले. म्हणजे आम्ही हजारतले एक होतो तर..

गाईडने सांगितलेला उद्घाटनाच्या वेळेचा किस्सा फारच मजेशीर आहे. सोहळ्याची तयारी जय्यत होती. दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर फित बांधून तयार होती. पंतप्रधान जॅक लँग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. ते फित कापण्यासाठी उठले; तेवढ्यात सुसाट वेगाने एक घोडेस्वार आला आणि राजे जॉर्ज यांच्या नावाचा उद्घोष करत हातातल्या तलवारीने त्याने फित कापली. राजे जॉर्ज यांच्या हस्ते उद्घाटन न केल्याच्या निषेधार्थ हे कृत्य करणाऱ्या त्या महाभागाचं नाव होतं ‘फ्रान्सिस दि ग्रूट’. हा पार्लमेंटमधील उजव्या मताच्या न्यू गार्ड या ग्रुपचा समर्थक होता. त्याला त्वरित अटक करण्यात आली. (आगे त्याला पाच पौंडाचा दंड झाला) घाईघाईने पुन्हा ती फित बांधून पंतप्रधानांच्या हस्ते ब्रिजचं रीतसर उद्घाटन झालं. या ऐतिहासिक फितीचा तुकडा म्हणे आजही सिडनीच्या संग्रहालयात जतन करून ठेवला आहे.

हा ब्रिज बांधताना कमानीच्या बांधकामाची सुरुवात बंदराच्या दोन्ही किनाऱ्यांवरून झाली. १९३० मध्ये या कमानी सर्वोच्च बिंदूपाशी एकमेकांना भेटल्या. मुख्य रस्त्याचं काम नंतर बरोबर मध्यभागापासून सुरू करून किनाऱ्यांकडे बांधत नेलं. एवढ्या अवजड क्रेन परत किनाऱ्यापाशी नेण्याचे कष्ट वाचावेत म्हणून ही युक्ती केली आणि ती सफलही झाली.

ब्रिजच्या रीतसर उद्घाटनापूर्वी कमाल वजनासाठी त्याची एक चाचणी घेण्यात आली. त्यासाठी ब्रिजवर रेल्वे व्हॅगन, ट्राम्स, बस यांची मुद्दाम वाहतूककोंडी करवली. ब्रिजच्या पन्नासाव्या वाढदिवशी पाच लाख लोकांनी चालत हा ब्रिज ओलांडला. ब्रिजवर वाहतुकीसाठी आठपदरी रस्ता, दोन रेल्वे लाईन, पूर्वेकडे पादचाऱ्यांसाठी आणि पश्चिमेकडे सायकलींची वेगळी लाईन आहे. गंमत अशी की दस्तावेजाप्रमाणे गाई-म्हशींनासुद्धा हा ब्रिज खुला आहे. फक्त मध्यरात्री चालायला सुरुवात करून तांबडं फुटायच्या आधी गोठ्यात परतायचं अशी अट मात्र आहे. अन त्याची बी नोटीस द्यावी लागते बगा कशी…

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in