

स्ट्रेट ड्राईव्ह
ऋषिकेश बामणे
भारत आणि श्रीलंका येथे ७ फेब्रुवारीपासून होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी सर्व संघ करत आहेत. मात्र बांगलादेश-आयसीसी वाद, पाकिस्तानच्या सहभागाविषयी संभ्रम आणि स्कॉटलंडसारख्या संघाचे ऐनवेळेचे बदल यामुळे स्पर्धेच्या सुरळीत आयोजनावर शंका निर्माण झाली आहे.
लाँग ऑफ, लाँग ऑफ, लाँग ऑफ...’ समालोचक जतिन सप्रूचे हे शब्द कानी पडताच २०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवने घेतलेला निर्णायक झेल कोणत्याही सच्च्या क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यांसमोर येतो. बार्बाडोसमध्ये झालेल्या त्या महाअंतिम मुकाबल्यात भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला नमवून दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. रोहित आता टी-२०तून निवृत्त झाला आहे. मात्र रोहितच्याच तालमीतला आणि ६ चेंडूंत १६ धावांची गरज असताना सीमारेषेजवळ अफलातून झेल घेणारा सूर्यकुमार आता दोन वर्षांनी टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदा प्रथमच २० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. २०२३मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीत अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवले होते. तेथून सावरत भारताने पुढील दोन्ही आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, तर २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने आपली ताकद दाखवून दिली. नोव्हेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भारताचा माजी कर्णधार रोहितची या स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली.
आता घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषक खेळायचा असल्याने सूर्यकुमारचे शिलेदार जेतेपद कायम राखतील, अशी आशा चाहत्यांना आहे. त्यादृष्टीने भारताची तयारीसुद्धा उत्तम सुरू आहे. कारण २०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर भारताने अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या ३७ पैकी ३२ सामन्यांत भारताने यश संपादन केले आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघांना आपण धूळ चारली आहे. मात्र विश्वचषकाचे दडपण वेगळे असेल. तसेच खेळाडूंची तंदुरुस्ती व अपेक्षांचा दबाव या दोन गोष्टी भारतीय संघ कसा हाताळतो, याकडे लक्ष असेल.
मात्र भारताचा ज्या गटात समावेश आहे, त्यात पाकिस्तानचा संघही आहे. आयसीसीशी २०२७पर्यंत केलेल्या करारानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातील कोणतेही सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाही टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार आहे. तसेच पाकिस्तान त्यांचे सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. परंतु पाकिस्तानच्या विश्वचषकातील समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. आशिया चषकापासून भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू झालेला नवा वाद आणि बांगलादेशची विश्वचषकातून झालेली गच्छंती यामुळे हे प्रकरण अधिक तापले आहे.
जरा या दोन्ही घटनांचा थोडक्यात आढावा घेऊया. गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले. भारताने अपेक्षेप्रमाणे ही स्पर्धा जिंकली. मुख्य म्हणजे भारताने त्या स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा (साखळी फेरी, सुपर-आठ, अंतिम फेरी) धूळ चारली. या तिन्ही सामन्यांत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. अनेकदा सामन्यादरम्यान दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही झाली. भारताने मैदानात बाजी मारून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने मात्र भारताच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
जेतेपदानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यासही भारताने नकार दिला. पहलमाग येथे मे महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या केंद्र शासन व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मिळून हा निर्णय घेतला होता. आयसीसीच्या नियमानुसार पाकिस्तानशी खेळणे अनिवार्य असल्याने भारताला ते टाळता आले नाही. काही महिन्यांनी हे प्रकरण शांत झाले, मात्र ट्रॉफी अद्यापही भारताला देण्यात आलेली नाही.
यानंतर १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे आयपीएल २०२६च्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात कोलकाता संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी इतकी बोली लावून खरेदी केले. बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर सुरू असणाऱ्या अत्याचाराविरोधात कोणत्याही संघांनी बांगलादेशी खेळाडूंवर बोली लावू नये, अशी मागणी चाहत्यांनी केली. ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी आहे, तशीच बांगलादेशवरही ती घालण्यात यावी, असाही जोर त्यांनी धरला. कारण आयपीएलमधील अन्य कोणत्याही संघात एकही बांगलादेशचा खेळाडू नाही. परिणामी बीसीसीआयला आठवडाभरातच याची दखल घ्यावी लागली व त्यांनी रहमानला संघातून काढण्याचे आदेश कोलकाताला दिले. त्याबदल्यात त्यांना अन्य खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली. कोलकातानेदेखील देशभावना समजून हा निर्णय मान्य केला.
या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने मात्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी टी-२० विश्वचषकातील भारतात होणारे सामने अन्य ठिकाणी खेळवण्याची मागणी आयसीसीकडे केली. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावल्यानंतर बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेण्याची भीती दर्शवली. तेव्हाही आयसीसीने बांगलादेशच्या खेळाडूंना, तेथील चाहत्यांना किंवा पत्रकारांना भारतात धोका नसेल, याची हमी दिली. तसेच ठराविक वेळेत निर्णय न घेतल्यास बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा विश्वचषकात समावेश केला जाईल, असेही स्पष्ट केले.
अखेरीस बांगलादेश निर्णयावर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांची गच्छंती केली. यामुळे बांगलादेश क्रिकेटचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच यापुढील आयसीसी स्पर्धा व द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये त्यांना आणखी मानहानी सहन करावी लागू शकते. पाकिस्तानने बांगलादेशचे सामने त्यांच्या येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. तसेच बांगलादेशची हकालपट्टी झाल्यामुळे पाकिस्ताननेही आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करून माघार घेण्याचे संकेत दिले. आता २ फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानच्या स्पर्धेतील सहभागाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
या सर्वांमध्ये विश्वचषकाला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे. खेळात राजकारणाचा शिरकाव झाल्याने काहीसे नुकसानही होत आहे. भविष्यातही हे सर्व काही सुरूच राहील, असे समजते. भारत-पाकिस्तान अथवा भारत-बांगलादेश यांच्यात भविष्यात होणाऱ्या लढतींमध्ये वेगळाच जोश पाहायला मिळेल. त्यामुळे आता विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला, तर त्या लढतीतही दोन्ही संघांतील खेळाडूंच्या भूमिकेकडे अवघ्या विश्वाचे लक्ष असेल.
क्रिकेट हा जंटलमन्स गेम नाही! आशिया चषकातील अंतिम सामना मी स्वत: मैदानातून पाहिला होता. तसेच सध्याचे प्रकरणही तितकेच गंभीर आहे. मला कोणत्याही देशाचे नाव घ्यायचे नाही. मात्र सध्या क्रिकेट हा जंटलमन्स गेम राहिलेला नाही असे वाटते. खेळ व राजकारण वेगळे असायला हवे. दोन्ही देशांतील शासन व क्रिकेट मंडळ याविषयी विचार करतील व योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
नदीम मेमन, क्रिकेट प्रशासक
bamnersurya17@gmail.com