स्वेटर विणणारे पुरुष

निळं अथांग सरोवर, लाल मातीचे डोंगर, रानफुलांनी सजलेल्या पायवाटा आणि पारंपरिक वेशातील हसतमुख माणसं-टकिले बेटाचं हे चित्र मनात कायमचं घर करून राहतं. आधुनिकतेला दूर ठेवून 'आपण सारे' या भावनेनं जगणारं हे बेट म्हणजे सामुदायिक जीवनाचा सुंदर आदर्शच!
स्वेटर विणणारे पुरुष
स्वेटर विणणारे पुरुष
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

निळं अथांग सरोवर, लाल मातीचे डोंगर, रानफुलांनी सजलेल्या पायवाटा आणि पारंपरिक वेशातील हसतमुख माणसं-टकिले बेटाचं हे चित्र मनात कायमचं घर करून राहतं. आधुनिकतेला दूर ठेवून 'आपण सारे' या भावनेनं जगणारं हे बेट म्हणजे सामुदायिक जीवनाचा सुंदर आदर्शच!

पेरूमधील पुनो शहराजवळील उरूस जमातीच्या तरंगत्या बेटांवरची तासाभराची भेट संपवून पुढे अंदाजे दोन तासांच्या अंतरावरील 'टकिले' नावाचं एक छोटंसं बेट हा आमचा पुढचा पडाव होता.

किनाऱ्यापासून जवळच उथळ पाण्यात असलेल्या उरूस बेटांजवळील पाण्याचा रंग हिरवट दिसत होता. पंचेचाळीस किलोमीटर आत असलेल्या टकिले बेटाकडे जाण्यासाठी आम्ही निघालो तसतसा पाण्याचा रंग निळसर होत गेला. मध्येच म्हावऱ्यानं भरलेलं जाळं ओढणारे कोळी आणि पाण्यावर डुलणाऱ्या छोट्या नावा दिसत होत्या. निरभ्र आकाशाची रुंद कमान खाली पसरलेल्या अथांग निळाईशी स्पर्धा करत होती. थोड्या वेळानं लाल मातीचं टकिले बेट नजरेच्या टप्यात आलं. आजूबाजूला निळाभोर शांत जलाशय, दूरवर दिसणारी बोलिव्हियातील बर्फाच्छादित पर्वतशिखरं, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी साधीसुधी माणसं, त्यांची तितकीच साधी घरं आणि आपल्यापेक्षा भिन्न संस्कृती!

टकिलेच्या जमिनीवर पाऊल टाकताच मनात भरली ती त्या बेटावरील स्वच्छता आणि सुबकता. दगडी कमानींना पार करत आम्ही डोंगरावरील आमच्या यजमान कुटुंबाच्या घराकडे जाणारा उभा चढ चढू लागलो. पांढऱ्या रंगात रंगवलेले छोटे छोटे दगड डकवून सुबकशी वाट सुनिश्चित केलेली होती. त्या पाऊलवाटेच्या कडेने लावलेली रंगीबेरंगी फुलं लडिवाळ बालकांसारखी आम्हाला सोबत करत होती. उंच सखल असलेल्या या बेटाचं क्षेत्रफळ सात चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या इनमीन तीन हजार. एवढ्याशा बेटाची त्यांनी सहा भागात विभागणी केली आहे. प्रत्येक विभागाचा महापौर वेगळा. परंतु ही सगळी मंडळी इतक्या गुण्यागोविंदानं नांदतात की या बेटावर पोलीस ठाणंच नाही. 'चोरी कधी करू नये, खोटं कधी बोलू नये.' याबरोबरच 'आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे.' ही मोलाची त्रिसूत्री त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून म्हणजे इंकांकडून मिळाली. आजतागायत त्याबरहुकूम त्यांचं जीवन चालू आहे. प्रामाणिक, हसतमुख आणि एकजुटीनं काम करणारी प्रजा आणि साधं, समाधानी ग्रामीण जीवन!

आधुनिक सुखसोयींना या बेटावर मज्जाव आहे. आजही तिथे वीज नाही, नळ नाहीत. गाड्या, स्कुटर तर सोडाच; पण पेरू देशात आढळणारी लामा, अल्पाकासारखी ओझेवाहू जनावरंही नाहीत. आपल्याच दोन पायांची गाडी आणि ओझं वाहायला आपलाच भारदस्त खांदा!

आबालवृद्ध, स्त्रिया असे सगळेजण विनासायास चढउतार करताना आढळले. टाकिलेची उंची आहे ३९५० मीटर. आम्हाला नेमून दिलेल्या वस्तीवर पोहोचताच तेथील कुटुंबीयांनी आमचं स्वागत केलं. पश्चिमेकडील हस्तांदोलन, भारतीय नमस्कार किंवा जपान्यांसारखं कमरेत लवून केलेलं अभिवादन या कुठल्याही प्रकाराशी साम्य नसलेली त्यांची अभिवादन पद्धती आहे. ही मंडळी एकमेकांसमोर आली की तोंडभर मधाळ हसून कमरेच्या मागे खोचलेल्या बटव्यातून कोकोआच्या पानांची अदलाबदल करतात. जणू दसऱ्याला अदलाबदल होणारी आपट्याची पानं! त्या पानांचा मान राखत त्यातली थोडी तोंडात कोंबून उरलेली बटव्यात सरकवतात. ही कोकोआची पानं चघळली की उंचीवरील विरळ हवेमुळे होणारे डोकेदुखीसारखे त्रास होत नाहीत. वस्तीवरील घरं व्यवस्थित विटा मातीची होती. करड्या रंगाच्या भिंती आणि मोठ्या खिडक्या ! पैकी एका खिडकीतून पूर्ण फुललेला गुलाबी जिरंनियम डोकावत होता. मधोमध छान मोकळं आवार होतं. तिथे एका बाजूला गर्द सावलीचं पेंशन फ्रुटचं झाड आणि त्याच्याभोवती पार! भिंतीला लागूनही बसण्यासाठी बाकांसारखी व्यवस्था. आमच्या मनोरंजनाप्रीत्यर्थ तिथे मेंडोलीनवादन, थोडी नाचगाणी आणि लुटुपुटुचा विवाह सोहळा सादर झाला. त्यानंतर आम्हाला हातमागावरील विणकामाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या बेटाची खासियत म्हणजे स्वेटर विणणारे पुरुष! या बेटावरील प्रत्येक पुरुष, बायकांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या विद्येत पारंगत आहे. चौकात गप्पा ठोकत बसणाऱ्या इथल्या पुरुषांच्या हातात विडी नसून या सुया असतात आणि जितकी भराभर जीभ चालते तितक्याच वेगाने या सुया चालतात. हातमागावरील विणकाम, सूतकताई, मेंढ्यांची लोकर स्वच्छ करून, वाळवून त्याचे गुंडे करणं अशी कामं घरातील 'ताई-माई-अक्का' करतात आणि 'दादा-बाबा-काका' सुयांवर भराभर स्वेटर विणतात. अतिशय घट्ट वीण असलेले, त्यांच्या हातचे विणकामाचे सुबक नमुने अप्रतिम असतात. त्या जोरावर त्यांनी युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत जागा पटकावली आहे. मला तेथील रापलेल्या कांतीच्या स्त्री-पुरुषांचे पारंपरिक पोशाखच खूप आवडले. पुरुषांच्या पोशाखात होता खांद्यावर आणि मनगटापाशी चुण्या असलेला पांढरा शर्ट, त्यावर काळी किंवा निळी आखूड बंडी आणि काळ्या रंगाची जाड वूलन पँट. या पोशाखाला आकर्षक आणि उठावदार बनवणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे घट्ट विणलेला कंबरपट्टा, कंबरेला खोचलेला कोकोआ पानांसाठीचा बटवा आणि कानांवर झडपा असलेली गोंड्याची टोपी. त्याचा रंग लाल असेल तर तो विवाहित आणि पांढरा असेल तर 'यंदा कर्तव्य' असलेला. सप्तरंगी टोपीचा मान गावच्या सरपंचाला. आजी आणि माजीही! कंबरपट्ट्यावर बारा ठळक चिन्हं विणलेली असतात. त्यातील काही चिन्हं शेतीविषयक; तर काही धार्मिक विधींची! म्हणून त्याला 'कॅलेंडर बेल्ट' म्हणतात. क्वेचुआ या त्यांच्या स्थानिक भाषेत टोपीला म्हणतात 'चुल्लू', कंबरपट्टद्याला 'चुपी' आणि बटव्याला 'चुप्स' ! 'च'च्या बाराखडीतली ही कापडी आभूषणं त्यांच्या वेषाला उठाव आणतात हे नक्की !

महिलांच्या पोषाखात काळी शाल महत्त्वाची असून तिच्या रंगीबेरंगी गोंड्यांवरून (लालावरून सौभाग्यवती तर इतर रंगांवरून कुमारिका) ओळख पटते. फुगीर बाह्यांच्या लाल शांखाली त्या अनेक रंगांचे घागरे एकावर एक घालतात आणि सर्वांत बाहेरचा काळा स्कर्ट पेशवाई नऊवारीसारखा कंबरेला खोचतात. लग्नाची मागणी घालताना इच्छूक वराने घट्ट विणलेली टोपी ('चुल्लू') मुलीच्या वडिलांना द्यावी लागते, ज्यातून पाणी न गळल्यास तो परीक्षेत पास होतो. नंतर वाग्दत्त वधूला नवऱ्यासाठी लाकडी हातमागावर 'चुंपी' (कंबरपट्टा) विणावी लागते; ज्यात ती मुबलक पीक, घर, बालगोपाळ आणि भरपूर सरपणासारखी सुखाची स्वप्ने विणते.

यजमानांच्या अंगणात टीटीकाका जलाशयाच्या निळ्याशार निसर्गरम्य पार्श्वभूमीवर fresh ब्रेड, किनोवा सूप, बटाटा, भात, शाकाहारी स्ट्यू आणि ताज्या माशांच्या मोजक्या पण चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. बेटावर प्राथमिक आणि विणकामाचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी अशा दोन शाळा असून, आठवी पूर्ण झाल्यावर मुलांची रवानगी विणकाम शाळेत होते; म्हणूनच ही कला शतकानुशतके टिकून आहे. ४०५० मीटर उंच टेकाडावरून सुबक घरे, रानफुलांच्या दगडी पायवाटा आणि जमिनीचा कस राखण्यासाठी आलटून-पालटून घेतलेली सहा विभागांतील शेती दिसली. प्रखर उन्हापासून बचावासाठी सर्वांची डोकी झाकलेली होती.

प्रदक्षिणेदरम्यान घरांच्या आवारातील गुराढोरांमध्ये एका लहान मुलाचे मेंढीसोबतचे निरागस हसू मन मोहून गेले. १९७० पासून पर्यटनाला सुरुवात झाल्यावर बाहेरील संस्थांना फायदा होऊ नये म्हणून बेटावरील ज्येष्ठांनी एकत्र येत स्वतःची पर्यटन संस्था स्थापन केली. आळीपाळीने यजमानपद स्वीकारत पर्यटनातून मिळणारी कमाई सर्वांमध्ये समान वाटून त्यांनी चढाओढ व भांडणे टाळली. भिन्न व्यक्ती असूनही एकोप्याने जगणारे हे टकिले बेटावरील समुदाय खऱ्या अर्थाने आदर्श सामुदायिक जीवनाचे उदाहरण आहे.

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in