वारकरी संप्रदायातील विवेकी विचार

लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या, वारकरी संप्रदायातील विवेकी विचारांचे विवेचन करणाऱ्या दोन पुस्तिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित नुकत्याच प्रकाशित झाल्या. त्यानिमित्त या दोन पुस्तिकांचा घेतलेला हा मागोवा...
वारकरी संप्रदायातील विवेकी विचार
Published on

नोंद

मुक्ता दाभोलकर

लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या, वारकरी संप्रदायातील विवेकी विचारांचे विवेचन करणाऱ्या दोन पुस्तिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रकाशित नुकत्याच प्रकाशित झाल्या. त्यानिमित्त या दोन पुस्तिकांचा घेतलेला हा मागोवा...

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक, समीक्षक डॉ. तारा भवाळकर या गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहेत. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिलेला आहे.

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, संशोधनासाठी प्रा. भवाळकर यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. अनेक विद्यापीठांच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ म्हणून काम केलं. अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठातील साहित्यविषयक चर्चासत्रात आपली भूमिका मांडली. मराठी विश्वकोश, वाङ्मयकोश, ग्रंथकोश, समाज विज्ञान कोश, चरित्रकोश अशा विविध संदर्भग्रंथांच्या लेखनात सहभाग घेतला. दिवंगत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासोबत त्यांनी ‘महामाया’ हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. जानेवारी २०२५ ला नवी दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांचं समग्र लेखन हे वस्तुनिष्ठता, यथार्थ चिकित्सक दृष्टी आणि सैद्धान्तिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे.

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी अलीकडेच ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ आणि ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या दोन पुस्तिका लिहिल्या आहेत. अंनिसच्या वतीने त्या प्रकाशित होत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ या पुस्तिकेत तारा भवाळकर यांनी संतांच्या मानवतावादी व चिकित्सक विचाराचे विविध पैलू अभंगांचे दाखले देत स्पष्ट केले आहेत.

भक्ती चळवळीच्या उगमाची सामाजिक पार्श्वभूमी, स्त्रीशुद्रादिदास्यपीडित समाजाला त्यातून मिळालेला दिलासा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्या व्यक्तित्वाचा संक्षिप्त आढावा, शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेल्या संतांना प्रत्यक्ष जीवनात सोसावा लागलेला त्रास यांची मांडणी करून संतांचे विचार समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी प्रा. डॉ. तारा भवाळकर अधोरेखित करतात. अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल संतांचे विचार सांगताना, वैराग्याचे सोंग आणून ढोंगीपणा करणारे साधू, नवस, अघोरी उपासना, सोवळे-ओवळे, कर्मकांड, मरणोत्तर मुक्ती, प्रपंच व परमार्थ, जातिभेद, पाप आणि पुण्याच्या व्याख्या, गुरुपद, स्त्रीचा रजोधर्म अशा विविध मुद्द्यांबद्दलच्या संत रचना सांगून त्यावर भवाळकर यांनी भाष्य केलं आहे. वारकरी संतांबरोबरच बसव संप्रदायाबद्दलची थोडक्यात माहिती देखील या पुस्तिकेत आहे. भक्तीतील समतेचा उद्गार व्यक्त करताना वर्णवर्चस्वाला आव्हान देण्यासंदर्भातील मर्यादांचा उल्लेख देखील लेखिकेने केला आहे.

दुसरी पुस्तिका ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ यामध्ये त्यांनी मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई, बहिणाबाई या व इतर काही संत कवयित्रींच्या स्थूल चरित्रकथा सांगितल्या आहेत. तसेच त्यांच्या काही रचनांचे दाखले देऊन त्या रचनांचं विश्लेषणही केलं आहे.

‘उपाधी सोडणे हीच साधूची खरी समाधी आहे’ असे सांगणारी मुक्ताई, श्रम करणारी ग्रामीण स्त्री स्वतःला जिच्या रचनांमध्ये पाहते अशी जनाई, नायकिणीची मुलगी असलेली कान्होपात्रा, स्वतःला प्रिय असलेल्या भक्तिमय वातावरणाचा सासरी अभाव असल्याने सासर त्यागून आलेली नागरी उर्फ नागी, तिसऱ्या वर्षी तीस वर्षांच्या बिजवराशी लग्न लागलेली व सतत नवऱ्याची हिंसा सोसणारी बहिणाबाई वाचकांना या पुस्तिकेत भेटतील.

स्वत्व नाकारून नवरा, मुले, सासर यांच्या छायेत जगणं हाच पारंपरिक स्त्रीत्वाचा आदर्श मानला जात असताना स्त्रीविषयक पारंपरिक कल्पनांना छेद देणारे, आत्मनिष्ठा ठळकपणे व्यक्त करणारे संत कवयित्रींचे आत्मप्रगटीकरण लेखिका या पुस्तिकेतून उलगडते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणाले त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ही संत आणि समाजसुधारकांच्या विवेकी विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. सदर बाब या दोन्ही पुस्तिकांच्या वाचनातून अधोरेखित होते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मानणाऱ्या प्रत्येकासाठी तसंच हा विचार समजून घेण्याची व पुढे नेण्याची इच्छा असलेल्या सर्वांना या दोन पुस्तिका नक्कीच प्रेरणादायी वाटतील.

अंनिस कार्यकर्त्या

logo
marathi.freepressjournal.in