

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
आजच्या 'प्रत्येक पदार्थासाठी वेगळं भांडं' शोधणाऱ्या चोखंदळ युगात, एकाच काळ्याभोर लोखंडी तव्यावर अवघ्या घराचा संसार तृप्ततेने चालवायची जुनी, समृद्ध संस्कृती आता केवळ आठवणींच्या कप्प्यात उरली आहे."
आज घरोघरी प्रत्येक पदार्थासाठी वेगळं भांडं, पोळ्या करण्यासाठी वेगळा तवा, डोसा किंवा त्या जातकुळीतले पदार्थ बनवण्यासाठी वेगळा न चिकटा (non stick) तवा, अंड्याचं ऑमलेट करण्यासाठी लहानगा कडा गोलसर असलेला न चिकटा तवा, तर झुणका किंवा पिठलं बनवण्यासाठी एक वेगळा खोलगट तवा, पराठे बनवण्यासाठी अजून एक. घरात दुकानासारखे तवे दिसतात. माझी लेक काही दिवसांसाठी परदेशातून आली होती. जाताना दोन न चिकटे तवे घेऊन गेली. त्याआधी एकदा आली होती तेव्हाही दोन घेतले होते, एक जडशीळ लोखंडी तवा घेतला होता. कोणता कशासाठी हे कसं लक्षात रहातं कोण जाणे. बरं किंमतीही भरमसाठ असतात या न चिकट्यांच्या.
पूर्वी ना असं काही नव्हतं. प्रत्येक घराच्या स्वयंपाकखोलीत काळाभोर, वजनदार अंगाचा एकच तवा असायचा. याला स्वच्छ घासायला राखाडी आणि नारळाची किशी असे. स्वच्छ झाला की नव्यासारखा छान कुळकुळीत काळंभोर मूळ रूप घ्यायचा.
याच तव्यावर घरात कुणी आजारी असलं, काही खाण्याची इच्छा नसली तर त्याच्यासाठी पावाच्या
कापट्याना, थोडं घरचं तूप लावून भाजल्या जायच्या. पोळ्या तर याच तव्यावर व्हायच्या आणि नंतर याच तव्यावर थोडं तेल टाकून मस्त सांडगी मिरची तळली जायची. भरपूर कांदा लसूण घालून केलेला खमंग झुणका याच तव्यावर बनायचा आणि चतकोर चतकोर भाकरीसोबत पानात उतरायचा.
कधी कुणाला धिरडी किंवा थालीपीठ खायची लहर आली की याच तव्यावर ती घातली जायची, आणि लोण्यासोबत, ओल्या नारळाच्या तुकड्यासोबत खाल्ली जायची. या तव्यावर मेथी, लाल माठ, चवळीची परतून केलेली भाजी बनायची आणि तिला लसणाची फोडणी दिल्यावर, तिचा जीभखवळू दरवळ घरभर पसरून पोटात भूक उसळायची.
वेळेला घरात कुणाची कंबर धरली, पाठ धरली की याच काळया तव्यावर कपड्याचा बोळा सहन होईल इतका गरम करून पाठ कंबर शेकून काढली जायची.
सामिष खाणाऱ्या घरांत, बरेच दिवस माशाचं काही बनवलं नसलं, जिभेची सामिष खाण्याची हुळहुळ वाढली असली, की अंड्याचा मस्त गुबगुबीत खमंग पोळा(ऑमलेट) याच तव्यावर टाकला जायचा. बांगडा, पापलेट किंवा सुरमईचे तुकडे त्यांना मिरची मीठ मसाला लावून या तव्यावर चुरचुरीत तळले जायचे.
थोडक्यात या तव्याला कसलाही विटाळ नव्हता. सर्वसमावेशक वृत्तीने तो जे येईल ते अंगावर घ्यायचा.
अनेकदा पोळ्या करून झाल्या की वेळेला एखाद्या भांड्यातील पदार्थ थोडा उबदार किंवा ऊन होण्यासाठी ते भांडं याच्यावर स्वार व्हायचं. इतर लहान भांडी आपल्यावर एखादं अवजड भांडं चढवलं की कलंडून निषेध व्यक्त करायची. याचा तो स्वभावच नाही. त्यामुळे अंगावर पडलेलं काम काही न बोलता हा करत असायचा. पण स्त्रियांना पुळका मात्र इतर भांड्यांचाच असायचा. कौतुक, माया, जवळीक याच्या वाट्याला कधीच नसे.
एखादं छान घाटाचं भांडं जवळ घेऊन आणि मायेने त्यावर हात फिरवत घरातली स्त्री उद्गारायची, "हे माझ्या आईने वेगळ्या घाटाचं म्हणून मला दिलं. अजूनही कसं आपलं नवेपण टिकवून आहे अगदी.....". किंवा
"हा गंज माझ्या आज्जीने दिलाय बरं का, तिच्या वेळचा आहे. इतकी वर्ष झाली, आजही अगदी तस्साच आहे. आज्जीची आठवण करून देतो अगदी......"
तसं पाहिलं तर वर्षोंवर्ष तो ही आपलं रूप, उपयुक्तता परकेपण सोसूनही टिकवून ठेवणारा. पण एखाद्याच्या नशिबीच नसतं निखळ कौतुक करून घेणं त्याला काय करणार.
या काळया लोखंडी तव्यांना धरायला हॅण्डल वगैरे नसायची.
स्वयंपाकगृहातलं याचं काम संपलं की पकडीने त्याला उचलून आडबाजूला सरकवून दिलं जायचं, किंवा त्याच्या अंगावर चुरचुरणारं पाणी ओतलं जायचं आणि तापलेल्या त्याला थंड केलं जायचं.
चमचे, डाव, ओगराळी, काविलथा, ताटं सारे आपली ड्युटी निभावल्यावर आपापल्या स्वतंत्र जागी विश्रांतीला जायचे. भांडी, वाट्या, टोप ओट्याखालच्या मांडणीमध्ये उलटे होऊन विसावा घ्यायचे. याला मात्र स्वतःचं असं अढळपद कधीच मिळालं नाही. पूर्वी चुलीच्या, त्यानंतर गॅसच्या मागे खाली किंवा अगदी जागा मिळेल तिकडे तो तोल सावरत गुपचूप उभा रहायचा. या तव्याला मिळणारी ही परकेपणाची, एकटेपणाची वागणूक पुढच्या काळात आलेल्या न चिकट्या तव्यांना मात्र नाही मिळाली, त्या काळया तव्याचे भोग यांच्या वाट्याला नाही आले. उलट तवा या नावामधलं, रुपामधलं करपलेपण जाऊन non stick pan असं आधुनिक नाव त्याला मिळालं. यामध्ये अजून क्रांती होऊन कढया, खोलगट पॅन, डोसापॅन असे विविध आकारातले आणि सुंदर रूपातले nsp बाजारात, दुकानांत आकर्षक खोक्यातून कंपनीची जाहिरात करत मिरवू लागले.
स्वयंपाकघरातील, खिजगणतीतही नसणाऱ्या तव्याच्या या आधुनिक रूपाला इतकं महत्त्व आलं, की प्रसंगी हे भेटवस्तू म्हणून दिले जाऊ लागले.
आज या nsp वर ग्रिल्ड सँडविच, गोल वाटोळे खळगे असलेल्या पॅन मध्ये आप्पे असे अनेक पदार्थ बनतात. त्या तव्याच्या कायम नशिबी असलेली राख किशी यांनी सोलवटून काढणारी स्वच्छता यांच्या नशिबी नाही. यांना स्वच्छतेसाठी लिक्वीड सोप, मऊ न टोचणारे नायलॉन दोऱ्यांचे स्पंज. काळाचा महिमा दुसरं काय.
आजच्या पिढीला तो काळाभोर रंगाचा, दीर्घायुषी बहुउद्देशीय तवा कुठला माहित असायला. आज बायकोबरोबर बाजारात जात असताना रस्त्यात एके ठिकाणी थोडी गर्दी दिसली. डोकावलो तर लोखंडी हॅण्डल असलेले नसलेले काळेभोर तवे दृष्टीला पडले.
आमच्याकडे आजही एक तसा तवा आहे, ज्यावर फोडणी तडतडली, मिरची तळली, झुणक्यातल्या लसणाचा खमंग वास दरवळला की मन भूतकाळाची सफर करून येतं. आजही तसंच झालं, मन अलवार भूतकाळात गेलं आणि स्मृतीत जागं झालेलं शब्दांत उतरलं.
kprasad1959@gmail.com