

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
चहा म्हणजे गप्पांची सुरुवात, तर कॉफी म्हणजे जरा आखीवरेखीव भेट! एक सर्वांमध्ये सहज मिसळणारा, तर दुसरी आपला थोडा रुबाब सांभाळणारी. चहा आणि कॉफीच्या कपातून उमटलेल्या आठवणींची ही गंमतशीर कहाणी-
भारतीयांच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी इतक्या सहज मिसळलेल्या आहेत की, त्यांच्याशिवाय दिवसाची कल्पनाच करणं कठीण वाटतं. त्यापैकी एक म्हणजे चहा आणि कॉफी. सकाळची प्रसन्न सुरुवात असो, दुपारचा थकवा असो, मित्रांची मैफल असो किंवा कार्यालयातील छोटीशी विश्रांती, चहा किंवा कॉफीचा कप अनेक प्रसंगांचा अविभाज्य भाग बनला आहे. ही केवळ पेये राहिलेली नाहीत; त्यांच्याभोवती एक स्वतंत्र सामाजिक आणि सांस्कृतिक विश्व निर्माण झालं आहे.
चहाला या पृथ्वीतलावरचं अमृत असं संबोधलं जातं. आता शोध लावणारे म्हणोत बापडे, चहात टॅनिन आणि कॅफीन ही घटक द्रव्य असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला तरतरीत वाटत रहातं, वगैरे वगैरे. यामध्ये मला आजिबात शिरायचं नाही.
शालेय जीवनापासूनच माझी चहा या पेयाशी दोस्ती झाली. आम्हा भावंडांना सकाळी दूध पिण्याची सवयच नव्हती. दात घासून झाले की, चहा आणि घरचं ताजं लोणी लावलेला कडक पाव, पाटावर बसून मस्त चहात डुंबवून खायचा. तर अगदी तेव्हापासून चहा नावाच्या पेयाने, जे मनावर आणि जिभेवर गारूड केलंय ते अगदी आजपर्यंत.
तोपर्यंत इन्स्टंट कॉफीचा जमाना आलेला नव्हता. दुकानात तुम्हाला समोर दळून कॉफी पावडर दिली जायची, आणि चाहासारखीच ती पाणी उकळून आणि त्यामध्ये पावडर घालून, सोबत वेलची जायफळ टाकून कॉफीची लज्जत वाढवली जायची. कधीतरी प्यायला बरी वाटायची, पण चहाची सर तिला नाही. अर्थात हे आपलं माझं मत झालं, तमाम कॉफी प्रेमी नक्कीच यावर आक्षेप घेतील.
चहा म्हणजे फक्त पेय नव्हे; तो अनेकदा संवादाचं निमित्त असतो. चहाच्या कपाभोवती राजकारणापासून क्रिकेटपर्यंत, साहित्यापासून कौटुंबिक विषयांपर्यंत आणि कामापासून मैत्रीपर्यंत असंख्य चर्चा रंगतात.
लग्न होण्यापूर्वी ठाण्यात आमचा मित्रांचा मस्त ग्रुप होता. सगळे संगीत, नाट्य प्रेमी आणि अट्टल खवैये. प्रत्येक मित्राच्या घरी महिन्यातून एकदा जेवणाचा बेत असायचा. तेव्हा, ठाण्यात तलावपाळीच्या जवळ ताठे उपहारगृह नावाचं चहा, भजी, वडा मिळणारं ठिकाण आमचा सायंकाळचा अड्डा होतं. उपस्थित मित्र संख्येच्या निम्मी प्लेट भजी आणि कटिंग चहा याचा आस्वाद घेत, गप्पा, चर्चा, धम्माल चालायची. बसणं थोडं अधिक लांबलं की, कटिंग चहाचा दुसरा राऊंड व्हायचा.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ तेव्हा गोखले उपहारगृह होतं. संध्याकाळी तिथे गरमागरम बटाटा भजी मस्तच मिळायची. पण त्यांच्याकडे चहा मात्र मिळत नसे. वेलची जायफळ घातलेली चविष्ट कॉफी मिळायची. पण अहो, भज्यांसोबत कॉफी हे सूत्रच जुळत नाही, तिथे चहाच पाहिजे.
चहाप्रमाणेच कॉफीलाही भारतात विशेष स्थान आहे. विशेषतः दक्षिण भारतातील कॉफी संस्कृती जगप्रसिद्ध आहे. ताज्या भाजलेल्या कॉफीच्या बियांचा सुगंध आणि गरमागरम फिल्टर कॉफीचा कप अनेकांसाठी दिवसाची ऊर्जा असतो.
दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीची पद्धत, तिची विशिष्ट चव आणि स्टीलच्या कप-डबऱ्यातून दिली जाणारी कॉफी ही स्वतःमध्ये एक सांस्कृतिक ओळख बनली आहे. त्याचबरोबर आज शहरांमध्ये कॅफे संस्कृती वाढल्यामुळे कॉफीचे असंख्य प्रकार लोकप्रिय झाले आहेत. ब्लॅक कॉफी, फिल्टर कॉफी, कॅफे लॅटे, कॅपुचिनो, मोका, कोल्ड कॉफी अशा अनेक प्रकारांनी कॉफीप्रेमींच्या आवडीचं विश्व विस्तारलं आहे.
कॉफीचा कप अनेकदा एकांतातील साथीदार असतो. पुस्तक वाचताना, अभ्यास करताना, संगीत ऐकताना किंवा एखाद्या कल्पनेवर विचार करताना कॉफीचा सुगंध मनाला वेगळीच प्रसन्नता देतो.
कॉफी कुठे सजते सांगू का? शास्त्रीय संगीताची, नाट्यसंगीताची मस्त मैफिल जमलीय, मध्यंतर होतं, वेलचियुक्त कॉफीचा मनमोही स्वाद दरवळतो, गप्पा मारत तिचा आस्वाद घेऊन मैफिलीच्या उर्वरित भागाचा आनंद घ्यायला सज्ज व्हायचं. षष्ठयाब्दीपूर्ती समारंभ, पूजा अशा मंगल समारंभात केशरी पेढा आणि कॉफीच हवी. तिथे चहाला प्रवेश नाहीच. थोडक्यात काय तर कॉफी ही ठराविक कार्यक्रमांतच सजते आणि शोभून दिसते. चहा मात्र वेळेला, मंगल कार्यापासून ते अगदी कुठेही आपला डेरा टाकू शकतो. त्याला कुठेही मज्जाव नसतो.
खरं सांगू का चहाची सोबतच खूप जवळची वाटते. दोन मित्र, दोन परिचित ते अगदी दोन अनोळखी एकत्र आले, की पहिला संवाद घडतो, ‘चहा घेऊया ना थोडा थोडा?’ किंवा ‘चहा मारायचा का कटिंग ?’
अगदी तळागाळातील कुणी व्यक्ती ते कुणी मोठा साहेब, कुणीही असो, चहा मारल्यावरच त्यांचा मूड लागतो, हात वेगाने चालू लागतात, मेंदू अकटीव्ह होतो इ. इ.
‘चहा मारुया’ या शब्दातच चहाला लाभलेलं आपलेपण, जवळीक आहे. त्यामानाने कॉफी ही जरा स्टेटस वाढवणारी. ‘आम्ही रात्री जेवणानंतर कॉफीच घेतो’ यातून उगीचच आपला मोठेपणा सांगणारी.
‘कॉफी मारुया का ?’ असा प्रश्न कुणी कुणाला विचारत नाही, तर ‘We will meet there & first will take a cup of coffee & then.......’ असं सुरू होतं. सिनेमातले नायक नायिका सुद्धा, ‘आज शामको कॉफी पिने चले ?’ असं म्हणत मोठ्ठ्या मगमधून कॉफी पिताना दाखवतात. ते कशाला? अगदी आजची पिढी सुद्धा, ‘आज आम्ही CCD मध्ये कॉफी प्यायला गेलो होतो म्हणते. चहाला हा मोठेपणा, स्टाईल या सगळ्याची गरज लागतच नाही.
आता आमच्याकडे कांदे पोहे, उपमा अशा सकाळच्या न्याहारी सोबत.... म्हणजे अगदी सोबतच चहा लागतो. कधी बाहेरून वडा, सामोसा आणला की आणल्याबरोबर, “चहा आहे ना ? नाहीतर टाक दोन कप.” असं सांगितलं जाणारच.
चहामध्ये मसाला वगैरे घालून, चहाच्या मूळ चवीची जे वाट लावतात ना, त्यांची मला खरंच कीव येते. अहो, चहाला स्वतःची इतकी सुंदर चव, सुगंध असताना, का असं काहीतरी घालून त्याच्या चवीची वाट लावायची म्हणतो मी ?
मध्यंतरी साखर फार जाते पोटात या विचाराने, सकाळचा पहिला चहा स्कीप करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तो दोन तीन दिवस टिकला. चहाचं प्रेम आहेच तसं. चहाची सलगी कॉफीला नाही येत.
अहो, कधी आपल्या जवळचं, नात्यातलं कुणी जातं, त्या घरातलं वातावरण शोकाकुल होतं. सगळं आटोपून आपण घरी येतो, खूप थकवा आलेला असतो, आणि अशा वेळी कुणी सहृदय शेजारी चहा घेऊन येतात आणि गरम चहाचा कप हाती ठेवतात. त्या स्वादानेच अर्धा थकवा निघून जातो. नितांत गरज असते अशा वेळी चहाची. आपण नजरेतून अगदी मनापासून आभार मानतो त्या शेजाऱ्याचे.
असा हा चहा सर्वतोमुखी असणारा. कुणाच्या घरी गेल्यावर समोर चहा आला आणि आपण म्हटलं, ‘मी चहा घेत नाही, कॉफी घेतो’ की, त्या यजमानिणीची किती गोची होते. घरात कॉफीच नसेल तर काय करायचं? आणि असली तरी त्या गृहिणीला पुन्हा गॅस पेटवा, दूध पाणी चढवा, डबल त्रास. तसंही हल्ली कुणाकडे गेल्यावर आधीच विचारतात, ‘सगळे चहा घेणार ना ?’
तर असा हा सर्वसमावेशक चहा आणि ठराविक ठिकाणीच शोभून दिसणारी कॉफी.
चहाशी ओळख दोस्ती जवळीक चटकन होऊन जाते, आणि गट्टीही जमते, तशी कॉफीशी मात्र होत नाही, ती ही सगळ्यांशी जुळवून घेत नाही, आपली अंतर राखूनच रहाते...
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com