निरागासतेतला संदेश

शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान देण्यापेक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील नात्याची संवेदनशील वाटचाल आहे, जिथे छोट्या कृती, निरागस विचार आणि विश्वासातून शिक्षणाचं खरं सौंदर्य उलगडतं.
निरागासतेतला संदेश
निरागासतेतला संदेश
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान देण्यापेक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील नात्याची संवेदनशील वाटचाल आहे, जिथे छोट्या कृती, निरागस विचार आणि विश्वासातून शिक्षणाचं खरं सौंदर्य उलगडतं.

वाचनाच्या आनंद सोहळ्यात गेल्या काही दिवसांपासून एक शांत सुख माझ्या मनाला स्पर्श करत होतं. रोज काहीतरी वेगळं जाणवत होतं; पण त्यामागचं कारण उमगत नव्हतं. आज मात्र त्या आनंदाची सुंदर उकल झाली. वाचनाचा सोहळा सुरू होण्याआधीच वर्गात एक शांत लगबग सुरू व्हायची. सहावीतील आमची शीतल— वर्गातली सर्वात संवेदनशील, गुणी आणि स्वाभिमानी मुलगी. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. अनेकदा एखाद्या स्पर्धेत सहभागी व्हावंसं तिला वाटायचं; पण परिस्थिती तिच्या पायात अडसर घालायची. तरीही तिच्या चेहऱ्यावर कधीही हताशपणा दिसत नसे. डोळ्यांत एक वेगळी चमक… मनात अपार जिद्द… आणि स्वभावात विलक्षण नम्रता.

वर्गात ती फार बोलत नसे; पण तिच्या कृती बोलक्या असायच्या. माझ्या टेबल-खुर्चीची मांडणी— ती फक्त शीतलच करायची. इतक्या प्रेमानं आणि बारकाईनं की जणू ती एखादं पवित्र काम करत आहे. अनेकदा माझ्या टेबलावर सुगंधित फुलांची छोटीशी ओंजळ असायची— ती तिच्याच हातची. कोणालाही न सांगता, कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त मनापासून ती करत होती. अभ्यासातही ती मागे नव्हती. ईश्वरी, कल्याणी, खुशी, प्रतीक, प्रयास यांच्या रांगेतच तिचं नाव यायचं. अभ्यास, वर्तन आणि संवेदनशीलता— सगळ्याच बाबतीत संतुलित.

त्या दिवशी मी वर्गात येण्याआधीच ती पटापट चटई उचलून खालील धूळ झाडत होती. वर्ग आधीच साफ असतानाही ती पुन्हा सगळं नीट करत होती. मग टेबल साफ, खुर्ची नीट आणि एका छोट्याशा पानात ठेवलेली फुलांची ओंजळ. मी वर्गात प्रवेश करताच लेकरं नेहमीप्रमाणे माझ्याभोवती बसली. शीतल मात्र निवांत जिथे जागा मिळेल तिथे बसायची. पण त्या दिवशी ती अगदी माझ्यासमोर येऊन बसली होती. मला कुतूहल वाटलं. मी तिला विचारलं, “शीतल, सकाळी वर्ग साफ असतानाही तू पुन्हा वर्ग का साफ करतेस?“

ती थोडी लाजली. काही क्षण शांत राहिली. आणि मग हलक्या आवाजात म्हणाली, “खरं सांगू गुरुजी… तुम्हाला छान वाटावं म्हणून मी हे करते.“

मी हसत म्हणालो, “अगं, मला तर असंही छान वाटतं ना!“

ती पुन्हा म्हणाली, “तसं नाही गुरुजी… तुम्ही आनंदात असता तेव्हा आणखी छान गोष्टी सांगता. तुमचं मन प्रसन्न राहिलं तर तुमच्या डोक्यातले छान विचार आम्हाला ऐकायला मिळतात. म्हणून मला आपला वर्ग सुंदर ठेवावा वाटतो…“

मी तिचं बोलणं ऐकतच राहिलो… त्या छोट्याशा वाक्यात किती मोठा विचार दडलेला होता! त्या दिवशी मला जाणवलं, लेकरं फक्त शिकायला येत नाहीत; ती आपल्याला शिकवायलाही येतात. त्या दिवशी शीतलने वर्ग झाडला, टेबल सजवलं, फुलांची ओंजळ ठेवली पण खरं तर ती माझ्या मनातला थकवा झाडत होती.

“गुरुजींना चांगलं वाटलं पाहिजे…“— हे तिचं साधं वाक्य नव्हतं; तो माझ्यावरचा विश्वास होता… माझ्या विचारांवरचा तिचा हक्क होता. मला तेव्हा उमगलं; गुरुजींचं मन जेव्हा आनंदी असतं, तेव्हा त्यांच्या डोक्यातून फक्त धडे बाहेर पडत नाहीत तर स्वप्नं, प्रेरणा आणि आयुष्य बदलणारे विचार बाहेर पडतात. त्या दिवशी शीतलने वर्ग सुंदर केला नव्हता तर तिने माझ्या विचारांना उजाळा दिला होता. माझ्या शब्दांना नवं बळ दिलं होतं. आणि मला जाणवलं, मी ज्या लेकरांना शिकवत होतो, ती लेकरंच मला शिकवत होती. गुरुजींना चांगलं वाटावं म्हणून केलेली तिची छोटी कृती माझ्या बंद ओंजळीत एक मोठा, निरागस आणि आयुष्यभर सुगंध देणारा आनंद ठेवून गेली…

शिक्षणगूज संदेश : विद्यार्थ्यांच्या छोट्या कृतीतून त्यांच्या मनातील शिक्षकांविषयीचा विश्वास आणि आदर दिसून येतो. शिक्षक आनंदी आणि प्रसन्न असतील, तर त्यांच्या विचारांतून अधिक समृद्ध शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. वर्गातील नातं हे केवळ अध्यापनाचं नसून परस्पर संवेदनशीलतेचं असतं. विद्यार्थ्यांच्या निरागस भावनांचा आदर केला, तर शिक्षण अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनतं. शिक्षक आणि विद्यार्थी— दोघेही एकमेकांचे खरे शिक्षक असतात.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात

yuvrajmane892@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in