रुसव्याच्या पलीकडचं नातं…

शिक्षकी पेशा म्हणजे केवळ पुस्तकी धडे नव्हे, तर मुलांच्या मनातील न बोललेले शब्द वाचून तुटलेली मने संवादाने जोडणारी एक पवित्र साधना होय.
रुसव्याच्या पलीकडचं नातं…
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

शिक्षकी पेशा म्हणजे केवळ पुस्तकी धडे नव्हे, तर मुलांच्या मनातील न बोललेले शब्द वाचून तुटलेली मने संवादाने जोडणारी एक पवित्र साधना होय.

शिक्षक होणं म्हणजे फक्त पुस्तकातील धडे शिकवणं नव्हे…तर लेकरांच्या मनातील न बोललेले शब्द ऐकणं, त्यांच्या भावनांना ओळखणं आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणं होय.

शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसते, ती नात्यांची, भावनांची आणि अनुभवांची उबदार दुनिया असते. इथे मैत्री निर्माण होते, कधी रुसवे-फुगवे होतात आणि

त्या सगळ्यातूनच घडतं खरं

आयुष्याचं शिक्षण….

त्या दिवशी शाळा सुटली होती. नेहमीप्रमाणे लेकरं माझ्या भोवती जमली होती. कोणी आपला आनंद सांगत होतं, कोणी छोट्या तक्रारी मांडत होतं… पण त्या गोंधळात एक शांत चेहरा माझ्या नजरेत भरला- गाडीपाशी उभी असलेली कल्याणी.

मी जवळ गेलो, तर तिने काही न बोलता एक चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि हलक्या आवाजात म्हणाली,

“गुरुजी… घरी जाऊन वाचा…”

तिच्या डोळ्यांत एक वेगळीच अस्वस्थता होती. मी काहीच न बोलता ती चिठ्ठी खिशात ठेवली, पण मनात प्रश्नांची गर्दी सुरू झाली. चिठ्ठी आणि अस्वस्थता. घरी आल्यावर चिठ्ठी उघडली… आणि शब्दांनी मनाला स्पर्श केला -

“गुरुजी, वर्गात रुसा फुगा सुरू आहे.…

मला कोणी बोलत नाही.… माझी चूक असेल तर मला सांगा… पण मला खूप

एकटं वाटतंय.…”

क्षणभर मन सुन्न झालं…. कल्याणी गुणी, हुशार, आत्मविश्वासू… पण कधी कधी तिचा आत्मविश्वासच अहंकाराच्या सीमारेषेला स्पर्श करतो, हे मला माहीत होतं. त्या रात्री झोप लागली नाही.… एकच विचार मनात फिरत राहिला- “या लेकरांच्या मनातला दुरावा कसा मिटवायचा? संवादाची सुरुवात कशी करायची?”

दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो. मी फळ्यावर एक वाक्य लिहिलं- “आपण खरंच एकमेकांचे मित्र आहोत का?”

लेकरं शांत झाली… नी मी हळूच म्हणालो, “आज अभ्यास नाही…. आज आपण मन मोकळं करू या. कोणालाही शिक्षा नाही…. फक्त खरं बोलायचं.…”

मन मोकळं होताना… ईश्वरी उठली.

“गुरुजी… कधी कधी कल्याणी आम्हाला कमी समजते….”

मी विचारलं, “कसं?”

ती म्हणाली- “काल मी उत्तर चुकवलं, तर ती म्हणाली, हे पण येत नाही तुला?… तेव्हा खूप वाईट वाटलं.…”

साक्षीने सांगितलं, “ती खूप चांगली आहे गुरुजी… पण आमचं ऐकत नाही

कधी कधी…..”

ममताच्या डोळ्यांत पाणी होतं.. “मला तिच्यासोबत बसायचं होतं… पण ती म्हणाली, “तू नीट अभ्यास करत नाहीस. मला खूप वाईट वाटलं.…”

हे सगळं ऐकताना कल्याणी शांत बसली होती. डोळ्यांत अश्रू, मनात पश्चात्ताप. जाणिवेचा क्षण.

मी तिला विचारलं, “कल्याणी, तू

काही सांगशील का?”

ती थरथरत उठली- “गुरुजी… मला वाटत नव्हतं मी असं वागते…. मी फक्त चांगलं सांगत होते… पण मी त्यांना

दुखावलं का…?”

मी शांतपणे म्हणालो, “बाळा… चांगलं सांगणं चुकीचं नाही… पण शब्दांची पद्धत चुकीची असेल, तर ते जखम देतात.”

मी सगळ्यांना सांगितलं, “शब्द हे बियांसारखे असतात. …जे आपण दुसऱ्यांच्या मनात पेरतो… तेच एक दिवस त्यांच्या आयुष्याचं झाड बनतं. जर आपण टोचणारे शब्द पेरले… तर दु:खाचं झाड उगवतं… आणि जर प्रेमाचे शब्द पेरले… तर नात्यांचं सुंदर झाड फुलतं….”

तेवढ्यात प्रयास उठला. “गुरुजी… आपण सगळेच चुकलो…. कल्याणी चुकीचं बोलली, पण आपण तिला एकटं सोडलं… तीही चूक आहे.…”

तो कल्याणीपाशी गेला- “चल… पुन्हा मित्र होऊया.…”

क्षणात वातावरण बदललं.… साक्षी पुढे आली. “माफ कर.…”

ईश्वरीने हात पुढे केला- “आता रुसवे नाहीत….”

ममताने कल्याणीला मिठी मारली…. त्या क्षणी… वर्गात पुन्हा एकदा मैत्री फुलली…

त्या दिवसानंतर मी एक निर्णय घेतला— आठवड्यातून एक तास ‘मनमोकळी सभा’. जिथे लेकरं मनातील भावना व्यक्त करतील, एकमेकांना समजून घेतील आणि नात्यांची किंमत शिकतील.

शिक्षणगूज : या छोट्याशा प्रसंगातून मला उमगलं- वर्गातल्या सर्वात मोठ्या समस्या पुस्तकात नसतात, त्या मनात असतात…. अहंकार माणसाला एकटं करतो, पण संवाद त्याला पुन्हा जोडतो…. शिक्षकाचं खरं काम म्हणजे फक्त धडे शिकवणं नाही…, तर तुटलेली मनं जोडणं आहे…. आजही ती चिठ्ठी माझ्याकडे जपून आहे…. कारण ती फक्त कागद नव्हती…. ती एका लेकराच्या मनाचा आवाज होती… आणि मला माझं खरं शिक्षकपण पुन्हा जाणवून देणारी होती….

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.

yuvrajmane892@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in