बंद ओंजळीतला सन्मान

शिक्षकाचे खरे यश पुरस्कारात नाही, तर विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेत आणि विश्वासात दडलेले असते. गणपत, ईश्वरी आणि सागर यांचा अनुभव हेच त्याचे जिवंत प्रतीक आहे.
बंद ओंजळीतला सन्मान
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

शिक्षकाचे खरे यश पुरस्कारात नाही, तर विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेत आणि विश्वासात दडलेले असते. गणपत, ईश्वरी आणि सागर यांचा अनुभव हेच त्याचे जिवंत प्रतीक आहे.

शिक्षकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात, जे पुरस्कारापेक्षा मोठे, सन्मानपत्रापेक्षा मौल्यवान आणि शब्दांपलीकडचे असतात. विद्यार्थ्यांच्या ओठांवरून सहज उमटलेली एक विनंती, डोळ्यांत दाटलेलं पाणी आणि पायाशी नतमस्तक होणारी कृतज्ञता हेच शिक्षकाच्या जीवनातील खरे अलंकार असतात.

हा तसाच एक क्षण… ज्याने माझ्या ओंजळीत आयुष्यभरासाठी सन्मान साठवून ठेवला. लघु विश्रांतीची वेळ होती. शाळेच्या पटांगणात लेकरांचा गोंधळ, हसण्याचे आवाज, धावपळ सुरू होती. मीही त्या आनंदात उभा होतो. इतक्यात माझा माजी विद्यार्थी गणपत शाळेत आला. त्याने नम्रपणे नमस्कार केला. त्या नमस्कारात वर्षानुवर्षांची जपलेली कृतज्ञता होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलांसाठी काहीतरी उपक्रम आयोजित करण्याच्या हेतूने आला होता.

तो सहज भेटवस्तू देत नाही. ‘गुरुजी, मुलांनी मेहनत करून जिंकावं,’ हा त्याचा आग्रह असतो. त्याच्या या विचारातच त्याची उंची दिसते. आमचं नियोजन सुरू असतानाच ईश्वरी न सांगता दोन खुर्च्या घेऊन आली.

ईश्वरी- सुज्ञ, संवेदनशील आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण. मी बसलो; पण गणपत मात्र उभाच राहिला. ‘गुरुजींसमोर बसायचं नाही,’ हा त्याचा आजही न बदललेला संस्कार!

इतक्यात सहावीचा सागर आमच्याजवळ येऊन उभा राहिला. तो शांतपणे आमचं बोलणं ऐकत होता. अचानक त्याने मला विचारलं, “गुरुजी, हा तुम्ही शिकवलेला विद्यार्थी आहे का?”

मी हसून म्हणालो, “हो सागर, हा माझाच विद्यार्थी.” सागरच्या नजरेत आदर होता.

गणपत गावात ओळखला जाणारा, अभ्यासू आणि विचारांनी परिपक्व मुलगा. त्याच्याकडे पाहून सागर प्रेरित झाला होता आणि मग तो बोलला- “गुरुजी, आता ईश्वरीताई सातवीतून पुढे जाणार आहेत.… तुम्ही आमचा वर्ग घ्या ना! तुम्ही खूप छान शिकवता. मला तुमचं शिकवणं खूप आवडतं. आता तुम्ही पहिलीचा वर्ग न घेता आमचा वर्ग घ्या….”

क्षणभर सगळं स्थिर झालं. त्या निरागस शब्दांत केवळ आग्रह नव्हता- तो होता विश्वास. ते होतं प्रेम. ते होतं शिक्षकाच्या कार्याचं जिवंत मूल्यमापन!

ईश्वरी आधीच पुढच्या महिन्यात दुसऱ्या शाळेत जाणार म्हणून व्याकूळ होती. सागरचे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यांत साचलेलं पाणी ओघळलं. ती स्वतःला सावरू शकली नाही; रडतच वर्गात निघून गेली. त्या अश्रूंमध्ये वेगळंच नातं होतं-गुरुजींबद्दलचा अभिमान आणि दूर जाण्याची वेदना.

गणपत शांतपणे माझ्या पायाशी नतमस्तक झाला. त्या स्पर्शात त्याचं यश, त्याची कृतज्ञता आणि माझ्या अध्यापनाच्या प्रयोगांची साक्ष होती. मी त्याच्या पाठीवर थाप दिली. तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना मला जाणवलं- हा केवळ माझा विद्यार्थी नाही; हा माझ्या विश्वासाचा, प्रयोगांचा आणि प्रेमाच्या शिक्षणपद्धतीचा जिवंत पुरावा आहे.

ईश्वरी आणि गणपत- हे दोघं माझ्या अध्यापनातील केवळ विद्यार्थी नव्हते; ते माझ्या विचारांचं विस्तारलेलं रूप होते. एक जिद्दी नेतृत्व, एक कृतज्ञ यशस्वी युवक- दोघांनीही ‘गुरुजी’ या शब्दाला अर्थ दिला. सागर मात्र हे सर्व डोळ्यांत साठवत उभा होता. कदाचित त्या क्षणी त्याच्या मनातही एक स्वप्न अंकुरत होतं- “मीही असाच होईन!”

त्या दिवशी घरी परतताना माझ्या हातात काहीच नव्हतं…. ना सन्मानपत्र, ना फुलांचा गुच्छ, ना पुरस्कार. पण हृदयाच्या कुपीत मात्र भरून आलं होतं.. सागरची निरागस विनंती, ईश्वरीचे थरथरणारे अश्रू आणि गणपतचा कृतज्ञ स्पर्श. रात्रभर सागरचे शब्द कानात घुमत राहिले- “गुरुजी, तुम्ही आमचाच वर्ग घ्या…” त्या शब्दांनी मला झोपू दिलं नाही; पण त्यांनी मला नव्याने जागं केलं. त्या क्षणी जाणवलं- शिक्षकाचं खरं आयुष्य वर्षांनी मोजलं जात नाही, ते विद्यार्थ्यांच्या प्रेमाने वाढत जातं.

माझी ओंजळ त्या दिवशी रिकामी नव्हती ती सन्मानाने, अभिमानाने आणि अनंत कृतज्ञतेने भरलेली होती.

शिक्षणगूज- शिक्षणाचा खरा अर्थ गुणपत्रिकेत मोजता येत नाही. तो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतल्या विश्वासात आणि त्यांच्या शब्दांतल्या प्रेमात दिसतो. शिक्षकाने दिलेला धडा विसरला जाऊ शकतो; पण शिक्षकाने दिलेला आत्मविश्वास आणि जपलेलं नातं आयुष्यभर टिकतं. जिथे विद्यार्थी स्वतःहून गुरुजींना मागतात, तिथे शिक्षणाने आपलं सर्वोच्च शिखर गाठलेलं असतं.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात

yuvrajmane892@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in