

आनंदाचं झाड
युवराज माने
शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरते आमची. या दिवशी आम्ही फक्त पुस्तक वाचन करतो. ज्याला जे आवडेल ते वाचण्याची मुभा दिलेली असते. वीणा गवाणकर यांच्या ‘किमयागार’ या पुस्तकाचं वाचन सुरू होतं. वाचताना मी मध्येच थांबलो आणि लेकरांना म्हणालो, “बाळांनो, आता मी सोमवारपासून पुढे पाच दिवस प्रशिक्षणासाठी जात आहे. मला शाळेत यायला जमणार नाही.” हे ऐकताच सर्व वर्ग शांत झाला. लेकरं बारीक चेहरे करून माझ्याकडे पाहू लागली.
“गुरुजी, जावंच लागतं काहो प्रशिक्षणासाठी?”, स्वातीने विचारलं. मी मुलांना समजावून सांगू लागलो, तर मलाच प्रश्नांवर प्रश्न विचारू लागली.
“काय असतं तिथं?”
“कोण शिकवतं तुम्हाला?”
“तुम्ही तर गुरुजी आहात. आता तुम्हाला काय गरज शिकण्याची?” असे कितीतरी प्रश्न मुलं विचारू लागली. लेकरांना किती कुतूहल असतं अन् जाणून घेण्याची ओढ असते.
अगदी पहिल्या वर्गापासूनच या लेकरांच्या डोक्यात मी जाणिवांच्या बिया पेरल्या आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टींची जाणीव आहे. लेकरांच्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित होतं. मी म्हणालो, “बाळांनो, निसर्गात प्रत्येक गोष्ट काळानुरूप स्वतःत बदल करून घेत असते. हा नियम आहे. तसंच मी गुरुजी आहे, म्हणूनच मला नवं नवं काहीतरी शिकण्याची गरज आहे. स्वत:ला अद्ययावत करण्याची गरज आहे. त्यासाठीच हे प्रशिक्षण आहे. म्हणून मी पाच दिवस तिथं जाणार आहे आणि हो, मी तिथं माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी पण जाणार आहे.”
असं म्हणताच प्रतीक म्हणाला, “आमच्यासाठी, ते कसं काय गुरुजी?”
लेकरांना पडणारे प्रश्न आणि त्यांची हवी असलेली उत्तरं ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
मी म्हणालो, “प्रशिक्षण घेऊन आलो की सांगतो.”
मी तालुक्याच्या गावी पाच दिवस प्रशिक्षण घेत असताना मलाही लेकरांची प्रत्येक प्रसंगात आठवण येत होती. आमचे प्रशिक्षक खूप छान पद्धतीने आम्हाला भविष्यवेधी शिक्षणरचना व शिक्षकांनी स्वतःमध्ये करायचे बदल सांगत होते. यादरम्यान मात्र मला माझ्या बालपणातील एक गोष्ट सतत आठवत होती. दररोज ती गोष्ट डोळ्यासमोर येत होती. त्या गोष्टीचा आणि या प्रशिक्षणाचा अगदी जुळणारा धागा म्हणजे वडील आणि मी...
माझ्या बालपणातील ही गोष्ट. आमच्या गावचा बाजार तालुक्याच्या ठिकाणी भरायचा. दर मंगळवारी बाजार असायचा. मी प्रत्येक मंगळवारची आतुरतेने वाट पहायचो. आमच्या गावच्या बाजूला तालुक्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याकडे मोठी टेकडी होती. आठवडी बाजाराच्या दिवशी मी शाळा सुटली की त्या टेकडीवर जायचो. तिथं उभं राहून वडिलांची वाट बघायचो. टेकडीवर उभा असतानाही पायाच्या टाचा उंच करून माझे वडील कधी येतील, याची वाट पाहत असायचो. पुन्हा पुन्हा टाचा उंच करून त्या रस्त्याकडे पहायचो. वडील दिसले की उड्या मारतच पळत सुटायचो. माझे वडील प्रत्येक बाजारच्या दिवशी माझ्यासाठी काही ना काहीतरी घेऊन यायचे. मी अगदी कुतूहलाने त्या पिशवीत डोकवायचो. मी अधीर असायचो की बाबांनी आज माझ्यासाठी काय आणलं आहे हे पाहण्यासाठी...कधी खेळणी, तर कधी जिलेबी, भजे, पेढा, रेवड्या, पेरू, केळी..असं काही ना काही असायचं. त्यादिवशी मला होणारा आनंद आजही शब्दातीत आहे.
गेल्या पाच दिवसांत मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा आठवत आहे. कारण मी तुमच्यासाठी खूप काही आणणार आहे, असं मी लेकरांना सांगून आलोय. याची जाण ठेवून या पाच दिवसांमध्ये मी खूप काही जमा करून माझ्या लेकरांसाठी घेऊन जातोय. कधी एकदा शाळेत जाईन आणि माझ्या लेकरांना मी त्यांच्यासाठी काय काय आणलं आहे हे सांगेन, असं मला झालं होतं.
माझ्या शाळेतील लेकरं अशीच माझी आतुरतेने वाट बघत असतील का? आमचे गुरुजी तालुक्याच्या गावी गेले आहेत तर आमच्यासाठी काहीतरी नवं आणतील का? कल्याणी, खुशी, साक्षी, अरुण, निशा, अश्विनी, साधना, आकाश, आयशा ही सारी बच्चे कंपनी आपल्या पायांच्या टाचा उंच करून शाळेकडे येणाऱ्या रस्त्याकडे पहात माझी वाट बघत असतील का?
-प्रयोगशील शिक्षक व ललित लेखक