नुसतं थँक्स म्हणून भागत नाही!

मोबाईलमध्ये 'थँक्यू' म्हणण्यासाठी इमोजी आहेत, स्टिकर्स आहेत, तयार मेसेजेस आहेत. पण ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, कष्ट घेतले, त्यांच्यासाठी आपण किती वेळ देतो? कारण आभार मानणं आणि कृतज्ञ असणं यात फरक आहे. थँक्स गिव्हिंगच्या निमित्ताने कृतज्ञतेचा हाच अर्थ आणि त्यातून उमटणाऱ्या आनंदाचा घेतलेला हा वेध...
नुसतं थँक्स म्हणून भागत नाही!
नुसतं थँक्स म्हणून भागत नाही!
Published on: 

साधक-बाधक

क्रांती गोडबोले-पाटील

मोबाईलमध्ये 'थँक्यू' म्हणण्यासाठी इमोजी आहेत, स्टिकर्स आहेत, तयार मेसेजेस आहेत. पण ज्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, कष्ट घेतले, त्यांच्यासाठी आपण किती वेळ देतो? कारण आभार मानणं आणि कृतज्ञ असणं यात फरक आहे. थँक्स गिव्हिंगच्या निमित्ताने कृतज्ञतेचा हाच अर्थ आणि त्यातून उमटणाऱ्या आनंदाचा घेतलेला हा वेध...

कधी कधी आपण सहज म्हणून जातो, 'थँक्यू !' कुणी दार उघडून धरलं, कुणी लिफ्ट थांबवली, कुणी हातातली जड पिशवी उचलायला मदत केली, की आपल्या तोंडून आपसूक 'थैंक्यू' हा शब्द बाहेर पडतो. पण गंमत अशी की, थँक्स म्हणजेच धन्यवाद म्हणायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही; मात्र ज्याचे आभार मानायचे आहेत, त्याच्यासाठी वेळ काढणं अनेकदा जमत नाही. एखाद्याला 'तुम्ही माझ्यासाठी खूप केलं' असं सांगणं सोपं असतं; पण त्याच माणसाला गरज असताना त्याच्या बाजूला उभं राहणं जरा कठीणच !

अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा होणारा 'थँक्स-गिव्हिंग डे' हा सण याच कृतज्ञतेची आठवण करून देतो. साधारण चारशे वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक परंपरेशी या दिवसाची नाळ जोडलेली आहे. इंग्लंडमधून उत्तर अमेरिकेत आलेल्या पिलग्रिम्सना तिथल्या स्थानिक आदिवासी समुदायाने शेती, अन्न पिकवणं आणि शिकारीच्या पद्धती शिकवून तिथे राहण्यासाठी मदत केली. पीक कापणीनंतर या नवागतांनी स्थानिक लोकांना एकत्र जेवणासाठी आमंत्रित केलं, अशी या सणाच्या उगमाविषयी प्रचलित कथा आहे.

पण या सगळ्या उत्सवी वातावरणापलीकडे या दिवसाच्या नावात दडलेला एक विचार अधिक महत्त्वाचा वाटतो. 'थँक्स' आणि 'गिव्हिंग' ! म्हणजेच आभार मानणं आणि देणं. कारण नुसतं थँक्स म्हटलं म्हणजे झालं, असं नसतं. कृतज्ञतेची खरी जाणीव आपल्या वागण्यातून व्यक्त होते का, हा खरा प्रश्न आहे.

आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या हातात काहीच नसतं. आई-वडील आपल्याला वाढवतात, शिकवतात, आपल्या छोट्या-मोठ्या गरजा भागवतात. आपण चालायला लागण्यापासून स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंत कितीतरी हात आपल्याला आधार देत असतात. आईच्या जागरणांचा, वडिलांच्या कष्टांचा, आजी-आजोबांच्या मायेचा हिशेब कुठल्या वहीत मांडणार ? खरं तर या ऋणाची परतफेड करण्यापेक्षा त्याची जाणीव ठेवणं अधिक महत्त्वाचं.

आई-वडिलांच्या वाढत्या वयात त्यांच्याशी चार प्रेमाचे शब्द बोलणं, त्यांच्या औषधपाण्याची काळजी घेणं, त्यांना एखाद्या कामासाठी आपली गरज वाटली तर वेळ काढणं, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं... हीसुद्धा कृतज्ञताच नाही का? महागड्या भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करणं छानच; पण आईला तिच्या आवडीचा पदार्थ करून देणं किंवा वडिलांना त्यांच्या जुन्या आठवणी सांगताना निवांत सोबत करणं, याची किंमत एखाद्या गिफ्टपेक्षा कमी असते का? कधी कधी माणसांना वस्तूंपेक्षा आपली उपस्थिती अधिक हवी असते आणि ती देण्यासाठी क्रेडिट कार्ड नव्हे, तर मन लागतं!

आपण केवळ आई-वडिलांचेच नाही, तर समाजाचेही देणेकरी आहोत. आपल्या ताटातलं अन्न शेतकऱ्याच्या कष्टातून येतं. घरापर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या यंत्रणेपासून रस्ते स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक अनोळखी हात आपल्या जगण्याला हातभार लावत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे केवळ धन्यवाद म्हणणं नव्हे. त्यांच्या श्रमांचा आदर करणं, त्यांच्याशी सन्मानाने वागणं आणि शक्य असेल तिथे त्यांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणं, ही त्याची खरी अभिव्यक्ती आहे.

याचं उदाहरण म्हणजे हुसेन मन्सुरी याचं सेवाकार्य. रस्त्यावर राहणाऱ्या गरीब, वृद्ध आणि मुलांना अन्न, कपडे देण्यापासून ते कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि दुर्मिळ आजारांनी त्रस्त मुलांच्या उपचारांसाठी मदत मिळवून देण्यापर्यंत त्यांचं काम विस्तारलेलं आहे. आपल्याकडचं थोडंसं दुसऱ्याला देऊन त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी आधार देणं, हाच खरा सेवाभाव आणि कृतज्ञता.

याच कृतज्ञतेचा विचार निसर्गाप्रतिही असायला हवा. झाडं, नद्या, माती आणि डोंगर आपल्याला भरभरून देतात; पण आपण मात्र विकासाच्या नावाखाली त्यांचं नुकसान करतो. झाडं लावणं, ती जगवणं, पाणी जपणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं हीच निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी कृती.

एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करताना आपण किती मोठा त्याग करतोय, याची जाहिरात करण्याची गरज नसते. आपल्या घरात जास्तीचं असलेलं अन्न एखाद्या भुकेल्या माणसापर्यंत पोहोचवणं, आर्थिक अडचणीत असलेल्या मित्राला शक्य तेवढी मदत करणं, कुणाला नोकरीची संधी मिळवून देणं, एखाद्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणं... अशा छोट्या कृतींतूनही 'गिव्हिंग'चा अर्थ उलगडत जातो. मदत म्हणजे नेहमी पैशांचं दान असतं असंही नाही. आपला वेळ, कौशल्य, अनुभव, सहानुभूती, एखाद्याचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी, हेसुद्धा देण्याचेच प्रकार आहेत.

खरं तर कृतज्ञता ही दुसऱ्याला दिलेली पावती नसून स्वतःच्या मनाची एक सुंदर अवस्था आहे. आपल्याकडे काय नाही, याची यादी करण्यात आपण इतके रमतो की काय आहे, याकडे पाहायलाच विसरतो. सकाळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, आवडीचा चहा, घरातल्या माणसांची विचारपूस, मित्राचा अचानक आलेला फोन, दिवसभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांत क्षण... या गोष्टींचं मोल जाणवायला एखादा मोठा प्रसंग घडण्याची वाट पाहावी लागते का?

मानसशास्त्रीयदृष्ट्याही कृतज्ञतेची भावना महत्त्वाची मानली जाते. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी आणि माणसांची जाणीव ठेवण्याची सवय मनाला सकारात्मक दृष्टी देते. नात्यांमध्ये विश्वास वाढवते, संवाद अधिक मोकळा करते आणि राग, नाराजी यांसारख्या भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करते. म्हणजे कृतज्ञता ही केवळ मनात जपायची भावना नसून माणसांना एकमेकांशी जोडणारी एक अदृश्य साखळी आहे.

मात्र, कृतज्ञ असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट निमूटपणे सहन करणं नव्हे. कुणी आपल्यासाठी काही केलं म्हणून त्याच्या प्रत्येक चुकीला मान्यता द्यावी, स्वतःच्या गरजा कायम बाजूला ठेवाव्यात किंवा अन्याय सहन करावा, असा त्याचा अर्थ नाही. नात्यांमध्ये कृतज्ञतेइतकाच परस्पर आदरही आवश्यक असतो. देणं हे प्रेमातून यावं, अपराधीपणातून किंवा सक्तीमधून नव्हे.

शेवटी, आयुष्य म्हणजे केवळ आपल्याला काय मिळालं याची बेरीज नसते; आपण काय दिलं, याचीही ती एक नोंद असते. म्हणूनच कधीतरी स्वतःला एक प्रश्न विचारून पाहावा... आजवर मला काय काय मिळालं, याची यादी तर मोठी असेल; पण माझ्यामुळे कुणाच्या आयुष्यात काय बरं झालं? कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं? कुणाचा कठीण दिवस थोडा सुसह्य झाला ? कारण 'थँक्स' म्हणणं ही चांगली सुरुवात आहे; पण त्या थैंक्समधून एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवणं, हेच कदाचित 'गिव्हिंग'चं खरं सौंदर्य आहे !

krantip183@gmail.com