द डबा गँग

डब्यातला साधा घासही मनं जोडू शकतो, याची ही हृदयस्पर्शी गोष्ट...
द डबा गँग
द डबा गँग'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

कथा

हार्दिका

डब्यातला साधा घासही मनं जोडू शकतो, याची ही हृदयस्पर्शी गोष्ट...

सहावी 'अ'चा वर्ग म्हणजे नुसता राडा! जेवणाच्या सुट्टीची बेल झाली की, सगळा वर्ग पटापट डबे काढायचा आणि स्पर्धा लागल्यागत सगळे खात सुटायचे. पण या गदारोळात एक गोष्ट मात्र एकदम फिक्स असायची—सगळ्यांचे डबे उघडायचे आणि ‘कोणाच्या डब्यात काय आहे?’ याची विचारणा आणि शेअरिंग असायचं. नील, कबीर, वीणा आणि सायली यांची तर एक वेगळीच गँग होती. रोज एकमेकांचे डबे ओरबाडून खाण्यात त्यांना जी मजा यायची, ती कशातच नव्हती.

पण गेल्या महिनाभरापासून वर्गात एक नवीन मुलगा आला होता—आनंद. एकदम शांत, साधा आणि सतत अभ्यासात मग्न असणारा. आनंद हुशार होता, पण सुट्टी झाली की, तो कुणाशीच बोलायचा नाही. सगळेजण जेव्हा वर्गात टेबल जोडून डबे खायला बसायचे, तेव्हा आनंद गुपचूप आपला कापडी डबा घेऊन वर्गाच्या कोपऱ्यात जाऊन बसायचा.

एकदा नीलची वॉटर बॅग वर्गातच्या कोपऱ्यात राहिली होती, म्हणून तो ती घेण्यासाठी त्या कोपऱ्यात गेला. कोपऱ्यात आनंद दडवून डबा खात बसला होता. हा असा लपवतोय काय म्हणून नीलने डोकावून पाहिलं. आनंदच्या पोत्यासारख्या कापडी पिशवीतून निघालेल्या स्टीलच्या जुन्या डब्यात फक्त एक सुकी भाकरी आणि थोडी चटणी होती. आनंद अगदी लाजत-लाजत, कोणाला दिसू नये अशा बेताने तो तुकडा तोंडात टाकत होता.

नील थबकला, 'हा एवढं का लपवतोय?' हाच विचार करत त्याने डबा खाताना ही गोष्ट कबीर, वीणा आणि सायलीला सांगितली.

"नवीन आहे ना, म्हणून लाजत असेल," सायली म्हणाली.

कबीरने विचारलं, "पण डब्यात काय होतं ते दिसलं का?"

नील म्हणाला, "फार नाही, पण एकच डबा होता अन त्यात फक्त लाल चटणीसारखं काहीतरी होतं."

यावर वीणा हळहळली, "अरे, म्हणजे त्याला संकोच वाटत असणार! आपल्या डब्यात भारी पदार्थ नाहीत म्हणून तो लाजत असेल. आमच्याकडे काम करणाऱ्या मावशी पण सुरुवातीला असंच शिळं जेवण गॅलरीत लपून खायच्या. माझ्या आजीच्या हे लक्षात आलं, मग ती रोज 'घरात जेवण जास्त झालंय' असं निमित्त काढून त्यांना हक्काने ताजं जेवण देऊ लागली."

"आपण त्याला आपल्याबरोबर जेवायला बोलवायचं का?" सायलीने विचारलं.

वीणा चटकन म्हणाली, "छे, असं डायरेक्ट नाही, त्याला वाटेल आपण त्याची गरीबी लक्षात घेऊन दया दाखवतोय. हे त्याचा मनाला लागेल. कारण त्याचा खर्च शाळेतील जोशी सर करत आहे असं मला आईकडून कळलंय."

"आयडिया!" कबीर डोळे चमकवत म्हणाला. "आपण काहीतरी असं करू की, त्याला वाटलं पाहिजे हा फक्त एक खेळ आहे. नो सिंपथी... डायरेक्ट ॲक्शन!

दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीची बेल वाजली. मुलं आपापले डबे काढू लागली. आनंद नेहमीप्रमाणे बॅगेतून पिशवी काढून गुपचूप वर्गाच्या कोपऱ्यात सटकायला लागला.

इतक्यात नील जोरात ओरडला, "ए आनंद! थांब जरा. कुठे चाललास?"

आनंद दचकून थांबला. वर्गातले सगळे जण त्याच्याकडे बघू लागले.

कबीरने फळ्यावर खडूने मोठ्या अक्षरात लिहिलं—'द डबा गँग : मिसळ लंच!'

"मित्रांनो, आज आपल्या क्लासमध्ये आपण एक नवीन गेम खेळणार आहोत," कबीरने जाहीर केलं. "आज कोणालाही स्वतःचा डबा एकट्याने खाता येणार नाही. रूल नंबर वन— सगळे डबे एकत्र होणार आणि आपण सगळे मिळून एकाच प्लेटमध्ये खाणार. नील, सायली, वीणा... चला डबे काढा! हे आम्हांला टीचरने सांगितलं आहे. मी मॉनिटर आहे म्हणून सगळ्यांना सांगतोय."

लगेचच सायलीने घरून आणलेलं मोठं स्टीलचं ताट बाकावर ठेवलं. नीलने त्यात आपले गरमागरम चीज पराठे ठेवले, वीणाने चायनीज नूडल्स आणल्या होत्या त्या ओतल्या, कबीरने पास्ता ठेवला, सायलीने पोळी भाजी आणली होती तीही ताटात ठेवले. वर्गातल्या सर्व मुलांनी आपपपले डबे त्या ताटात ठेवले.

"आनंद, चल रे, तुझा डबा रिकामी कर यात!" कबीरने त्याचा हात पकडून त्याला बाकाकडे ओढलं.

आनंद बावचळला, गोंधळला. त्याने आपले हात पाठीमागे लपवले. "नाही रे... माझ्या डब्यात काही खास नाहीये. तुम्ही खा ना, मला भूक नाहीये आज," तो चाचरत म्हणाला. त्याचे डोळे जमिनीकडे झुकले होते.

"अरे, नखरे नको करू हं! आज जर गेमचा रूल मोडला, तर क्लास टीचरकडे तक्रार जाईल," वीणाने खोटे खोटे डोळे वटारले.

आनंदने अगदी थरथरत्या हाताने पिशवीतून तो जुना डबा काढला. संकोचाने त्याने झाकण उघडलं. त्यात तीच कोरडी भाकरी आणि चटणी होती. वर्गातल्या काही मुलांनी नाकं मुरडली. आनंदचा चेहरा एकदम पडला, तो तिथून पळणारच होता...

इतक्यात सायली ओरडली, "अरे वा! गावरान भाकरी आणि आजीच्या हाताची चटणी? काय सॉलिड कॉम्बिनेशन आहे! माझ्या आईला ही चटणी बनवताच येत नाही."

"थांब, थांब! ही भाकरी अशी नाही खायची," कबीर म्हणाला. त्याने कसलाही विचार न करता आनंदच्या डब्यातली भाकरीचा एक घास मोडला आणि चटणीला लावून तोंडात घातला. अरे वा मस्त एकदम झणझणीत. बघा तरी चाखून आपण असं कधीच खाल्लं नाहीये.

मग एकेकाने भाकरी-चटणी ट्राय केली. काहींची तर जीभ जळली. नीलने पहिला घास स्वतः तोंडात टाकला आणि त्याचे डोळे मोठे झाले, "अरे बापरे! एवढं तिखट कसं खातोस रे तू?"

"सवय आहे." आनंद म्हणाला.

सायलीने आनंदला बाकीचे पदार्थ चाखायला सांगितले. कसे झाले ते सांग आम्हांला. आनंद थक्क होऊन बघत होता. आनंदने एक एक घास तोंडात टाकला. त्याचा कोरडा कंठ आज हळूच ओला झाला. पण यावेळी घास गिळताना त्याला त्रास झाला नाही, कारण त्यात त्याच्या मित्रांच्या प्रेमाचा ओलावा होता. आनंदच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओल्या झाल्या, पण ओठांवर एक असं हसू आलं, जे त्याने गेल्या महिनाभरात कधीच काढलं नव्हतं.

त्यानंतर तो वर्ग बदलला, वयं बदलली, पण तो 'मिसळ लंच' कधीच बदलला नाही. आनंदला कधीच जाणवू दिलं गेलं नाही की तो वेगळा आहे. उलट, कधी कधी कबीर मुद्दाम घरून अर्धाच डबा आणायचा आणि म्हणायचा, "आनंद, आज जाम भूक लागलीये रे, तुझ्या डब्यातली अर्धी भाकरी दे ना!" आणि आनंदही मग अगदी हक्काने, राजासारखा आपली भाकरी त्याच्यासोबत वाटून खायचा.

कोणताही मोठा आव न आणता या मुलांनी संवेदनशीलतेचा खरा अर्थ कृतीतून दाखवला होता. त्यांची 'डबा गँग' आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती.

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in