
रसास्वाद
विकास पालवे
पुस्तकप्रेम, पुस्तकाचा शोध, पुस्तकांविषयीची चर्चा हे सारं जेव्हा एखाद्या कादंबरीचा भाग बनतं तेव्हा ती कादंबरी पुस्तकांच्या जगाला काही वेगळं देऊ पाहते. ‘द हाउस ऑफ पेपर’ ही कादंबरी काही गूढ वळणं घेत पुस्तकांची गुहा उघड करते. अभिषेक धनगर यांनी या कादंबरीचा सहजसुंदर अनुवाद केला आहे.
ओरहान पामुक या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला एकदा कुणीतरी विचारलं की, तुमच्या संग्रहातील सगळी पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का? तर पामुक म्हणाला, “हो, वाचली आहेत. पण मी ती सगळी वाचलेली नसती तरी ती माझ्यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण ठरली असती. एकापाठोपाठ एक पुस्तक विकत घेणं हे विटा विटा जोडत घर उभारण्यासारखं आहे.” पामुक याने त्याच्या ‘माय टर्किश लायब्ररी’ (My Turkish Library) या लेखात ही घटना नोंदवली आहे. या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे अभिषेक धनगर यांनी कार्लोस मारिया दोमिंगेझ् यांच्या ‘द हाउस ऑफ पेपर’ या कादंबरीचा केलेला अनुवाद. ही कादंबरी नुकतीच कृष्णा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाली आहे. पामुकने विटा विटा जोडत घर उभारण्याची जी उपमा पुस्तकसंग्रहाच्या बाबतीत दिली आहे तिची प्रचिती उलट्या अंगाने या कादंबरीत येते, पण पुस्तकवेडाचा धागा मात्र त्यात कायम आहे.
या कादंबरीचा निवेदक केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक आहे. त्याची सहकारी ब्लुमा लेनन हिने एमिली डिकन्सन या कवयित्रीचा एक कवितासंग्रह विकत घेतला आहे, रस्त्यातून चालता चालता ती तो वाचत असते आणि त्याचवेळी एका कारखाली येऊन तिचा अपघाती मृत्यू होतो, या घटनेपासून ही कादंबरी सुरू होते. तिच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी निवेदकाला तिच्या नावाचं एक पार्सल मिळतं. ते उरुग्वेमधून आलेलं असतं, पण त्यावर पाठवणाऱ्याचा पत्ता नसतो. त्यात जोसेफ कॉनरॅडच्या ‘द शॅडो लाइन’ या पुस्तकाची जीर्णशीर्ण झालेली प्रत असते. त्या पुस्तकावर सिमेंट-वाळूचे थर जमलेले असतात. हे पुस्तक ब्लुमाने कोणत्यातरी कार्लोस नावाच्या व्यक्तीला भेट दिलं होतं हे दर्शवणारा संदेश पहिल्या पानावर खुद्द ब्लुमानेच लिहिलेला असतो. हे पुस्तक आता तिच्या मृत्यूनंतर तिला का पाठवलं गेलं आणि हा कार्लोस कोण, असे प्रश्न निवेदकाला भेडसावू लागतात. तो या कार्लोसचा पत्ता हुडकून काढण्याचा आणि त्याला हे पुस्तक परत करण्याचा निश्चय करतो. इथून सुरू होतो त्याचा कार्लोसला शोधण्याचा प्रवास.
निवेदक स्वतः पुस्तकप्रेमी आणि ग्रंथसंग्राहक आहे. पुस्तकं आपल्या घराचा ताबा घेत आहेत आणि त्यांना कसं रोखावं हे त्याला समजत नाहीए. जी पुस्तकं आपण नजीकच्या काळात वाचणार नाही आहोत ती आपण स्वतःजवळ का ठेवतो, याचा गुंता त्याला सोडवता येत नाहीए. कोणत्याही अस्सल ग्रंथसंग्राहकासमोरचे हे पेच आहेत. कादंबरीकार पुस्तकांशी जोडल्या गेलेल्या पात्रांच्या माध्यमातून मानवी स्वभावाचेही विविध पैलू उलगडून दाखवतो. तसेच निवेदकाच्या भटकंतीच्या निमित्ताने काही शहरांचं त्या काळातील झपाट्याने बदलत जाणारं चित्रंही रेखाटतो. त्यामुळे वाचक भौगोलिकदृष्ट्याही त्या संबंधित परिसराशी मानसिकरीत्या जोडला जातो. पात्रांच्या संवादांची रचना तो अशा पद्धतीने करतो, की एखाद्या दीर्घ प्रवासात पुढे गूढ, रहस्यात्मक वळण यायचं अजून शिल्लक आहे, असं वाटावं.
दिनार्ली निवेदकाला देल्गादो या व्यक्तीची भेट घ्यायला सांगतो. देल्गादो हाही चांगला पुस्तक संग्राहक असतो. त्याच्या खासगी संग्रहात अठरा हजार पुस्तकं असावीत असा अंदाज तो निवेदकाशी बोलताना व्यक्त करतो. पुस्तकांविषयी, त्यांच्या संग्रहाविषयी, त्यांच्या जपणुकीविषयी दोघांत जो संवाद होतो तो निव्वळ अप्रतिम आहे. पुस्तकवेड्यांसाठी ती खास मेजवानी आहे. वाचनाने झपाटलेल्या कोणालाही वाचन, पुस्तकं, ग्रंथसंग्रह यांविषयी त्याच्या मनात उमटणाऱ्या भावनांना कुणीतरी जवळचा मित्र शब्दरूप देतो आहे, असं वाटण्याची शक्यता आहे. जातिवंत पुस्तक वाचकाची दैनंदिन रगाड्यात अडकल्यानंतर होणारी तगमग, बेचैनी व्यक्त करताना देल्गादो म्हणतो की, “मला सकाळी आठपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बऱ्यापैकी जबाबदारीचं काम करावं लागतं; पण त्यातला एकेक क्षण इथं - माझ्या या गुहेत (म्हणजे पुस्तकांच्या सहवासात)- परत येण्यासाठी मी व्याकूळ असतो.” देल्गादो त्याला कार्लोसविषयी, त्याच्या ग्रंथवेडाविषयी, पुस्तक वाचनाच्या सवयींविषयी, पुस्तक वाचताना त्याच्या नोंदी करण्याच्या पद्धतीविषयी आणि गॅरेजमध्ये पुस्तकं ठेवता यावीत म्हणून स्वतःची कार मित्राला देऊन टाकणं व बाथरूममध्ये पुस्तकं ठेवता यावीत म्हणून गरम पाण्याने अंघोळ करणं सोडून देऊन भर हिवाळ्यातही थंड पाण्याने अंघोळ करणं (गरम पाण्यामुळे वाफ तयार होऊन पुस्तकं खराब होण्याचं भय) अशा पुस्तकप्रेमाने तुडुंब भरलेल्या त्याच्या जगण्याविषयी सविस्तर माहिती देत जातो.
पुढे एक दुर्घटना घडते आणि कार्लोसला त्याचं घर विकावं लागतं. त्याच्या घटस्फोटित पत्नीला पैसे द्यायचे असतात ते तो देऊन टाकतो आणि वीज, पाणी अशी कसलीही सोय नसलेल्या एका रेताड भागात जाऊन घर बांधू पाहतो. पण या घरासाठी विटा म्हणून गवंड्यांना पुस्तकं वापरायला सांगतो. या पुस्तकांनी वारा, पाऊस आणि थंडीपासून त्याचं संरक्षण करावं असं त्याला वाटत असतं आणि आश्चर्य म्हणजे तो तसं घर बांधून घेतो आणि त्यात राहतोही. मला असं वाटतं की, इथवर झालेला त्याचा प्रवास हा त्याने पुस्तकवेडाचं गाठलेलं सर्वात शेवटचं टोक आहे. पुढे जे काही घडतं त्याला त्याच्या मनात असणाऱ्या ब्लुमाबद्दलच्या हळव्या, नाजूक भावनांची किनार आहे. त्याच्या घरांच्या पुस्तकभिंतींतून ब्लुमाला हवं असलेलं ते पुस्तक शोधताना त्याच्या घराची दुर्दशा होते आणि एवढं करूनही ते पुस्तक ब्लुमापर्यंत पोहोचता पोहोचता उशीरच झालेला असतो. निवेदक या दोघांची मरणोत्तर भेट कशी घडवून आणतो हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे. एक शब्दही इकडचा तिकडे करावा लागू नये अशा गोळीबंद कवितेसारखा या कादंबरीचा शेवट आहे.
या कादंबरीची निर्मिती अतिशय सुंदर केलेली आहे. यात प्रामुख्याने पुठ्ठाबांधणी, चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ आणि आतील चित्रं यांचा मोठा वाटा आहे. पुस्तकाला असलेली किशोर कदम यांची प्रस्तावना मात्र निराश करते. साधारण कवितेच्या ओळी, पुनरुक्ती आणि पुस्तकातल्याच अवतरणांनी व्यापलेली जागा यामुळे ही प्रस्तावना पुस्तकाला जोडलेल्या ठिगळासारखी वाटते. पण सुदैवाने कादंबरीचं आशयद्रव्य, वाचकाची उत्कंठा टिकून राहील अशी केलेली रचना आणि धनगर यांनी केलेला तिचा प्रवाही अनुवाद यामुळे कादंबरी संग्राह्य झालेली आहे. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या, तीव्र वाचन असोशी असणाऱ्या कोणत्याही अट्टल वाचकाच्या संग्रही असायलाच हवी अशी ही कादंबरी आहे. वाचकाने केव्हाही उघडून वाचायला घेतली तरी त्याला त्या कादंबरीत स्वतःच्या पुस्तकप्रेमाने व्यापलेल्या जगण्याच्या सावल्या हलताना दिसतील.
साहित्याचे आस्वादक आणि अभ्यासक