विराट वादळाची अधुरी कहाणी

एखादी प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्यानंतर दिग्गज खेळाडूच्या कारकीर्दीच्या पर्वाचा अस्त होणे, हे अपेक्षित असते. मात्र एकीकडे आधीच देशभरात तणावाचे वातावरण सुरू असताना तारांकित खेळाडू विराट कोहलीने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून पत्करलेली निवृत्ती कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली.
विराट वादळाची अधुरी कहाणी
Published on

स्ट्रेट ड्राईव्ह

एखादी प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकल्यानंतर दिग्गज खेळाडूच्या कारकीर्दीच्या पर्वाचा अस्त होणे, हे अपेक्षित असते. मात्र एकीकडे आधीच देशभरात तणावाचे वातावरण सुरू असताना तारांकित खेळाडू विराट कोहलीने अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून पत्करलेली निवृत्ती कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. एका तपाहून अधिक काळ कसोटी क्रिकेटवर राज्य गाजवणाऱ्या विराटला आता पुन्हा क्रिकेटच्या त्या पांढऱ्या पारंपरिक पोशाखात पाहता येणार नाही. किंबहुना त्याला थाटात निरोप देता येणार नाही, याची खंत तमाम चाहत्यांना कायम राहील.

क्रिकेटच्या कसोटी प्रकाराने संपूर्ण आयष्यात सातत्याने माझी कसोटी पाहिली. खेळाडू आणि माणूस म्हणून मला घडवण्यात कसोटी क्रिकेटने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे मी सदैव कसोटी क्रिकेटचा ऋणी राहीन.” आधुनिक काळातील ‘किंग’, ‘मॉडर्न मास्टर’, ‘रनमशीन’ अशा विविध नावांनी लोकप्रिय असलेल्या विराट कोहलीने निवृत्तीच्या संदेशात व्यक्त केलेल्या या भावना अनेकांच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून राहतील.

३६ वर्षीय विराटने १२ मे रोजी क्रिकेटच्या सर्वाधिक आव्हानात्मक आणि पारंपरिक अशा कसोटी प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या घोषणेच्या काही दिवस आधीच कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा कसोटी क्रिकेटला अलविदा केला. मात्र रोहितच्या तुलनेत विराटच्या निवृत्तीने चाहत्यांना अधिक खोलवर धक्का बसला. सातत्यपूर्ण कामगिरी, मैदानातील आक्रमक वावर आणि संघावर असलेला त्याचा प्रभाव यामुळे कसोटीत विराटचे विराटपणे वेगळे दिसून यायचे. सध्याची पिढी टी-२० क्रिकेटच्या मागे धावत असताना विराटने गेल्या दशकभरापासून कसोटीचे महत्त्व टिकवून ठेवले. अनेकांना त्याचा आक्रमकपणा डोळ्यांत खुपणारा किंवा अनावश्यक वाटू शकतो. मात्र विराट कर्णधार असताना भारताची गोलंदाजी पाहणे ही चाहत्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असायची, हेही तितकंच खरं. संघ दडपणाखाली असला किंवा फलंदाज म्हणून कामगिरी खालावलेली असली तरी विराटच्या देहबोलीकडे पाहून ते कधीच जाणवायचे नाही. हीच बाब विराटला अन्य खेळाडूंच्या तुलनेत खास ठरवते. त्यामुळे भारतासाठी कसोटीतील सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या विराटची निवृत्ती अनेकांना दुखावणारी ठरली.

कोरोनानंतरच्या कालावधीत विराटचा कसोटीमध्ये संघर्ष सुरू झाला. गेल्या पाच वर्षांत त्याला कसोटीत तीनच शतके झळकवता आली होती. कदाचित आपली सुमार कामगिरी त्याला स्वत:लाच सतावत होती. तसेच बीसीसीआयच्या काही नियमांनाही विराटचा विरोध असल्याने त्याने कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या इराद्याने निवृत्ती पत्करल्याची चर्चा आहे. विराटच्या निवृत्तीस कारणीभूत ठरलेल्या दोन महत्त्वाच्या मालिका म्हणजे मायदेशातच न्यूझीलंडविरुद्धचा ०-३ असा पराभव, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-३ अशी नामुष्की. या मालिकांमध्ये विराटला अवघे एकच शतक साकारता आले. विराटची कसोटीतील सरासरीसुद्धा प्रथमच ५०पेक्षा खाली गेली. मात्र क्षेत्ररक्षण करताना किंवा संघासाठी हिताचे निर्णय घेताना त्याची ऊर्जा कुठेही कमी पडल्याचे वाटले नाही. विराटचे कुटुंब लंडनला स्थायिक असल्याने त्यांना वेळ देणेही कठीण जात होते. बीसीसीआयच्या नियमानुसार आता ४० दिवसांचा दौरा असेल, तर कुटुंबीयांना फक्त १५ दिवसच खेळाडूसह राहण्याची परवानगी आहे. या अशा बाबींचा अखेरीस कुठे ना कुठे परिणाम झाला. विराट आता फक्त एकदिवसीय प्रकारात आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी विराट प्रयत्नशील आहे. मात्र बीसीसीआय आणि प्रशिक्षकीय चमूचा पाठिंबा मिळाला नाही, तर विराट त्यापूर्वीच एकदिवसीय प्रकारालाही अलविदा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपूर्ण १० हजार धावा
विराट कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त ७७० धावा पिछाडीवर होता. १२३ कसोटींमध्ये विराटने ९,२३० धावा करताना ३१ अर्धशतकं व ३० शतकं झळकावली. मात्र सिडनी येथे जानेवारीत खेळलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी कसोटीच विराटच्या कारकीर्दीतील अखेरची कसोटी ठरली, तर त्याने मायदेशातील अखेरची कसोटी न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळली. कर्णधारपद गेल्यानंतर विराटने रोहितला पूर्ण पाठिंबा दिला. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित-विराटने एकत्रितपणे त्या प्रकारातून निवृत्ती पत्करली. कसोटीला मात्र दोघांनीही मैदानाच्या बाहेरूनच अलविदा केला.

भारतीय संघ २० जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून उभय संघांत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी विराटचे संघातील स्थान पक्के होते. विशेषत: रोहितच्या अनुपस्थितीत विराटच संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू होता. त्यामुळे तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेल, असेच सर्वांना वाटले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका संपल्यावर विराट रणजी स्पर्धेतही १३ वर्षांनी खेळला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची कोणी कल्पनाही केली नव्हती. मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवून देण्यातही विराटने मोलाचे योगदान दिले होते. आयपीएलमध्येही विराट सहज धावा काढत असून युवा खेळाडूंना लाजवेल, असे क्षेत्ररक्षणही करत आहे. मात्र मध्यंतरी आयपीएल स्थगित झाल्यावर आपसुकच इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या संघनिवडीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि आठवडाभराच्या अवधीत विराट कसोटीतून निवृत्तही झाला.

एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, १९ वर्षांखालील विश्वचषक अशा सर्व प्रकारच्या आयसीसी स्पर्धांचे जेतेपद मिळवणाऱ्या विराटला कसोटी क्रिकेटपटू म्हणून आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. २०२१ व २०२३ मध्ये भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विराट किमान पुढील दोन वर्षे या प्रकारात सहज खेळला असता, असेच प्रत्येकाचे मत आहे. मात्र त्याच्या अनपेक्षित निवृत्तीमुळे भारताच्या कसोटी संघात आता पोकळी निर्माण झाली आहे. तसेच कसोटीतील कोहलीची ‘विराट’ कहाणी अधुरी राहूनच संपली, हे सत्य पचनी पडण्यास बराच अवधी लागेल.

bamnersurya17@gmail.com

अनोखे रसायन

विराटच्या मानसिक कणखरतेविषयी सांगायचेच झाले, तर २००६मध्ये रणजी स्पर्धेत कर्नाटकविरुद्धची लढत सुरू असतानाच विराटच्या वडिलांचे निधन झाले. जबाबदारीची झोळी परिस्थितीने अंगावर टाकण्याआधीच त्या मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मॅच सोडून विराट तातडीने विधींसाठी रवाना झाला. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ खेळायला मैदानात दाखल झाले. तेव्हा विराटला तेथे पाहून दोन्ही संघांतील खेळाडू अवाक झाले. दिल्ली संघाच्या प्रशिक्षकांनी त्याला समजावले की, तुला खेळायलाच हवे असे काही नाही. आम्ही समजू शकतो. मात्र विराटने त्यांना सांगितले की, “माझे बाबा जिवंत असते, तर त्यांना मी क्रिकेट खेळणेच आवडले असते. संघाबाहेर बसणे नाही. मी फक्त माझ्या बाबांची इच्छा पूर्ण करत आहे.” इतके सांगून फलंदाजीची वेळ आल्यावर विराटने ९० धावा फटकावल्या. त्याला शतकाने हुलकावणी दिली. मात्र पॅव्हेलियनमध्ये परतताना त्याने आकाशाकडे पाहून डोळे मिटले. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधारही त्याला आलिंगन देण्यासाठी धावत आला. विराट हे रसायन काय आहे, कदाचित याचीच ती पहिली झलक होती. पुढे विराटने केलेले करिष्मे आपल्यासमोर आहेतच.

logo
marathi.freepressjournal.in