

नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
एका छोट्याशा कल्पनेने संगणकाचे जग कायमचे बदलून टाकले. चला, 'कट, कॉपी, पेस्ट' या भन्नाट शोधामागची रंजक गोष्ट...
काय मग दोस्तांनो! अभ्यास करताना, एखादा प्रोजेक्ट किंवा पीपीटी (PPT) बनवताना 'Ctrl + C' आणि 'Ctrl + V' ची जादू न वापरणारा तुमच्यापैकी कोणी आहे का? नक्कीच नाही! मोबाईलवर चॅटिंग करताना एखादा मेसेज फॉरवर्ड करायचा असो, किंवा संगणकावर गृहपाठ करताना माहिती गोळा करायची असो... आपल्या बोटांना सर्वात जास्त सवय असते ती एकाच गोष्टीची— 'कट, कॉपी, पेस्ट'! पण कधी विचार केलाय का, की आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेली ही 'जादूची किल्ली' नेमकी शोधली कोणी? आणि या शोधाचा तुमच्या शाळेच्या 'चिकटवहीशी' (Scrapbook) काय बरं संबंध असेल?
आजकाल तुम्ही सगळेच कॉम्प्युटर वापरायला शिकलात ना? मस्त! पुढच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी हे 'टेक्नो सॅव्ही' असणे खूप गरजेचे आहे बरं का!
आता चाचणी परीक्षांचे वेध लागले असतील. प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याची धावपळ सुरू होणार आणि त्यासाठी 'चिकटवही' (Scrapbook) सुद्धा तयार करावी लागणार! विषयानुरूप योग्य चित्रे शोधायची, ती नीट कापायची आणि वहीत चिकटवायची... खरंच, खूप मजा येते ना हे काम करायला?
पण हेच काम तुम्ही आता टेक्नोसॅव्ही झाल्यामुळे संगणकावर किंवा मोबाईलवरही कित्येकदा करत असाल ना? प्रेझेंटेशन तयार करताना किंवा नोट्स लिहिताना! कॉम्प्युटरवरच नाही, तर मोबाईलवर देखील जगभरातील सामान्य लोकांना सर्वात जास्त उपयोगी ठरलेली कमांड कोणती माहित आहे? ती म्हणजे— 'कट, कॉपी आणि पेस्ट'!
एखादा शब्द पुन्हा वापरायचा असेल, किंवा एखादी गोष्ट चुकीच्या ठिकाणी लिहिली गेली असेल आणि ती आता दुसरीकडे न्यायची असेल, तर अगदी पटकन आपण चित्र, शब्द, वाक्य... इतकंच काय, अख्खा परिच्छेद किंवा लेखही 'कट, कॉपी, पेस्ट' करतो.
पण तुम्हाला माहित आहे का? १९८० च्या आधी हे काम करणे फार अवघड होते. मग कोणी बरं शोधून काढले असेल इतके छान आणि सोपे फिचर?
सामान्य लोकांना संगणक सहज वापरता यावा याचा सतत ध्यास घेतलेल्या लॅरी टेसलर यांनी हे फिचर शोधले; आणि विशेष म्हणजे, तुम्हा शाळकरी मुलांमुळेच त्यांना ही कल्पना सुचली! संगणक फाईलमध्ये एखादा शब्द किंवा चित्र कापून पुन्हा चिकटवता आले तर किती सोपे होईल, या विचारात असताना लॅरी यांना शाळेतले प्रोजेक्ट्स आणि चिकटवही आठवली!
बस, अगदी असंच हवे आहे आपल्याला... कापा आणि चिकटवा! आणि या हुशार प्रोग्रामरने 'कट, कॉपी, पेस्ट' हे फिचर तयार केले. लॅरी यांनी झेरॉक्स, ॲपल, ॲमेझॉन, याहू अशा अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. हे फिचर शोधल्यानंतर लॅरी ॲपल कंपनीत रुजू झाले. १९८३ साली ॲपलच्या संगणकात हे फिचर समाविष्ट करण्यात आले आणि त्यानंतर जगभरात ते प्रचंड लोकप्रिय झाले! संगणक 'युझर फ्रेंडली' (वापरायला सोपा) असावा, ही संकल्पना मांडणारे आणि संगणकाला तसा चेहरा मिळवून देणारे लॅरीच होते.
लॅरी यांचा एक संशोधक मित्र होता— टीम मॉट. एकदा टीम संगणकासमोर बसून काम करत होता. काम करताना हाताने टेबलवर बोटांनी तो सहज ताल धरत होता... टॅप टॅप! अचानक त्याला एक कल्पना सुचली. तो तसाच धावत लॅरीकडे आला आणि म्हणाला, "टॅप! आपण युझरला एखाद्या शब्दावर टॅप करायला किंवा डबल क्लिक करायला सांगू शकू का? ज्यामुळे त्या शब्दाची पूर्ण माहिती दुसरीकडे उघडू शकेल?"
झालं! यातूनच 'टॅप' तयार झाले आणि आज आपण मोबाईल वा कॉम्प्युटरवर 'टॅप, टॅप'ची ती जादू अनुभवत आहोतच! सामान्य लोकांसाठी असे अनेक उपयुक्त फीचर्स लॅरी यांनी तयार केले.
लॅरी आता आपल्यात नाहीत. फेब्रुवारी २०२० मध्येच त्यांचे निधन झाले. परंतु, लॅरी यांचा झेरॉक्स कंपनीत सत्तरच्या दशकात काम करतानाचा एक छान फोटो आहे. त्यांची आठवण म्हणून तो फोटो तुम्ही इंटरनेटवरून नक्कीच 'कट, कॉपी' करून आपल्या संगणकावर 'पेस्ट' करू शकता!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar@gmail.com